वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ५/१५ पृ. २४-२८
  • आपल्या निर्माणकर्त्याचं अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या निर्माणकर्त्याचं अनुकरण करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांवर प्रेम दाखवण्याद्वारे येशूनं यहोवाचं अनुकरण केलं
  • यहोवासारखं प्रेम दाखवा
  • यहोवासारखी दया दाखवा
  • यहोवासारखी समजबुद्धी दाखवा
  • आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा
  • कशाचीही चिंता करू नका
  • “चल, माझ्यामागे ये”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • येशूसारखी निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आपली सर्व चिंता यहोवावर टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ५/१५ पृ. २४-२८
सभागृहात एकटे बसलेल्या वृद्ध बांधवाला पाहताना एक तरुण बांधव

आपल्या निर्माणकर्त्याचं अनुकरण करा

“देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.”—इफिस. ५:१.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

  • येशूनं कशा प्रकारे यहोवाच्या गुणांचं अनुकरण केलं?

  • आपण यहोवाच्या गुणांचं आणि खासकरून त्याच्या प्रेमाचं अनुकरण कसं करू शकतो?

  • आपण कोणत्या गोष्टींचा विचार करतो, याविषयी सावध राहण्याची गरज का आहे?

१. कोणत्या क्षमतेमुळे आपण यहोवाचं अनुकरण करू शकतो?

इतरांची परिस्थिती आपण स्वतः अनुभवली नसली, तरी आपण त्यांच्या भावना समजू शकतो. कारण यहोवानं आपल्याला या क्षमतेसह निर्माण केलं आहे. (इफिसकर ५:१, २ वाचा.) या क्षमतेचा वापर करून आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो? आणि, या क्षमतेचा वापर करताना कोणत्या बाबतीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे?

२. आपल्याला दुःख सहन करावं लागतं तेव्हा यहोवाला कसं वाटतं?

२ यहोवानं आपल्याला अशा एका सुंदर भविष्याचं अभिवचन दिलं आहे जिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नसेल. अभिषिक्‍त जन आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ सदस्य या सार्वकालिक जीवनाची वाट पाहत आहेत. (योहा. १०:१६; १७:३; १ करिंथ. १५:५३) आज आपल्याला जेव्हा दुःखांचा सामना करावा लागतो, तेव्हा आपल्याला होणारं दुःख यहोवाला कळतं. गतकाळात त्याच्या लोकांना इजिप्तच्या दास्यात छळ सहन करावा लागला, तेव्हा तो खूप “दुःखी झाला.” (यश. ६३:९) पुढे मंदिराची पुनर्बांधणी करत असताना इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंची भीती वाटत होती. तेव्हासुद्धा, यहोवानं त्यांच्या भावना समजून घेतल्या. म्हणूनच त्यानं म्हटलं, जो कोणी तुम्हाला स्पर्श करेल त्यानं जणू माझ्या “डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श” केल्यासारखं होईल. (जख. २:८) जसं एक आई आपल्या मुलावर जिवापाड प्रेम करते, तसं यहोवा आपल्या सेवकांवर प्रेम करतो. त्यांना मदत करायला तो नेहमी तयार असतो. (यश. ४९:१५) आपण जेव्हा स्वतःला इतरांच्या जागी ठेवून त्यांच्या भावना समजून घेतो, तेव्हा खरंतर आपण यहोवाचं अनुकरण करत असतो.—स्तो. १०३:१३, १४.

इतरांवर प्रेम दाखवण्याद्वारे येशूनं यहोवाचं अनुकरण केलं

३. येशूला लोकांबद्दल कसं वाटलं?

३ येशूनं लोकांच्या हालअपेष्टा प्रत्यक्ष अनुभवल्या नसल्या, तरी त्यांच्या भावना त्यानं समजून घेतल्या. उदाहरणार्थ, लोकांचं जीवन अतिशय कठीण आहे याची त्याला जाणीव होती. धार्मिक पुढारी त्यांची फसवणूक करत होते आणि स्वतःचे कित्येक नियम त्यांनी या लोकांवर लादले होते. आणि लोकांना त्यांची भीती वाटत होती. (मत्त. २३:४; मार्क ७:१-५; योहा. ७:१३) येशू स्वतः मात्र या धार्मिक पुढाऱ्‍यांना कधी घाबरला नाही. आणि त्यांच्या खोट्या शिकवणींवर त्यानं कधी विश्‍वासही ठेवला नाही. पण तरी, लोकांच्या भावना येशू समजू शकला. शिवाय, लोकांना वाईट वागणूक सहन करावी लागत आहे, हे पाहून येशूला खूप दुःख व्हायचं. त्यांना कोणाचीही मदत नसल्यामुळे, ते जणू “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे” आहेत असं येशूला वाटलं. (मत्त. ९:३६) यहोवाप्रमाणेच येशूदेखील लोकांशी दयाळूपणे व कृपाळूपणे वागला.—स्तो. १०३:८.

४. लोकांना त्रास होत आहे हे येशूनं पाहिलं, तेव्हा त्यानं काय केलं?

४ लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत हे पाहून येशूनं त्यांना मदत केली. कारण आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणेच त्याचंही लोकांवर खूप प्रेम होतं. उदाहरणार्थ, लोकांना शिकवण्यासाठी, येशूच्या शिष्यांनी एकदा लांबचा प्रवास केला होता. ते फार थकले होते आणि एका निवांत ठिकाणी जाऊन त्यांना आराम करायचा होता. पण, त्याच वेळी कित्येक लोक आपलं ऐकण्यासाठी थांबले आहेत हे येशूनं पाहिलं. जमलेल्या या सर्व लोकांना मदतीची गरज आहे हे त्यानं ओळखलं. त्यामुळे, “तो त्यांना बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.”—मार्क ६:३०, ३१, ३४.

यहोवासारखं प्रेम दाखवा

५, ६. यहोवासारखं प्रेम दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो? स्पष्ट करा. (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

५ आपल्यालाही यहोवासारखंच इतरांवर प्रेम दाखवायचं असेल, तर आपण काय करू शकतो? एक उदाहरण घेऊ या. असा विचार करा, की ॲलन नावाचा एक तरुण बांधव आहे. तो अशा एका वृद्ध बांधवाचा विचार करत आहे, ज्यांना नीट चालता येत नाही आणि स्पष्ट दिसतही नाही. त्या बांधवाचा विचार करताना ॲलनला येशूचे शब्द आठवतात: “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा.” (लूक ६:३१) येशूच्या या शब्दांचा विचार केल्यावर तो स्वतःला असं विचारतो, ‘इतरांनी माझ्यासाठी काय करावं अशी माझी इच्छा आहे?’ स्वतःच्याच प्रश्‍नाचं उत्तर देत तो म्हणतो, ‘त्यांनी माझ्यासोबत क्रिकेट खेळावं असं मला वाटतं!’ पण या वृद्ध बांधवाला पळता येणं किंवा कोणाशी खेळणंही शक्य नाही. म्हणून ॲलननं स्वतःला खरंतर असं विचारलं पाहिजे, ‘जर मी या बांधवाच्या जागी असतो, तर इतरांनी माझ्यासाठी काय करावं अशी माझी इच्छा असती?’

६ या उदाहरणातील ॲलन जरी एक तरुण व्यक्‍ती असला, तरी तो स्वतःला त्या वृद्ध बांधवाच्या जागी ठेऊन, त्यांना कसं वाटत असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो त्या बांधवासोबत वेळ घालवतो आणि त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. असं केल्यामुळे, या बांधवाला बायबल वाचायला अवघड जात आहे आणि घरोघरच्या साक्षकार्यात चालणंही कठीण होत आहे हे त्याला जाणवतं. बांधवाच्या गरजेनुसार त्यांना मदत कशी करता येईल याचा ॲलन आता विचार करतो, आणि या बांधवासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी तो तयार आहे. अशा प्रकारे जेव्हा इतरांच्या भावना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याशी प्रेमानं वागतो, तेव्हा आपण खरंतर यहोवासारखंच प्रेम दाखवत असतो.—१ करिंथ. १२:२६.

एका वृद्ध बांधवासोबत तलावाशेजारी वेळ घालवताना एक तरुण बांधव

प्रेम दाखवण्याद्वारे यहोवाचं अनुकरण करा (परिच्छेद ७ पाहा)

७. बांधवांचं दुःख आपण कसं समजू शकतो?

७ इतरांना कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत हे समजून घेणं नेहमीच सोपं नसतं, खासकरून जेव्हा आपण त्यांची परिस्थिती स्वतः अनुभवलेली नसते. उदाहरणार्थ, आपल्या कित्येक बांधवांना आजारपणामुळे, वय झाल्यामुळे किंवा अपघातामुळे वेदना सहन कराव्या लागत आहेत. तर काही जणांना, नैराश्‍य किंवा गतकाळात झालेल्या अत्याचारामुळे भावनिक आघात सहन करावे लागत आहेत. तसंच, असेही काही पालक आहेत जे एकटेच मुलांचं पालनपोषण करत आहेत. प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या समस्येला आज तोंड द्यावं लागत आहे. आणि प्रत्येकाच्या समस्या आपल्यासारख्याच असतील असं म्हणता येणार नाही. पण तरी, इतरांना मदत करावी आणि त्यांना प्रेम दाखवावं अशी आपली इच्छा असते. मग यासाठी आपल्याला काय करता येईल? आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे, जेव्हा आपण एखाद्याचं काळजीपूर्वक ऐकू आणि त्याला कसं वाटत असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा त्या व्यक्‍तीला सर्वात योग्य मार्गानं मदत करणं आपल्याला शक्य होईल. तसंच, त्या व्यक्‍तीच्या समस्येबद्दल यहोवाला कसं वाटतं याचीही आपण तिला आठवण करून देऊ शकतो आणि तिला मदत करू शकतो. असं करण्याद्वारे आपण यहोवाचं अनुकरण करत असतो.—रोमकर १२:१५; १ पेत्र ३:८ वाचा.

यहोवासारखी दया दाखवा

८. कोणत्या गोष्टीमुळे येशू दया दाखवू शकला?

८ यहोवा प्रत्येकावर दया दाखवतो. (लूक ६:३५) आणि येशूदेखील याबाबतीत अगदी आपल्या पित्यासारखाच आहे. पृथ्वीवर असताना येशूला कोणत्या गोष्टीमुळे लोकांवर दया दाखवणं शक्य झालं? आपण जे काही बोलणार आहोत किंवा करणार आहोत त्यामुळे इतरांना कसं वाटेल याचा त्यानं विचार केला. उदाहरणार्थ, वाईट चालचलन असणारी एक स्त्री येशूच्या पायांशी येऊन अत्यंत विव्हळ होऊन रडू लागली. तिचे अश्रू त्याच्या पायांवर ओघळू लागले. या स्त्रीला स्वतःच्या चुकांबद्दल अतिशय वाईट वाटत आहे आणि तिनं मनापासून पश्‍चात्ताप केला आहे, हे येशूनं ओळखलं. अशा वेळी या स्त्रीला कठोरतेनं वागवलं तर तिच्या मनावर याचा किती वाईट परिणाम होईल, याचा येशूनं विचार केला. म्हणून त्यानं तिची प्रशंसा केली आणि तिला माफ केलं. शिवाय, येशूनं केलेल्या या गोष्टीशी सहमत नसलेल्या परूशी व्यक्‍तीशीही तो अगदी दयाळूपणे बोलला.—लूक ७:३६-४८.

९. दयाळूपणे वागण्याकरता कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? उदाहरण द्या.

९ आपणही यहोवासारखा दयाळूपणा कसा दाखवू शकतो? काही बोलण्याआधी किंवा काही करण्याआधी त्याचा काय परिणाम होईल याचा आपण विचार केला पाहिजे. यामुळे इतरांच्या भावना न दुखावता त्यांच्याशी दयाळूपणे वागणं आपल्याला शक्य होईल. प्रेषित पौलानं असं लिहिलं, “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे. (२ तीम. २:२४) पुढील परिस्थितीत तुम्हाला दयाळूपणा कसा दाखवता येईल याचा विचार करा: तुमचा मालक त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसेल तर तुम्ही काय कराल? बऱ्‍याच महिन्यांपासून सभेला न आलेला एखादा बांधव अचानक सभेला येतो, तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणाल? सेवाकार्यात असताना एखादा घरमालक कामात व्यस्त असल्याचं कारण सांगून तुमचं ऐकून घ्यायला तयार नसतो, तेव्हा तुम्ही त्याच्याशी दयाळूपणे कसं वागाल? आणि ‘हा निर्णय घेण्याआधी तुम्ही मला विचारलं का नाही,’ असा प्रश्‍न तुमच्या पत्नीनं तुम्हाला केला, तर अशा वेळीही तुम्ही दयाळूपणे वागाल का? इतरांच्या भावना लक्षात घेऊन, आपल्या बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. यामुळे इतरांशी काय बोलावं आणि कसं वागावं हे आपल्याला समजेल. आणि यहोवासारखं दयाळूपणे वागता येईल.—नीतिसूत्रे १५:२८ वाचा.

यहोवासारखी समजबुद्धी दाखवा

१०, ११. यहोवाचं अनुकरण करून आपण समजबुद्धी कशी दाखवू शकतो? उदाहरण द्या.

१० यहोवाची बुद्धी अमर्याद आहे. भविष्यात काय होईल हे तो पाहू शकतो. पण, आपल्यात ही क्षमता नसली तरी आपणही याबाबतीत यहोवाचं अनुकरण करू शकतो. हे कसं शक्य आहे? कोणताही निर्णय घेण्याआधी त्या निर्णयाचा आपल्यावर आणि इतरांवर काय परिणाम होईल, याची आपण आधीच कल्पना करू शकतो. पण, इस्राएली लोकांनी मात्र असं केलं नाही. यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे याचा काय परिणाम होईल, याविषयी त्यांनी विचार केला नाही. शिवाय, देवासोबत असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाचा आणि देवानं त्यांच्यासाठी जे काही केलं होतं त्या गोष्टींचाही त्यांनी विचार केला नाही. त्यांच्या या प्रवृत्तीची मोशेला कल्पना होती. इस्राएली लोक जे वाईट तेच करतील हे त्याला माहीत होतं. म्हणून त्यानं म्हटलं, “हे राष्ट्र विचारशून्य आहे, यांना समजच नाही. ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!”—अनु. ३१:२९, ३०; ३२:२८, २९.

११ उदाहरणार्थ, तुम्ही जर लग्नाच्या हेतूनं भेटीगाठी करत असाल तर हे नेहमी लक्षात ठेवा, की त्या व्यक्‍तीबद्दल आकर्षण वाटत असल्यामुळे स्वतःच्या भावनांवर आणि लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवणं अतिशय कठीण असतं. अशा परिस्थितीत यहोवासोबतचा तुमचा नातेसंबध धोक्यात येईल असं कोणतंही कृत्य तुमच्या हातून घडू देऊ नका. उलट समजबुद्धी दाखवून अशा धोक्यांना टाळण्याचा प्रयत्न करा. यहोवानं दिलेला सुज्ञ सल्ला नेहमी लक्षात ठेवा: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.”—नीति. २२:३.

आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा

१२. आपले विचार आपलं नुकसान कसं करू शकतात?

१२ समंजस व्यक्‍तीचं, नेहमी आपल्या विचारांवर नियंत्रण असतं. ज्याप्रमाणे आगीमुळे एकतर फायदा होऊ शकतो किंवा नुकसान, त्याचप्रमाणे आपण ज्याविषयी विचार करतो त्याचा आपल्यावर एकतर चांगला परिणाम होऊ शकतो किंवा वाईट. आगीचा वापर करून आपण स्वयंपाक करू शकतो. पण योग्य ती खबरदारी बाळगली नाही तर त्याच आगीनं आपलं पूर्ण घर जळून खाक होऊ शकतं. एवढंच नव्हे तर त्यात आपला जीवही जाऊ शकतो. आपल्या विचार करण्याच्या क्षमतेचंही असंच आहे. यहोवाकडून आपण जे काही शिकलो, त्याविषयी जर आपण विचार करत राहिलो तर आपल्याला याचा नेहमीच फायदा होईल. पण त्याऐवजी, जर आपण लैंगिक अनैतिकतेविषयी विचार करू म्हणजे एखादी वाईट गोष्ट करत असल्याची कल्पना आपण करत राहू, तर या गोष्टींचा आपल्याला इतका मोह होईल, की त्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्या हातून घडतील. आणि शेवटी यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध संपुष्टात येईल.—याकोब १:१४, १५ वाचा.

१३. हव्वेनं कोणता विचार केला?

१३ पहिली स्त्री हव्वा हिच्या उदाहरणावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ” तुम्ही खाऊ नका अशी आज्ञा यहोवानं आदाम आणि हव्वेला दिली होती. (उत्प. २:१६, १७) पण, सैतानानं हव्वेला सांगितलं: “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याचा अधिकार जर आपण स्वतःकडे घेतला, तर जीवन किती चांगलं होईल अशी कल्पना हव्वेनं केली. आणि हीच कल्पना तिनं मनात घोळू दिली. त्यामुळे, “त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर . . . आहे असे त्या स्त्रीला दिसून आले.” त्यानंतर काय झालं? “तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले; व त्याने ते खाल्ले.” (उत्प. ३:१-६) याचा परिणाम म्हणजे, “पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले.” (रोम. ५:१२) खरंच, हव्वेनं आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं!

१४. लैंगिक अनैतिकतेविषयी बायबल आपल्याला कोणती ताकीद देतं?

१४ हे खरं आहे, की हव्वेनं जे पाप केलं त्यात लैंगिक अनैतिकतेचा समावेश नव्हता. पण, आपण लैंगिक अनैतिकतेचं कार्य करत असल्याची कल्पना करत राहू नये, अशी स्पष्ट ताकीद बायबल आपल्याला देतं. येशूनं म्हटलं, “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्त. ५:२८) शिवाय, पौलानंही असं म्हटलं, “देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.”—रोम. १३:१४.

१५. आपण कोणत्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि का?

१५ आपण पैशाच्या श्रीमंतीकडे नव्हे तर यहोवाचं मन आनंदित करण्याकडे आपलं लक्ष लावावं, असं बायबल आपल्याला सांगतं. एखाद्याकडे अमाप पैसा असला म्हणून त्याच्या जीवाचं रक्षण होतंच, असं नाही. (नीति. १८:११) आपल्या जीवनात यहोवाला पहिलं स्थान देण्याऐवजी स्वतःकरता धनदौलत जमा करणारी व्यक्‍ती खरंतर मूर्ख आहे, असं येशूनं म्हटलं. कारण ती व्यक्‍ती आध्यात्मिक गोष्टींविषयी धनवान नसते. (लूक १२:१६-२१) पण, याउलट जेव्हा आपण यहोवाला आवडणाऱ्‍या गोष्टी करण्याद्वारे “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती” साठवतो तेव्हा आपण यहोवाचं मन आनंदित करतो. शिवाय, यामुळे आपण स्वतःही आनंदी असतो. (मत्त. ६:२०; नीति. २७:११) यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त मौल्यवान आहे, नाही का?

कशाचीही चिंता करू नका

१६. आपण चिंतेत असतो तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१६ आपण या जगात धनदौलत मिळवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या पदरी केवळ चिंता आणि काळजीच पडेल. (मत्त. ६:१९) जी व्यक्‍ती नेहमी पैशाचा विचार करत राहते तिला आपल्या जीवनात देवाच्या राज्याला पहिलं स्थान देणं कठीण असतं, असं येशूनं म्हटलं. (मत्त. १३:१८, १९, २२) आपल्या जीवनात काहीतरी वाईट होईल याविषयी काही जण नेहमी चिंता करत असतात. पण, असं विनाकारण काळजी करत राहिल्यानं, आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आणि याहूनही वाईट म्हणजे यहोवावरचा आपला विश्‍वास हळूहळू कमी होऊ शकतो. त्यामुळे, यहोवा आपल्याला नक्की मदत करेल असा पक्का विश्‍वास आपण बाळगला पाहिजे. बायबल आपल्याला सांगतं: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.” (नीति. १२:२५) म्हणून जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चिंता लागून राहते, तेव्हा त्याविषयी अशा व्यक्‍तीशी बोला जी यहोवाची उपासक आहे आणि तुम्हाला चांगलं ओळखते. तुम्ही तुमच्या आईवडीलांशी, पतीशी, पत्नीशी किंवा एखाद्या चांगल्या मित्राशी बोलू शकता. ते तुम्हाला विनाकारण काळजी करत राहण्याऐवजी यहोवावर विसंबून राहण्यासाठी मदत करतील.

१७. आपण चिंतेत असतो तेव्हा यहोवा आपल्याला मदत कशी करतो?

१७ इतर कोणत्याही व्यक्‍तीपेक्षा यहोवाला आपल्या भावना चांगल्या प्रकारे समजतात. शिवाय, चिंतेत असतानाही आपलं मन शांत राखण्याकरता तो आपल्याला मदत करू शकतो. पौलानं लिहिलं, “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल.” (फिलिप्पै. ४:६, ७) म्हणून, जेव्हा तुम्ही चिंतित असता तेव्हा यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत ठेवण्यासाठी तो पुरवत असलेल्या मदतीचा विचार करा. मग ही मदत तो कदाचित तुमच्या बांधवांद्वारे, ख्रिस्ती वडिलांद्वारे, बुद्धिमान दासाद्वारे, देवदूतांद्वारे किंवा थेट येशूद्वारे पुरवत असेल.

१८. कल्पना करण्याच्या क्षमतेचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

१८ आपण जेव्हा इतरांच्या भावना समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेचा वापर करतो, तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो. (१ तीम. १:११; १ योहा. ४:८) आपण इतरांवर प्रेम आणि दया दाखवतो, काहीही करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करतो, आणि चिंता करत बसण्याचं टाळतो तेव्हा आपण नक्कीच आनंदी राहू शकतो. तेव्हा, देवाच्या राज्यात जीवन किती सुंदर असेल याची कल्पना आपण करत राहू या. आणि यहोवाचं अनुकरण करण्याकरता जे काही करता येईल ते करत राहण्याचा प्रयत्न करत राहू या.—रोम. १२:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा