“तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या”
“तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्तय १०:८) सुवार्तेचा प्रचार करण्यास पाठवण्याआधी येशूने आपल्या प्रेषितांना ही सूचना दिली. प्रेषितांनी या सूचनेचे पालन केले का? होय, येशू पृथ्वीवरून निघून गेल्यावरही ते त्याच्या सूचनेचे पालन करीत राहिले.
उदाहरणार्थ, पूर्वी जादूगार असलेल्या शिमोनने, प्रेषित पेत्र आणि योहान यांच्याकडे असलेली चमत्कारिक शक्ती पाहिली तेव्हा त्याने पैसे देऊन ती शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. पण पेत्राने त्याला खडसावून म्हटले: “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवावयाचा तू विचार केलास.”—प्रेषितांची कृत्ये ८:१८-२०.
प्रेषित पौलाने पेत्रासारखीच मनोवृत्ती दर्शवली. पौल करिंथमधील आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींवर अवलंबून राहू शकला असता. पण, स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने काम केले. (प्रेषितांची कृत्ये १८:१-३) म्हणूनच तो पूर्ण खात्रीने असे म्हणू शकला, की त्याने करिंथकरांना सुवार्तेचा प्रचार “फुकट” केला.—१ करिंथकर ४:१२; ९:१८.
पण दुःखाची गोष्ट अशी आहे की, ख्रिस्ताचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्या अनेकांनी ‘फुकट देण्याची’ तीच इच्छा दाखवलेली नाही. ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक धर्म पुढारी “वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात.” (मीखा ३:११) काही धार्मिक नेते तर, आपल्या कळपाकडून गोळा केलेल्या पैशाने श्रीमंत झाले आहेत. १९८९ साली, अमेरिकेतील एका सुवार्तिकाला ४५ वर्षांची कैद झाली. का? कारण त्याने, “आपल्या समर्थकांचे लाखो डॉलर लुटले होते आणि या पैशाने त्याने घरे, मोटारगाड्या विकत घेतल्या होत्या, देशोदेशी प्रवास करण्यासाठी ते पैसे खर्च केले होते, इतकेच नव्हे तर आपल्या कुत्र्यासाठी एक वातानुकुलित घर देखील बनवले होते.”—पीपल्स डेली ग्राफिक, ऑक्टोबर ७, १९८९.
मार्च ३१, १९९० च्या घानेयन टाईम्सनुसार, घानात, एका रोमन कॅथलिक पाळकाने एका चर्च सेवेनंतर गोळा करण्यात आलेले पैसे पुन्हा श्रोत्यांवर भिरकावून दिले. “कारण, प्रौढ या नात्याने त्यांच्याकडून यापेक्षा अधिक देणगी देण्याची अपेक्षा होती” असे बातमीपत्र म्हणते. अनेक चर्चेस, आपल्या सदस्यांना लोभी होण्याचे प्रोत्साहन देतात; पैसे कमावण्यासाठी जुगाराला व इतर योजनांना सक्रियतेने उत्तेजन देतात.
याच्या उलट, यहोवाचे साक्षीदार येशूचे आणि त्याच्या आरंभीच्या शिष्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यात पगार दिले जाणारे पाळक नाहीत. प्रत्येक साक्षीदार एक सेवक आहे ज्याला ‘राज्याची सुवार्ता’ इतरांना सांगण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (मत्तय २४:१४) असे ६० लाखांपेक्षा अधिक सेवक, लोकांना “जीवनाचे पाणी” फुकट देण्याच्या कामात लागलेले आहेत. (प्रकटीकरण २२:१७) यामुळे, “पैका नसलेले” देखील बायबलच्या संदेशातून लाभ मिळवू शकतात. (यशया ५५:१) संपूर्ण जगभरात चाललेले यांचे कार्य पूर्णतः ऐच्छिक अनुदानांवर चालत असले तरी ते पैशासाठी विनवणी करत नाहीत. देवाचे खरे सेवक या नात्याने ते ‘देवाच्या वचनाचे विक्रेते’ नाहीत तर “सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे” बोलतात.—२ करिंथकर २:१७, NW.
पण यहोवाचे साक्षीदार इतरांना मदत करण्यास इच्छुक का आहेत आणि तेही स्वखर्चाने? त्यांना ही प्रेरणा कोठून मिळते? फुकट देण्याचा अर्थ असा होतो, का की ते त्यांच्या प्रयत्नांसाठी कसल्याही प्रतिफळाची अपेक्षा करीत नाहीत?
सैतानाच्या आव्हानाला उत्तर
खरे ख्रिस्ती आज प्रामुख्याने, श्रीमंत होण्याच्या नव्हे तर यहोवाला संतुष्ट करण्याच्या इच्छेमुळे फुकट देण्यास प्रेरित होतात. अशाप्रकारे ते दियाबल सैतानाने अनेक शतकांआधी केलेल्या एका आव्हानाला उत्तर पुरवू शकतात. ईयोब नावाच्या एका धार्मिक मनुष्याच्या बाबतीत, सैतानाने यहोवाला असा प्रश्न विचारून आव्हान केले होते: “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो?” सैतानाने असा आरोप केला, की देवाने ईयोबाभोवती सुरक्षा कुंपण घातले होते म्हणूनच ईयोब देवाची सेवा करत होता. सैतानाने असा वाद केला, की जर ईयोबाकडून त्याची सर्व संपत्ती हिरावून घेतली तर तो देवाच्या तोंडावर त्याला नाकारेल!—ईयोब १:७-११.
या आव्हानाला उत्तर देण्याकरता, देवाने सैतानाला ईयोबाची परीक्षा घेण्यास अनुमती दिली; देवाने सैतानाला म्हटले: “त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो.” (ईयोब १:१२) याचा परिणाम काय झाला? सैतान लबाड आहे हे ईयोबाने शाबीत करून दाखवले. ईयोबावर वाटेल ती संकटे आली, पण ईयोब मात्र एकनिष्ठ राहिला. “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही,” असे तो म्हणाला.—ईयोब २७:५, ६.
खरे उपासक आज ईयोबासारखीच मनोवृत्ती दाखवतात. ते भौतिक लाभासाठी देवाची सेवा करत नाहीत.
देवाच्या अपात्र कृपेची मोफत देणगी
खरे ख्रिस्ती आणखी एका कारणासाठी ‘फुकट देण्यास’ इच्छुक असतात; ते कारण म्हणजे, त्यांना स्वतःला देवाकडून “फुकट मिळाले” आहे. मानवजात, आपला पूर्वज आदाम याच्या पापामुळे पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वात आहे. (रोमकर ५:१२) यहोवाने प्रेमळपणे आपल्या पुत्राला, बलिदानरूपी मृत्यू येण्याची व्यवस्था केली; या व्यवस्थेमुळे देवाला मोठी किंमत मोजावी लागली. मानवजात ही व्यवस्था मिळवण्यास पात्र नाही. पण, ही व्यवस्था देवाकडून एक देणगी आहे.—रोमकर ४:४; ५:८; ६:२३.
रोमकर ३:२३, २४ मध्ये नमूद केल्यानुसार पौलाने अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिले: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.” तसेच पृथ्वीवर सदासर्वकाळ जिवंत राहण्याची आशा असलेले ही “विनामूल्य” देणगी प्राप्त करतात. या देणगीत, यहोवाचे मित्र या नात्याने धार्मिक घोषित होण्याचा बहुमान समाविष्ट आहे.—याकोब २:२३; प्रकटीकरण ७:१४.
ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानामुळे सर्व ख्रिश्चनांना देवाचे सेवक म्हणून सेवा करणे देखील शक्य होते. प्रेषित पौलाने लिहिले: “देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेणेकरून मी त्या [पवित्र रहस्याचा] सेवक झालो आहे.” (इफिसकर ३:४-७) देवाच्या खऱ्या सेवकांना देणगीच्या द्वारे या सेवेसाठी पाचारण करण्यात आले; ही देणगी मिळवण्यास ते पात्र नव्हते किंवा ती ते कमावू शकत नव्हते त्यामुळे या देणगीची सुवार्ता सांगण्यासाठी पगार मिळण्याची अपेक्षा ते करू शकत नव्हते.
सार्वकालिक जीवनाची अपेक्षा—स्वार्थीपणा आहे का?
याचा अर्थ असा होतो का, की ख्रिश्चनांनी कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता देवाची सेवा करावी अशी तो अपेक्षा करतो? नाही; कारण प्रेषित पौलाने आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींना लिहिले: “तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) शिवाय, यहोवा अन्यायी देखील नाही. (अनुवाद ३२:४) उलट “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) पण सार्वकालिक जीवनाची अपेक्षा करणे म्हणजे स्वार्थीपणा नाही का?—लूक २३:४३.
मुळीच नाही. याचे एक कारण म्हणजे, परादीस पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची इच्छा ही देवानेच दिलेली आहे. त्यानेच पहिल्या मानवी दांपत्याला सदासर्वकाळ जगण्याची आशा दिली होती. (उत्पत्ति १:२८; २:१५-१७) मग आदाम आणि हव्वेने आपल्या संततीसाठी ही आशा गमावली तेव्हा देवाने ही आशा पुन्हा देण्याची व्यवस्था देखील केली. म्हणूनच तो आपल्या वचनात असे वचन देतो: “सृष्टीहि स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.” (रोमकर ८:२१) त्यामुळे आज ख्रिश्चनांनी, प्राचीन काळच्या मोशेप्रमाणे “प्रतिफळावर” दृष्टी ठेवणे पूर्णपणे उचित आहे. (इब्री लोकांस ११:२६) देव हे बक्षीस लाच म्हणून देत नाही. तर जे त्याची सेवा करतात त्यांच्यावर खरे प्रेम असल्यामुळे तो त्यांना हे बक्षीस देतो. (२ थेस्सलनीकाकर २:१६, १७) यास्तव, “पहिल्याने त्याने आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.”—१ योहान ४:१९.
देवाची सेवा करण्यामागचा योग्य हेतू
तरीपण, ख्रिश्चनांनी आज, देवाची सेवा करण्यामागच्या त्यांच्या हेतूंचे सतत परीक्षण केले पाहिजे. योहान ६:१०-१३ मध्ये आपण वाचतो, की येशूने चमत्कार करून पाच हजार पेक्षा अधिक लोकसमूहाला जेवू घातले. कालांतराने, काही लोक येशूच्या मागे फक्त स्वार्थी कारणांसाठीच येऊ लागले. येशूने त्यांना सांगितले, की तुम्ही “भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता.” (योहान ६:२६) काही दशकांनंतर, काही समर्पित ख्रिश्चनांनी देखील देवाची सेवा ‘शुद्ध भावाने केली नाही.’ (फिलिप्पैकर १:१७, पं.र.भा.) “येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती, . . . मान्य” न करणाऱ्या काहींनी तर ख्रिश्चनांबरोबरच्या संगतीतून कमाई करण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला.—१ तीमथ्य ६:३-५.
आज, परादीस पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची इच्छा बाळगणारी ख्रिस्ती व्यक्तीसुद्धा मनात स्वार्थी हेतू बाळगून देवाची सेवा करेल. कालांतराने मात्र अशी व्यक्ती आध्यात्मिकरित्या अपयशी ठरेल. सैतानाचे व्यवस्थीकरण अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त काळ टिकले असल्यामुळे, अंत येण्यास अजून अवकाश आहे असा विचार करून ही व्यक्ती ‘खचून जाईल.’ (गलतीकर ६:९) तिने केलेल्या भौतिक त्यागांबद्दलही तिला कदाचित पस्तावा वाटू लागेल. येशू आपल्याला आठवण करून देतो: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति” केली पाहिजे. (मत्तय २२:३७) होय, जी व्यक्ती प्रेमापोटी देवाची सेवा करते ती विशिष्ट काळापर्यंत देवाची सेवा करण्याचा विचार करत नाही. तिने यहोवाची सदासर्वदा सेवा करण्याचे ठरवलेले असते! (मीखा ४:५) देवाच्या सेवेसाठी केलेल्या त्यागांचा तिला पस्तावा होत नाही. (इब्री लोकांस १३:१५, १६) देवाबद्दलचे प्रेम तिला, देवाच्या इच्छेला आपल्या जीवनात प्राधान्य देण्यास प्रवृत्त करते.—मत्तय ६:३३.
आज, ६० लाखांहून अधिक खरे उपासक यहोवाची सेवा करण्यासाठी “संतोषाने पुढे होतात.” (स्तोत्र ११०:३) तुम्ही यांपैकी एक आहात का? नसल्यास, देव ज्या गोष्टी देऊ करत आहे त्यांवर अंमळ विचार करा: सत्याचे शुद्ध ज्ञान; (योहान १७:३) खोट्या धार्मिक शिकवणुकींपासून सुटका; (योहान ८:३२) सार्वकालिक जीवनाची आशा. (प्रकटीकरण २१:४) या सर्व गोष्टी तुम्ही देवाकडून फुकट कशा मिळवू शकता ते शिकून घेण्यास तुम्हाला मदत करायला यहोवाचे साक्षीदार तयार आहेत.
[२२ पानांवरील संक्षिप्त आशय]
खरे ख्रिस्ती आज प्रामुख्याने, स्वतःला श्रीमंत करण्याच्या नव्हे तर यहोवाला संतुष्ट करण्याच्या इच्छेमुळे फुकट देण्यास प्रेरित होतात
[२१ पानांवरील चित्र]
देवाने दिलेली खंडणीची मोफत देणगी ख्रिश्चनांनाही इतरांना सुवार्ता फुकट सांगण्यास प्रेरित करते