वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w07 १०/१ पृ. २२-२७
  • आज देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आज देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रगतीशील, व्यावहारिक पावले उचलणे
  • संतुलन राखण्यास शिकणे
  • देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालण्याला आपले जीवनध्येय बनवणे
  • खरोखरच समाधानकारक जीवन
  • अर्थपूर्ण उद्देश शोधणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • पूर्णवेळेच्या सेवकांची आठवण ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • नवीन नेमणुकीमुळे होणाऱ्‍या बदलांशी जुळवून घेणं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
w07 १०/१ पृ. २२-२७

आज देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालणे

‘[ख्रिस्त] सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता जगू नये.’—२ करिंथकर ५:१५.

१. एका मिशनरी बांधवाला त्याच्या नेमणूकीत कोणता अनुभव आला ते सांगा.

बंधू एरन, हे आफ्रिकेत एक मिशनरी आहेत.a त्यांनी काही आठवणी सांगितल्या. “मुलकी युद्ध संपल्यानंतर, त्या दूरच्या आफ्रिकन गावात शिरणारी आमचीच पहिली गाडी होती जी बिनलष्करी होती. त्या गावात एक लहानशी मंडळी होती. पण तिच्याबरोबर आमचा काहीच संपर्क राहिला नव्हता. तिथल्या बांधवांना काय हवंय, नकोय, ते सर्व आम्हाला पाहायचं होतं. अन्‍न, कपडे आणि बायबल साहित्य यांच्याव्यतिरिक्‍त आम्ही यहोवाचे साक्षीदार—नावामागील संघटनाb (इंग्रजी) या व्हिडिओची एक प्रतही सोबत आणली. हा व्हिडिओ गावातल्या ‘थिएटरमध्ये’ दाखवण्यात आला. थिएटर म्हणजे गवताची एक मोठी झोपडी ज्यात एक व्हिसीआर आणि एक टीव्ही ठेवला होता. तो पाहण्यासाठी गावातले इतके लोक जमले की आम्हाला व्हिडिओ दोनदा दाखवावा लागला. पण प्रत्येक खेळानंतर अनेक बायबल अभ्यास सुरू करता आले. आमच्या प्रयत्नांचं चीज झालं.”

२. (क) देवाची सेवा करण्यात आपले जीवन व्यतीत करण्याचा निश्‍चय ख्रिश्‍चन का करतात? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

२ पण बंधू एरन आणि त्यांच्या साथीदारांनी हा इतका कठीण विडा का उचलला? येशू ख्रिस्ताने दिलेल्या खंडणी बलिदानाबद्दल आभारी असल्यामुळे त्यांनी देवाला आपले जीवन समर्पित केले आहे आणि देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात आपल्या जीवनाचा उपयोग करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्याप्रमाणे, सर्व समर्पित ख्रिश्‍चनांनी ‘स्वतःकरता न जगता’ “सुवार्तेकरिता” त्यांच्याने होईल ते करण्याचा निश्‍चय केला आहे. (२ करिंथकर ५:१५; १ करिंथकर ९:२३) त्यांना याची जाणीव आहे, की या व्यवस्थीकरणाचा नाश होईल तेव्हा, जगातला सर्व पैसा व प्रतिष्ठा कवडी मोलाची होईल. यास्तव, जिवात जीव व बऱ्‍यापैकी आरोग्य आहे तोपर्यंत ते आपले जीवन देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात व्यतीत करू इच्छितात. (उपदेशक १२:१) हे आपण कसे करू शकतो? असे करण्यासाठी आपल्याला बळ आणि शक्‍ती कोठून मिळू शकेल? आपल्या समोर सेवेच्या कोणकोणत्या संधींचे द्वार खुले आहे?

प्रगतीशील, व्यावहारिक पावले उचलणे

३. देवाची इच्छा पूर्ण करण्यात कोणती मूलभूत पावले उचलणे समाविष्ट आहे?

३ देवाची इच्छा पूर्ण करणे हाच खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा जीवनभर प्रयत्न असतो. यासाठी त्यांना सुरुवातीला काही मूलभूत पावले उचलावी लागतात; जसे की, ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत नाव दाखल करणे, बायबलचे दररोज वाचन करणे, प्रचार कार्यात भाग घेणे आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करणे. आपण जसजशी प्रगती करत राहतो तसतसे आपण प्रेषित पौलाचे शब्द मनात ठेवतो: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.” (१ तीमथ्य ४:१५) अशाप्रकारची प्रगती ही आत्मगौरवासाठी नसते तर यावरून देवाची इच्छा निस्वार्थपणे करण्याचा आपण निर्धार केला आहे हे दिसून येते. हा मार्ग निवडण्याद्वारे आपण दाखवून देतो, की पदोपदी आपण देवाचे मार्गदर्शन स्वीकारतो आणि आपल्यापेक्षा कितीतरी उत्कृष्टतेने देवही आपल्याला मदत करतो.—स्तोत्र ३२:८.

४. नको त्या गोष्टींची चिंता करण्याचे आपण सोडून कसे देऊ शकतो?

४ परंतु, निर्णय घेण्यात कुचराई केल्यास किंवा स्वतःविषयी फाजील चिंता केल्यास देवाच्या सेवेत आपण प्रगती करू शकणार नाही. (उपदेशक ११:४) त्यामुळे, देवाची आणि इतरांची सेवा करताना आनंद प्राप्त करण्याआधी आपण आपल्या स्वतःच्या मनांतील भीतींवर मात केले पाहिजे. जसे की, एरीक परकीय भाषा मंडळीत जाऊन सेवा करण्याचा विचार करत होता. पण त्याच्या मनात चिंता होती: ‘मला त्या मंडळीत राहणे जमेल का? मला तिथले बंधूभगिनी आवडतील का? त्यांना मी आवडेन का?’ एरीक म्हणतो: “नंतर मला जाणवलं, की स्वतःऐवजी मला बांधवांची अधिक चिंता असली पाहिजे. तेव्हा मी नको असलेल्या गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आणि इतरांच्या उपयोगी कसा पडू शकेन यावर मन केंद्रित केलं. मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि मनात ठरवल्याप्रमाणे पुढे गेलो. आता तिथं मी माझ्या सेवेत पुरेपूर आनंद उपभोगत आहे.” (रोमकर ४:२०) देवाची आणि इतरांची आपण जितक्या निस्वार्थीपणे सेवा करू तितका आनंद व समाधान आपण उपभोगू.

५. देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात यशस्वीरीत्या चालण्याकरता काळजीपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे का आहे? उदाहरण द्या.

५ देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात यशस्वीरीत्या चालण्याकरता काळजीपूर्वक नियोजन करणे देखील महत्त्वाचे आहे. आपण आपल्या डोक्यावर कर्जांचे ओझे लादण्याचे सुज्ञपणे टाळू. नाहीतर आपण या युगाचे दास होऊ आणि आपल्याला पूर्ण स्वातंत्र्याने देवाची सेवा करता येणार नाही. बायबल आपल्याला आठवण करून देते: “ऋणको धनकोचा दास होतो.” (नीतिसूत्रे २२:७) यहोवावर भाव ठेवल्याने व आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिल्याने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत मिळते. जसे की, ग्वोमिंग आणि त्याच्या दोन बहिणी आपल्या आईबरोबर अशा एका भागात राहतात जेथे घरांच्या किंमती खूपच आहेत व स्थायी नोकरी मिळणे कठीण आहे. काटकसर केल्यामुळे व खर्च आपापसात वाटून घेतल्यामुळे, सर्वांनाच काम नसले तरीसुद्धा त्यांचा खर्च भागतो. ग्वोमिंग म्हणतो: “कधीकधी आम्हा सर्वांनाच काम नसतं. तरीपण आम्ही पायनियरींग चालू ठेवतो आणि आईचीसुद्धा काळजी घेऊ शकतो. चैनीच्या वस्तू देता याव्यात म्हणून आम्ही पायनियरींग आणि मंडळीत मिळणारं काम सोडून द्यावं अशी आमच्या आईची इच्छा नाही म्हणून आम्ही खूप आभारी आहोत.”—२ करिंथकर १२:१४; इब्री लोकांस १३:५.

६. आपण देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात जीवन जगू शकतो, हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

६ तुम्ही जर जगिक गोष्टींमध्ये—पैसा मिळवण्यात किंवा इतर गोष्टी मिळवण्यात—खूपच गुरफटून गेला असाल तर देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात चालण्याकरता आधी तुम्हाला मोठमोठे बदल करावे लागतील. असे बदल एका रात्रीत करणे शक्य नाही. आणि बदल करताना तुमच्या हातून चुका झाल्या तरी त्याचा अर्थ तुम्ही अपयशी ठरला, असे नाही. कोईचीचे उदाहरण घ्या. तो मनोरंजनात बेसुमार वेळ खर्च करत होता. किशोरवयात असताना त्याने बायबलचा अभ्यास केला होता. पण त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत त्याला व्हिडिओ गेम्सशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. एकदा तो स्वतःलाच म्हणाला: ‘तू काय करतोयस? तू तिशी उलटली आहेस आणि तुझं जीवन हे असं बेकार घालवतोयस?’ कोईचीने पुन्हा एकदा बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मंडळीकडून मदत स्वीकारली. त्याने जीवनात लगेच बदल केले नाहीत तरीपण त्याने हार मानली नाही. खूपदा प्रार्थना करून व इतरांच्या प्रेमळ सहकार्याने सरतेशेवटी व्हिडिओ गेम्स खेळण्याचे त्याच्या डोक्यातले खूळ निघून गेले. (लूक ११:९) कोईची आज एक सेवा सेवक म्हणून आनंदाने सेवा करत आहे.

संतुलन राखण्यास शिकणे

७. देवाची सेवा करताना आपण संतुलित असणे महत्त्वाचे का आहे?

७ देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात चालण्याकरता आपल्याला आपल्या पूर्ण मनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण काकूं किंवा आळस करू नये. (इब्री लोकांस ६:११, १२) यहोवा आपल्याला शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या किंवा भावनिकरीत्या पिळून काढू इच्छित नाही. त्याचे कार्य आपण आपल्या शक्‍तीच्या आधारावर पूर्ण करू शकत नाही असे नम्रपणे कबूल केल्याने त्याचे गौरव होते आणि आपणही संतुलित आहोत हे दिसून येते. (१ पेत्र ४:११) यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला जी शक्‍ती लागते ती देण्याचे तो वचन देत असला तरी, आपल्याकडून तो ज्यांची अपेक्षा करत नाही त्या गोष्टी करण्याकरता आपण आपल्या जीवापलिकडे प्रयत्न करण्याची गरज नाही. (२ करिंथकर ४:७) पार थकून न जाता देवाची सेवा करीत राहण्याकरता आपण आपल्या शक्‍तीचा सुज्ञपणे उपयोग केला पाहिजे.

८. एका तरुण ख्रिस्ती भगिनीने पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याचा आणि नोकरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय झाले, व तिने कोणता बदल केला?

८ उदाहरणार्थ जी हे, ही भगिनी पूर्व आशियात राहते. पायनियरींग करता करता ती दोन वर्षांपासून एक नोकरी करत होती जिथे तिला खूप मेहनत करावी लागत होती. ती म्हणते: “मी पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याचा आणि नोकरी करण्याचा प्रयत्न केला. पण मला रात्रीची फक्‍त पाच तास झोप मिळत असे. हळूहळू मला सत्यासाठी काही मानसिक शक्‍तीच उरली नाही; आध्यात्मिक गोष्टींमध्ये मला पूर्वीसारखा आनंद मिळेनासा झाला.” पण “संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने” यहोवाची सेवा करता यावी म्हणून जी हेने कमी मेहनतीची नोकरी शोधली. (मार्क १२:३०) ती म्हणते: “माझ्या घरच्यांनी माझ्यावर भरपूर पैसे कमवण्यासाठी बराच दबाव आणला तरीपण मी देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालण्याचा प्रयत्न केला. आजही मी पैसे कमवते, पण फक्‍त माझ्या गरजांपुरता; जसे की, मला शालीन कपडे घेता येतील एवढे. शिवाय, मला पुरेशी झोप मिळत असल्यामुळे ताजंतवानं वाटतं. मला सेवेत खूप आनंद मिळतो, मी आध्यात्मिकरीत्याही मजबूत झाले आहे. हे सर्व, मी जगाच्या आकर्षणांकडे व विकर्षणांकडे लक्ष देत नाहीए म्हणून शक्य झाले आहे.”—उपदेशक ४:६; मत्तय ६:२४, २८-३०.

९. आपल्या प्रयत्नांचा क्षेत्रांतील लोकांवर कोणता परिणाम होऊ शकतो?

९ प्रत्येकच जण पूर्ण-वेळचा सुवार्तिक होऊ शकत नाही. वृद्धावस्था, आजारपण किंवा इतर अडीअडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असला तर, हे लक्षात ठेवा, की यहोवा तुमच्या विश्‍वासूपणाची आणि तुम्हाला जितकी जमते तितक्या मनःपूर्वक सेवेची खूप कदर करतो. (लूक २१:२, ३) त्यामुळे आपल्या प्रयत्नांचा मग ते मर्यादित का असेनात, त्यांचा इतरांवर जो परिणाम होतो त्याला क्षुल्लक लेखू नये. उदाहरणार्थ, समजा आपण प्रचारकार्यात काही घरी गेलो पण आपल्या संदेशात कोणी आवड दाखवली नाही. आपला संदेश ऐकून घेण्यासाठी कदाचित कोणी दारही उघडले नसेल; तरीपण आपण गेल्यानंतर, अनेक तासांनंतर किंवा कदाचित दिवसांनंतरही ते आपल्याविषयी बोलतील. ज्याने ज्याने आपल्याकडून सुवार्ता ऐकली आहे तो प्रत्येक जण ती स्वीकारेल, अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. किंबहुना काही जण ती स्वीकारतील. (मत्तय १३:१९-२३) जगातील परिस्थिती किंवा त्यांच्या जीवनातील परिस्थिती बदलल्यास कदाचित ते आपला संदेश ऐकतील. लोक ऐकोत अगर न ऐकोत, आपण मात्र सार्वजनिक सेवेत आपल्यापरीने होता होईल तितका भाग घेतला पाहिजे; अशाप्रकारे आपण देवाचे कार्य करतो. आपण “देवाचे सहकारी” आहोत.—१ करिंथकर ३:९.

१०. मंडळीतील सर्वांपुढे कोणत्या संधी आहेत?

१० तसेच, आपण सर्व आपल्या कौटुंबिक सदस्यांना व आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींना मदत करू शकतो. (गलतीकर ६:१०) आपल्या उत्तम वर्तनाचा आपण इतरांवर खोल व दीर्घकाळ टिकेल अशी छाप पाडू शकतो. (उपदेशक ११:१, ६) वडील आणि सेवा सेवक आपल्या जबाबदाऱ्‍या मनःपूर्वक पूर्ण करतात तेव्हा ते मंडळीच्या आध्यात्मिक आरोग्याला व स्थैर्याला हातभार लावतात; परिणामतः ख्रिस्ती कार्य वाढते. ‘प्रभूच्या कामात आपण सर्वदा अधिकाधिक’ करतो तेव्हा आपले “श्रम व्यर्थ” जाणार नाहीत, असे आपल्याला आश्‍वासन देण्यात आले आहे.—१ करिंथकर १५:५८.

देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालण्याला आपले जीवनध्येय बनवणे

११. स्थानीय मंडळीबरोबर सेवा करण्याव्यतिरिक्‍त आपल्याला इतर कोणकोणत्या संधी असू शकतात?

११ ख्रिस्ती यानात्याने आपल्याला जीवन प्रिय आहे आणि आपण जे काही करू त्याद्वारे देवाचे गौरव करण्याची आपली इच्छा आहे. (१ करिंथकर १०:३१) आपण जर विश्‍वासूपणे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला व येशूने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी पाळावयास इतरांना शिकवल्या तर देवाची सेवा करण्याचे अनेक मार्ग आपल्याला दिसतील ज्यांद्वारे आपण आनंदी होऊ. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) स्थानीय मंडळीबरोबर कार्य करण्याव्यतिरिक्‍त, आपल्यासमोर अधिक गरज असलेल्या ठिकाणी मग ती दुसऱ्‍या क्षेत्रात असो, भाषेत असो अथवा राष्ट्रात असो, सेवा करण्याची संधी असू शकते. अविवाहित असलेल्या योग्यताप्राप्त वडिलांना व सेवा सेवकांना, सेवा प्रशिक्षण प्रशालेचे आमंत्रण मिळू शकते. या प्रशालेतून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना, त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रांत अथवा परदेशात, प्रौढ ख्रिस्ती बांधवांच्या मदतीची गरज असलेल्या मंडळ्यांमध्ये सेवा करण्याचे आमंत्रण दिले जाते. पूर्ण वेळेच्या सेवेत असलेली विवाहित दांपत्ये गिलियड मिशनरी प्रशिक्षण मिळण्यास पात्र ठरू शकतात व परदेशात सेवा करू शकतात. याशिवाय, बेथेलमध्ये वेगवेगळी कामे करण्याकरता तसेच राज्य सभागृहांच्या व शाखा दफ्तरांच्या बांधकामासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी स्वयंसेवकांची तर सतत गरज असते.

१२, १३. (क) कोणत्या प्रकारची सेवा निवडायची, हे तुम्ही कसे ठरवू शकता? (ख) एका नेमणूकीत मिळवलेला अनुभव दुसऱ्‍या नेमणुकींमध्ये देखील उपयोगी पडू शकतो, हे दाखवण्यासाठी एक उदाहरण द्या.

१२ तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा निवडू शकाल? यहोवाचा समर्पित सेवक यानात्याने मार्गदर्शनासाठी नेहमी त्याच्याकडे व त्याच्या संस्थेकडे पाहा. योग्य निर्णय घेण्यास त्याचा “सदात्मा” तुम्हाला मदत करेल. (नहेम्या ९:२०) तुम्हाला एक नेमणूक मिळाली की तुम्हाला अनेक नेमणूका मिळत राहतील आणि एक प्रकारच्या सेवेत तुम्ही प्राप्त केलेला अनुभव व कौशल्ये नंतर दुसऱ्‍या एखाद्या नेमणूकीत सहसा उपयोगी पडू शकतात.

१३ डेनीस आणि त्यांची पत्नी जेनी नियमितरीत्या राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पात सेवा करतात. संयुक्‍त संस्थानांच्या दक्षिणेस कॅटरिना चक्रीवादळ आले तेव्हा त्यांनी मदत कार्यात स्वयंसेवा केली. डेनीस म्हणतात: “राज्य सभागृहे बांधण्याकरता आम्ही विकसित केलेल्या कौशल्यांचा बांधवांना मदत करण्याकरता जेव्हा आम्ही उपयोग करतो तेव्हा आम्हाला खूप आनंद मिळतो. मदत केलेल्या बंधूभगिनींनी आमचे किती आभार मानले हे पाहून आम्हीच भारावून गेलो. मदत कार्य करणाऱ्‍या इतर गटांना पुनर्बांधणीत फार कमी यश आले आहे. पण यहोवाच्या साक्षीदारांनी ५,३०० पेक्षा अधिक घरे आणि अनेक राज्य सभागृहे दुरुस्त केली आहेत किंवा नव्याने बांधून दिली आहेत. लोक हे पाहतात आणि आता अनेक जण आपल्या संदेशात आवड दाखवू लागले आहेत.”

१४. पूर्ण वेळेच्या सेवेत उतरण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता?

१४ पूर्ण वेळच्या सेवेला आपले जीवनध्येय बनवून तुम्ही देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात चालू शकता का? जर होय, तर तुम्हाला निश्‍चित अनेक आशीर्वाद मिळतील. तुमच्या सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्हाला हे शक्य नसेल तर कदाचित तुम्हाला काही फेरबदल करावे लागतील. नहेम्याप्रमाणे तुमची परिस्थिती यहोवासमोर मांडा. नहेम्याने एक महत्त्वपूर्ण कामगिरी हाती घेण्याआधी यहोवाला प्रार्थना केली: “हे प्रभू, मी विनवणी करितो की तू . . . तुझ्या सेवकास आज यश दे.” (नहेम्या १:११) आणि मग, ‘जो प्रार्थना ऐकतो’ त्याच्यावर भाव ठेवून आपल्या विनंतीनुसार कार्य करा. (स्तोत्र ६५:२) यहोवाची पूर्ण मनाने सेवा करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर त्याचे आशीर्वाद तुम्हाला हवे असतील तर आधी तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. पूर्ण वेळेच्या सेवेत उतरण्याचा निर्णय घेतल्यावर बदलू नका. जसजसा वेळ जाईल तसतसा तुमचा अनुभव आणि तुमची कौशल्ये वाढतील आणि तुमचा आनंदही द्विगुणीत होईल.

खरोखरच समाधानकारक जीवन

१५. (क) अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या बंधूभगिनींबरोबर बोलून व त्यांच्या जीवनकथा वाचून आपल्याला कशाप्रकारे लाभ होतो? (ख) तुम्हाला खासकरून उत्तेजनदायक वाटललेली एखादी जीवनकथा सांगा.

१५ देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात चालल्याने कोणत्या परिणामांची तुम्ही अपेक्षा कराल? दीर्घकाळपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या खासकरून अनेक वर्षांपासून पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या बंधूभगिनींबरोबर बोला. त्यांचे जीवन खरोखरच किती समाधानकारक आहे! (नीतिसूत्रे १०:२२) त्यांना ज्या गोष्टींची खरोखरच गरज होती त्या आणि इतर अनेक गोष्टी मिळवणे कठीण असताना देखील यहोवाने त्यांना कधीही त्यागले नाही, हे ते तुम्हाला सांगतील. (फिलिप्पैकर ४:११-१३) गत शतकात, विश्‍वासू जणांच्या शेकडोहून अधिक जीवनकथा टेहळणी बुरूज मासिकात छापण्यात आल्या आहेत. प्रत्येक जीवनकथेतून आपल्याला बंधूभगिनींचा आवेशी व आनंदी आत्मा दिसून येतो ज्यावरून आपल्याला बायबलमधील प्रेषितांची कृत्ये नावाच्या पुस्तकाची आठवण होते. अशाप्रकारचे उल्लेखनीय अहवाल वाचल्यास तुम्ही असे म्हणावयास प्रवृत्त व्हाल: ‘मला अशाप्रकारचे जीवन जगायला आवडेल!’

१६. ख्रिश्‍चनांचे जीवन अर्थपूर्ण व आनंदी कशामुळे होते?

१६ लेखाच्या सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला होता ते बंधू एरन आठवून सांगतात: “आफ्रिकेत माझी भेट अनेकदा अशा तरुणांशी घडायची जे जीवनाचा काय उद्देश आहे याचा शोध घेण्यासाठी भटकत असायचे. बहुतेकांना याचे उत्तर सापडलेले नव्हते. पण आम्ही राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करून देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात जगत होतो. आम्ही आव्हानात्मक व अर्थपूर्ण जीवन जगत होतो. घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

१७. आपण आज देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात चालणे का महत्त्वाचे आहे?

१७ तुमच्याविषयी काय? तुमचे जीवन कोणत्या गोष्टीवर केंद्रित आहे? देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात चालण्यास मदत मिळावी म्हणून तुम्ही जर विशिष्ट आध्यात्मिक ध्येये ठेवली नाहीत तर इतर गोष्टी करण्यातच तुमचा बहुतेक वेळ आणि तुमची बहुतेक शक्‍ती खर्च होईल. सैतानी व्यवस्थीकरणावर आपले जीवन का म्हणून वाया घालवायचे? फार लवकर जेव्हा या जगावर “मोठे संकट” कोसळेल तेव्हा धनदौलत आणि जगिक पदे कवडीमोल ठरतील. केवळ यहोवाबरोबरचा आपला घनिष्ठ नातेसंबंध काय तो कामी येईल. आपण देवाची आणि इतरांची सेवा केली आणि जीवनभर देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात चालत राहिलो म्हणून आपण किती आभारी राहू.—मत्तय २४:२१; प्रकटीकरण ७:१४, १५. (w०७ १०/१)

[तळटीपा]

a काही नावे बदलण्यात आली आहेत.

b यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

तुम्हाला उत्तर देता येईल का?

• आपण यहोवाची सेवा करतो त्याविषयी त्याला कसे वाटते?

• व्यावहारिक व संतुलित मदत आपल्याला देवाची आणि इतरांची सेवा करण्यास कशाप्रकारे मदत करते?

• देवाची सेवा करण्याचे कोणकोणते मार्ग अथवा संधी आपल्यासमोर आहेत?

• आपण आज देवाच्या उद्देशांच्या सामंजस्यात कसे चालू शकतो?

[२४ पानांवरील चित्रे]

यहोवाची सेवा पूर्ण मनाने करण्याकरता संतुलनाची आवश्‍यकता आहे

[२५ पानांवरील चित्रे]

अनेक मार्गांनी देवाची सेवा केली जाऊ शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा