वाचकांचे प्रश्न
विविध बायबल भाषांतरांमध्ये स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील वचनांच्या क्रमांकांत फरक का आहे?
सन १५५३ मध्ये रॉबर्ट एस्टीनने प्रकाशित केलेल्या संपूर्ण बायबलच्या एका फ्रेंच भाषांतरात सर्वात पहिल्यांदा अध्याय आणि वचने अशी विभागणी केली होती. परंतु, त्याही आधीपासून स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील अध्याय व वचने ही वेगवेगळी होती कारण हे, अनेक लोकांनी रचलेल्या अनेक स्तोत्रांचे किंवा गीतांचे संकलन आहे.
हे स्पष्ट आहे, की यहोवाने सार्वजनिक उपासनेत वापरता येईल म्हणून स्तोत्रांचा एक संग्रह करण्यास पहिल्यांदा दाविदाला सांगितले. (१ इतिहास १५:१६-२४) असे मानले जाते, की याजक व “पारंगत शास्त्री” असलेला एज्रा, स्तोत्रसंहिता या पुस्तकाचे सध्या असलेल्या रूपात संकलन करण्यास जबाबदार होता. (एज्रा ७:६) याचा अर्थ, एकेका स्तोत्राचे संकलन करून स्तोत्रसंहितेचे पुस्तक तयार करण्यात आले.
आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्यादरम्यान ॲन्टियोक (पिसिडिया) येथील एका सभास्थानात प्रेषित पौलाने दिलेल्या एका भाषणात त्याने स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातला एक उतारा उद्धृत केला व म्हटले: “स्तोत्र दुसरे ह्यांतहि असे लिहिले आहे की, ‘तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे.’” (प्रेषितांची कृत्ये १३:३३) आज बायबलमध्ये हे शब्द स्तोत्राच्या दुसऱ्या अध्यायाच्या ७ व्या वचनात अजूनही आहेत. परंतु, विविध बायबल भाषांतरांमध्ये स्तोत्रसंहितेच्या अनेक वचनांच्या क्रमांकात फरक आहे. कारण, काही भाषांतरे इब्री मॅसोरेटिक लिखाणावर तर इतर, सा.यु.पू. दुसऱ्या शतकात पूर्ण झालेल्या इब्री लिखाणाचे भाषांतर अर्थात ग्रीक सेप्ट्यूएजिंट यावर आधारित आहेत. उदाहरणार्थ, अनेक कॅथलिक बायबलचे भाषांतर ज्यातून करण्यात आले आहे ते लॅटिन व्हल्गेट यामध्ये सेप्ट्यूएजिंटप्रमाणे स्तोत्रांना क्रमांक देण्यात आले आहेत; तर, नवे जग भाषांतर (इंग्रजी) आणि इतर भाषांतरांमध्ये इब्री मॅसोरेटिक लिखाणानुसार क्रमांक देण्यात आले आहेत.
यांत नेमका काय फरक आहे? इब्री लिखाणात एकूण १५० स्तोत्रे आहेत. परंतु, सेप्ट्यूएजिंटमध्ये स्तोत्रसंहिता ९ आणि १० तसेच स्तोत्रसंहिता ११४ आणि ११५ यांना एकत्र करण्यात आले आहे. शिवाय, स्तोत्रसंहिता ११६ आणि १४७ यांना प्रत्येकी दोन स्तोत्रांत विभागण्यात आले आहे. स्तोत्रांची एकूण संख्या ही तितकीच असली तरी, सेप्ट्यूएजिंटमध्ये स्तोत्र १० पासून स्तोत्र १४६ पर्यंतचा क्रमांक इब्री लिखाणापेक्षा एका क्रमांकाने कमी आहे. त्यामुळे, २३ वे स्तोत्र डुए व्हर्जनमध्ये २२ वे स्तोत्र आहे; डुए व्हर्जन, लॅटिन व्हल्गेटनुसार आहे आणि लॅटिन व्हल्गेट, सेप्ट्यूएजिंटनुसार आहे.
शिवाय, अनेक भाषांतरांमध्ये काही स्तोत्रांतील वचनांच्या क्रमांकांत देखील फरक आहे. असे का? कारण काही भाषांतरे, “उपरिलेखनाला पहिले वचन मानण्याची यहुदी प्रथा अनुसरतात,” असे मॅक्लिनटॉक आणि स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ म्हणतो; परंतु इतर भाषांतरांच्या बाबतीत असे नाही. खरे तर, शीर्षक अथवा उपरिलेखन लांब असेल तर त्यांना बहुतेकदा दोन वचने असे गणले जाते आणि त्यानुसार मग स्तोत्रातील वचनांचे क्रमांक वाढतात.