पुनरावृत्ती न होणाऱ्या कार्यात भाग घेणे
१ मानवी इतिहासाच्या विविध समयांदरम्यान, आपल्या शत्रुंवर न्यायदंड बजावणे यहोवास आवश्यक वाटले. परंतु, त्याच्या दयेमुळे त्याने सरळ अंतःकरणाच्या लोकांना तारणाची संधी पुरवली. (स्तोत्र १०३:१३) त्यांच्या प्रतिसादानुरुप त्यांचे भवितव्य ठरले.
२ उदाहरणार्थ, सा. यु. पू. २३७० मध्ये जलप्रलय येण्याआधी, नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता. ईश्वरी इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा नाश झाला. (२ पेत्र २:५; इब्री. ११:७) सा. यु. ७० मध्ये जेरुसलेमच्या नाशाआधी येशूने, त्या शहरावर येणाऱ्या नाशापासून वाचण्याकरता आवश्यक असलेल्या कृतींबद्दल स्पष्टपणे सांगितले होते. त्याच्या इशारेवजा संदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वांना भयंकर परिणाम भोगावे लागले. (लूक २१:२०-२४) अशा प्रकारचे ईश्वरी इशारे व न्यायदंड इतिहासात अनेक वेळा पुनः पुनः घडले.
३ आधुनिक दिवसातील इशाऱ्याचे कार्य: यहोवाने हे फार पूर्वीच घोषित केले होते, की आजच्या दुष्ट व्यवस्थीकरणाविरूद्ध त्याचा क्रोध प्रकट केला जाईल व केवळ नम्र लोक बचावतील. (सफ. २:२, ३; ३:८) या इशाऱ्याची घोषणा करण्याची वेळ वेगाने समाप्त होत आहे! “मोठे संकट” अगदी उंबरठ्यावर आहे, व आता नम्र लोकांना एकत्र केले जात आहे. होय, “शेते” “कापणीसाठी पांढरी” झाली आहेत. म्हणूनच, महत्त्व व निकडीच्या बाबतीत इतर कोणत्याही कामाची तुलना या कामाशी केली जाऊ शकत नाही.—मत्त. २४:१४, २१, २२; योहा. ४:३५.
४ आधुनिक दिवसातील इशारा इतर ‘ऐकोत अगर न ऐकोत,’ तो त्यांना सांगण्यात आपण भाग घेतलाच पाहिजे. ही ईश्वर-प्रदत्त नेमणूक आहे जिच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. (यहे. २:४, ५; ३:१७, १८) या कार्यातील आपला पूर्ण सहभाग, देवाबद्दल आपल्याला असलेल्या सखोल प्रीतीचे, आपल्या शेजाऱ्यांबद्दल आपल्याला असलेल्या चिंतेचे आणि आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्यावरील आपल्या अढळ विश्वासाचे खात्रीलायक प्रदर्शन पुरवतो.
५ कार्य करण्याची आता वेळ आहे: यहोवाने गत न्यायदंड बजावल्यानंतर दुष्टाई पुन्हा नव्याने बोकाळली, कारण सैतान आणि त्याचे दुरात्मे सक्रिय होते. परंतु, या वेळेस तसे होणार नाही. सैतानी प्रभावाचा नायनाट केला जाईल. जवळ येऊन ठेपलेल्या ‘मोठ्या संकटाविषयीच्या’ विश्वव्यापी इशाऱ्याची पुन्हा कधीच गरज भासणार नाही. (प्रकटी. ७:१४; रोम. १६:२०) पुनरावृत्ती न होणाऱ्या कार्याचा भाग असण्याचा आपल्याला खास सुहक्क आहे. आज, या संधीपासून होता होईल तितका फायदा घेण्याचा समय आहे.
६ प्रेषित पौलाने आपल्या प्रचार कार्याविषयी अगदी ठामपणे म्हटले: “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे.” (प्रे. कृत्ये २०:२६) इशारा देण्यात अपयशी न ठरल्यामुळे त्याला रक्तदोषी वाटले नाही. का नाही? कारण तो आपल्या सेवेविषयी म्हणू शकला की, “मी झटून श्रम करीत आहे.” (कलस्सै. १:२९) पुनरावृत्ती न होणाऱ्या कार्यात होता होईल तितका भाग घेऊन आपणही अशाच प्रकारच्या समाधानाचा आनंद लुटू या!—२ तीम. २:१५.