अभ्यास लेख ३०
देवा-धर्मावर विश्वास नसलेल्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचणं
“मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो, यासाठी की कसेही करून काहींचे तारण करावे.”—१ करिंथ. ९:२२.
गीत ४५ उन्नती करू या!
सारांशa
१. अलीकडच्या दशकांत काही ठिकाणी कोणते बदल घडले आहेत?
हजारो वर्षांपासून जगभरातले बहुतेक लोक कोणत्या न कोणत्या धर्माशी संबंधित आहेत. पण अलीकडच्या काही दशकांत एक मोठा बदल घडत असल्याचं दिसून आलं आहे. आज पुष्कळसे लोक धर्माला मानत नाहीत. इतकंच काय, तर काही देशांत बहुतेक लोकांचं असं म्हणणं आहे की ते कुठल्याच धर्माला मानत नाहीत.b—मत्त. २४:१२.
२. आज लोक कोणत्या काही कारणांमुळे देवधर्म पाळत नाहीत?
२ आज जास्तीत जास्त लोक देवधर्म का पाळत नाहीत?c कारण काहींचं लक्ष कदाचित चैनबाजी किंवा जीवनातल्या चिंता यांवर केंद्रित आहे. (लूक ८:१४) काही आधी देवाला मानायचे पण ते आता नास्तिक बनले आहेत, तर इतर काही असे आहेत जे देवावर विश्वास करतात पण त्यांना वाटतं की धर्म आजच्या पिढीसाठी नाही, व्यावहारिक नाही आणि विज्ञान व तर्काला पटणारा नाही. जीवनाची सुरुवात आपोआप झाली आहे असं कदाचित त्यांना आपल्या मित्रांकडून, शिक्षकांकडून किंवा मिडियातल्या लोकांकडून ऐकायला मिळतं. पण देवावर विश्वास वाढेल अशा गोष्टी त्यांना क्वचितच ऐकायला मिळतात. आणखी काहींना अशा धार्मिक पुढाऱ्यांचा राग येतो ज्यांना पैशांचा व अधिकाराचा लोभ आहे. आणि काही देशांत सरकारी अधिकाऱ्यांनी धार्मिक गोष्टींवर प्रतिबंध घातले आहेत.
३. या लेखाचा उद्देश काय आहे?
३ येशूची अपेक्षा आहे की आपण “सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य” करावं. (मत्त. २८:१९) आपण देवा-धर्मावर विश्वास नसलेल्या लोकांना देवावर प्रेम करायला आणि ख्रिस्ताचे शिष्य बनायला कशी मदत करू शकतो? आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एक व्यक्ती आपल्या संदेशाला कशी प्रतिक्रिया देईल हे कदाचित ती लहानाची मोठी कुठे झाली आहे यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, युरोपमध्ये राहणाऱ्यांची प्रतिक्रिया आशिया खंडात राहणाऱ्यांसारखी नसेल. असं का? कारण युरोपमध्ये राहणाऱ्या लोकांना बायबलबद्दल काही प्रमाणात माहीत असतं आणि विश्वाची निर्मिती देवाने केली आहे हे त्यांनी ऐकलेलं असतं. पण आशियामध्ये बहुतेक लोकांना बायबलबद्दल अगदी थोडं किंवा कधीकधी तर काहीच माहीत नसतं. तसंच, एक सृष्टिकर्ता आहे असंही ते कदाचित मानत नाहीत. या लेखाचा उद्देश हाच आहे की आपण सेवाकार्यात भेटणाऱ्या सर्व लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मग त्यांची पार्श्वभूमी किंवा विश्वास वेगळे असले तरीही.
सकारात्मक मनोवृत्ती बाळगा
४. आपण सकारात्मक मनोवृत्ती का बाळगली पाहिजे?
४ सकारात्मक असा. प्रत्येक वर्षी देवा-धर्मावर विश्वास नसलेले अनेक लोक यहोवाचे साक्षीदार बनतात. साक्षीदार बनण्याआधी त्यांपैकी बऱ्याच लोकांचे नैतिक स्तर चांगले होते आणि त्यांना धर्मांमध्ये चाललेल्या ढोंगीपणाचा वीट आला होता. तर इतर काही असे होते ज्यांचे नैतिक स्तर चांगले नव्हते. तसंच, बऱ्याच जणांना आपल्या वाईट सवयीही सोडून द्याव्या लागल्या. यावरून स्पष्टच आहे की, यहोवाच्या मदतीने आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्या” लोकांना नक्की शोधू शकतो.—प्रे. कार्ये १३:४८; १ तीम. २:३, ४.
बायबलवर विश्वास नसलेल्या लोकांना साक्ष देताना आपण आपल्या प्रस्तावनेत फेरबदल केला पाहिजे (परिच्छेद ५-६ पाहा)d
५ आपल्या संदेशाला लोक अनेकदा चांगली प्रतिक्रिया का देतात?
५ प्रेमळपणे आणि विचारशीलपणे वागा. बऱ्याच वेळा आपण लोकांना काय सांगतो यामुळे नाही तर कसं सांगतो यामुळे ते आपला संदेश स्वीकारतात. आपण त्यांच्याशी प्रेमळपणे, विचारशीलपणे वागतो आणि त्यांच्यात मनापासून आस्था दाखवतो तेव्हा त्यांना या गोष्टी आवडतात. आपण आपलं मत त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत नाही, तर धर्माबद्दल त्यांचं मत काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जसं की, काही लोकांना अनोळखी लोकांशी धर्म याविषयावर बोलायला आवडत नाही. तर इतर काहींना देव याविषयावर त्यांचं मत विचारणं चुकीचं किंवा अगदी विचित्र वाटू शकतं. आणि असेही काही आहेत जे लोकांसमोर बायबल वाचायला कचरतात; खासकरून यहोवाचे साक्षीदार त्यांना बायबलमधून काही दाखवतात तेव्हा. यांपैकी कुठलीही परिस्थिती असो, आपण लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—२ तीम. २:२४, तळटीप.
६. प्रेषित पौल परिस्थिती लक्षात ठेवून संदेश सांगायचा हे कशावरून कळतं आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?
६ ‘बायबल,’ ‘देव’ किंवा ‘धर्म’ हे शब्द एखाद्याला आवडणार नाहीत असं जर आपल्याला जाणवलं तर आपण काय करू शकतो? आपण प्रेषित पौलचं अनुकरण करून त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. पौल यहुदी लोकांशी बोलला तेव्हा त्याने त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क केला. पण अरीयपगमध्ये ग्रीक तत्त्वज्ञानींशी बोलताना, तो त्यांना शास्त्रवचनांमधून काहीतरी सांगत आहे असं त्याने म्हटलं नाही. (प्रे. कार्ये १७:२, ३, २२-३१) आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो? जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटली जिचा बायबलवर विश्वास नाही तर तुम्ही तिच्याशी तर्क करताना थेट बायबलमधून सांगण्याचं किंवा ‘बायबल’ असा उल्लेख करण्याचं टाळू शकता. एखादी व्यक्ती इतरांसमोर असताना बायबलच्या प्रतीतून वाचायला कचरू शकते. अशा वेळी तुम्ही तिला बायबलची प्रत उघडून दाखवण्याऐवजी मोबाईल किंवा टॅबवरून वचनं दाखवू शकता.
७. १ करिंथकर ९:२०-२३ या वचनांत सांगितल्यानुसार आपण पौलसारखं बनण्यासाठी काय करू शकतो?
७ लोकांच्या भावना समजून घ्या आणि त्यांचं ऐका. प्रचारात भेटणारे लोक अमुक विचार का करतात किंवा त्यांना जे वाटतं त्यामागचं काय कारण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. (नीति. २०:५) आपण पुन्हा एकदा पौलच्या उदाहरणाचा विचार करू या. तो यहुदी लोकांमध्ये लहानाचा मोठा झाला. यहुदी नसलेल्या लोकांना म्हणजे ज्यांना यहोवाबद्दल किंवा शास्त्रवचनांबद्दल खूप कमी किंवा काहीच माहीत नव्हतं, अशांना प्रचार करण्यासाठी त्याला आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करावे लागले असतील. आपल्या क्षेत्रातल्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी आपल्यालाही कदाचित संशोधन करावं लागेल किंवा मंडळीतल्या अनुभवी लोकांशी बोलावं लागेल.—१ करिंथकर ९:२०-२३ वाचा.
८. बायबलबद्दल चर्चा सुरू करण्याचा एक मार्ग कोणता आहे?
८ आपला हेतू “योग्य” लोकांना शोधून काढणं हा आहे. (मत्त. १०:११) लोकांनी आपलं ऐकावं यासाठी आपण त्यांना त्यांचं मत सांगण्याचं प्रोत्साहन देतो आणि ते बोलत असताना त्यांचं लक्ष देऊन ऐकतो. इंग्लंडमध्ये राहणारा एक बांधव काही विषयांवर लोकांचं मत विचारतो जसं की, आनंदी कुटुंबासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, मुलांचं संगोपन कसं करावं किंवा अन्यायाचा धीराने सामना कसा करावा. मग समोरच्याचं मत ऐकून घेतल्यावर तो म्हणतो, “बघा इथे २,००० वर्षांपूर्वी दिलेल्या या सल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” मग तो ‘बायबल’ हा शब्द न वापरता समोरच्याला आपल्या मोबाईलमधून आधीच निवडून ठेवलेली वचनं वाचून दाखवतो.
लोकांच्या मनापर्यंत पोहोचा
९. देव याविषयावर ज्यांना बोलायला आवडत नाही त्यांना आपण कशी मदत करू शकतो?
९ देव याविषयावर ज्यांना सहसा चर्चा करायला आवडत नाही त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्यांच्याशी त्यांना आवडणाऱ्या विषयांवर बोलू शकतो. उदाहरणार्थ, अनेकांना निसर्गातल्या गोष्टींबद्दल आश्चर्य वाटतं. त्यामुळे तुम्ही असं काहीतरी म्हणू शकता: “वैज्ञानिक बऱ्याचदा निसर्गातल्या गोष्टींची नक्कल करून नवनवीन गोष्टींचा शोध लावतात हे कदाचित तुम्हाला माहीत असेल. जसं की, मायक्रोफोनची रचना करणारे लोक प्राण्यांचे कान आणि कॅमेऱ्याची रचना करणारे लोक प्राण्यांचे डोळे या गोष्टींचा अभ्यास करतात. हे निसर्ग पाहून तुम्हाला काय वाटतं? ही एक शक्ती आहे, व्यक्ती आहे की आणखी काही?” मग समोरच्याचं लक्ष देऊन ऐकल्यावर तुम्ही म्हणू शकता: “जेव्हा इंजीनियर्स कानाच्या किंवा डोळ्यांच्या रचनेतून शिकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो, की ते नेमकं कोणापासून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत? मला प्राचीन काळातल्या एका कवीचे शब्द वाचून खूप कुतूहल वाटलं. त्याने म्हटलं: ‘ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळा बनवला तो पाहाणार नाही? तो . . . मानवांचा ज्ञानदाता’ आहे. काही वैज्ञानिकांचंही हेच मत आहे की सृष्टीची रचना करण्यात आली आहे.” (स्तो. ९४:९, १०) मग तुम्ही त्याला jw.org/mr वरून तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का? (प्रकाशने > व्हिडिओ > तरुणांसाठी इथे पाहा.) हा व्हिडिओ दाखवू शकता. किंवा जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न किंवा वॉझ लाईफ क्रिएटेड? यांपैकी एक माहितीपत्रक देऊ शकता.
१०. देवाविषयी ज्यांना बोलायचं नसतं त्यांच्यासोबत आपण चर्चा कशी सुरू करू शकतो?
१० बहुतेक लोकांना वाटतं की त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं. पण अनेक जणांना वाटतं की या पृथ्वीचा नाश होईल किंवा तिच्यावर कोणीच राहणार नाही. नोर्वेमध्ये असलेले एक प्रवासी पर्यवेक्षक म्हणतात, की देवाविषयी बोलायला तयार नसलेले लोक सहसा जगातल्या परिस्थितींबद्दल बोलायला तयार असतात. लोकांना आपली ओळख करून दिल्यावर ते विचारतात: “आपलं भविष्य चांगलं असेल का? ते आपल्यासाठी कोण घडवून आणेल? नेते, वैज्ञानिक की आणखी कोणीतरी, तुम्हाला काय वाटतं?” उत्तर लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर ते उज्ज्वल भविष्याबद्दल असलेलं एखादं वचन वाचतात किंवा बोलून दाखवतात. पृथ्वी कायमस्वरूपी टिकेल आणि चांगले लोक त्यावर नेहमीसाठी राहतील या बायबलमधल्या अभिवचनामुळे काहींच्या मनात आणखी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.—स्तो. ३७:२९; उप. १:४.
११. चर्चेची सुरुवात करताना आपण वेगवेगळ्या प्रस्तावना का वापरल्या पाहिजेत आणि रोमकर १:१४-१६ या वचनांनुसार आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो?
११ आपण लोकांना भेटतो तेव्हा त्यांच्याशी बोलताना वेगवेगळ्या प्रस्तावनांचा वापर केला पाहिजे. असं का? कारण प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. एकाला जे आवडेल ते दुसऱ्या कदाचित आवडणार नाही. देव किंवा बायबल या विषयांवर काहींना चर्चा करायला हरकत नसते. पण इतर काहींशी दुसऱ्या विषयांवर बोललं तर ते आपला संदेश ऐकून घेतात. दोन्ही बाबतींत आपण सर्व लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (रोमकर १:१४-१६ वाचा.) पण असं करताना मात्र आपण लक्षात ठेवतो की योग्य गोष्टींवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनात सत्याचं बी यहोवाच वाढवतो.—१ करिंथ. ३:६, ७.
आशिया खंडातल्या लोकांना सत्य सांगणं
बरेचसे प्रचारक ख्रिश्चन नसलेल्या देशांतून आलेल्या लोकांमध्ये वैयक्तिक आस्था घेतात आणि त्यांना बायबलमध्ये दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यांबद्दल सांगतात (परिच्छेद १२-१३ पाहा)
१२. आशिया खंडातल्या लोकांनी एक सृष्टिकर्ता आहे की नाही यावर कधीच लक्षपूर्वक विचार केलेला नसतो तेव्हा आपण त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी काय करू शकतो?
१२ जगभरात अनेक प्रचारक अशा लोकांशी बोलतात जे देवाला मानत नाहीत आणि त्यांपैकी काही अशा देशांमधले आहेत जिथे सरकारने धार्मिक गोष्टींवर प्रतिबंध घातले आहेत. आशिया खंडातल्या अनेक देशांत बऱ्याचशा लोकांनी एक सृष्टिकर्ता आहे की नाही यावर कधीच लक्षपूर्वक विचार केलेला नसतो. काहींना बायबलचा संदेश ऐकल्यावर उत्सुकता वाटते आणि ते लगेच अभ्यास करायला तयार होतात. पण इतर काही असेही असतात जे सुरुवातीला काहीतरी नवीन शिकून घ्यायला कचरतात. अशांच्या मनापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो? काही अनुभवी प्रचारकांना एक पद्धत खूप परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे. ती म्हणजे चर्चेची सुरुवात करताना मैत्रीपूर्ण रितीने बोलणं, वैयक्तिक आवड घेणं आणि बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे त्यांना कसा फायदा झाला, हे योग्य वेळी सांगणं.
१३. लोक बायबलबद्दल जाणून घेण्यासाठी कशामुळे आकर्षित होऊ शकतात? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)
१३ बरेचसे लोक पहिल्यांदा बायबलमधल्या व्यावहारिक सल्ल्यांमुळे आकर्षित झाले आहेत. (उप. ७:१२) न्यूयॉर्कमध्ये राहणारी एक बहीण चीनी भाषा बोलणाऱ्या लोकांना प्रचार करते. ती म्हणते: “मी लोकांशी मैत्रीपूर्वक बोलते आणि त्यांचं लक्ष देऊन ऐकते. जर मला कळलं की कोणी नुकतंच इथे राहायला आलं आहे तर मी विचारते: ‘नवीन जागी तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला नोकरी मिळाली का? इथले लोक तुमच्याशी नीट वागतात का?’” यामुळे मग कधीकधी मला बायबल शिकवणींबद्दल सांगायची एक संधी मिळते. त्यानंतर जर योग्य वाटलं तर ती बहीण असंही म्हणते: “लोकांसोबत चांगले नातेसंबंध बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तुम्हाला काय वाटतं? बायबलमध्ये एक चांगला सल्ला दिला आहे तो मी तुम्हाला दाखवू का? इथे म्हटलं आहे: ‘वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा.’ तुम्हाला काय वाटतं हा सल्ला आपल्याला इतरांशी जुळवून घ्यायला मदतीचा ठरेल का?” (नीति. १७:१४, ईझी-टू-रीड व्हर्शन) अशा प्रकारे चर्चा केल्यामुळे आपल्याला अशा लोकांना ओळखता येईल ज्यांना आणखी शिकून घ्यायची इच्छा आहे.
१४ ‘आम्ही देवाला मानत नाही’ असं म्हणणाऱ्या लोकांना एक बांधव कशी मदत करतो?
१४ ‘आम्ही देवाला मानत नाही’ असं बोलणाऱ्यांशी आपण कशी चर्चा सुरू करू शकतो? एका बांधवाला पूर्वेकडच्या देशातल्या अशा लोकांना प्रचार करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे ज्यांचा देवा-धर्मावर विश्वास नाही. तो म्हणतो: “‘मी देवाला मानत नाही’ असं सहसा लोक म्हणतात तेव्हा त्याचा असा अर्थ असतो, की लोक ज्या पारंपरिक पद्धतीने देवाची उपासना करतात ती त्यांना मान्य नसते. म्हणून मी त्यांच्याशी सहमत होत म्हणतो, की बरेच देव हे मानवांनी घडवलेले आहेत आणि खरे नाहीत. मग मी सहसा यिर्मया १६:२० हे वचन वाचतो ज्यात म्हटलं आहे: ‘मानव आपल्यासाठी देव बनवेल काय? असल्या वस्तु तर देव नाहीत.’ मग मी विचारतो: ‘खरा देव आणि मानवांनी बनवलेला देव यांतला फरक आपण कसा ओळखू शकतो?’ त्यांचं उत्तर मी लक्ष देऊन ऐकतो आणि त्यानंतर मी यशया ४१:२३ हे वचन वाचतो. त्यात म्हटलं आहे: ‘पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहा असे आम्ही समजू.’ मग त्यानंतर, यहोवाने भविष्याबद्दल कसं आधीपासूनच सांगितलं आहे याचं एक उदाहरण मी देतो.”
१५. पूर्व आशियामध्ये राहणाऱ्या बांधवाकडून आपण काय शिकू शकतो?
१५ पूर्व आशियामध्ये राहणारा एक बांधव पुनर्भेट करण्यासाठी पुढे दिलेली पद्धत वापरतो. तो म्हणतो: “मी लोकांना बायबलमधून सुज्ञ सल्ले, पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या आणि विश्वाला नियंत्रित करणारे नैसर्गिक नियम यांची काही उदाहरणं दाखवतो. मग मी त्यांच्याशी तर्क करतो की या गोष्टींवरून आपल्याला एक खरोखरचा आणि सुज्ञ निर्माणकर्ता असल्याचा पुरावा कसा मिळतो. जेव्हा समोरची व्यक्ती, देव अस्तित्वात असल्याचं मान्य करू लागते तेव्हा मी तिला बायबल, यहोवाबद्दल काय म्हणतं ते दाखवतो.”
१६. इब्री लोकांना ११:६ या वचनानुसार विद्यार्थ्यांचा देवावर आणि बायबलवर विश्वास का असला पाहिजे आणि तो विकसित करण्यासाठी आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
१६ आपण देवधर्म न मानणाऱ्या वेगवेगळ्या लोकांसोबत बायबल अभ्यास करतो त्या वेळी देव अस्तित्वात आहे यावर त्यांचा विश्वास वाढत राहिला पाहिजे. (इब्री लोकांना ११:६ वाचा.) तसंच, आपण त्यांना बायबलवर विश्वास वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे. असं करण्यासाठी कदाचित आपल्याला काही मुद्दे वारंवार सांगावे लागतील. अभ्यास घेताना प्रत्येक वेळी आपल्याला बायबल हे देवाचं वचन आहे याच्या पुराव्यांवर चर्चा करावी लागू शकते. आपल्याला कदाचित बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांची पूर्णता, वैज्ञानिक व ऐतिहासिक दृष्ट्या असलेली अचूकता किंवा त्यातले सुज्ञ व्यावहारिक सल्ले यांवर थोडक्यात चर्चा करावी लागेल.
१७. आपण दाखवत असलेल्या प्रेमामुळे लोकांवर काय परिणाम होऊ शकतो?
१७ लोक देवधर्म मानणारे असले किंवा नसले, तरी त्यांना ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठी मदत करून आपण त्यांच्यावर आपलं प्रेम असल्याचं दाखवत राहिलं पाहिजे. (१ करिंथ. १३:१) देवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपलं त्याच्यावर प्रेम असावं अशी त्याची इच्छा आहे, या गोष्टी लोकांना शिकवणं हे आपलं मुख्य ध्येय आहे. धर्माबद्दल ज्यांना थोडीफार किंवा काहीच आवड नव्हती असे हजारो लोक दर वर्षी देवावर प्रेम करायला शिकल्यामुळे बाप्तिस्मा घेत आहेत. तेव्हा, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा व सर्व लोकांवर प्रेम करा आणि त्यांच्यात वैयक्तिक आस्था घ्या. तसंच, त्यांचं लक्षपूर्वक ऐका आणि त्यांना समजून घ्या. तुमच्या उदाहरणावरून त्यांना ख्रिस्ताचा शिष्य बनायला शिकवा.
गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!
a पूर्वीपेक्षा आज आपल्याला प्रचारात जास्तकरून असे लोक भेटू शकतात जे देवा-धर्मावर विश्वास ठेवत नाहीत. या लेखात चर्चा करण्यात आली आहे की आपण या लोकांना बायबल सत्याबद्दल कसं शिकवू शकतो आणि त्यांना बायबल व यहोवा देवावर विश्वास विकसित करायला कशी मदत करू शकतो.
b एका सर्वेनुसार त्यांपैकी काही देशांची नावं पुढे दिली आहेत: अलबानीया, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, आझरबाइजान, कॅनडा, चीन, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, आयर्लंड, इस्राएल, जपान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्झ, नॉर्वे, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि व्हियेतनाम.
c वाक्यांशाचं स्पष्टीकरण: या लेखात देवधर्म न पाळणारे लोक म्हणजे असे लोक जे एकतर कोणताच धर्म पाळत नाहीत किंवा देवाला मानत नाहीत.