योग्य वेळी आध्यात्मिक अन्न
१. यहेज्केल ३६:२९ आज कशाप्रकारे पूर्ण होत आहे?
१ “मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुम्हावर दुष्काळ आणणार नाही,” असे सार्वभौम प्रभू यहोवा म्हणतो. (यहे. ३६:२९) हे भविष्यसूचक शब्द आज देवाच्या लोकांच्या बाबतीत खरे ठरत आहेत. लाक्षणिक अर्थाने, यहोवाने आपल्या लोकांकरता जीवनदायक धान्य विपुल प्रमाणात उपजवले आहे. आपल्या प्रांतीय अधिवेशनांच्या माध्यमाने पुरवले जाणारे समयोचित आध्यात्मिक अन्न ही गोष्ट स्पष्टपणे दाखवते.
२. यहोवाने यथाकाळी आध्यात्मिक अन्न पुरवण्याकरता प्रांतीय अधिवेशनांचा कशाप्रकारे उपयोग करून घेतला आहे?
२ कोलंबस, ओहायो येथे १९३१ साली पार पडलेल्या अधिवेशनात यहोवाने आपल्या उपासकांना यहोवाचे साक्षीदार हे नवे नाव स्वीकारण्यास मार्गदर्शित केले. (यश. ४३:१०-१२) १९३५ साली प्रकटीकरण ७:९-१७ यात उल्लेखलेल्या मोठ्या लोकसमुदायाची अचूकपणे ओळख करून देण्यात आली. १९४२ साली बंधू नॉर यांनी “शांती—ती टिकू शकेल का?” या विषयावर व्याख्यान केले. या व्याख्यानामुळे जागतिक प्रचार कार्याला चालना मिळाली आणि वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेची स्थापना झाली. अर्थात, अशी काही अधिवेशने खास संस्मरणीय ठरतात; पण प्रत्येक अधिवेशन हे समयोचित व पौष्टिक आध्यात्मिक अन्नाची मेजवानीच असते.—स्तो. २३:५; मत्त २४:४५.
३. प्रांतीय अधिवेशनातील आध्यात्मिक मेजवानीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
३ तुम्ही योग्य आहार घेत आहात का? मुबलक अन्न उपलब्ध असूनही जर आपण ते खाण्याची तसदी घेतली नाही तर आपण कुपोषित होऊ शकतो. (नीति. २६:१५) हेच आध्यात्मिक अर्थानेही खरे आहे. एखाद दोन अधिवेशनात असे पाहण्यात आले आहे की कार्यक्रम सुरू असताना बरेचजण विनाकारण फिरत असतात किंवा इतरांशी बोलत असतात. उभारणीकारक सहवासाचा आनंद घेणे हे नक्कीच अधिवेशनाचे एक मुख्य आकर्षण आहे पण याची योग्य वेळ प्रत्येक सत्राच्या आधी व नंतर असते. (उप. ३:१, ७) आपण आपल्या जागेवर बसून कार्यक्रमाकडे लक्ष दिले नाही, तर एखादा मुख्य मुद्दा आपल्या हातून निसटून जाण्याची शक्यता आहे. प्रवास व उष्ण वातावरणामुळे काहींना मध्येच डुलकी लागण्याची शक्यता आहे. पण आदल्या रात्री पुरेशी झोप घेतल्यास आपल्याला दुसऱ्या दिवशी जागे राहण्यास व कार्यक्रमाकडे लक्ष लावण्यास सोपे जाईल. अधिवेशनातील विविध विभागांचे पर्यवेक्षक व नेमणुका हाताळणारे बांधव, यांना कधीकधी कार्यक्रम सुरू असताना अधिवेशनाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्याची गरज पडू शकते. पण एरवी त्यांनीही कार्यक्रमाकडे पूर्ण लक्ष देण्याद्वारे इतरांपुढे उत्तम आदर्श ठेवावा. सर्वांनी दररोजच्या समाप्तीच्या प्रार्थनेपर्यंत आपल्या जागेवर राहावे. आपल्याला पुरवल्या जाणाऱ्या आध्यात्मिक अन्नाचा थोडाही भाग आपण चुकवता कामा नये.—१ करिंथ. १०:१२; फिलिप्पै. २:१२.
४. यहोवाने पुरवलेल्या विपुल आध्यात्मिक अन्नाबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?
४ ख्रिस्ती धर्मजगताच्या निःसत्त्व खोट्या सिद्धान्तांच्या तुलनेत यहोवाने पुरवलेली सकस आध्यात्मिक सत्ये खरोखर किती आनंददायक आहेत! (यश. ६५:१३, १४) याबद्दल आपली ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे अधिवेशनाला यहोवाद्वारे शिकवले जाण्याची एक संधी मानणे. (कलस्सै. ३:१५) भाषण देणाऱ्याकडे पाहू नका, तर तो सांगत असलेली माहिती आपल्या ‘महान शिक्षकाकडून’ येत आहे या दृष्टीने पाहा. (यश. ३०:२०, २१; ५४:१३) मनःपूर्वक लक्ष द्या. मुख्य मुद्द्यांच्या संक्षिप्त टिपा लिहून ठेवण्यास विसरू नका; कारण यामुळे तुम्हाला दररोज संध्याकाळी, त्या त्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या ठळक मुद्द्यांची उजळणी करण्यास मदत मिळण्यासोबतच काही महिन्यांनंतर सेवा सभेत घेतल्या जाणाऱ्या अधिवेशनाच्या तोंडी उजळणीत सहभाग घेणेही शक्य होईल. शिकलेल्या गोष्टी आचरणात आणा.
५. प्रांतीय अधिवेशनांच्या निमित्ताने आपल्याला आनंदी होण्याची कोणती कारणे मिळतात?
५ हर्मगिदोन येण्याआधी होणारे प्रत्येक अधिवेशन, मग ते एखाद्या निर्वासितांच्या शिबिरात असो, युद्धग्रस्त देशात असो किंवा शांतीपूर्ण परिस्थितीत पार पडणारे भव्य अधिवेशन असो, हे सैतानाविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा पुरावा आहे! संघटित बंधूसमाज या नात्याने प्रांतीय अधिवेशनांच्या निमित्ताने एकत्रित होण्याच्या सुसंधी आपल्याजवळ आहेत त्यांची आपण मनापासून कदर करतो. (यहे. ३६:३८) आपल्याला खात्री आहे की पुन्हा एकदा यहोवा आपल्याला प्रेमळपणे, “योग्य वेळी शिधासामुग्री” पुरवेल.—लूक १२:४२.
[४ पानांवरील चौकट]
यहोवाने पुरवलेल्या अन्नाबद्दल कदर असल्याचे दाखवा
◼ मनःपूर्वक लक्ष द्या
◼ मुख्य मुद्द्यांच्या टिपा घ्या
◼ दररोज संध्याकाळी त्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या ठळक मुद्द्यांची उजळणी करा
◼ शिकलेल्या गोष्टी आचरणात आणा