“भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो”
“बातमीपत्र कधीही न पाहणारी व्यक्ती मूर्ख आहे; पण बातमीपत्रात लिहिलेलं सर्वकाही, ते त्यात लिहिलं आहे म्हणून खरं मानणारी व्यक्ती त्याहूनही मूर्ख आहे.”—ऑगस्ट फॉन श्लूझर, जर्मन इतिहासकार आणि लेखक (१७३५-१८०९).
या विधानावरून दिसून येतं की जवळपास दोनशे वर्षांआधीसुद्धा बातमीपत्रातील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं लोकांना कठीण होतं. आणि आज इंटरनेटच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. इंटरनेटवर पाहायला किंवा वाचायला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आज आपण विश्वास ठेवू शकत नाही. इंटरनेटवर आज प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. शिवाय, आधुनिक तंत्रज्ञानामुळे हवी असणारी माहिती शोधणंही अगदी सोपं झालं आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणारी पुष्कळ माहिती हानीकारक नसते. शिवाय ती खरी आणि उपयोगीदेखील असते, यात शंका नाही. पण, फसव्या, वायफळ आणि धोकादायक माहितीचीही इंटरनेटवर कमी नाही. म्हणूनच, आपण काय वाचतो याचं काळजीपूर्वक परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. काही जण इंटरनेटचा वापर करण्यास सुरवात करतात, तेव्हा एखादी बातमी सध्या इंटरनेटवर झळकत आहे किंवा आपल्या मित्रानं ती ई-मेलवर पाठवली आहे, म्हणून ती खरी असली पाहिजे असा विचार कदाचित ते करतील. आणि ती गोष्टी अगदी न पटण्याजोगी जरी असली तरीही तिच्यावर विश्वास ठेवतील. पण, बायबल अगदी स्पष्टपणे ताकीद देतं की “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.”—नीति. १४:१५.
भोळेपणाच्या किंवा आंधळेपणानं प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याच्या उलट शहाणपण किंवा चाणाक्षपण आहे. आपल्या अंगी शहाणपण असेल तर आपण प्रत्येक बाबतीत दक्ष असू आणि खात्रीशीर गोष्टींवरच विश्वास ठेवू. इंटरनेटवर वाचायला मिळणाऱ्या कोणत्याही खोट्या गोष्टीवर, मग ती कितीही चर्चेत असली तरीही त्यावर विश्वास ठेवून आपण स्वतःची फसवणूक करून घेणार नाही. मग असं शहाणपण बाळगण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? यासाठी पहिल्यांदा आपल्याला काही प्रश्न स्वतःला विचारावे लागतील. जसं की, इंटरनेटवर मिळालेली एखादी गोष्ट अधिकृत आणि भरवशालायक अशा वेबसाईटवरून आहे का? की कोणत्यातरी अज्ञात उगमाकडून किंवा अशा वेबसाईटवरून आहे, ज्यावर कोणीही आपलं स्वतःचं मत मांडू शकतं? मिळालेली माहिती खोटी असल्याचं आधीच एखाद्या भरवशालायक वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे का?a असे प्रश्न स्वतःला विचारून थोडं परीक्षण केल्यावर, तुम्हाला शहाणपणानं योग्य तो निष्कर्ष काढता येईल आणि तुम्ही “बुद्धीहीन” नसल्याचं दाखवता येईल. (नीति. ७:७) इंटरनेटवरील एखादी बातमी जेव्हा शंकास्पद असते, तेव्हा ती खोटी असण्याचीच जास्त शक्यता असते. शिवाय, इतरांबद्दल काही नकारात्मक माहिती वाचायला मिळते, तेव्हा ही माहिती पसरवल्यामुळे कोणाला फायदा होईल आणि ती का पसरवली जात असेल याचा विचार करा.
तुम्ही आलेला प्रत्येक ई-मेल नेहमीच इतरांना पाठवत असता का?
काही जण त्यांना मिळालेली एखादी बातमी लगेच इंटरनेटवरील आपल्या सर्व सोबत्यांना पाठवून मोकळे होतात. ती माहिती खरी आहे की नाही किंवा ती पाठवल्यामुळे पुढे काय होईल, याचा जराही विचार ते करत नाहीत. याचं एक कारण म्हणजे, लोकांचं सतत आपल्याकडे लक्ष असावं किंवा ती बातमी इतरांना पोचवणारी पहिली व्यक्ती आपण असावी असं कदाचित त्यांना वाटत असेल. (२ शमु. १३:२८-३३) पण, यामुळे कोणता वाईट परिणाम घडू शकतो याचा आधी विचार करणं खरंतर शहाणपणाचं आहे. उदाहरणार्थ, यामुळे एखाद्या व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाव तर खराब होत नाही ना, याचा विचार आपण आधी केला पाहिजे.
इतरांना एखादी बातमी पाठवणारी व्यक्ती तिची सत्यता पडताळून पाहत नाही, याचं आणखी एक कारण म्हणजे त्यासाठी लागणारा वेळ आणि परिश्रम. तिला वाटतं की ज्यांना ही बातमी मी पाठवत आहे, ते लोक ही बातमी खरी आहे की नाही हे तपासून पाहू शकतात. पण, त्यांचा वेळदेखील महत्त्वाचा आहे हे विसरू नका. (इफिस. ५:१५, १६) तेव्हा, आपल्यालाच खात्री नसेल अशी एखादी माहिती इतरांना पाठवण्याऐवजी, “मला यात शंका वाटते, तर ती नष्ट केलेलीच बरी!” असा विचार करणंच शहाणपणाचं ठरेल.
स्वतःला विचारा: ‘मी नेहमीच, येतील ते ई-मेल इतरांना पाठवत असतो का? चुकीची किंवा खोटी माहिती पाठवली म्हणून मला कधी इतरांची माफी मागावी लागली आहे का? मला असे मेल पाठवत जाऊ नकोस, असं कोणी मला कधी म्हटलं आहे का?’ हे विसरू नका की ज्यांच्याकडे ई-मेल आहे तेसुद्धा इंटरनेटचा वापर करतात. आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी इंटरनेटवर शोधण्यासाठी तुमच्या मदतीची त्यांना गरज नाही. तेव्हा, ढीगभर मजेशीर कथा, व्हिडिओ, किंवा चित्रांनी आपला मेल-बॉक्स तुडुंब भरून जावा अशी त्यांची मुळीच इच्छा नसते. भाषणाचे रेकॉर्डिंग किंवा त्यांच्या तपशीलवार नोंदी पाठवण्याचंदेखील खरंतर शहाणपणाचं ठरणार नाही.b शिवाय, एखाद्यानं स्वतः संशोधन केलं, शास्त्रवचनं पडताळली, किंवा सभांसाठी स्वतःहून उत्तरं तयार केली, तर त्याला जास्त फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का?
मी ही माहिती इतरांनाही पाठवू का?
यहोवाच्या संघटनेबद्दल दुष्ट हेतूनं खोटी माहिती पसरवणारं असं काहीतरी इंटरनेटवर तुम्ही पाहिलं, तर काय कराल? अशा गोष्टीवर बिलकूल विश्वास ठेवू नका. आणि ती गोष्ट लगेचच आपल्या समोरून घालवून द्या! अशा गोष्टी इतरांना पाठवून, त्याबद्दल त्यांचं मत विचारणं नक्कीच शहाणपणाचं ठरणार नाही. कारण यामुळे अशी धोकादायक माहिती सगळीकडे पसरण्याशिवाय आणखी वेगळं काही होणार नाही. इंटरनेटवरील एखादी गोष्ट तुम्हाला चिंतित करत असेल, तर त्याविषयी योग्य ती समज मिळावी म्हणून यहोवाला प्रार्थना करा. तसंच मंडळीतील प्रौढ बांधवांशी त्याबद्दल बोला. (याको. १:५, ६; यहू. २२, २३) आपल्याविषयी लोक अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत, हे पाहून खरंतर आपल्याला आश्चर्य वाटण्याची गरज नाही. येशूबद्दलही लोकांनी खोट्या गोष्टी पसरवल्या होत्या. शिवाय, तुमचे शत्रू तुमचा छळ करतील आणि “सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील” असं येशूनं आपल्या शिष्यांना आधीच सांगितलं होतं. (मत्त. ५:११; ११:१९; योहा. १०:१९-२१) तेव्हा, तुम्ही जर समंजस आणि काळजीपूर्वक विचार करणारे असाल, तर खोटं बोलून कोणीतरी इतरांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे, हे तुम्हाला ओळखता येईल.—नीति. २:१०-१६.
इतरांच्या हक्काचा आदर करा
आपल्या बांधवांविषयी असणारी एखादी बातमी किंवा ऐकलेला एखादा अनुभव इतरांना सांगतानादेखील आपण काळजी घेतली पाहिजे. माहिती खरी असली तरी, त्या वेळी इतरांना त्याबद्दल सांगणं कदाचित योग्य किंवा प्रेमळपणाचं ठरणार नाही. (मत्त. ७:१२) उदाहरणार्थ, इंटरनेटचा वापर करून एखाद्याविषयी असलेल्या नकारात्मक गोष्टी इतरांना सांगणं नक्कीच प्रेमळपणाचं किंवा प्रोत्साहनदायक ठरणार नाही. (२ थेस्सलनी. ३:११; १ तीम. ५:१३) शिवाय, काही गोष्टी कदाचित गोपनीय असतील, आणि या गोष्टी काहींना वेगळ्या पद्धतीनं किंवा नंतर उघड करायच्या असतील. म्हणून, अशा गोष्टी केव्हा आणि कशा उघड करायच्या हे ठरवण्याच्या त्यांच्या हक्काचा आदर करा. खरंतर अशा गोष्टी वेळेआधीच इतरांना सांगितल्यामुळे खूप नुकसानदेखील होऊ शकतं.
आज कोणतीही बातमी, मग ती खरी असो किंवा खोटी, फायद्याची असो किंवा निरुपयोगी, साधी असो किंवा धोकादायक, अगदी झपाट्यानं सगळीकडे पसरू शकते. तुम्ही एक साधा मेसेज जर एखाद्याला पाठवला, तर तो मेसेज ती व्यक्ती काही सेकंदांतच साऱ्या जगाला पाठवू शकते. म्हणून एखादी गोष्ट लगेचच आणि तेही सर्वांना पाठवण्याचा मोह आवरा. प्रीती “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते” आणि कोणत्याही गोष्टीवर शंका घेत नाही. म्हणून प्रत्येक नवीन आणि मनोरंजक गोष्टीवर आपण आंधळेपणानं विश्वास ठेवावा, असा याचा अर्थ होत नाही. (१ करिंथ. १३:७) यहोवाच्या संघटनेबद्दल आणि ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, त्या आपल्या बांधवांबद्दल असलेल्या कोणत्याही खोट्या माहितीवर आपण कधीच विश्वास ठेवणार नाही. खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करणारे, मुळात “लबाडीचा बाप” असणाऱ्या सैतानाला खूश करण्याचा प्रयत्न करत असतात. (योहा. ८:४४) बायबल म्हणतं: “भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.” (नीति. १४:१८) तेव्हा, उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या प्रचंड साठ्याचा कसा वापर करायचा, याबाबतीत आपण नेहमी काळजीपूर्वक विचार करून शहाणपणा दाखवू या.
a बऱ्याच वेळा असं होतं की पूर्वी एखादी माहिती खोटी असल्याचं उघड केल्यानंतरही ती खरी वाटावी, म्हणून थोडाफार बदल करून ती पुन्हा इंटरनेटवर आणली जाते.
b आपली राज्य सेवा एप्रिल २०१० मधील “प्रश्न पेटी” पाहा.