आध्यात्मिकरित्या बलवान व्हा आणि यहोवाच्या सेवेसाठी शुद्ध असा
१ यशया ६०:२२ मध्ये यहोवाने असे अभिवचन दिले आहे, जे आमच्या डोळ्यांसमोर पूर्ण होत आहेः “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” जेव्हा एखाद्या राष्ट्राबद्दल आपण विचार करतो तेव्हा अत्यंत मोठ्या जमावाचे चित्र आपणापुढे राहते. हा जमाव सर्वसाधारण आस्थेने एकत्र झालेला असतो व तो संघटित सरकारच्या अधिकाराखाली वावरत असतो.
२ १९९१ चा क्षेत्रकार्याचा अहवाल दाखवितो की, जगभर ४२,७८,८२० सुवार्तेच्या प्रचारकांचा उच्चांक गाठला गेला; ही गेल्या वर्षापेक्षा ६.५ टक्क्याची वाढ होय. या जाचक व्यवस्थेपासून वेगळे होण्याची आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मशीही राज्याखाली निष्ठावंत प्रजाजन बनू इच्छिणाऱ्या प्रामाणिक लोकांच्या मोठ्या जमावाला यहोवाने खरेच एकत्रित केले आहे. दर वर्षी हा एकत्र होणाऱ्यांचा आकडा वाढतच आहे. ज्याचे नव्या जगाची संस्था असे खरेपणाने वर्णन करता येऊ शकते त्या या राष्ट्राचे सदस्य होण्यास आम्हाला खरोखरी आनंद वाटतो. १९९१ मधील स्मारकविधीच्या प्रसंगी एकूण उपस्थिती १,०६,५०,१५८ होती व ही १९९० पेक्षा ७ टक्के अधिक आहे. ही, राज्याची प्रजा या नात्याने आणखी खूप लोक गोळा होण्याची प्रचंड संभाव्यता दाखवते.
३ अर्थात, आम्हाला याची जाणीव आहे की, स्मारकविधीच्या उपस्थितीतील सर्वांनीच, यहोवाचे लोक या नात्याने स्वीकृत ठरण्यासाठी स्वतःला जगापासून वेगळे केलेले नाही. सर्व राष्ट्रातील ‘लोकांच्या झुंडी यहोवाच्या मंदिराकडे येत आहेत,’ पण यांना ‘त्याच्या मार्गाचे शिक्षण मिळ’ण्यास हवे आणि यांनी “त्याच्या पथांनी” चालले पाहिजे. (यशया २:२-४) स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या चाळीस लक्षापेक्षा अधिक लोकांनी देवाच्या सूचना स्वीकारल्या आहेत, आध्यात्मिक बळ मिळवले आहे व यामुळेच यांना शुद्ध आचरण राखण्यास चालना मिळाली असून ते सध्या केल्या जात असलेल्या राज्य प्रचाराच्या कामात सहभागी होण्यास पात्र ठरले आहेत. (मत्तय २४:१४) असे लोक यहोवाच्या नजरेत चांगल्या भूमिकेत आहेत व ते, यहोवा पुरवीत असलेल्या सर्व अद्भूत गोष्टींचा लाभ मिळवीत आहेत. मग, बाकीच्या साठ लाखापेक्षा अधिकांनी आध्यात्मिक बळ मिळवायचे आहे आणि यहोवाच्या सेवेसाठी शुद्ध राहायचे आहे तर काय केले पाहिजे?
४ त्यांनी “विश्वासाचे सुयुद्ध लढवले” पाहिजे. (यहूदा ३) यांनी एकदा यहोवाच्या मार्गात चालण्याची निवड केल्यावर ते परिक्षा, मोहपाश, आणि वाईट प्रभाव याद्वारे सैतानाच्या दबावाखाली येतात. अशांनी टिकून राहण्यासाठी बळ मिळावे म्हणून यहोवाकडे पाहिले पाहिजे. (फिलि. ४:१३) यहोवा अशांना, जे आधीच विश्वासात सबळ झाले आहेत त्यांच्याद्वारे मदत देतो. पौलाने सूचना केली की, “आपण जे सबळ आहोत त्या आपण दुर्बळांची दुर्बळता सोशिली पाहिजे.” (रोम. १५:१, २) जेव्हा बळकट व अशक्त दोघेही एक होतात तेव्हा दृढ उभे राहण्यास बळ मिळते. “एकट्यापेक्षा दोघे बरे. . . . जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल.”—उप. ४:९, १२.
५ याचा हा अर्थ होतो की, नवे लोक यहोवापासून बळ मिळावे म्हणून आमच्यावर विसंबून असतात. आम्हा समर्पित ख्रिश्चनांनी नव्या लोकांना मदत करायची असल्यास आपण स्वतः आध्यात्मिकदृष्ट्या बलवान असले पाहिजे. जे बलवान ख्रिस्ती आहेत ते, इतरांना ‘आध्यात्मिक वरदान’ देऊ शकतात की, ज्यामुळे ‘परस्परांना उत्तेजन मिळण्याचा’ परिणाम घडतो. (रोम. १:११, १२) आम्हास संघटित करण्याचा व सर्वांना ‘दृढ व सबळ’ करण्याचा यहोवाचा हा प्रमुख मार्ग आहे.—१ पेत्र ५:९-११.
६ स्वतःच्या आध्यात्मिक गरजांची दक्षता राखीत असता आम्ही या नव्या लोकांना मदत करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. (मत्तय ५:३) आध्यात्मिकता ही आमच्या बळाची किल्ली आहे. या गुणाची नियमित रुपाने आध्यात्मिक भरवणूक करण्याद्वारे मजबूती व संगोपन केले जाण्यास हवे. यहोवा आपल्या संस्थेद्वारे त्याच्या वचनाच्या अभ्यासाचा तौलनिक कार्यक्रम पुरवीत असतो. मंडळीच्या पाच साप्ताहिक सभा आम्हाला बलवान करण्यात आणि ‘प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल’ असे बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका करतात.—इब्री. १०:२४.
७ या सभांचे लाभ, व्यक्तीगत तसेच कौटुंबिक अभ्यासाला जोडून अनेक पटीने वाढत असतात. कमीत कमी ध्येय म्हणून आम्ही सर्वांनी दैनंदिन वचनाचे वाचन व विचारविनिमय केला पाहिजे. तसेच ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत देण्यात आलेला पवित्र शास्त्र वाचनाचा कार्यक्रम राबवला पाहिजे आणि मंडळीचा पुस्तक अभ्यास व टेहळणी बुरुज अभ्यासाची तयारी केली पाहिजे. याचे संघटन कसे करावे व ते नियमित रुपाने कसे करावे हे प्रत्येक कुटुंबाला ठरवावे लागेल. तसेच कुटुंबप्रमुखाने अभ्यासाचा कार्यक्रम कुटुंबाच्या विशिष्ट आध्यात्मिक गरजांनुरुप वळवून घेतला जात आहे हे बघितले पाहिजे. याप्रकारे, ‘घर बांधले जाईल; व ते मजबूत राहील.’ (नीती २४:३) व्यक्तीगतरित्या व कौटुंबिकरित्या आपण आपल्या अभ्यासाच्या सवयांबद्दल जागृत राहिलो तर यहोवा आम्हाला आशीर्वादित करील आणि त्याचा आत्मा विविध समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी मदत करील याबद्दल आम्हाला आत्मविश्वास राखता येईल.—याकोब १:२, ३; १ पेत्र ४:११.
८ शुद्ध राहणे व निंदेस कारण न बनणे: यहोवा आपल्याला त्याच्याकडे येण्याचे उबदार निमंत्रण देत असला तरी त्याच वेळी तो हे स्पष्ट करतो की, हे आम्ही येशूच्या वाहिलेल्या रक्तावर जो विश्वास प्रदर्शित करतो त्याच्या आधारावर केले जाते. ते रक्त “आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते.” (१ योहान १:७; तसेच इब्री. ९:१४ पहा.) आम्ही आमचा विश्वास देवाच्या वचनाच्या व्यक्तिगत अभ्यासाद्वारे व जे शिकलो त्याचा अवलंब करण्याद्वारे बळकट करू शकतो. काहीजण नंतर मागे पडतात त्याचे कारण हे असते की, यांनी एकतर आध्यात्मिक अन्नाचे सेवन करण्यात किंवा त्याचा अवलंब स्वतःच्या जीवनात लागू करण्यात खूप कमी परिश्रम घेतलेले असतात. याद्वारे ते सैतानाच्या हल्ल्यांना भक्ष्य म्हणून सामोरे जातात. काहीजण आध्यात्मिक रितीने दुर्बळ होऊन अक्रियाक झालेले आहेत. तसेच इतर काहींनी गंभीर पातक आचरल्यामुळे त्यांना मंडळीतून बहिष्कृत करावे लागले ही दुःखद गोष्ट आहे. पौलाने इशारा दिलाः “आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथ १०:१२) आम्ही अभ्यास, सभांची उपस्थिती, सेवाकार्य करणे यामध्ये हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यास आम्हावर सहजगत्या वाईट प्रभाव व मोहपाश यांचा विळखा पडेल.—इब्री. २:१; २ पेत्र २:२०-२२.
९ आम्ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व नैतिक दृष्टीने शुद्ध राहणे जरुरीचे आहे. (२ करिंथ. ७:१) आम्हा सभोवतालचे जग हे दिवसेंदिवस विपरीत व नीच बनत आहे. दियाबल तर आम्हावर पाश टाकण्यासाठी नवनवीन फसव्या युक्त्या घेऊन येत आहे. आम्ही स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या बलवान ठेवल्यास आम्हाला त्याचे ‘विचार कळणार नाही असे नाही आणि त्याचे वर्चस्व होणार नाही.’ (२ करिंथ. २:११) यहोवाच्या संस्थेकडून येणाऱ्या सूचना व सल्ला आपल्याला वाईट प्रभावास ओळखण्यास व त्याचा प्रतिकार करण्याची मदत देतो.
१० बलवान व शुद्ध राहण्याच्या बाबतीत मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांवर स्वतःचे चांगले उदाहरण दुसऱ्यांसमोर राखण्याची जबाबदारी आहे. पौलाने या गोष्टीवर असे म्हणून जोर दिला की, “तुम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्यांना आठवणीत ठेवा. त्यांच्या वर्तणूकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” (इब्री १३:७) वडील व उपाध्य सेवकांनी आपली वैयक्तिक वागणूक तसेच कुटुंबप्रमुख या नात्याची आपली जबाबदारी याबद्दल उदाहरणशील असणे महत्त्वाचे आहे. त्यांनी तरुण तीमथ्यासारखे असावे, ज्याला “भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी . . . कित्ता हो”ण्यास सांगितले होते. (१ तीम. ४:१२; १ पेत्र ५:३) आम्ही बाकीच्यांनीही सन्माननीय आचरण राखून स्वतःचे चांगले उदाहरण राखण्याची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. नवे लोक आमच्या बाबतीत जे बघतात त्याद्वारे सत्य तसेच यहोवाची संस्था याबद्दल आपला निर्णय घेत असतात. यास्तव, जे काही आमच्या बाबतीत त्यांना दिसते त्याने त्यांना यहोवाच्या शुद्ध संस्थेत आपली जागा मिळवण्यास उत्तेजन द्यावे अशीच आमची खात्री राहिली पाहिजे.
११ “मोठे संकट” यातून बचाव होण्यासाठी केले जात असणारे एकत्रीकरण आता गति घेत आहे. (प्रक. ७:१४) जे आध्यात्मिकरित्या बलवान होतात व स्वतःला शुद्ध राखतात अशांचाच शेवटी बचाव होईल. हे सर्वकाही या गोष्टींवर अवलंबून आहेः (१) देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याच्या चांगल्या सवया जोपासणे व अभ्यासावर मनन करणे; (२) प्रोत्साहन पुरवावे या उद्देशाने एकमेकांबद्दल अस्सल व्यक्तिगत काळजी दाखवणे; आणि (३) यहोवाच्या नामाचा सन्मान होईल अशी शुद्ध वागणूक जोपासण्यासाठी एकमेकांसोबत मिळून ऐक्याने काम करणे. हे केल्यामुळे जगाचा शेवट होईल तेव्हा आपल्याला यहोवाच्या संरक्षणाची व आशीर्वादांची खात्री राहील. “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] सत्यशीलांचे रक्षण करतो,” त्यामध्ये आपण राहू याची आपल्याला खात्री असेल.—स्तोत्र. ३१:२३.