वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ३/१५ पृ. २८-२९
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवा तुम्हाला ओळखतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं
    बायबलमधून शिकू या!
  • गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ३/१५ पृ. २८-२९

वाचकांचे प्रश्‍न

यहेज्केल १८:२० यात “मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही” असे म्हटले आहे. पण, निर्गम २०:५ म्हणते की “[देव] मुलांना तिसऱ्‍याचौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करितो.” या दोन वचनांत तफावत आहे का?

या दोन वचनांत कोणतीही तफावत नाही. एक विधान, प्रत्येक व्यक्‍ती आपल्या कृत्यांसाठी जबाबदार आहे यावर भर देते; तर दुसरे विधान ही वस्तुस्थिती कबूल करते, की एखाद्याने केलेल्या चुकीमुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांचा त्याच्या मुलाबाळांच्या जीवनावरही प्रभाव पडू शकतो.

यहेज्केल पुस्तकाच्या १८ व्या अध्यायात यावर भर दिला आहे की प्रत्येक व्यक्‍ती आपल्या कृत्यांसाठी जबाबदार असते. या अध्यायाचा संदर्भ पाहिल्यास हे लक्षात येते. ४ थ्या वचनात असे म्हटले आहे, “जो जिवात्मा पाप करितो तो मरेल.” दुसरीकडे पाहता, “जो न्यायाने व धर्माने वागतो” अशा ‘धार्मिक मनुष्याबद्दल’ काय? “तो खात्रीने वाचेल.” (यहे. १८:५, ९) तात्पर्य असे, की आपल्या कृत्यांबद्दल जबाबदार ठरवले जाण्याइतपत वय झाल्यानंतर, “ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे” प्रत्येकाचा न्याय केला जातो.—यहे. १८:३०.

हे तत्त्व कोरह नावाच्या एका लेव्याच्या बाबतीत जे घडले त्यावरून स्पष्ट होते. इस्राएल लोक अरण्यातून प्रवास करत होते त्या काळात, कोरह नावाचा एक लेवी स्वतःजवळ असलेल्या सेवेच्या विशेषाधिकारांबद्दल समाधानी नव्हता. त्याने व इतर काही जणांनी याजकांच्या जबाबदाऱ्‍या बळकावण्याच्या प्रयत्नात, यहोवाचे प्रतिनिधी असणारे मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध बंड पुकारला. हे लोक आपली मर्यादा सोडून वागले आणि ज्यावर त्यांना हक्क नव्हता त्या याजकपदाची त्यांनी लालसा केली. त्यामुळे यहोवाने कोरह व त्याच्या बंडखोर साथीदारांना जिवे मारले. (गण. १६:८-११, ३१-३३) पण, कोरहचे पुत्र त्याच्यासोबत या बंडात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे देवाने त्यांना त्यांच्या बापाच्या पातकाबद्दल जबाबदार धरले नाही. यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचे जीवन वाचले.—गण. २६:१०, ११.

पण, निर्गम २०:५ यातील दहा आज्ञांमध्ये सामील असलेल्या इशाऱ्‍याबद्दल काय? पुन्हा एकदा, संदर्भ लक्षात घ्या. यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबत नियमशास्त्राचा करार केला. या कराराच्या अटी ऐकून घेतल्यावर इस्राएल लोकांनी जाहीरपणे असे कबूल केले: “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्ग. १९:५-८) अशा रीतीने, हे सबंध राष्ट्र यहोवासोबत एका खास नातेसंबंधात आले. त्याअर्थी, निर्गम २०:५ यातील शब्द मुळात सबंध इस्राएल राष्ट्राला उद्देशून होते.

इस्राएल लोक यहोवाला विश्‍वासू राहिले तेव्हा एक राष्ट्र या नात्याने त्यांना अनेक फायदे व आशीर्वाद अनुभवता आले. (लेवी. २६:३-८) याउलट, जेव्हा यहोवाकडे पाठ फिरवून ते खोट्या देवांची उपासना करू लागले तेव्हा यहोवाने त्यांच्यावरून आपली कृपा व संरक्षण काढून घेतले. परिणामस्वरूप, त्या राष्ट्राला अनेक संकटे सोसावी लागली. (शास्ते २:११-१८) अर्थात, सबंध राष्ट्र जरी मूर्तिपूजा करू लागले तरीसुद्धा काही मोजके लोक असे होते जे विश्‍वासूपणे देवाच्या आज्ञांचे पालन करत राहिले. (१ राजे १९:१४, १८) या विश्‍वासू व्यक्‍तींना कदाचित सबंध राष्ट्राच्या पापांमुळे काही ना काही त्रास सहन करावा लागला असेल, पण ते स्वतः विश्‍वासू असल्यामुळे यहोवाने त्यांच्यावर कृपादृष्टी केली.

कालांतराने इस्राएल राष्ट्र यहोवाच्या तत्त्वांचे इतक्या उघडपणे उल्लंघन करू लागले, की यामुळे यहोवाचे नाव इतर राष्ट्रांमध्ये थट्टेचा विषय बनले. तेव्हा, यहोवाने आपल्या लोकांना शिक्षा करायचे ठरवले. त्याने आपल्या लोकांना बंदिवान बनून बॅबिलोनला नेले जाण्यास अनुमती दिली. अर्थात ही शिक्षा त्या सबंध राष्ट्राला आणि त्यातील व्यक्‍तींनाही भोगावी लागली. (यिर्म. ५२:३-११, २७) किंबहुना, बायबल असे सांगते की सामूहिक रीत्या इस्राएल राष्ट्राचा दोष इतका मोठा होता की निर्गम २०:५ यात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कदाचित तीन, चार किंवा त्याहीपेक्षा जास्त पिढ्यांना आपल्या वाडवडिलांच्या पापांचे दुष्परिणाम भोगावे लागले असतील.

देवाच्या वचनात, आईबापांच्या गैरवर्तणुकीमुळे त्या विशिष्ट कुटुंबाला दुष्परिणाम भोगावे लागल्याचेही अहवाल आढळतात. उदाहरणार्थ, महायाजक एली याने आपल्या “अधम,” व वाईट चालीच्या मुलांना याजक म्हणून सेवा करू दिली आणि याबद्दल तो देवाच्या नजरेत दोषी ठरला. (१ शमु. २:१२-१६, २२-२५) एलीने यहोवापेक्षा आपल्या मुलांना जास्त महत्त्व दिल्यामुळे देवाने असे सांगितले की एलीच्या कुटुंबाला महायाजक पदावरून कायमचे काढून टाकले जाईल. एलीचा खापरपणतू अब्याथार याच्या काळापासून देवाचे हे शब्द पूर्ण होण्यास सुरुवात झाली. (१ शमु. २:२९-३६; १ राजे २:२७) निर्गम २०:५ यातील तत्त्व गेहजी याच्या उदाहरणावरूनही स्पष्ट होते. गेहजी अलीशा संदेष्ट्याचा सेवक होता. पण, त्याने आपल्या या पदाचा गैरफायदा घेतला. अरामी सेनापती नामान याला बरे करण्यात आले तेव्हा गेहजीने या घटनेतून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अलीशा संदेष्ट्याद्वारे यहोवाने त्याच्याविरुद्ध असा न्यायसंदेश घोषित केला: “नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.” (२ राजे ५:२०-२७) अशा रीतीने, गेहजीने केलेल्या चुकीचा परिणाम त्याच्या वंशजांवरही झाला.

निर्माणकर्ता व जीवनदाता या नात्याने कोणती शिक्षा न्याय्य व योग्य आहे हे ठरवण्याचा यहोवाला पूर्ण अधिकार आहे. मुलांवर किंवा वंशजांवर त्यांच्या वाडवडिलांच्या पापाचे दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण वरील उदाहरणांत पाहिले. पण, यहोवा “दीनांची आरोळी” ऐकतो आणि जे मनापासून त्याच्याकडे वळतात त्यांच्यावर तो कृपादृष्टी करून त्यांचा त्रासही काही प्रमाणात सुसह्‍य करू शकतो.—ईयो. ३४:२८.

[२९ पानांवरील चित्र]

कोरह व त्याच्या बंडखोर साथीदारांना त्यांच्या कृत्यांबद्दल जबाबदार धरण्यात आले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा