“प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करितो”
देवाचे वचन बायबल यांतील मार्गदर्शन “सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट” आहे. (स्तोत्र १९:७-१०) का? कारण “सुज्ञाचा [यहोवाचा] बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवितो.” (नीतिसूत्रे १३:१४) शास्त्रवचनांतील सल्ल्याचे पालन केल्याने आपल्या जीवनाचा केवळ दर्जाच सुधारत नाही तर आपल्या जीवाला धोकेदायक असलेले पाश टाळण्यासही मदत मिळते. यास्तव, शास्त्रवचनांतील ज्ञान शोधून ते आपल्या जीवनात लागू करणे किती महत्त्वाचे आहे!
नीतिसूत्रे १३:१५-२५ मध्ये लिहून ठेवलेला सल्ला, राजा शलमोनाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला दिला होता जो आज आपल्याला उत्तम व दीर्घ जीवन जगता यावे म्हणून सुज्ञपणे वागण्यास मदत करतो.a लहान नीतिवचनांद्वारे तो हे दाखवतो, की देवाचे वचन आपल्याला, इतरांची मर्जी संपादन करण्यास, आपल्या सेवेत टिकून राहण्यास, शिक्षेबद्दलचा उचित दृष्टिकोन बाळगण्यास व सुज्ञपणे मित्र निवडण्यास मदत करू शकते. आपल्या लेकराबाळांसाठी वारसा ठेवणे तसेच त्यांना प्रेमाने शिस्त लावणे यात पालकांचा दूरदृष्टीपणा दिसून येतो, हेही तो सांगतो.
समंजसपणाने कृपा संपादिता येते
“समंजसपणाने कृपा संपादिता येते, पण कपटी इसमांचा मार्ग खडतर असतो,” असे शलमोन म्हणतो. (नीतिसूत्रे १३:१५) “समंजसपणा” किंवा समजूतदारपणा यासाठी असलेल्या मूळ भाषेतील वाक्यांशाचा अर्थ, “सुजाणपणा, योग्य तारतम्य आणि सुज्ञ मतांची क्षमता, होय” असे एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे. असे गुण अंगी असलेल्या व्यक्तीला इतरांची मर्जी सहजपणे संपादता येते.
फिलेमोनचा पळून आलेला दास अनेसिम याला माघारी पाठवताना प्रेषित पौलाने त्याच्याशी अर्थात सहख्रिश्चन फिलेमोन याच्याशी किती समंजसपणे व्यवहार केला त्याचा विचार करा. तू माझे जसे स्वागत करशील तसेच अनेसिमचे करावे, असे पौलाने फिलेमोनास आर्जवले. इतकेच नव्हे तर, पौल असेही म्हणाला, की जर अनेसिमला फिलेमोनाचे काही पैसे द्यायचे असतील तेही मी देईन. पौल आपल्या अधिकाराचा उपयोग करू शकला असता, अनेसिमला दयाळुपणे पुन्हा स्वीकारावे अशी तो फिलेमोनाला आज्ञा देऊ शकला असता. परंतु त्याने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून व प्रेमळपणे हे प्रकरण हाताळण्याचे ठरवले. पौलाला पूर्ण खात्री होती, की असे केल्यामुळे फिलेमोन नक्की त्याला सहकार्य देईल; इतकेच नव्हे तर त्याने त्याला जितके करण्यास सांगितले आहे त्यापेक्षा अधिक करेल. आपणही आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींबरोबर असेच वागू नये का?—फिलेमोन ८-२१.
दुसऱ्या बाजूला पाहता, कपटी इसमांचा मार्ग “खडतर” किंवा कठीण असतो. कोणत्या अर्थाने? एका विद्वानानुसार, येथे वापरण्यात आलेल्या शब्दाचा अर्थ “दृढ, भक्कम, दुष्ट लोकांची निर्दयी वागणूक असा होतो. . . . दुष्ट मार्गात सरसावलेला मनुष्य निर्दयी असतो, इतरांच्या सुज्ञ सूचनांची त्याला पर्वा नसते, तो नाशाच्या रस्त्यावर असतो.”
शलमोन पुढे म्हणतो: “प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करितो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडितो.” (नीतिसूत्रे १३:१६) हा शहाणा मनुष्य धूर्त नाही. येथे शहाणपणाचा ज्ञानाशी आणि कार्य करण्याआधी विचार करणाऱ्या एका समंजस व्यक्तीशी संबंध जोडण्यात आला आहे. एखाद्या शहाण्या मनुष्याची अन्यायीपणे टीका केली जाते किंवा अपमानही केला जातो तेव्हा तो आपल्या जिभेवर ताबा ठेवतो. राग अनावर होऊ नये म्हणून पवित्र आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्यास आपल्याला मदत करावी म्हणून तो देवाला प्रार्थना करतो. (गलतीकर ५:२२, २३) शहाणा मनुष्य दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला आपल्यावर ताबा मिळवू देत नाही. तर तो स्वतःवर ताबा ठेवतो आणि भांडण टाळतो; पण लगेच चिडणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असे होत नाही.
शहाणा मनुष्य निर्णय घेताना देखील समज दाखवतो. त्याला माहीत असते, की सुज्ञ कार्ये ही अंदाजपंची, भावनाविवश होऊन किंवा लोकांचे अंधानुकरण केल्याने होत नसतात. त्यामुळे तो आपल्या परिस्थितीचे आधी परीक्षण करतो. तो सर्व वस्तुस्थिती पडताळून पाहतो आणि आपल्यासमोरील विविध पर्याय विचारात घेतो. मग तो शास्त्रवचनांमध्ये संशोधन करतो, आपल्या परिस्थितीला कोणते बायबल नियम किंवा तत्त्वे लागू होतात हे ठरवतो. अशा मनुष्याचा मार्ग सरळ राहतो.—नीतिसूत्रे ३:५, ६.
“विश्वासू वकील एक औषधी आहे”
यहोवाचे साक्षीदार यानात्याने आपल्यावर देवाकडून मिळालेल्या संदेशाची घोषणा करण्याची कामगिरी सोपवण्यात आली आहे. पुढील नीतिसूत्रातील शब्द आपल्याला आपली कामगिरी विश्वासूपणे पूर्ण करण्यास मदत करतील. ते नीतिसूत्र असे आहे: “दुष्ट जासूद संकटांत पडतो; पण विश्वासू वकील एक औषधी आहे.”—नीतिसूत्रे १३:१७.
येथे, संदेशवाहकाच्या अर्थात जासूदाच्या गुणांवर जोर देण्यात आला आहे. संदेशवाहकाने दुष्टपणाने संदेशाचा विपर्यास केला किंवा त्यात फेरफार केला तर? त्याचा प्रतिकूल न्यायदंड मिळणार नाही का? संदेष्टा अलीशाचा चाकर गेहजी याचा विचार करा; त्याने लोभास्तव अरामी अर्थात सिरियाचा सेना प्रमुख नामान याला खोटा संदेश दिला. नामानाला ज्या कोडातून बरे करण्यात आले होते ते कोड गेहजीला लागले. (२ राजे ५:२०-२७) एखादा संदेशवाहक किंवा जासूद अविश्वासू बनतो आणि संदेश सांगण्याचेच सोडून देतो तेव्हा त्याचे काय होते? बायबल म्हणते: “कोणा दुर्जनास . . . त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्यास सावध केले नाही तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी [यहोवा] तुजजवळ मागेन.”—यहेज्केल ३३:८.
दुसऱ्या बाजूला पाहता, विश्वासू संदेशवाहक स्वतःसाठी आणि जे त्याचा संदेश ऐकतात अशांसाठी औषधासारखा असतो. पौलाने तीमथ्याला आर्जवले: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेहि तारण साधिशील.” (१ तीमथ्य ४:१६) राज्याच्या सुवार्तेची विश्वासूपणे घोषणा करीत राहिल्याने लोक बरे कसे होतात याचा विचार करा. ही सुवार्ता उचित अंतःकरणाच्या लोकांना प्रवृत्त करते आणि त्यांना स्वतंत्र करणाऱ्या मार्गावर आणते. (योहान ८:३२) आणि लोकांनी संदेश ऐकायला नकार जरी दिला तरी एकनिष्ठ संदेशवाहक “आपल्या जिवाचा बचाव” करेल. (यहेज्केल ३३:९) आपण प्रचार करण्याच्या आपल्याला दिलेल्या कामगिरीकडे केव्हाही दुर्लक्ष करू नये. (१ करिंथकर ९:१६) “वचनाची घोषणा” करताना आपण, बायबलच्या संदेशाचे महत्त्व कमी करण्याद्वारे किंवा त्याला मिर्चमसाला लावण्याद्वारे हातमिळवणी करणार नाही.—२ तीमथ्य ४:२.
“वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो”
शहाण्याला लाभदायक सल्ला दिला जातो तेव्हा त्याने त्याला तुच्छ लेखावे का? नीतिसूत्रे १३:१८ म्हणते: “बोधाचा अव्हेर करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो.” मागितलेला नसताना जेव्हा आपल्याला सल्ला दिला जातो तेव्हाही तो स्वीकारण्याद्वारे आपण सुज्ञता दाखवतो. उचित सल्ला मिळण्याची आपल्याला गरज आहे अशी जाणीव नसताना तो मिळतो तेव्हा तो अधिक फायदेकारक ठरू शकतो. असा सल्ला अनुसरल्याने आपण अनेक दुःखांतून वाचू शकतो आणि दुर्घटना टाळू शकतो. सल्ला तुच्छ लेखल्याने आपला अपमान होऊ शकतो.
पात्र असताना आपली प्रशंसा केली जाते तेव्हा आपल्याला उभारी मिळते, उत्तेजन मिळते. पण प्रशंसेसोबत आपण वाग्दंडाची अपेक्षा केली पाहिजे आणि ती स्वीकारली पाहिजे. प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दोन पत्रांचा विचार करा. या पत्रात तीमथ्याच्या विश्वासूपणाची प्रशंसा करण्यात आली आहे पण त्यासोबत त्यात पुष्कळ सल्लाही देण्यात आला आहे. पौलाने या तरुण मनुष्याला, विश्वास आणि चांगला विवेक बाळगण्याच्या बाबतीत, मंडळीत इतरांशी कसे वागायचे या बाबतीत, ईश्वरी भक्ती आणि आत्म-संतुष्ट मनोवृत्ती विकसित करण्याच्या बाबतीत, इतरांना सूचना देण्याच्या बाबतीत, धर्मत्यागाचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत आणि आपली सेवा पूर्ण करण्याच्या बाबतीत सल्ला दिला. मंडळीतील तरुण सदस्यांनी अधिक अनुभवी बंधूभगिनींकडून सल्ला मिळण्याची व तो स्वीकारण्याची तयारी दर्शवली पाहिजे.
“सुज्ञांची सोबत धर”
“इच्छातृप्ति जिवाला गोड वाटते, पण वाईट सोडून देण्याचा मूर्खाला वीट आहे,” असे सुज्ञ राजा म्हणतो. (नीतिसूत्रे १३:१९) या नीतिसूत्राच्या अर्थाविषयी एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले होते: “एखादे ध्येय साध्य केले जाते किंवा एखादी इच्छा पूर्ण होते तेव्हा तो मनुष्य मनापासून समाधानी होतो. . . . ध्येय साध्य करणे हा सर्वात सुखदायक अनुभव असल्यामुळे, दुष्टाईपासून दूर पळणे मूर्खांना असुखकारक वाटणे अपेक्षितच आहे. कारण मूर्खांच्या आकांक्षा, वाईट मार्गानेच साध्य होऊ शकतात; त्यांनी जर दुष्टाई सोडून दिली तर त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे सुख मिळणार नाही.” यास्तव, आपण उचित इच्छा विकसित करणे किती महत्त्वाचे आहे!
आपल्या साथीदारांचा, आपले विचार, आपली आवड आणि नावड यांवर किती जबरदस्त प्रभाव पडू शकतो! शलमोनाने कधीही न बदलणारे एक सत्य विधान केले; तो म्हणाला: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) होय, आपला सहवास—मग तो मनोरंजनाद्वारे असो, इंटरनेटद्वारे असो, पुस्तकांद्वारे असो—त्याचा आपण काय आहोत आणि काय होऊ यावर प्रभाव पडतो. तेव्हा सुज्ञपणे आपले साथीदार निवडणे खरोखरच महत्त्वाचे आहे!
‘वतन ठेवणे’
इस्राएलचा राजा म्हणतो: “पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण धार्मिकांस कल्याणरूप प्रतिफळ मिळते.” (नीतिसूत्रे १३:२१) धार्मिकतेचा पाठलाग केल्याने प्रतिफळ मिळते कारण धार्मिक अर्थात नीतिमान लोकांची यहोवा काळजी घेतो. (स्तोत्र ३७:२५) परंतु, आपण ही जाणीव ठेवली पाहिजे की, “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) अनपेक्षितपणे येणाऱ्या घटनांसाठी आपण आताच तयारी करू शकतो का?
शलमोन म्हणतो: “चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांस वतन ठेवितो.” (नीतिसूत्रे १३:२२अ) आपल्या मुलांना यहोवाचे ज्ञान घेण्यास व त्याच्याबरोबर एक उत्तम नातेसंबंध जोडण्यास मदत करण्याद्वारे पालक आपल्या मुलांसाठी किती मौल्यवान वारसा ठेवतात! पण, शक्य असते तेव्हा कुटुंबाच्या आर्थिक कल्याणाची व्यवस्था करणे सुज्ञपणाचे ठरणार नाही का, जेणेकरून पालकांपैकी एकाचा अकाली मृत्यू झालाच तर कुटुंबाचे हाल होणार नाहीत? पुष्कळ ठिकाणी, कुटुंब प्रमुख विमा उतरून घेऊ शकतात, कायदेशीर इच्छा-पत्र तयार करू शकतात व भविष्यात वापरण्यासाठी काही पैसे साठवून ठेवू शकतात.
दुष्टांच्या वतनाविषयी काय म्हणता येईल? शलमोन पुढे म्हणतो: “पाप्यांचे धन धार्मिकासाठी साठविलेले असते.” (नीतिसूत्रे १३:२२) आता मिळणाऱ्या लाभांशिवाय, “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी” निर्माण करण्याचे आपले वचन यहोवा पूर्ण करेल तेव्हाही हे शब्द खरे ठरतील. (२ पेत्र ३:१३) तेव्हा दुष्टांचा नायनाट केला जाईल आणि “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.”—स्तोत्र ३७:११.
शहाणा मनुष्य त्याच्याजवळ कमी संपत्ती असतानाही बुद्धीने कार्य करतो. नीतिसूत्रे १३:२३ म्हणते: “गरिबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते; तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशहि होतो.” एक गरीब मनुष्य, काबाड कष्ट करून व देवाच्या आशीर्वादाने हळूहळू आपली संपत्ती वाढवतो. परंतु, न्याय नसलेल्या ठिकाणी, अन्यायामुळे संपत्ती नाहीशी होऊ शकते.
‘वेळीच त्याला शिक्षा करणे’
अपरिपूर्ण लोकांना शिक्षेची आवश्यकता आहे आणि ही शिक्षा त्यांना लहानपणापासून द्यावी लागते. इस्राएलचा राजा असे म्हणतो: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.”—नीतिसूत्रे १३:२४.
छडी हे अधिकारचे प्रतीक आहे. नीतिसूत्रे १३:२४ मध्ये ती पालकांच्या अधिकाराला सूचित करते. या वचनाच्या संदर्भात, छडीचा वापर करणे म्हणजे मुलाला मारणे असा त्याचा नेहमीच अर्थ होत नाही. तर त्याचा अर्थ कोणत्याही रूपातील सुधारणूक, असा होतो. कधीकधी, एखाद्या मुलाला त्याचे चुकीचे वर्तन सुधारण्यासाठी शब्दांचा मार पुरेसा असेल. दुसऱ्या मुलाला कदाचित आणखी जरा कडक शिक्षा द्यावी लागेल. नीतिसूत्रे १७:१० म्हणते: “वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.”
पालकांनी नेहमी प्रेमाने व बुद्धीने मुलांच्या लाभास्तव त्यांना शिक्षा द्यावी. प्रेमळ पालक आपल्या मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणार नाही. उलट, तो/ती त्यांच्याकडे लक्ष देईल जेणेकरून चुकीच्या प्रवृत्ती मुलाच्या अंतःकरणात मूळ धरण्याआधी त्यांना उपटून टाकता येईल. अर्थात असे करताना प्रेमळ पालक पौलाच्या या सल्ल्याकडे लक्ष देईल: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.
एखादा पालक जर आपल्या मुलाला त्याच्या मर्जीनुसार वागू देतो आणि त्याची कधीच सुधारणूक करीत नसेल तर? फाजील लाड केल्याबद्दल अशा पालकाची नंतर कदर केली जाईल का? मुळीच नाही! (नीतिसूत्रे २९:२१) बायबल म्हणते: “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीतिसूत्रे २९:१५) पालक आपला अधिकार दाखवत नाहीत तेव्हा त्यावरून त्यांना मुलांची काळजी नाही, त्यांना त्यांच्याबद्दल प्रेम नाही हे दिसून येते. दयाळुपणे परंतु दृढपणे अधिकार चालवल्याने पालकांना मुलांबद्दल प्रेमळ काळजी आहे हे व्यक्त होते.
खऱ्या ज्ञानानुसार वागणाऱ्या एका शहाण्या व धार्मिक मनुष्याला प्रतिफळ मिळेल. शलमोन आपल्याला अशी हमी देतो: “धार्मिक पोटभर जेवितो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.” (नीतिसूत्रे १३:२५) जीवनातील कोणत्याही क्षेत्रात—कौटुंबिक वर्तुळात, इतरांबरोबरच्या आपल्या नातेसंबंधात, आपल्या सेवेत किंवा आपल्याला शिक्षा दिली जाते तेव्हा आपल्यासाठी काय लाभदायक आहे हे यहोवाला माहीत आहे. त्यामुळे त्याच्या वचनातील सल्ल्याचे आपण सुज्ञपणे पालन करतो तेव्हा आपण निश्चितच सर्वोत्तम जीवनाचा आनंद लुटू.
[तळटीप]
a नीतिसूत्रे १३:१-१४ वचनांवरील चर्चेसाठी, टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, २००३, पृष्ठे २१-५ पाहा.
[२८ पानांवरील चित्र]
एखाद्या शहाण्या मनुष्याची अन्यायीपणे टीका केली जाते किंवा अपमानही केला जातो तेव्हा तो आपल्या जिभेवर ताबा ठेवतो
[२९ पानांवरील चित्र]
एक विश्वासू राज्य उद्घोषक बरे करते
[३० पानांवरील चित्र]
प्रशंसेमुळे उत्तेजन मिळत असले तरी आपल्याला जेव्हा सल्ला दिला जातो तेव्हा आपण तो आनंदाने स्वीकारला पाहिजे
[३१ पानांवरील चित्र]
प्रेमळ पालक आपल्या मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणार नाही