“कारण तुला असेच योग्य दिसले”
“ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या आहेत.”—लूक १०:२१.
१. येशू “पवित्र आत्म्यात उल्लसित” का झाला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
येशू “पवित्र आत्म्यात उल्लसित” झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे असतील याची कल्पना करा. कदाचित त्याचा चेहरा अतिशय आनंदी असेल आणि त्याच्या डोळ्यांत उत्सुकता असेल. पण, येशूला इतका आनंद का झाला होता? कारण, राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी त्यानं ज्या ७० शिष्यांना पाठवलं होतं ते नुकतेच परतले होते.a खरंतर, सुवार्तेच्या प्रचारकार्याला अनेक शक्तिशाली शत्रूंचा विरोध होता. त्यामुळे, शिष्यांना सोपवण्यात आलेलं काम त्यांनी कशा प्रकारे पार पाडलं हे जाणून घेण्यासाठी येशू खूप उत्सुक होता. प्रचाराच्या विरोधात असलेल्यांमध्ये शास्त्री आणि परुशीदेखील होते. हे लोक खूप शिकलेले व हुशार होते. आणि लोकांनी येशूला फक्त एक साधारण सुतार व त्याच्या शिष्यांना “निरक्षर व अज्ञानी” समजावं अशी त्यांची इच्छा होती. (प्रे. कृत्ये ४:१३; मार्क ६:३) हे सर्व असूनही शिष्य प्रचार करून परतले तेव्हा ते खूप आनंदात होते. कारण फक्त माणसांचाच नाही, तर दुरात्म्यांचा विरोध असूनही त्यांना प्रचार कार्यात यश आलं होतं! शिष्यांना आनंदी राहण्यास आणि धैर्य दाखवण्यास कशामुळे मदत झाली होती?—लूक १०:१, १७-२१ वाचा.
२. (क) येशूनं आपल्या शिष्यांची तुलना लहान मुलांशी का केली? (ख) बायबलमधील खोल सत्य समजून घेण्यासाठी येशूच्या शिष्यांना कशामुळे मदत झाली?
२ येशू यहोवाला म्हणाला: “हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले.” (मत्त. ११:२५, २६) येशूनं आपल्या शिष्यांची तुलना लहान मुलांशी का केली? कारण, शिकल्या-सवरलेल्या शास्त्री आणि परुशी लोकांप्रमाणे ते स्वतःला जास्त हुशार समजत नव्हते. तर, ते मुलांप्रमाणे शिकून घेण्यास तयार होते. गर्विष्ठपणा दाखवण्याऐवजी त्यांनी नम्रता दाखवण्याचं शिकून घेतलं होतं. (मत्त. १८:१-४) ते नम्र असल्यामुळे यहोवानं पवित्र आत्म्याद्वारे त्यांना बायबलमधील खोल सत्य समजण्यास मदत केली. दुसरीकडे पाहता यहुदी धर्मपुढारी गर्विष्ठ होते. त्यामुळे त्यांना अंधारात ठेवण्यात सैतानाला यश आलं. या धर्मपुढाऱ्यांच्या गर्विष्ठपणामुळे त्यांनी बायबलमधील सत्य समजून घेण्याची संधी गमावली.
३. या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
३ येशूला इतका आनंद का झाला होता हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. नम्र मनाच्या लोकांना, अगदी कमी शिकलेल्यांनासुद्धा यहोवानं शास्त्रवचनांतील खोल सत्य समजण्यास मदत केली, हे पाहून त्याला आनंद झाला होता. सर्वसाधारण लोकांनासुद्धा सहज समजेल अशा रीतीनं शिकवण्याची ही पद्धत यहोवाला योग्य वाटली आणि आजही त्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. आजही त्याला शिकवण्याची ही पद्धत योग्य वाटते हे कशावरून दिसून येतं? हे समजण्याकरता, आज यहोवा नम्र लोकांना बायबलमधील खोल सत्य समजण्यास कशी मदत करत आहे याविषयी आपण चर्चा करू.
खोल सत्याचं सर्वांना समजेल असं स्पष्टीकरण
४. टेहळणी बुरूज नियतकालिकाची सोपी आवृत्ती अनेकांसाठी एक आशीर्वाद का ठरली आहे?
४ अलीकडच्या वर्षांत देवाच्या संघटनेने साध्या-सोप्या पद्धतीनं शिकवण्यावर जास्त भर दिला आहे. याची तीन उदाहरणं आपण पाहू या. पहिलं उदाहरण म्हणजे टेहळणी बुरूजची सोपी आवृत्ती.b ज्यांना वाचायला आणि समजून घ्यायला कठीण जातं त्यांच्यासाठी व इतर अनेकांसाठी ही आवृत्ती एक आशीर्वादच ठरली आहे. या सोप्या आवृत्तीमुळे लहान मुलांना टेहळणी बुरूज आता चांगल्या प्रकारे समजतं, असं बऱ्याच पालकांच्या लक्षात आलं आहे. अनेकांनी पत्र लिहून नियमन मंडळाचे आभार मानले आहेत. एका बहिणीनं म्हटलं, की आधी तिला टेहळणी बुरूज अभ्यासात उत्तरं द्यायला भीती वाटायची, पण आता मुळीच वाटत नाही! ती लिहिते, “आता मी फक्त एकाच उत्तरावर थांबत नाही आणि अगदी न घाबरता उत्तरं देते. मी यहोवाची आणि तुमचीही खूप आभारी आहे.”
५. बायबलच्या सुधारित आवृत्तीमुळे कोणते फायदे झाले आहेत?
५ दुसरं उदाहरण म्हणजे, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स या इंग्रजी बायबलची सुधारित आवृत्ती. ही आवृत्ती ५ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या वार्षिक सभेत प्रकाशित करण्यात आली होती.c या बायबलमध्ये अनेक शास्त्रवचनांत आता कमी शब्द वापरण्यात आले आहेत. पण तरी त्यांचा अर्थ बदलला नाही; उलट ती शास्त्रवचनं आता समजायला सोपी झाली आहेत. उदाहरणार्थ, ईयोब १०:१ मध्ये आधी २७ शब्द होते पण आता फक्त १९ आहेत. तसंच, नीतिसूत्रे ८:६ मध्ये आधी २० शब्द होते आणि आता फक्त १३ आहेत. नवीन आवृत्तीतील ही दोन्ही वचनं आणखी स्पष्ट झाली आहेत. अनेक वर्षांपासून यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेल्या एका अभिषिक्त बांधवानं म्हटलं: “मी नुकतंच नवीन बायबलमधलं ईयोबाचं पुस्तक वाचून काढलं. यातली माहिती पहिल्यांदाच मला इतक्या स्पष्टपणे कळली!” अनेकांनी असंच मत व्यक्त केलं आहे.
६. मत्तय २४:४५-४७ या वचनांच्या स्पष्टीकरणांबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
६ तिसरं उदाहरण म्हणजे, काही शास्त्रवचनांबद्दल अलीकडेच देण्यात आलेली सुधारित स्पष्टीकरणे. उदाहरणार्थ, १५ जुलै २०१३ च्या टेहळणी बुरूज अंकात “विश्वासू व बुद्धिमान” दासाबद्दल आपल्याला आणखी स्पष्ट समज मिळाली. (मत्त. २४:४५-४७) नियमन मंडळच विश्वासू व बुद्धिमान दास आहे असं त्या लेखात स्पष्ट करण्यात आलं. तसंच, ज्या “परिवारावर” या दासाला नेमण्यात आलं त्यामध्ये अभिषिक्त जन व “दुसरी मेंढरे” या दोन्ही गटांचा समावेश होतो. या सर्वांना विश्वासू दास आध्यात्मिक अन्न पुरवतो. (योहा. १०:१६) या सर्व गोष्टी शिकून घ्यायला व इतरांना शिकवायला आपल्याला किती आनंद होतो! सर्वांना समजेल अशा साध्या-सोप्या पद्धतीनं शिकवणं यहोवाला योग्य वाटतं हे आणखी कशावरून दिसून येतं?
बायबलमधील अहवालांचं सोपं स्पष्टीकरण
७, ८. बायबलमध्ये असे कोणते अहवाल आहेत जे भविष्यातील महत्त्वाच्या गोष्टींना सूचित करतात?
७ तुम्ही अनेक वर्षांपासून सत्यात असाल, तर आपल्या प्रकाशनांत बायबलचे काही अहवाल आता थोड्या वेगळ्या पद्धतीनं समजावले जातात हे तुमच्या लक्षात आलं असेल. पूर्वी, बायबलमधील काही अहवाल भविष्यात होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना चित्रित करतात असं सहसा सांगितलं जायचं. प्राचीन काळातील त्या अहवालाला ‘नमुना’ म्हटलं जायचं. तर, तो नमुना ज्या व्यक्तीला किंवा घटनेला चित्रित करतो त्याला ‘प्रतिनमुना’ म्हटलं जायचं. अशा प्रकारे बायबलमधील अहवालांचं स्पष्टीकरण देणं योग्य आहे का? हो, नक्कीच! उदाहरणार्थ, स्वतः येशूनं ‘योना संदेष्ट्याच्या चिन्हाबद्दल’ सांगितलं होतं. (मत्तय १२:३९, ४० वाचा.) येशूनं म्हटलं की ज्याप्रमाणे योना काही काळ माशाच्या पोटात होता त्याचप्रमाणे तोही काही काळापर्यंत कबरेत असेल.
८ बायबलमध्ये इतरही असे अहवाल आहेत जे भविष्यात होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना चित्रित करतात. प्रेषित पौलानं यांपैकी अनेकांचा उल्लेख केला. उदाहरणार्थ, हागार आणि सारा यांच्याशी असलेला अब्राहामाचा नातेसंबंध हा ‘इस्राएल राष्ट्र’ आणि यहोवाच्या संघटनेचा स्वर्गीय भाग यांच्यातील नातेसंबंधाला सूचित करतो, असं पौलानं म्हटलं. (गलती. ४:२२-२६) तसंच निवासमंडप, मंदिर, प्रायश्चित्ताचा दिवस, प्रमुख याजक आणि नियमशास्त्रातील इतर गोष्टींमध्ये ‘पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया’ होती, असंही त्यानं सांगितलं. (इब्री ९:२३-२५; १०:१) या अहवालांचा आणि ते ज्या गोष्टींना चित्रित करतात त्यांचा अभ्यास केल्यामुळे आपला विश्वास आणखी मजबूत होतो. पण, बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती, घटना किंवा वस्तू भविष्यातील एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला चित्रित करते असा याचा अर्थ होतो का?
९. नाबोथाच्या अहवालाचं पूर्वी कशा प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आलं होतं?
९ बायबलमधील प्रत्येक व्यक्ती, घटना किंवा वस्तू ही एखाद्या व्यक्तीला किंवा पुढे होणाऱ्या एखाद्या घटनेला चित्रित करते, असं पूर्वी आपल्या प्रकाशनांमध्ये सहसा सांगितलं जायचं. उदाहरणार्थ, नाबोथाचा द्राक्षमळा बळकावण्याकरता अहाबाच्या पत्नीनं म्हणजेच दुष्ट राणी ईजबेल हिनं नाबोथाची हत्या घडवून आणली. (१ राजे २१:१-१६) १९३२ च्या टेहळणी बुरूजमध्ये असं सांगण्यात आलं होतं, की अहाब आणि ईजबेल हे सैतानाला आणि त्याच्या संघटनेला चित्रित करतात; तर, नाबोथ हा येशूला आणि नाबोथाचा मृत्यू येशूच्या मृत्यूला चित्रित करतो. पण, पुढे १९६१ मध्ये “लेट युवर नेम बी सॅन्टिफाइड” या पुस्तकात असं म्हणण्यात आलं की नाबोथ हा अभिषिक्त जनांना तर ईजबेल ही ख्रिस्ती धर्मजगताला चित्रित करते. तसंच, ईजबेलनं नाबोथाचा छळ केला ही गोष्ट शेवटल्या काळातील अभिषिक्तांच्या छळाला चित्रित करते. हे खरं आहे की अनेक वर्षांपर्यंत या स्पष्टीकरणांमुळे देवाच्या लोकांचा विश्वास दृढ झाला. तर मग, आज अशा प्रकारच्या अहवालांचं वेगळ्या पद्धतीनं स्पष्टीकरण का दिलं जातं?
१०. (क) बायबलमधील अहवालांचं स्पष्टीकरण देताना विश्वासू दास आता जास्त सावधगिरी कशी दाखवतो? (ख) आता आपल्या प्रकाशनांत कशावर जास्त जोर दिला जातो?
१० काळाच्या ओघात यहोवा देवानं “विश्वासू व बुद्धिमान दासाला” आणखी सुज्ञ आणि सावध बनण्यास मदत केली आहे. कोणत्या अर्थानं? आता हा विश्वासू दास, शास्त्रवचनांचा भक्कम आधार असल्याशिवाय बायबलमधील कोणताही अहवाल भविष्यातील एखाद्या गोष्टीला सूचित करतो असं सांगत नाही. पूर्वी अहवालांचं ‘नमुना’ आणि ‘प्रतिनमुना’ असं स्पष्टीकरण दिलं जायचं. पण, त्यांपैकी काही स्पष्टीकरणं समजायला, लक्षात ठेवायला तसंच लागू करायला अवघड होती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खात्रीशीर आधार नसताना एखाद्या अहवालाच्या भविष्यातील पूर्णतेवरच जास्त भर दिला जायचा, तेव्हा त्यातील व्यावहारिक धड्यांकडे दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळे, आज आपल्या प्रकाशनांत बायबल अहवालांतून शिकायला मिळणाऱ्या साध्या-सोप्या, व्यावहारिक धड्यांवर जास्त जोर दिला जातो. उदाहरणार्थ विश्वास, धीर, एकनिष्ठा आणि यांसारखे इतर चांगले गुण विकसित करण्याचं प्रोत्साहन आपल्याला दिलं जातं.
नाबोथाच्या अहवालावरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो (परिच्छेद ११ पाहा)
११. (क) नाबोथाच्या अहवालाचं आता आपल्या प्रकाशनांत कशा प्रकारे स्पष्टीकरण दिलं जातं, आणि त्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो? (ख) आता आपल्या प्रकाशनांमध्ये नमुने आणि प्रतिनमुने यांचा क्वचितच उल्लेख केला जातो यामागचं कारण काय? (याच अंकातील “वाचकांचे प्रश्न” पाहा.)
११ नाबोथाच्या अहवालाबद्दल आता आपली समज आणखी स्पष्ट आणि सोपी झाली आहे. नाबोथाचा मृत्यू, तो येशूला किंवा अभिषिक्तांना चित्रित करत असल्यामुळे झाला नव्हता. तर, देवाला विश्वासू राहण्याचा त्याचा निर्धार असल्यामुळे झाला होता. एका शक्तिशाली शासकाकडून तीव्र छळ होऊनही तो यहोवाच्या नियमाचं पालन करत राहिला. (गण. ३६:७; १ राजे २१:३) आज देवाच्या ज्या सेवकांना अशाच छळाचा सामना करावा लागतो, त्यांच्यासमोर नाबोथाचं किती चांगलं उदाहरण आहे! (२ तीमथ्य ३:१२ वाचा.) या अहवालातून मिळणारा धडा यहोवाचे सर्व सेवक समजू शकतात, लक्षात ठेवू शकतात, जीवनात लागू करू शकतात आणि त्याद्वारे आपला विश्वास आणखी दृढ करू शकतात.
१२. (क) बायबलच्या अहवालांविषयी कोणता निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल? (ख) बायबलमधील कठीण विषयसुद्धा आपल्याला स्पष्टपणे का समजतात? (तळटीप पाहा.)
१२ तर मग, बायबलमधील अहवालांतून फक्त व्यावहारिक धडेच शिकता येतात, त्यांचा दुसरा काही अर्थ होत नाही असं आपण समजावं का? नक्कीच नाही. आता आपल्या प्रकाशनांत, बायबलमध्ये उल्लेख केलेली एखादी गोष्ट भविष्यातील दुसऱ्या एखाद्या गोष्टीला, आणि फक्त त्याच गोष्टीला चित्रित करते असं सांगितलं जात नाही. तर, एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना ती दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आठवण करून देते यावर आता जास्त भर दिला जातो. किंवा, दोन गोष्टींमध्ये कोणतं साम्य दिसून येतं याविषयी सांगितलं जातं. नाबोथाच्या उदाहरणाचा पुन्हा विचार करा. त्यानं छळाला आणि मृत्यूला सामोरे जाताना जी एकनिष्ठा दाखवली, त्यावरून ख्रिस्तानं आणि अभिषिक्तांनी दाखवलेल्या एकनिष्ठेची आपल्याला नक्कीच आठवण होते. पण, फक्त त्यांचीच नाही तर ‘दुसऱ्या मेंढरांतील’ अशा अनेकांचीही आपल्याला आठवण होते ज्यांनी एकनिष्ठा दाखवली. तर अशा प्रकारे यहोवा अगदी स्पष्ट आणि साध्या पद्धतीनं आपल्याला शिकवत आहे याच्याशी तुम्हीही नक्कीच सहमत व्हाल.d
येशूच्या दाखल्यांचं साधंसोपं स्पष्टीकरण
१३. येशूचे दाखले आता साध्या-सोप्या आणि स्पष्ट पद्धतीनं समजावले जातात हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येतं?
१३ येशू ख्रिस्त हा पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वात महान शिक्षक होता. लोकांना शिकवताना तो नेहमी दाखल्यांचा किंवा उदाहरणांचा वापर करायचा. (मत्त. १३:३४) उदाहरणांच्या साहाय्यानं अवघड विषय साध्या-सोप्या पद्धतीनं समजावून सांगता येतात. त्यांमुळे आपल्या विचारांना चालना मिळते आणि आपल्या मनावर त्यांची खोल छाप पडते. काळाच्या ओघात, आपल्या प्रकाशनांतील येशूच्या दाखल्यांचं स्पष्टीकरण अधिकाधिक सोपं आणि स्पष्ट होत गेलं आहे. उदाहरणार्थ, १५ जुलै २००८ च्या टेहळणी बुरूज अंकात खमीर, मोहरीचा दाणा आणि मासे पकडण्याचे जाळे या दाखल्यांचा अर्थ आणखी सोप्या पद्धतीनं समजावण्यात आला. हे सर्व दाखले देवाच्या राज्याशी संबंधित आहेत; आणि या राज्यामुळे अनेकांना दुष्ट जगापासून वेगळे होऊन ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास मदत मिळाली आहे हे आता आपल्याला स्पष्टपणे समजलं आहे.
१४. (क) चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्याचं पूर्वी कशा प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आलं होतं? (ख) आता या दाखल्याचा अर्थ कशा प्रकारे स्पष्ट करण्यात आला आहे?
१४ येशूनं काही सविस्तर दाखलेदेखील सांगितले होते. त्यांचा अर्थ आपण कसा समजू शकतो? यांपैकी काही दाखल्यांचा लाक्षणिक किंवा भविष्यसूचक अर्थ आहे. तर, काहींमधून आपल्याला व्यावहारिक धडे शिकायला मिळतात. पण, यांपैकी कोणत्या दाखल्याचा लाक्षणिक अर्थ आहे आणि कोणत्या दाखल्याचा नाही हे आपल्याला कसं कळेल? गेल्या काही वर्षांदरम्यान याचं उत्तर आणखी स्पष्ट झालं आहे. उदाहरणार्थ, चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्याचं पूर्वी कशा प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आलं होतं याचा विचार करा. (लूक १०:३०-३७) १९२४ च्या टेहळणी बुरूज अंकात असं सांगण्यात आलं होतं की या दाखल्यातला शोमरोनी हा येशूला चित्रित करतो; जेरूसलेमपासून यरीहोला जाणारा रस्ता एदेन बागेतील बंडाळीनंतर मानवजातीच्या खालावत गेलेल्या परिस्थितीला चित्रित करतो. तसंच, रस्त्यावरील लुटारू हे मोठमोठ्या संस्थांना व लोभी व्यापाऱ्यांना चित्रित करतात; आणि याजक व लेवी ख्रिस्ती धर्मजगताला चित्रित करतात, असंही त्यात म्हणण्यात आलं होतं. पण, आता आपल्या प्रकाशनांत या अहवालाच्या साहाय्यानं सर्व ख्रिश्चनांना आठवण दिली जाते की आपण लोकांमध्ये भेदभाव करू नये. उलट सर्वांना मदत केली पाहिजे. खासकरून देवाबद्दलचं सत्य समजून घ्यायला आपण त्यांना मदत केली पाहिजे. खरोखर, आज यहोवा सत्य किती स्पष्ट करून सांगत आहे हे पाहून आपल्याला आनंद होत नाही का?
१५. पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
१५ पुढच्या लेखात आपण दहा कुमारींबद्दल येशूनं दिलेल्या दाखल्याची चर्चा करणार आहोत. (मत्त. २५:१-१३) शेवटल्या काळातील आपल्या अनुयायांनी, या जबरदस्त दाखल्याचा कशा प्रकारे अर्थ घ्यावा अशी येशूची इच्छा होती? या दाखल्यातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटना भविष्यातील एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला सूचित करते का? की, शेवटल्या काळात जगताना उपयोगी ठरतील, अशा व्यावहारिक गोष्टी या दाखल्यातून आपल्याला शिकवण्याची त्याची इच्छा होती? पुढच्या लेखात याविषयी चर्चा करू या.
a बायबलच्या काही हस्तलेखांत “७०” तर काहींमध्ये “७२” शिष्यांना पाठवण्यात आलं, असं म्हटलेलं आहे.
b इंग्रजी भाषेतील पहिली सोपी आवृत्ती जुलै २०११ मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर, इतर काही भाषांतही सोपी आवृत्ती काढण्यात आली.
c बायबलची सुधारित आवृत्ती इतर भाषांमध्येही प्रकाशित करण्यात येईल.
d बायबलमध्ये अशाही काही गोष्टी आहेत ज्या “समजावयास कठीण” वाटू शकतात. यात पौलानं लिहिलेल्या काही गोष्टींचाही समावेश होतो. पण, सर्वच बायबल लेखकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं लिखाण केलं. आणि आज पवित्र आत्मा खऱ्या ख्रिश्चनांना बायबलमधील सत्य समजण्यासाठी मदत करतो. यांत “देवाच्या गहन गोष्टींचाही” समावेश होतो.—२ पेत्र ३:१६, १७; १ करिंथ. २:१०.