वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w01 ७/१५ पृ. २१-२३
  • तुम्ही खरोखरच सहनशील आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही खरोखरच सहनशील आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवा तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो’
  • संतुलनाची आवश्‍यकता
  • एकमेकांचे सहन करा
  • “सौम्यतेने व भीडस्तपणाने”
  • देव किती सहनशील आहे?
    सावध राहा!—२००२
  • सहनशील असणं म्हणजे नेमकं काय?
    सावध राहा!—२०१५
  • लवचिक, तरीही ईश्‍वरी दर्जांना बांधील
    सावध राहा!—१९९७
  • सहिष्णुता एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
w01 ७/१५ पृ. २१-२३

तुम्ही खरोखरच सहनशील आहात का?

एखाद्याचे अनुचित वर्तन पाहून कधी तुमच्या अंगाच्या लाह्‍या लाह्‍या झाल्या आहेत का? तुमच्या जवळच्या मित्रांवर वाईट प्रभाव होऊ लागतात तेव्हा तुम्ही लगेच पाऊल उचलता का?

गंभीर पापाचा फैलाव रोखण्यासाठी काही वेळा तत्काळ व कडक पावले उचलावी लागतात. उदाहरणार्थ, सा.यु.पू. १५ व्या शतकात इस्राएली लोकांच्या कोडगेपणामुळे त्यांच्यामध्ये अशुद्धता पसरण्याचा धोका होता तेव्हा अहरोनाचा नातू फीनहास याने वाईटाचा समूळ नाश करण्याकरता निर्णायक पावले उचलली. फीनहासने केलेल्या कार्याला यहोवा देवाची मान्यता होती हे आपल्याला यहोवाच्या शब्दांवरून कळते. यहोवाने म्हटले: “फीनहास ह्‍याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही.”—गणना २५:१-११.

अशुद्धतेचा हा फैलाव रोखण्यासाठी फीनहासने उचित पाऊल उचलले होते. पण मानवी स्वभावामुळे घडणाऱ्‍या चुकांबद्दल इतरांवर एकदम संताप व्यक्‍त करण्याविषयी काय? आपण अविचारीपणाने किंवा विनाकारण राग व्यक्‍त केला तर धार्मिकतेचे समर्थक होण्याऐवजी आपण असहिष्णू व्यक्‍ती होऊ, अर्थात, अपरिपूर्णतेमुळे इतरांकडून घडणाऱ्‍या चुका देखील विचारात न घेणारे बनू. हा धोका आपण कसा टाळू शकतो?

‘यहोवा तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो’

यहोवा “ईर्ष्यावान [आवेशी] देव आहे; तो प्रतिस्पर्धी सहन करत नाही.” (निर्गम २०:५; NW तळटीप) तो आपला निर्माणकर्ता असल्यामुळे, आपल्याकडून अनन्य भक्‍तीची मागणी करण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. (प्रकटीकरण ४:११) तरीसुद्धा, मानवांच्या चुका तो सहन करतो. म्हणूनच तर स्तोत्रकर्त्या दाविदाने असे गायिले: “परमेश्‍वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; . . . आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही.” होय, आपण जर पश्‍चात्ताप केला तर यहोवा आपल्या ‘सर्व दुष्कर्मांची क्षमा करेल.’—स्तोत्र १०३:३, ८-१०.

यहोवाला मानवांचा पापी स्वभाव माहीत असल्यामुळे तो पश्‍चात्तापी लोकांना ‘सर्वदाच दोष देत राहत नाही.’ (स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२) खरे तर, पाप आणि अपरिपूर्णतेचे उच्चाटन करण्याचा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे हा त्याचा उद्देश जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत, “आपल्या दुष्कृत्यांच्या मानाने” तो आपल्याला भोगू न देता येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर दयाळुपणे आपल्याला क्षमा करतो. उचित प्रसंगी आपल्याला यहोवाने दया दाखवली नसती तर आपल्यापैकी कोणीही बचावास पात्र ठरले नसते. (स्तोत्र १३०:३) त्यामुळे अनन्य भक्‍तीची योग्यपणे मागणी करणारा आपला स्वर्गीय देव सहनशील देव आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ असावे!

संतुलनाची आवश्‍यकता

मग, विश्‍वाचा सार्वभौम प्रभू जर अपरिपूर्ण मानवांबरोबर सहनशीलतेने वागतो तर आपणही तसेच करू नये का? सहनशीलतेची व्याख्या, “इतरांच्या मतांबद्दल किंवा वागणुकीबद्दल सोशिकपणा दाखवण्याची मनोवृत्ती” अशाप्रकारे करण्यात आली आहे. आपली मनोवृत्ती अशी आहे का? काही वेळा इतरांच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून घोर पाप होत नसेल परंतु त्यांचे वागणे किंवा बोलणे चुकीचे असेल. अशा वेळी, सहनशीलता आणि संयम दाखवण्याची वृत्ती आपल्यात आहे का?

अर्थात, आपण अतिसहनशील देखील होऊ नये. उदाहरणार्थ, लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार करत राहणाऱ्‍या पाळकांना धार्मिक अधिकारी सहन करतात तेव्हा खूप मोठी हानी होते. आयर्लंडमधील एका पत्रकाराने म्हटले की, “या मुलांच्या बाबतीत जे काही घडले ते त्या विशिष्ट घटकेला पापाच्या मोहाला बळी पडल्यामुळे घडले असे मानून चर्च अधिकाऱ्‍यांनी अपराध करणाऱ्‍या पाळकांची फक्‍त [दुसऱ्‍या ठिकाणी] बदली केली.”

अशा पापी व्यक्‍तीची फक्‍त बदली करणे हे योग्यप्रकारच्या सहनशीलतेचे उदाहरण आहे का? मुळीच नाही. समजा, एखाद्या बेजबाबदार सर्जनच्या उपचारामुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत किंवा रुग्ण अपंग होत आहेत आणि वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी फक्‍त दुसऱ्‍या ठिकाणी त्याची बदली करून त्याला उपचार देत राहण्याची मुभा दिली तर चालेल का? अशाप्रकारची “सहनशीलता,” व्यवसायातल्या सोबत्यांप्रती एकनिष्ठतेच्या चुकीच्या भावनेमुळे दाखवली जाते. हलगर्जीपणामुळे अथवा अपराधी वागणुकीमुळे जीव गमावलेल्या किंवा नुकसान झालेल्या रुग्णांचे काय?

आता दुसरी टोकाची भूमिका म्हणजे अजिबातच सहनशील नसणे. येशू पृथ्वीवर होता तेव्हा काही झिलॉट यहुद्यांनी आपल्या वर्तणुकीचे समर्थन करण्यासाठी फीनहासच्या उदाहरणाचे चुकीने अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. काही झिलॉट अति करायचे. सणादरम्यान किंवा अशाच प्रसंगी जेरूसलेममध्ये जमलेल्या लोकांच्या समूहात शिरून ते आपल्या शत्रूंना नकळत खंजीराने भोसकायचे.”

आपण ख्रिस्ती या नात्याने, आपल्याला न आवडणाऱ्‍या लोकांवर झिलॉटांप्रमाणे हल्ला करणार नाही. पण, काही प्रमाणात असहिष्णु असल्यामुळे इतर प्रकारे म्हणजे कदाचित त्यांच्याविषयी वाईट बोलण्याद्वारे आपण त्यांच्यावर हल्ला करतो का? आपण खरोखरच सहनशील असू तर केव्हाही कोणाविषयी वाईट बोलणार नाही.

असहिष्णुतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे पहिल्या शतकातले परूशी लोक. ते नेहमी इतरांची निंदा करायचे आणि लोकांची अपरिपूर्णता कधी विचारात घ्यायचे नाहीत. हे गर्विष्ठ परूशी नेहमी सामान्य लोकांना तुच्छ लेखायचे, त्यांना “शापित” म्हणायचे. (योहान ७:४९) म्हणूनच तर येशूने, स्वतःला धार्मिक समजणाऱ्‍या या परूश्‍यांना खडसावून म्हटले: “अहो, शास्त्र्यांनो, अहो परूश्‍यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्‍यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत; ह्‍या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही.”—मत्तय २३:२३.

येशूच्या या बोलण्यावरून तो मोशेच्या नियमशात्राचे महत्त्व कमी करत होता असे नाही. तर तो लोकांना हे दाखवू इच्छित होता, की नियमशात्रातील “मुख्य” किंवा अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींचे, समंजसपणा व दया या गुणांसहित पालन करणे गरजेचे होते. आणि याबाबतीत येशू आणि त्याचे शिष्य जराही सहनशील नसलेल्या परूशी व झिलॉटांपेक्षा किती वेगळे होते!

यहोवा देव किंवा येशू ख्रिस्तही दुष्टाईकडे दुर्लक्ष करीत नाहीत. ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा फार लवकर सूड’ घेतला जाणार आहे. (२ थेस्सलनीकाकर १:६-१०) येशूला धार्मिकतेबद्दल आवेश आहे खरा पण तो आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे सात्विक मार्गाने चालण्याची इच्छा असणाऱ्‍या लोकांना सहनशीलता, करुणा आणि प्रेमळ दया दाखवायला विसरत नाही. (यशया ४२:१-३; मत्तय ११:२८-३०; १२:१८-२१) खरेच किती उत्तम उदाहरण आहे येशूचे आपल्यापुढे!

एकमेकांचे सहन करा

सत्याचे समर्थन करण्याच्या बाबतीत आपण फार आवेशी असलो तरी प्रेषित पौलाचा सल्ला आपण लागू करू या: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सैकर ३:१३; मत्तय ६:१४, १५) सहनशील असणे म्हणजे या अपरिपूर्ण जगात इतरांच्या उणीवा आणि चुका सहन करणे. इतरांकडून आपण अवाजवी अपेक्षा करू नये.—फिलिप्पैकर ४:५.

सहनशील असण्याचा अर्थ, इतरांच्या चुकांना संमती देणे किंवा त्यांकडे डोळेझाक करणे असा मुळीच होत नाही. काही बंधूभगिनींचे विचार किंवा आचरण काहीसे यहोवाच्या दर्जांविरुद्ध असेल. पण यहोवाकडून झिडकारले जाण्याइतके ते गंभीर नसेल; तरीही त्यावरून सुधारणूक करण्याची गरज आहे असा इशारा मिळतो. (उत्पत्ति ४:६, ७) अशा वेळी, मंडळीतील आध्यात्मिक पात्रता असलेले वडील, चुका करणाऱ्‍या बंधूभगिनींची “सौम्य वृत्तीने” सुधारणूक करण्याचा प्रयत्न करतात हे प्रेमळपणाचे नाही का? (गलतीकर ६:१) परंतु वडिलांनी हा प्रयत्न, बंधूभगिनींची टीका करण्याच्या नव्हे तर त्यांच्याबद्दल काळजी व्यक्‍त करण्याच्या भावनेने करणे आवश्‍यक आहे; तेव्हाच त्याचा फायदा होईल.

“सौम्यतेने व भीडस्तपणाने”

पण ज्या लोकांची धार्मिक मते आपल्यापेक्षा वेगळी असतात अशा लोकांच्या बाबतीतही सहनशीलता दाखवणे उचित आहे का? आयर्लंडमध्ये १८३१ साली सर्व राष्ट्रीय शाळांमध्ये हा “सामान्य धडा” चिकटवण्यात आला: “लोकांना धाक दाखवून त्यांच्यावर आपला धर्म लादायचा हा येशू ख्रिस्ताचा हेतू नव्हता. . . . आपल्या शेजाऱ्‍यांना, आपले बरोबर आहे आणि त्यांचे चूक आहे हे पटवून देण्यासाठी त्यांच्याशी भांडणे किंवा त्यांची निंदानालस्ती करणे हा योग्य मार्ग नव्हे. उलट आपल्यामध्ये ख्रिस्ती आत्मा नाही अशीच त्यांची खात्री पटेल.”

येशूच्या शिकवणींमुळे व आचरणामुळे लोक देवाच्या वचनाकडे आकर्षित झाले. आपणही येशूप्रमाणे व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. (मार्क ६:३४; लूक ४:२२, ३२; १ पेत्र २:२१) येशू हा देवाकडून सूक्ष्मदृष्टी मिळालेला परिपूर्ण मनुष्य असल्यामुळे लोकांच्या अंतःकरणात काय चालले आहे हे तो पाहू शकत होता. म्हणूनच, जेव्हा आवश्‍यकता पडली तेव्हा त्याने यहोवाच्या शत्रूंना चांगलेच खडसावले. (मत्तय २३:१३-३३) हे त्याने असहिष्णुतेमुळे केले असे म्हणता येणार नाही.

आपण येशूप्रमाणे लोकांच्या अंतःकरणात काय चालले आहे हे पाहू शकत नाही. त्यामुळे प्रेषित पेत्राने दिलेला सल्ला आपण लागू केला पाहिजे. तो म्हणतो: “ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणांत पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) यहोवाचे सेवक या नात्याने आपण आपल्या विश्‍वासाचे समर्थन केले पाहिजे. कारण आपण जो काही विश्‍वास करतो तो पूर्णपणे देवाच्या वचनावर आधारित आहे. हे आपण इतरांबद्दल आणि त्यांच्या धार्मिक भावनांबद्दल आदर दाखवून केले पाहिजे. पौलाने लिहिले: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे; म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.”—कलस्सैकर ४:६.

येशूने आपल्या डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचनात म्हटले होते: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) तेव्हा आपण सर्वांच्या अपरिपूर्णता सहन करू या आणि ज्यांना सुवार्तेचा प्रचार करतो त्यांना आदर दाखवू या. आपण धार्मिकतेबद्दलचा आवेश, बायबल आधारित सहनशीलतेसह दाखवू या. यामुळे यहोवा संतुष्ट होईल व आपण खऱ्‍या अर्थाने सहनशील होऊ.

[२३ पानांवरील चित्र]

परूश्‍यांप्रमाणे असहिष्णु मनोवृत्ती बाळगू नका

[२३ पानांवरील चित्र]

येशूने आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे सहनशील मनोवृत्ती दाखवली. तुम्हीही दाखवता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा