एकता वाढवणारा स्मारकविधी
“पाहा, बंधूनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तो. १३३:१.
१, २. या वर्षी कोणता समारंभ आपल्या सर्वांना एका अनोख्या प्रकारे एकत्रित करेल? असं आपण का म्हणू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
या वर्षी ३१ मार्च रोजी जगभरात लाखो लोक एका खास समारंभाला जातील. एक असा समारंभ जो वर्षातून फक्त एकदाच आयोजित केला जातो. यहोवाचे साक्षीदार आणि त्यांच्यासोबत बरेच लोक मिळून सुर्यास्तानंतर येशूने दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून एक विधी पाळतील. दरवर्षी ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी लोकांना एका अनोख्या प्रकारे एकत्र आणतो. जगभरात याच्यासारखा दुसरा कोणताच कार्यक्रम नाही.
२ जगभरात लाखो लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी या समारंभाला उपस्थित राहिलेलं पाहून यहोवाला आणि येशूला मनापासून आनंद होत असेल. बायबलमध्ये सांगितलं आहे की “सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला आणि कोणत्याही मनुष्याला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय” एकत्र होईल. हे लोक मोठ्याने अशी घोषणा करतील: “तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकऱ्याकडून मिळते.” (प्रकटी. ७:९, १०) यहोवाने आणि येशूने मानवजातीसाठी अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेत. स्मारकविधीच्या दिवशी लाखो लोक त्यांची मनापासून कदर करतात हे पाहून आपल्याला खूप आनंद होतो.
३. या लेखात आपल्याला कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळतील?
३ या लेखात आपल्याला पुढील चार प्रश्नांची उत्तरं मिळतील: (१) स्मारकविधीमुळे मला फायदा होईल या उद्देशाने मी तयारी कशी करू शकतो? (२) स्मारकविधी कोणत्या मार्गांनी देवाच्या लोकांना एकतेत राहायला मदत करतो? (३) देवाच्या लोकांमधली एकता टिकवून ठेवण्यासाठी मी कसा हातभार लावू शकतो? (४) स्मारकविधीचा शेवट कधी होईल?
तयारी करून आणि उपस्थित राहून फायदा कसा मिळवायचा?
४. स्मारकविधीला उपस्थित राहणं आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे?
४ स्मारकविधी या सभेला उपस्थित राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? याचं एक कारण म्हणजे सभांना उपस्थित राहून आपण यहोवाची उपासना करतो. वर्षातल्या सर्वात महत्त्वाच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो त्याची दखल यहोवा आणि येशू घेतात याची आपण खात्री बाळगू शकतो. एखाद्याला कदाचित बिकट परिस्थिती किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे उपस्थित राहणं शक्य होणार नाही आणि हे समजण्यासारखं आहे. पण या सर्वात महत्त्वाच्या समारंभाला उपस्थित राहण्याचा आपल्या सर्वांनीच पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे कारण यहोवाची आणि येशूची हीच इच्छा आहे. आपल्यासाठी सभा खूप महत्त्वाच्या आहेत हे जेव्हा आपल्या कार्यांतून आपण दाखवू, तेव्हा यहोवा त्याच्या ‘स्मरणवहीत’ आपल्या नावाची नोंद करेल. बायबलमध्ये या पुस्तकाला ‘जीवनाचं पुस्तक’ असंदेखील म्हटलं आहे. यहोवाला ज्या लोकांना सदासर्वकाळाचं जीवन द्यायचं आहे त्या सर्वांची नावं या पुस्तकात लिहिली जातात.—मला. ३:१६; प्रकटी. २०:१५.
५. आपण विश्वासात आहोत की नाही, हे पाहण्यासाठी स्मारकविधीच्या आधी आपण काय करू शकतो?
५ स्मारकविधीच्या आधीच्या आठवड्यांत, आपण प्रार्थना करण्यासाठी आणि यहोवासोबत आपला नातेसंबंध किती जवळचा आहे यावर विचार करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकतो. (२ करिंथकर १३:५ वाचा.) प्रेषित पौलने ख्रिश्चनांना सांगितलं: “तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख करत राहा.” आपण ही पारख कशी करू शकतो? यासाठी आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘यहोवाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त याच संघटनेला निवडलं आहे यावर माझा पूर्ण भरवसा आहे का? आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि बायबल शिकवण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करत आहे का? आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत आणि सैतानाच्या जगाचा लवकर अंत होईल, याची मला जाणीव आहे हे माझ्या जीवनातून दिसून येतं का? मी साक्षीदार झालो होतो तेव्हाच्या तुलनेत, आता यहोवा आणि येशूवर माझा भरवसा वाढला आहे का?’ (मत्त. २४:१४; २ तीम. ३:१; इब्री ३:१४) या प्रश्नांच्या उत्तरांवर मनन केल्यामुळे आपला विश्वास “तपासून” पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल.
६. (क) सर्वकाळाचं जीवन मिळण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे? (ख) एक वडील दरवर्षी स्मारकविधीची तयारी कशी करतात? तुम्हीही त्यांच्यासारखी तयारी कशी करू शकता?
६ स्मारकविधीची तयारी करण्यासाठी आपण असे लेख लक्षपूर्वक वाचू शकतो जे या समारंभाचं महत्त्व समजावून सांगतात. (योहान ३:१६; १७:३ वाचा.) सर्वकाळाचं जीवन मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे यहोवाबद्दल शिकणं आणि त्याच्या पुत्रावर, येशूवर विश्वास ठेवणं. स्मारकविधीची तयारी करण्यासाठी आपण वैयक्तिक अभ्यासात असे विषय घेऊ शकतो, ज्यामुळे आपलं यहोवा आणि येशू यांच्यासोबतचं नातं आणखी मजबूत होईल. अनेक वर्षांपासून मंडळीत वडील म्हणून सेवा करणारे एक बांधवदेखील हेच करतात. या बांधवाने बऱ्याच वर्षांपासून टेहळणी बुरूजचे असे लेख गोळा केले आहेत जे स्मारकविधी आणि यहोवा व येशू यांच्या प्रेमाबद्दल सांगतात. स्मारकविधीच्या काही आठवड्यांआधी हे बांधव ते लेख परत वाचतात आणि हा विधी इतका महत्त्वाचा का आहे यावर मनन करतात. या विषयावर काही नवीन लेख आले तर तेदेखील हे बांधव सांभाळून ठेवतात. तसंच, स्मारकविधीचं बायबल वाचन करून हे बांधव त्यावर मनन करतात. या सर्व गोष्टी करून दरवर्षी मी नवीन काहीतरी शिकतो असं हे बांधव म्हणतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे अभ्यास केल्यामुळे त्यांचं यहोवा आणि येशू यांच्याप्रती प्रेम वाढतं. तुम्हीदेखील अशा प्रकारे अभ्यास केला तर यहोवा आणि येशू यांच्याप्रती तुमचंही प्रेम वाढेल. तसंच, त्यांनी केलेल्या सर्व गोष्टींसाठी तुमची कदरही वाढेल. यामुळे तुम्हाला स्मारकविधीपासून फायदा होईल.
एकतेचं बंधन मजबूत करणारा स्मारकविधी
७. (क) स्मारकविधीची स्थापना केल्यानंतर येशूने कशासाठी प्रार्थना केली? (ख) यहोवाने येशूची प्रार्थना ऐकली आहे असं का म्हणता येईल?
७ येशूने स्मारकविधीची स्थापना केली त्या रात्री त्याने एक खास प्रार्थना केली. तो आणि पिता कसं एकतेत आहे याबद्दल त्याने प्रार्थना केली. येशूने प्रार्थनेत पुढे म्हटलं की त्याचे शिष्यसुद्धा अशाच प्रकारे एकतेत राहतील. (योहान १७:२०, २१ वाचा.) यहोवाने आपल्या प्रिय पुत्राची ही प्रार्थना ऐकली आहे असं आपण खात्रीने म्हणू शकतो. इतर कोणत्याही सभेच्या तुलनेत स्मारकविधीच्या दिवशी हे अगदी स्पष्ट होतं की यहोवाचे साक्षीदार एकतेत आहेत. या दिवशी जगभरात वेगवेगळ्या देशांचे आणि वर्णाचे लोक एकत्र येतात आणि येशूला यहोवाने पाठवलं होतं यावर आपला विश्वास प्रदर्शित करतात. काही देशांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी धार्मिक समारंभासाठी एकत्र येणं सर्वसामान्य नाही. काही लोकांना तर ते योग्यसुद्धा वाटत नाही. पण या लोकांसारखा यहोवा आणि येशू विचार करत नाही. स्मारकविधीच्या वेळी दिसणारी एकता त्यांच्यासाठी खूप मोलाची आहे.
८. यहोवाने यहेज्केलला काय सांगितलं?
८ ही एकता पाहून आपल्याला आश्चर्य वाटत नाही. कारण यहोवाने यहेज्केलला दिलेल्या संदेशात आधीच याबद्दल सांगितलं होतं. त्याने यहेज्केलला दोन काठ्या घ्यायला सांगितल्या. त्यातली एक काठी ‘यहूदासाठी’ आणि एक ‘योसेफसाठी’ असणार होती आणि त्या काठ्या एकत्र आणण्यासाठी यहोवाने सांगितलं. यामुळे त्या एक होणार होत्या. (यहेज्केल ३७:१५-१७ वाचा.) जुलै २०१६ च्या टेहळणी बुरूज मधील वाचकांच्या प्रश्नात असं सांगितलं आहे: “यहेज्केल संदेष्ट्याद्वारे यहोवाने सांगितलं, की त्याचे लोक वचन दिलेल्या देशात परततील आणि त्यांचं पुन्हा एक राष्ट्र बनेल. त्या भविष्यवाणीत असंही सांगितलं होतं, की शेवटल्या दिवसांत यहोवाचे उपासक एकतेने त्याची उपासना करतील.”
९. यहेज्केलच्या भविष्यवाणीत सांगितलेली एकता दरवर्षी स्मारकविधीमधून कशी दिसून येते?
९ यहोवाने १९१९ सालापासून अभिषिक्त जणांना पुन्हा एकत्रित आणि संघटित करणं सुरू केलं. ते ‘यहूदाच्या’ काठीसारखे होते. यानंतर पृथ्वीवर जीवन जगण्याची आशा ठेवणारे अनेक लोकही अभिषिक्तांसोबत एकत्र येऊ लागले. पृथ्वीवर जीवनाची आशा ठेवणारे हे लोक ‘योसेफची’ काठी यांसारखे आहेत. यहोवाने या दोन काठ्यांना एकत्र आणण्याचं आणि त्यांना “जोडून” त्यांची एक काठी बनवण्याचं अभिवचन दिलं होतं. (यहे. ३७:१९) यहोवाने अभिषिक्त आणि ‘दुसरी मेंढरे’ यांना एकत्र केलं आणि त्यांचा “एक कळप” बनला. (योहा. १०:१६; जख. ८:२३) आज दोन्ही गट एकतेत आहेत आणि ते सोबत मिळून यहोवाची सेवा करत आहेत. त्यांचा एक राजा आहे, येशू ख्रिस्त. त्याला यहेज्केलच्या भविष्यवाणीत देवाचा “सेवक दावीद” असं म्हणण्यात आलं आहे. (यहे. ३७:२४, २५) दरवर्षी आपण येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येतो, तेव्हा या दोन गटांमध्ये आपण यहेज्केलने सांगितलेली एकता पाहतो. पण आपल्यापैकी प्रत्येक जण ही एकता टिकवून ठेवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी हातभार कसा लावू शकतो?
एकता टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
१०. देवाच्या लोकांमधली एकता टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
१० देवाच्या लोकांमधली एकता टिकवून ठेवण्याचा पहिला मार्ग कोणता आहे? नम्र बनून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करणं. पृथ्वीवर असताना येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं की त्यांनी नेहमी नम्र राहण्याचा प्रयत्न करावा. (मत्त. २३:१२) जगात लोक सहसा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. पण आपण नम्र असलो तर आपण मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांचा आदर करू आणि त्यांचं मार्गदर्शन स्वीकारू. सर्वांनी असं केलं तरच मंडळीत एकता टिकून राहील. नम्र राहण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, यामुळे आपण देवाचं मन आनंदित करतो. बायबल सांगतं: “देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.”—१ पेत्र ५:५.
११. द्राक्षारस आणि भाकर यांबद्दल खोलवर विचार केल्यामुळे आपल्याला एकता टिकवून ठेवायला कशी मदत होते?
११ एकता टिकवून ठेवण्याचा दुसरा मार्ग कोणता आहे? द्राक्षारस आणि भाकर कशाला सूचित करतात यावर विचार करणं. आपण स्मारकविधीच्या आधी आणि त्या रात्री यावर मनन करणं गरजेचं आहे. (१ करिंथ. ११:२३-२५) खमीर नसलेली भाकर येशूने बलिदान दिलेल्या परिपूर्ण शरीराला सूचित करते. तसंच, लाल द्राक्षारस त्याच्या रक्ताला सूचित करतो. पण फक्त या मूलभूत गोष्टी समजणंच पुरेसं नाही. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की येशूने दिलेल्या खंडणी बलिदानात दोन व्यक्तींनी दाखवलेल्या महान प्रेमाचा समावेश होतो. यहोवाने त्याच्या पुत्राला आपल्यासाठी अर्पण केलं आणि येशूनेही स्वेच्छेने त्याचं जीवन दिलं. या प्रेमाबद्दल खोलवर विचार केल्यामुळे आपल्याला त्यांच्यावर प्रेम करण्याची प्रेरणा मिळते. यहोवावर असलेल्या प्रेमामुळे आपली एकता आणखी मजबूत होईल.
इतरांना माफ करण्याद्वारे आपण एकता टिकवून ठेवतो (परिच्छेद १२, १३ पाहा)
१२. आपण इतरांना माफ करावं अशी यहोवाची इच्छा आहे हे येशूने एका दाखल्यातून कसं स्पष्ट केलं?
१२ एकता टिकवून ठेवण्याचा तिसरा मार्ग कोणता आहे? इतरांना मनापासून माफ करणं. आपण इतरांना माफ करतो तेव्हा येशूच्या बलिदानामुळे यहोवा आपले पाप माफ करू शकतो, या गोष्टीबद्दल आपण कदर दाखवत असतो. माफ करणं इतकं महत्त्वाचं का आहे हे दाखवण्यासाठी येशूने राजा आणि त्याच्या दासांबद्दल एक दाखला दिला. मत्तय १८:२३-३४ ही वचनं वाचून स्वतःला विचारा: ‘येशूने जे शिकवलं ते करण्यासाठी मी तयार असतो का? आपल्या बंधुभगिनींसोबत वागताना मी धीर दाखवतो का? मी त्यांना समजून घेतो का? ज्या लोकांनी माझं मन दुखावलं आहे त्यांना माफ करायला मी तयार असतो का?’ हे खरं आहे की काही अपराध गंभीर असतात आणि अपरिपूर्ण असल्यामुळे काही अपराधांसाठी इतरांना माफ करणं खूप कठीण जाऊ शकतं. पण येशूने सांगितलेल्या दाखल्यातून, यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे कळतं. (मत्तय १८:३५ वाचा.) येशूने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की जर आपण पश्चात्ताप दाखवणाऱ्या बंधुभगिनींना माफ केलं नाही, तर यहोवाही आपण केलेल्या चुकांसाठी आपल्याला माफ करणार नाही. या गोष्टीवर आपण खोलवर विचार करायला हवा. एकता टिकवून ठेवण्यासाठी येशूने शिकवल्याप्रमाणे आपण इतरांना माफ केलं पाहिजे.
१३. इतरांसोबत शांती टिकवून ठेवण्याद्वारे आपण एकता कशी टिकवून ठेवतो?
१३ आपल्या बंधुभगिनींना माफ करण्याद्वारे आपण त्यांच्यासोबत शांती टिकवून ठेवतो. प्रेषित पौलने म्हटलं की आपण एकतेत राहण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे आणि नेहमी शांती टिकवून ठेवली पाहिजे. (इफिस. ४:३) यामुळे स्मारकविधीच्या काळात आणि खासकरून त्या दिवशी आपण इतरांशी कसं वागतो यावर विचार करा. स्वतःला विचारा: ‘इतरांबद्दल माझ्या मनात राग नाही हे स्पष्टपणे दिसून येतं का? मी शांती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो हे माझ्या वागण्यातून दिसून येतं का?’ या प्रश्नांवर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.
१४. “प्रेमाने एकमेकांचे सहन करा” याचं आपण पालन करत आहोत हे कसं दिसून येईल?
१४ एकता टिकवून ठेवण्याचा चौथा मार्ग कोणता आहे? प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करणं. (१ योहा. ४:८) आपण असं कधीच बोलू नये की, ‘ते माझे बंधुभगिनी असल्यामुळे मला त्यांच्यावर प्रेम करावं लागतं, खरंतर मला ते आवडत नाहीत.’ कारण आपण जर मनात असा विचार करत असू, तर आपल्याला पौलने दिलेल्या सल्ल्याचं पालन करता येणार नाही. त्याने सांगितलं: “प्रेमाने एकमेकांचे सहन करा.” (इफिस. ४:२) पौलने “एकमेकांचे सहन करा” असं सांगितलं नाही, तर तो म्हणाला की “प्रेमाने” एकमेकांचे सहन करा. मंडळीत वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात आणि त्या सर्वांना यहोवाने त्याच्या मंडळीत आणलं आहे. (योहा. ६:४४) यहोवाने त्यांच्यात नक्कीच चांगले गुण पाहिले असतील. मग जर यहोवा आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करू शकतो, तर आपणही त्यांच्यावर प्रेम करायला नको का? यहोवाची इच्छा आहे त्याप्रमाणे आपण आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजेत.—१ योहा. ४:२०, २१.
स्मारकविधीचा शेवट कधी होईल?
१५. स्मारकविधीचा शेवट होईल असं आपण का म्हणू शकतो?
१५ आपण शेवटचा स्मारकविधी पाळू तो दिवस लवकरच येईल. असं आपण कशावरून म्हणू शकतो? पौलने अभिषिक्त ख्रिश्चनांना सांगितलं की ते जेव्हा येशूच्या मृत्यूची दरवर्षी आठवण करतात, तेव्हा ते “प्रभू येईपर्यंत . . . त्याच्या मृत्यूची घोषणा” करत असतात. (१ करिंथ. ११:२६) अंताविषयीच्या भविष्यवाणीतही येशूने आपल्या येण्याबद्दल सांगितलं. मोठ्या संकटाबद्दल येशूने म्हटलं: “मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवर सर्व वंशांचे लोक दुःखाने छाती बडवून घेतील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातील ढगांवर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. आणि तो आपल्या देवदूतांना कर्ण्याच्या मोठ्या आवाजासहित पाठवेल आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना चारही दिशांतून गोळा करतील.” (मत्त. २४:२९-३१) येशू जेव्हा पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्त जणांना “गोळा” करून स्वर्गात घेऊन जाईल, तेव्हा हे शब्द पूर्ण होतील. ही घटना मोठं संकट सुरू झाल्यानंतर, पण हर्मगिदोनाचं युद्ध सुरू होण्याआधी घडेल. या युद्धात येशू त्याच्या १,४४,००० सहराजांसोबत पृथ्वीच्या राजांविरुद्ध लढेल आणि तो विजयी होईल. (प्रकटी. १७:१२-१४) येशू अभिषिक्त लोकांना गोळा करायला ‘येईल’ त्याआधीचा स्मारकविधी हा शेवटचा असेल.
१६. या वर्षी स्मारकविधीला उपस्थित राहण्याचा तुम्ही निश्चय का केला आहे?
१६ या वर्षी ३१ मार्चला स्मारकविधीला उपस्थित राहण्याचा दृढनिश्चय करा. तसंच, आपली एकता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला हातभार लावता यावा म्हणून यहोवाला प्रार्थना करा. (स्तोत्र १३३:१ वाचा.) आपण शेवटचा स्मारकविधी पाळू तो दिवस लवकरच येईल. तोपर्यंत, दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित राहून आपली एकता टिकवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करत राहू या.