सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
“त्याजविरुद्ध आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू.”—मीखा ५:५.
१. अराम व इस्राएलने केलेली योजना सफल होणे का शक्य नव्हते?
ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात (इ.स.पू. ७६२ ते ७५९ दरम्यान) इस्राएलच्या राजाने व अरामाच्या राजाने मिळून यहूदाच्या राज्याविरुद्ध युद्ध घोषित केले. जेरूसलेमवर कब्जा करणे, आहाज राजाला गादीवरून काढणे, आणि त्याच्याऐवजी बहुधा दावीद राजाच्या वंशातला नसणारा एखादा राजा गादीवर बसवणे हा त्यांचा उद्देश होता. (यश. ७:५, ६) पण, त्यांची ही योजना सफल होणे शक्यच नव्हते. कारण यहोवाने आधीच वचन दिले होते, की दाविदाच्या वंशाचाच राजा जेरूसलेमवर राज्य करेल. आणि यहोवाचे वचन कधीही खोटे ठरत नाही.—यहो. २३:१४; २ शमु. ७:१६.
२-४. (क) ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात आणि (ख) येशूच्या काळात यशया ७:१४, १६ यांतील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
२ सुरुवातीला, अराम व इस्राएल यांचे संयुक्त सैन्य विजयी होईल असे भासले. कारण फक्त एकाच लढाईत आहाज राजाच्या सैन्यातील १,२०,००० सैनिक मारले गेले. “राजपुत्र” मासेया हासुद्धा मारला गेला. (२ इति. २८:६, ७) पण यहोवा हे सर्व पाहत होता. दाविदाला त्याने दिलेले वचन त्याला आठवले. आणि म्हणूनच त्याने यशया संदेष्ट्याला एक अतिशय सांत्वनदायक संदेश घेऊन आहाजाकडे पाठवले.
३ यशयाने म्हटले: “पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील. . . . वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलास समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या [अराम व इस्राएल] भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल.” (यश. ७:१४, १६) या भविष्यवाणीच्या पहिल्या भागाचा संबंध आपण सहसा मशीहाच्या जन्माशी जोडतो आणि हे योग्यच आहे. (मत्त. १:२३) पण भविष्यवाणीत उल्लेखलेल्या ‘दोन राजांनी’ अर्थात अराम व इस्राएल या राष्ट्रांनी येशूच्या काळात यहूदा राज्यावर हल्ला केला नाही. यावरून असे म्हणता येईल, की इम्मानुएलसंबंधी असलेल्या या भविष्यवाणीची पहिली पूर्णता यशयाच्या काळात झाली असावी. ती कशी?
४ यशयाने ही लक्षवेधक भविष्यवाणी केल्यावर काही काळातच त्याची पत्नी गर्भवती होऊन तिने पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव “महेर-शालाल-हाश-बज” ठेवण्यात आले. यशयाने भविष्यवाणीत उल्लेखलेला “इम्मानुएल” कदाचित हाच असावा.a प्राचीन काळात, एखाद्या खास घटनेची आठवण ठेवण्यासाठी जन्माच्या वेळी बाळाला विशिष्ट नाव दिले जायचे; पण आईवडील व नातेवाईक त्याला वेगळ्या नावाने ओळखत. (२ शमु. १२:२४, २५) येशूला कधीही इम्मानुएल या नावाने संबोधण्यात आल्याचा कोठेही उल्लेख नाही.—यशया ७:१४; ८:३, ४ वाचा.
५. आहाज राजाने कोणता अयोग्य निर्णय घेतला?
५ इस्राएल व अराम यांनी यहूदाला आपले लक्ष्य बनवले होते. पण, त्याच दरम्यान आणखी एक साम्राज्य या भागावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात होते. ते होते अश्शूर, जे त्या वेळी जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत होते. यशया ८:३, ४ यातील भविष्यवाणीनुसार, अश्शूरचे साम्राज्य आधी अराम व इस्राएल राष्ट्रांवर विजय मिळवणार होते आणि त्यानंतर ते दक्षिणेकडील यहूदा राज्यावर हल्ला करणार होते. यहूदाचा राजा आहाज याने यशयाद्वारे देवाने जे सांगितले होते त्यावर भरवसा ठेवायला पाहिजे होता. पण त्याऐवजी, त्याने अश्शूऱ्यांसोबत शांतीचा करार करण्याद्वारे यहोवावर विश्वास नसल्याचे दाखवले. याचा अतिशय दुःखदायक परिणाम झाला, कारण कालांतराने अश्शूऱ्यांनी यहूदाच्या रहिवाशांवर क्रूरपणे अत्याचार केला. (२ राजे १६:७-१०) यहूदा राज्याचा मेंढपाळ या नात्याने आहाजने आपल्या लोकांचे संरक्षण करायचे होते, पण तो या बाबतीत अयशस्वी ठरला. आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा मी देवावर भरवसा ठेवतो की मानवांवर?’—नीति. ३:५, ६.
एका नव्या मेंढपाळाचे चांगले उदाहरण
६. हिज्कीया आहाज राजापेक्षा कशा प्रकारे वेगळा होता?
६ आहाज राजा इ.स.पू. ७४६ साली मरण पावला आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र हिज्कीया राजा बनला. त्या वेळी आर्थिक व आध्यात्मिक दृष्ट्या यहूदा राज्याची अगदी दयनीय स्थिती झाली होती. तरुण वयात राजा बनलेल्या हिज्कीयाने राज्य सुरू करताच कोणत्या गोष्टीकडे सर्वात आधी लक्ष दिले? त्याने यहूदा राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला का? नाही. हिज्कीया हा आध्यात्मिक वळणाचा होता आणि तो आपल्या राज्यातील लोकांचा एक चांगला मेंढपाळ होता. त्यामुळे, सर्वप्रथम त्याने आपल्या राज्यात खरी उपासना पुन्हा सुरू करण्याकडे आणि लोकांचा यहोवासोबतचा बिघडलेला नातेसंबंध सुधारण्याकडे लक्ष दिले. देवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे समजल्यावर हिज्कीयाने त्वरित निर्णय घेऊन योग्य पावले उचलली. आपल्याकरता त्याने किती चांगला आदर्श मांडला!—२ इति. २९:१-१९.
७. राजाने लेव्यांना कोणते आश्वासन दिले व का?
७ खरी उपासना पुन्हा सुरू करण्याकरता लेवी महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. त्यामुळे, हिज्कीयाने त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. त्या सभेला उपस्थित राहिलेल्या विश्वासू लेव्यांनी राजाचे शब्द ऐकले, तेव्हा कदाचित त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले असतील; राजाने त्यांना म्हटले: “[परमेश्वराची] सेवाचाकरी करावी . . . म्हणून [त्याने] तुम्हास निवडले आहे.” (२ इति. २९:११) अशा रीतीने, खरी उपासना करण्यास लोकांना मदत करण्याची स्पष्ट आज्ञा लेव्यांना देण्यात आली!
८. खरी उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी हिज्कीयाने आणखी कोणती पावले उचलली आणि याचा काय परिणाम झाला?
८ हिज्कीयाने यहूदा व इस्राएलमधील सर्व लोकांना वल्हांडण सणाचा मोठा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित केले. यानंतर लोकांनी सात दिवसांपर्यंत बेखमीर भाकरींचा सण साजरा केला. या सणामुळे लोक इतके आनंदित झाले की त्यांनी आणखी सात दिवसांपर्यंत हा सण साजरा केला. बायबलमध्ये असे सांगितले आहे: “यरुशलेमेत फार आनंद झाला; इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता.” (२ इति. ३०:२५, २६) या सणांमुळे सर्व लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या नक्कीच खूप प्रोत्साहन मिळाले असेल! २ इतिहास ३१:१ यात आपण असे वाचतो: “हे सर्व आटोपल्यावर . . . [त्यांनी] मूर्तिस्तंभ मोडून फोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून टाकल्या.” अशा रीतीने यहूदा राज्यातील लोकांनी यहोवाकडे परत येण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली. या आध्यात्मिक शुद्धीकरणामुळे, लवकरच त्यांच्यावर येणार असलेल्या संकटासाठी तयार राहण्यास त्यांना मदत मिळाली.
राजा यहोवावर भरवसा ठेवतो
९. (क) इस्राएल राज्याचे बेत कशा प्रकारे धुळीस मिळाले? (ख) सुरुवातीला सन्हेरीब यहूदात कशा प्रकारे यशस्वी ठरला?
९ यशयाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. अश्शूरी लोकांनी उत्तरेकडील इस्राएल राज्यावर विजय मिळवला आणि त्यातील रहिवाशांना कैदी बनवून नेले. अशा रीतीने दाविदाच्या वंशातून नसलेल्या राजाला यहूदाच्या सिंहासनावर बसवण्याचा इस्राएल राज्याचा बेत धुळीस मिळाला. पण अश्शूऱ्यांच्या योजनांचे काय झाले? अश्शूरी लोकांनी आता यहूदाकडे मोर्चा वळवला. अहवाल सांगतो: “हिज्कीया राजाच्या कारकीर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.” सन्हेरीबाने यहूदातील एकूण ४६ शहरे काबीज केली असे सांगितले जाते. अश्शूरचे शक्तिशाली सैन्य एकापाठोपाठ एक शहरावर ताबा मिळवत जेरूसलेमच्या जवळ जवळ येत होते. तुम्ही त्या वेळी जेरूसलेममध्ये राहत असता, तर तुम्हाला कसे वाटले असते याची कल्पना करा!—२ राजे १८:१३.
१०. मीखा ५:५, ६ येथे नमूद असलेल्या शब्दांमुळे हिज्कीयाला प्रोत्साहन मिळाले असेल असे का म्हणता येईल?
१० अश्शूरी लोक लवकरच जेरूसलेमवरही हल्ला करतील हे साहजिकच हिज्कीयाला माहीत होते. पण, त्याने घाबरून जाऊन आपला अविश्वासू पिता आहाज याच्याप्रमाणे एका मूर्तिपूजक राष्ट्राची मदत घेतली नाही. उलट, त्याने यहोवावर भरवसा ठेवला. (२ इति. २८:२०, २१) संदेष्टा मीखा याने अश्शूऱ्यांसंबंधी जे सांगितले होते ते हिज्कीयाला माहीत असावे: “[अश्शूरविरुद्ध] आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू. ते अश्शूर देश, . . . तरवारीने उद्ध्वस्त करतील.” (मीखा ५:५, ६) या देवप्रेरित शब्दांमुळे हिज्कीयाला नक्कीच प्रोत्साहन मिळाले असेल. कारण, अश्शूऱ्यांचा सामना करण्यासाठी यहोवा एक अगदीच असामान्य सैन्य उभे करून अश्शूऱ्यांचा पराभव करेल हे या शब्दांवरून दिसून आले.
११. सात मेंढपाळ व आठ लोकनायक यांच्यासंबंधीच्या भविष्यवाणीची सर्वात महत्त्वाची पूर्णता केव्हा होईल?
११ सात मेंढपाळ व आठ लोकनायक (“सरदार,” द न्यू इंग्लिश बायबल) यांच्याविषयीच्या भविष्यवाणीची सर्वात महत्त्वाची पूर्णता येशूच्या जन्माच्या बऱ्याच काळानंतर होणार होती. मीखाच्या भविष्यवाणीत येशूला “इस्राएलचा शास्ता” म्हणण्यात आले होते, ज्याचा “उद्भव प्राचीन काळापासून . . . आहे.” (मीखा ५:१, २ वाचा.) सात मेंढपाळ व आठ लोकनायक यांच्याविषयीच्या भविष्यवाणीची पूर्णता भविष्यात होईल, जेव्हा आधुनिक काळातील एक “अश्शूरी” यहोवाच्या लोकांवर हल्ला करून त्यांचा पूर्णपणे नाश करण्याचा प्रयत्न करेल. या शक्तिशाली शत्रूचा सामना करण्यासाठी यहोवा, सध्या स्वर्गात राज्य करत असलेल्या त्याच्या पुत्राद्वारे कोणते सैन्य उभे करेल? ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण प्रथम, हिज्कीयाने अश्शूरी सैन्यापासून आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी जी पावले उचलली त्यांपासून आपण कोणता धडा घेऊ शकतो हे पाहू या.
हिज्कीया सुज्ञतेने पावले उचलतो
१२. हिज्कीया व इतर धैर्यवान मनुष्यांनी देवाच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलली?
१२ आपण एखादी गोष्ट स्वतःच्या बळावर करू शकत नाही तेव्हा यहोवा आपली मदत करण्यास नेहमीच तयार असतो; पण ज्या गोष्टी करणे आपल्या हातात आहे त्या आपण कराव्यात अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. हिज्कीयाने “आपले सरदार व योद्धे” यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या सर्वांनी मिळून “नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद” करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, “कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुनः बांधून काढला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला, . . . आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनवल्या.” (२ इति. ३२:३-५) अशा रीतीने त्या काळी आपल्या लोकांचे संरक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी यहोवाने हिज्कीया, त्याचे सरदार आणि विश्वासू संदेष्टे यांसारख्या अनेक धैर्यवान मनुष्यांचा उपयोग केला.
१३. अश्शूऱ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यास लोकांना तयार करण्यासाठी हिज्कीयाने केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती? स्पष्ट करा.
१३ यानंतर हिज्कीयाने जे केले, ते पाण्याचे झरे बंद करण्यापेक्षा व शहराची तटबंदी मजबूत करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे होते. एका चांगल्या मेंढपाळाप्रमाणे हिज्कीयाला आपल्या राज्यातील लोकांची काळजी होती. त्यामुळे त्याने लोकांना एकत्रित करून त्यांना या शब्दांत प्रोत्साहन दिले: “अश्शूरचा राजा व त्याजबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका; त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. मांसमय भुजांचा त्यांस आधार आहे, पण आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्वर [“यहोवा,” NW] आम्हाबरोबर आहे.” हे शब्द ऐकून लोकांचा विश्वास किती दृढ झाला असेल! राजाने त्यांना आठवण करून दिली की खुद्द यहोवा त्यांच्या बाजूने लढणार होता. “यहूदाचा राजा हिज्कीया याच्या या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.” हिज्कीयाने बोललेल्या शब्दांमुळे लोकांचे धैर्य वाढले याकडे लक्ष द्या. यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे हिज्कीया, त्याचे सरदार व योद्धे, तसेच मीखा व यशया यांच्यासारखे संदेष्टे, यांनी चांगले मेंढपाळ बनून लोकांचे मार्गदर्शन केले.—२ इति. ३२:७, ८; मीखा ५:५, ६ वाचा.
हिज्कीयाच्या शब्दांमुळे लोकांना धैर्य मिळाले (परिच्छेद १२, १३ पाहा)
१४. रब-शाकेने काय केले आणि लोकांनी याला कसा प्रतिसाद दिला?
१४ अश्शूरच्या राजाने आपल्या सैन्यासोबत जेरूसलेमजवळील लाखीश येथे तळ ठोकला. तेथून त्याने तीन राजदूतांना पाठवून जेरूसलेमच्या रहिवाशांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. राजाने पाठवलेला प्रतिनिधी, ज्याला रब-शाके म्हटले जायचे त्याने जेरूसलेमच्या लोकांशी त्यांच्या स्वतःच्या भाषेत अर्थात हिब्रू भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्याने लोकांना असे पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी आपल्या राजाला सोडून द्यावे आणि अश्शूऱ्यांना जाऊन मिळावे. तसेच, त्यांना एका दुसऱ्या देशात वतन दिले जाईल आणि तेथे ते अगदी आरामशीर जीवन जगू शकतील या प्रकारची खोटी आश्वासनेही त्याने लोकांना दिली. (२ राजे १८:३१, ३२ वाचा.) त्यानंतर रब-शाके याने असा दावा केला की ज्या प्रकारे इतर राष्ट्रांचे देव त्यांच्या उपासकांना वाचवू शकले नाहीत, त्याच प्रकारे यहोवादेखील यहुद्यांना अश्शूऱ्यांच्या तावडीतून सोडवू शकणार नाही. पण, लोकांनी सुज्ञपणा दाखवून या खोट्या दाव्यांना कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. आजही यहोवाच्या लोकांवर खोटे आरोप लावले जातात तेव्हा बरेचदा ते सुज्ञपणे कोणतेही प्रत्युत्तर देत नाहीत.—२ राजे १८:३५, ३६ वाचा.
१५. जेरूसलेमच्या रहिवाशांनी काय करायचे होते आणि यहोवाने कशा प्रकारे जेरूसलेम शहराचा बचाव केला?
१५ हिज्कीया साहजिकच काळजीत पडला होता. पण दुसऱ्या एखाद्या राष्ट्राकडून मदत मागण्याऐवजी त्याने यशया संदेष्ट्याला आपल्याकडे बोलावून घेतले. यशयाने हिज्कीयाला सांगितले: “[सन्हेरीब] या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही.” (२ राजे १९:३२) जेरूसलेमच्या रहिवाशांनी हिंमत न हारता यहोवावर भरवसा ठेवायचा होता. कारण यहोवा स्वतः यहूदाच्या वतीने लढणार होता. आणि तो खरोखरच त्यांच्या वतीने लढला! “त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले!” (२ राजे १९:३५) अशा प्रकारे, जेरूसलेमचा बचाव झाला. पण, हा बचाव हिज्कीयाने नगराबाहेरील झरे बंद केल्यामुळे किंवा तटबंदी मजबूत केल्यामुळे झाला नव्हता; तर, यहोवा त्यांच्या बाजूने लढल्यामुळेच शहराचा बचाव झाला होता!
आपण काय शिकतो?
१६. (क) जेरूसलेमचे रहिवाशी (ख) “अश्शूरी” आणि (ग) सात मेंढपाळ व आठ लोकनायक आज कोणास सूचित करतात?
१६ सात मेंढपाळ व आठ लोकनायक यांच्याविषयीच्या भविष्यवाणीची सर्वात महत्त्वाची पूर्णता आपल्या काळात होईल. प्राचीन जेरूसलेमवर अश्शूऱ्यांनी हल्ला केला होता. पण लवकरच, आधुनिक काळातील “अश्शूरी” यहोवाच्या असहाय भासणाऱ्या लोकांवर हल्ला करेल. त्यांचे अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकण्याचा त्याचा इरादा असेल. बायबलमध्ये या हल्ल्याप्रमाणेच, “मागोग देशातील गोग” याचा हल्ला, ‘उत्तरेच्या राजाचा’ हल्ला, व ‘पृथ्वीवरील राजांचा’ हल्ला यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. (यहे. ३८:२, १०-१३; दानी. ११:४०, ४४, ४५; प्रकटी. १७:१४; १९:१९) हे सर्व वेगवेगळे हल्ले आहेत का? हे आपण नक्की सांगू शकत नाही. बायबल कदाचित या वेगवेगळ्या नावांनी एकाच हल्ल्याविषयी सांगत असावे. मग, मीखाच्या भविष्यवाणीनुसार त्या शक्तिशाली शत्रूविरुद्ध, म्हणजेच “अश्शूरी” याच्याविरुद्ध यहोवा कोणते सैन्य उभे करेल? एक अतिशय असामान्य सैन्य—“सात मेंढपाळ व आठ लोकनायक!” (मीखा ५:५) या विलक्षण सैन्यातील मेंढपाळ व लोकनायक (किंवा “सरदार,” द न्यू इंग्लिश बायबल) हे मंडळ्यांतील वडील आहेत. (१ पेत्र ५:२) यहोवाने आपल्या मौल्यवान मेंढरांचे मार्गदर्शन व संरक्षण करण्यासाठी; तसेच, त्यांना आधुनिक काळातील “अश्शूरी” याच्या भविष्यातील हल्ल्यास तोंड द्यायला साहाय्य करण्यासाठी आज नक्कीच विपुल प्रमाणात आध्यात्मिक मेंढपाळांची तरतूद केली आहे.b मीखाच्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे, ते “अश्शूर देश . . . तरवारीने उद्ध्वस्त करतील.” (मीखा ५:६) त्यांच्या युद्धाच्या शस्त्रांपैकी सर्वात महत्त्वाचे शस्त्र “आत्म्याची तरवार” म्हणजेच देवाचे वचन, बायबल हे आहे.—२ करिंथ. १०:४; इफिस. ६:१७.
१७. आपण आताच चर्चा केलेल्या माहितीवरून वडील कोणत्या चार महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतात?
१७ मंडळीतील वडिलांनो, आपण आताच चर्चा केलेल्या माहितीवरून तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकता: (१) भविष्यातील “अश्शूरी” याच्या हल्ल्यास तोंड देण्याकरता सज्ज होण्यासाठी आपण जी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे देवावरील विश्वास मजबूत करणे आणि आपल्या बांधवांनाही तसेच करण्यास मदत करणे. (२) “अश्शूरी” हल्ला करेल तेव्हा यहोवा आपला बचाव करेल याची वडिलांना अगदी पूर्ण खात्री असली पाहिजे. (३) त्या वेळी, यहोवाच्या संघटनेकडून आपल्याला ज्या जीवनदायक सूचना मिळतील त्या मानवी दृष्टिकोनातून कदाचित योग्य किंवा व्यावहारिक वाटणार नाहीत. पण, या सूचना मानवी दृष्टिकोनातून योग्य वाटत नसल्या, तरीसुद्धा आपल्याला जे काही सांगितले जाते त्याचे पालन करण्यास आपण सर्वांनी तयार असले पाहिजे. (४) जगातील शिक्षण, धनसंपत्ती किंवा मानवी संस्था यांवर भरवसा ठेवणाऱ्यांनी आपल्या विचारसरणीत बदल करण्याची हीच वेळ आहे. जे कोणी विश्वासात डळमळत आहेत त्यांना वडिलांनी लवकरात लवकर मदत केली पाहिजे.
१८. आपण चर्चा केलेल्या अहवालावर मनन केल्यामुळे भविष्यात आपल्याला कोणता फायदा होईल?
१८ भविष्यात अशी वेळ येणार आहे जेव्हा देवाचे आधुनिक काळातील सेवक, हिज्कीयाच्या काळात जेरूसलेममध्ये अडकलेल्या यहुद्यांइतकेच असहाय भासतील. ती वेळ येईल तेव्हा आपण सर्व जण हिज्कीयाच्या शब्दांतून प्रोत्साहन मिळवू या. आपण हे आठवणीत ठेवू या, की आपल्या शत्रूंना “मांसमय भुजांचा . . . आधार आहे, पण आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्वर [यहोवा] आम्हाबरोबर आहे.”—२ इति. ३२:८.
a यशया ७:१४ यात “कुमारी” असे भाषांतर करण्यात आलेला मूळ इब्री शब्द, विवाहित स्त्रीच्या संदर्भातही वापरला जाऊ शकतो. त्यामुळे, तो शब्द यशयाच्या पत्नीला आणि यहुदी कुमारी असलेल्या मरीयेलाही लागू होऊ शकतो.
b सात हा आकडा बायबलमध्ये सहसा पूर्णतेस सूचित करण्यासाठी वापरला जातो. आठ हा आकडा (सातपेक्षा एक जास्त) केव्हाकेव्हा विपुलतेला सूचित करतो.