वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp17 क्र. २ पृ. ४-७
  • जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल या प्रश्‍नाचं उत्तर देतं
  • खोटी शिकवण वाढत जाते
  • “सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल”
  • पुनरुत्थानावरील तुमचा विश्‍वास किती भक्कम आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • जीवाकरता एक चांगली आशा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मृत कोठे आहेत?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • मृत्यूनंतर जीवन—लोकांचा काय विश्‍वास आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
wp17 क्र. २ पृ. ४-७
कबरेत असलेला एक मृतदेह

मुख्य विषय | जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

बायबलमध्ये उत्पत्ति नावाच्या पुस्तकात निर्मितीविषयी सांगण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की यहोवाa देवाने पहिला मानव आदाम याला घडवलं आणि त्याला अशी आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २: १६, १७) या सोप्या आणि स्पष्ट आज्ञेवरून कळतं, की आदामने जर देवाचं ऐकलं असतं तर तो एदेन बागेत नेहमीसाठी जगला असता. त्याला कधीच मरण आलं नसतं.

आदाम आणि हव्वा त्यांच्या म्हातारपणी

पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आदामने देवाची आज्ञा पाळण्याचं आणि कायमस्वरूपी जगण्याचं निवडलं नाही. याऐवजी त्याने देवाची आज्ञा मोडली. त्याच्या पत्नीने, हव्वाने जेव्हा त्याला मना केलेलं फळ खायला दिलं तेव्हा त्याने ते खाल्लं. (उत्पत्ति ३:१-६) जरी देवाची आज्ञा आदामने मोडली असली, तरी त्याचे परिणाम आज आपल्यालाही भोगावे लागत आहेत. बायबलचा एक लेखक पौल याबद्दल असं म्हणतो: “म्हणूनच, ज्या प्रकारे एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.” (रोमकर ५:१२) या ठिकाणी ज्या ‘एका माणसाचा’ उल्लेख केला आहे तो आदाम होता. मग ‘पाप’ काय होतं आणि त्यामुळे मृत्यू कसा आला?

आदामने जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली होती; त्याने जे केलं ते पाप होतं. (१ योहान ३:४) देवाने आदामला सांगितलं होतं की पापाची शिक्षा मृत्यू आहे. आदाम आणि भविष्यात जन्माला येणारी त्याची मुलं जोपर्यंत देवाने दिलेल्या आज्ञेचं पालन करणार होती, तोपर्यंत त्यांच्यात पाप येणार नव्हतं आणि त्यांना कधीही मृत्यूचा सामना करावा लागणार नव्हता. मानवांना मरण यावं अशा उद्देशाने देवाने त्यांना निर्माण केलंच नव्हतं. याउलट, त्याची इच्छा होती की त्यांनी नेहमीसाठी जगावं.

पण बायबलमध्ये सांगितल्यानुसार “सर्व माणसांमध्ये . . . मरण पसरले,” आणि हीच आजची वस्तुस्थिती आहे. मग मृत्यूनंतर आपल्यातला काही भाग जिवंत राहतो का? अनेक लोक ‘हो’ असं उत्तर देतील. त्यांच्या म्हणण्यानुसार जिवंत राहणारा तो भाग म्हणजे आत्मा, जो अमर राहतो. पण जर ही गोष्ट खरी आहे, तर मग देव आदामला खोटं बोलला असा याचा अर्थ होतो. कारण मृत्यूनंतर जर आपल्यातला एखादा भाग दुसऱ्‍या कुठल्यातरी विश्‍वात जिवंत राहत असेल, तर मग पापाची शिक्षा मृत्यू आहे असं जे देवाने म्हटलं ते खोटं ठरणार नाही का? पण बायबल म्हणतं: “देव कधीही खोटे बोलू शकत नाही.” (इब्री लोकांना ६:१८) खरंतर हव्वाशी खोटं बोलणारा सैतान होता. तो म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही.”—उत्पत्ति ३:४.

जर अमर आत्म्याची शिकवण खोटी आहे, तर मृत्यूनंतर आपलं नेमकं काय होतं?

बायबल या प्रश्‍नाचं उत्तर देतं

उत्पत्तिच्या अहवालात यहोवा देवाने जी निर्मिती केली त्याबद्दल सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे: “मग परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्‍वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” इथे “जीवधारी प्राणी” असा जो वाक्यांश वापरला आहे, तो निफेशb या हिब्रू शब्दातून भाषांतरित करण्यात आला आहे. याचा शाब्दिक अर्थ ‘श्‍वास घेणारा प्राणी’ असा होतो.—उत्पत्ति २:७.

निर्मिती करताना देवाने मानवांमध्ये अमर राहणारा आत्मा टाकला नाही, तर प्रत्येक व्यक्‍तीच एक “जीवधारी प्राणी” आहे असं बायबल सांगतं. म्हणूनच बायबल लिखाणांमध्ये कुठेही “अमर आत्मा” असा वाक्यांश शोधला तरी सापडणार नाही.

काहींचं म्हणणं आहे, की मानवांमध्ये अमर आत्मा असतो. पण बायबल या शिकवणीला दुजोरा देत नाही. मग बऱ्‍याच धर्मांमध्ये ही शिकवण का दिली जाते? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन इजिप्तचा इतिहास पाहावा लागेल.

खोटी शिकवण वाढत जाते

इ.स.पू. पाचव्या शतकातला ग्रीक इतिहासकार हेरोडिटस, याने इजिप्तच्या लोकांबद्दल असं म्हटलं: “त्यांनी सर्वात आधी अमर आत्म्याची शिकवण मानवांना दिली.” यासोबतच, आणखीन एका प्राचीन संस्कृतीने म्हणजेच, बाबेलच्या संस्कृतीनेही अमर आत्म्याची शिकवण स्वीकारली. थोर सिकंदरने इ.स.पू. ३३२ साली, मध्य-पूर्व देशांना काबीज केलं, तोपर्यंत ग्रीक तत्त्वज्ञान्यांनी ही शिकवण प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ही शिकवण लवकरच संपूर्ण ग्रीक साम्राज्यात पसरली.

तुम्हाला “अमर आत्मा” असा वाक्यांश कोणत्याही बायबल लिखाणांमध्ये सापडणार नाही

इ.स. पहिल्या शतकातल्या इसीन आणि परूशी या दोन प्रमुख यहुदी पंथांनी, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो असं शिकवलं. द जूईश एन्सायक्लोपिडिया यात म्हटलं आहे: “यहुदी लोकांमध्ये अमर आत्म्याची शिकवण ग्रीक विचारधारांमधून आणि मुख्यतः प्लेटोच्या तत्त्वज्ञानांतून आली.” पहिल्या शतकातला यहुदी इतिहासकार जोसिफस याचंदेखील म्हणणं आहे, की ही शिकवण पवित्र शास्त्रावर आधारलेली नसून “ग्रीक लोकांच्या विश्‍वासावर आधारित आहे.” आणि या शिकवणी दंतकथा लिहिणाऱ्‍यांच्या कथांचा एक संग्रह आहे, असं त्याचं मत आहे.

ग्रीक संस्कृतीचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसं स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्‍यांनीदेखील ही खोटी शिकवण स्वीकारण्यास सुरुवात केली. योन लेंडरीन या इतिहासकाराने म्हटलं, “प्लेटोच्या सिद्धान्तानुसार, आपला आत्मा आधी एका चांगल्या स्थितीत होता आणि आता अशा एका जगात राहत आहे ज्याचं पतन झालं आहे. या शिकवणीमुळे प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला, ख्रिस्ती धर्माच्या शिकवणींसोबत जोडणं शक्य झालं.” अशा प्रकारे अमर आत्म्याची ही खोटी शिकवण, ख्रिस्ती धर्मजगताच्या मूळ शिकवणींमध्ये सामील झाली.

“सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल”

पहिल्या शतकात पौलने सल्ला दिला: “प्रेरित वचन स्पष्टपणे सांगते की भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा काही जण दिशाभूल करणाऱ्‍या प्रेरित संदेशांकडे आणि दुरात्म्यांच्या शिकवणींकडे लक्ष देऊन विश्‍वास सोडून देतील.” (१ तीमथ्य ४:१) त्याचे हे शब्द आज किती खरे ठरले आहेत! पण अमर आत्म्याची शिकवण ही दुरात्म्यांच्या शिकवणींपैकी फक्‍त एक आहे. ही शिकवण बायबलमधून नसून हिचा उगम खोट्या धर्मांतून आणि तत्त्वज्ञानातून झाला आहे.

पण आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येशूने म्हटलं: “तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल.” (योहान ८:३२) जगातले अनेक धर्म अशा शिकवणींना आणि रितीरिवाजांना बढावा देत आहेत ज्यांमुळे देवाचा अनादर होतो. पण बायबलमधल्या सत्यांविषयी अचूक ज्ञान घेतल्यामुळे आपण अशा शिकवणींपासून आणि रितीरिवाजांपासून मुक्‍त होतो. इतकंच काय, तर देवाच्या वचनातलं सत्य आपल्याला मृत्यूशी संबंधित असलेल्या परंपरा आणि अंधविश्‍वासांच्या बेड्यांतूनही मुक्‍त करतं.—“मृतजन कुठे आहेत?” ही चौकट पाहा.

मानवांनी फक्‍त ७० किंवा ८० वर्षंच या पृथ्वीवर जगावं आणि त्यानंतर दुसऱ्‍या एका विश्‍वात कायमस्वरूपी राहण्यासाठी जावं, यासाठी देवाने त्यांना निर्माण केलं नव्हतं. तर मानवांनी देवाच्या आज्ञेत राहून याच पृथ्वीवर कायमस्वरूपी जगावं, हा देवाचा मूळ संकल्प होता. हा महान संकल्प देवाचं मानवांवर असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे आणि तो नक्की पूर्ण होणार. (मलाखी ३:६) बायबलच्या एका लेखकाने जे लिहिलं त्यामुळे या गोष्टीवर आपला भरवसा आणखी वाढतो. तो म्हणाला: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.

बायबलमध्ये जीवन आणि मृत्यू यांविषयी काय सांगितलं आहे, हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या पुस्तकाचा ६ वा अध्याय पाहा. हे प्रकाशन www.jw.org/mr वरदेखील उपलब्ध आहे किंवा तुम्ही हा कोड स्कॅन करू शकता.

a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं आहे.

b काही बायबल भाषांतरात जसं की, मराठी कॉमन लँग्वेज, ईझी-टू-रीड व्हर्शन आणि पं.र.भा. यांमध्ये निफेश या शब्दाला “जिवंत प्राणी” असं भाषांतरित करण्यात आलं आहे. तसंच, सुबोध भाषांतर यामध्ये याचं भाषांतर “जीवधारी प्राणी” असं करण्यात आलं आहे.

मानव नेहमीसाठी जगू शकतात का?

काही वर्षांपूर्वी संशोधकांना काही समुद्री वनस्पती सापडल्या. त्यांच्या मते या वनस्पती हजारो वर्षांपासून जिवंत आहेत. पृथ्वीवर असलेल्या इतर कोणत्याही सजीव गोष्टींपेक्षा त्यांचं अस्तित्व फार जुनं असावं, असं ते म्हणतात. या वनस्पती समुद्री गवत असून पोसेडोनिया ओशेनिका या जातीच्या आहेत. या वनस्पतींचा खूप मोठा पट्टा, स्पेन आणि साइप्रस या देशांच्या मध्ये असलेल्या भूमध्य समुद्राच्या तळाशी आढळतो.

जर वनस्पती इतकी जास्त वर्षं जगू शकतात, तर मानवांबद्दल काय? मानव वृद्ध का होतात, या विषयावर संशोधन करणारे काही वैज्ञानिक असा दृष्टिकोन बाळगतात, की मानव आज जगत आहेत त्यापेक्षाही जास्त वर्षं जगू शकतात. उदाहरणार्थ, या विषयावर आधारित असं एक संपूर्ण पुस्तक आहे, ज्यात “थक्क करून टाकणाऱ्‍या अनेक गोष्टींच्या शोधांबद्दल” सांगितलं आहे. पण, वैज्ञानिकांना लागलेल्या शोधांचा मानवांच्या आयुष्यावर खरंच काही प्रभाव पडेल की नाही याबद्दल आताच काही म्हणता येणार नाही.

आधुनिक विज्ञान आपल्याला कायमचं जीवन देऊ शकत नाही. तर आपला सृष्टिकर्ता, यहोवा देवच आपल्याला कायमचं जीवन देऊ शकतो. कारण बायबल आपल्याला सांगतं: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ [देवाजवळ] आहे.” (स्तोत्र ३६:९) येशू ख्रिस्ताने यहोवाला अशी प्रार्थना केली: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्‍यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.” (योहान १७:३) जर आपण यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांना जाणून घेण्यासाठी मेहनत घेतली आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जगलो, तर आपल्याला कायमस्वरूपी जगण्याचा आशीर्वाद मिळू शकतो.

समुद्रातील गवत

शोधकर्त्यांच्या मते या समुद्री गवतांच्या जातीच्या काही वनस्पती हजारो वर्षांपासून जिवंत आहेत

मृतजन कुठे आहेत?

येशू लाजरचं पुनरुत्थान करतो

सोप्या शब्दांत सांगायचं, तर मृतजन पुन्हा मातीला मिळतात. पण, त्यांना पुन्हा जिवंत होण्याची आशा आहे असं बायबल म्हणतं. (उत्पत्ति ३:१९; योहान ५:२८, २९) ते कोणत्याही प्रकारच्या यातना किंवा दुःख भोगत नाहीत. कारण “मृतांस . . . काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) येशूने शिकवलं की मृतांची स्थिती गाढ झोपेत असलेल्या व्यक्‍तीप्रमाणे आहे. (योहान ११:११-१४) म्हणून आपल्याला मृतजनांना घाबरण्याची किंवा त्यांना खूश करण्यासाठी अर्पणं देण्याची गरज नाही. ते आपल्याला मदत करू शकत नाहीत किंवा आपल्याला इजाही पोचवू शकत नाहीत. कारण “कबरेत काम नसते. तिथे ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते.” (उपदेशक ९:१०, ईझी-टू-रीड व्हर्शन) पण पुनरुत्थानाद्वारे म्हणजेच मृतांना परत जिवंत करण्याद्वारे, देव मृत्यूला कायमचं नाहीसं करेल.—१ करिंथकर १५:२६, ५५; प्रकटीकरण २१:४.

बायबल जे सांगतं त्यावर तुम्ही विश्‍वास का ठेवू शकता?

बायबलमध्ये जे सांगितलं आहे, त्यावर आपण पूर्णपणे विश्‍वास ठेवू शकतो. का? पुढील कारणांवर विचार करा:

  • दऊत आणि लेखणी

    अप्रतिम लेखक: बायबल ६६ पुस्तकांनी मिळून बनलेलं आहे. ४० लेखकांनी, इ.स.पू. १५१३ पासून इ.स. ९८ पर्यंतच्या काळात ते लिहिलं. ते लिहिण्यासाठी १,६०० पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी लागला. असं असलं तरी, आपल्याला बायबलमध्ये सुसंगतता आणि ताळमेळ असल्याचं दिसून येतं. यावरून सिद्ध होतं, की बायबलचा लेखक कोणी मानव नसून सर्वशक्‍तिमान देव आहे. त्याने मानवांना आपला संदेश सांगितला आणि मानवांनी तो लिहून काढला.

  • एक स्तंभ

    ऐतिहासिक रीत्या अचूक: बायबलमध्ये ज्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्या इतिहासात खरोखर घडल्या होत्या हे पुराव्यांवरून सिद्ध होतं. अ लॉयर एक्झामिन्स द बायबल या पुस्तकात म्हटलं आहे: “प्रेम कथा, लोक कथा आणि मानवांची खोटी साक्ष यांबद्दल लिहिताना ठिकाणांचा किंवा कालावधीचा अचूकपणे उल्लेख केला जात नाही, . . . पण याउलट बायबलच्या अहवालात आपल्याला अचूक तारखा आणि ठिकाणांची नावं वाचायला मिळतात.”

  • एक अणू

    वैज्ञानिक रीत्या अचूक: बायबल हे विज्ञानाचं पुस्तक नाही. पण त्यात विज्ञानाशी संबंधित जी माहिती दिली आहे ती अगदी अचूक आहे. शिवाय ती खूप वर्षांपूर्वीच लिहिण्यात आली आहे. उदाहरणार्थ, बायबलमधल्या लेवीय नावाच्या पुस्तकाच्या अध्याय १३ आणि १४ यांमध्ये इस्राएली लोकांना स्वच्छता आणि आजारी व्यक्‍तीला इतरांपासून वेगळं ठेवण्याच्या बाबतीत बारीकसारीक नियम देण्यात आले होते. त्या काळी जंतू आणि संसर्गजन्य रोग यांबद्दल लोकांना काहीच कल्पना नव्हती. तसंच, पृथ्वीचा आकार गोल आहे आणि ती कोणत्याही आधाराशिवाय अंतराळात आहे हेसुद्धा बायबलमध्ये सांगितलं आहे. हे लिहिण्याच्या खूप वर्षांनंतर वैज्ञानिकांना पूर्णपणे ही गोष्ट समजली.—ईयोब २६:७; यशया ४०:२२.

बायबल खरोखर देवाकडून आहे, हे वर दिलेल्या काही उदाहरणांवरून सिद्ध होतं. आणि म्हणूनच बायबलमध्ये जे म्हटलं आहे त्यावर आपण विश्‍वास ठेवू शकतो. त्यात म्हटलं आहे: “संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असून ते शिकवण्यासाठी, ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी, न्यायनीतीनुसार शिस्त लावण्यासाठी उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा