तुम्ही पैशांबद्दल संतुलित दृष्टिकोन कसा राखू शकता?
पैशांबद्दल प्रेम आणि भौतिक वस्तू प्राप्त करण्याची इच्छा काही नवीन नाही; बायबलमध्येही याविषयी बरेच काही सांगितले आहे कारण पूर्वीच्या काळी देखील लोकांमध्ये ही मनोवृत्ती दिसून येत होती. नियमशास्त्रात देवाने इस्राएलांना अशी सूचना दिली: “आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको . . . त्याची कोणतीहि वस्तु ह्यांचा लोभ धरू नको.”—निर्गम २०:१७.
येशूच्या दिवसांमध्येही लोक पैशाच्या व भौतिक वस्तूंच्या मागे होते. एक “फार श्रीमंत” तरुण आणि येशू यांच्यात झालेल्या संभाषणाचा हा वृत्तान्त पाहा. “येशूने त्याला म्हटले, ‘अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.’ पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता.”—लूक १८:१८-२३.
पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन
परंतु, बायबलनुसार पैसा प्राप्त करणे चुकीचे आहे किंवा आवश्यक गोष्टींसाठी पैशाचा वापर करणे चुकीचे आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. कारण बायबल दाखवते की, पैसा, गरिबीपासून आणि त्यासोबत येणाऱ्या समस्यांपासून लोकांचे रक्षण करतो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. राजा शलमोनाने लिहिले: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे.” आणि त्याने असेही म्हटले: “ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करितात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्व काही साध्य होते.”—उपदेशक ७:१२; १०:१९.
पैशांचा उचित वापर करण्याला देवाची संमती आहे. उदाहरणार्थ, येशूने म्हटले: “अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा.” (लूक १६:९) यामध्ये, देवाच्या खऱ्या उपासनेला बढावा देण्यासाठी अनुदान देणे समाविष्ट आहे कारण देव आपला मित्र व्हावा असे आपल्याला निश्चितच वाटते. खुद्द शलमोनाने आपल्या पित्याचे अर्थात दावीदाचे अनुकरण करून यहोवाचे मंदिर बांधण्यासाठी भरपूर पैसा आणि मौल्यवान वस्तू दान केल्या. गरजवंतांना आर्थिकरित्या साहाय्य करणे ही आणखी एक ख्रिस्ती आज्ञा आहे. प्रेषित पौल म्हणाला: “पवित्र जनांच्या गरजा भागवा.” तो असेही म्हणाला: “आतिथ्य करण्यात तत्पर असा.” (रोमकर १२:१३) यासाठी सहसा पैसा खर्च करावाच लागतो. परंतु, पैशाचा लोभ असण्याविषयी काय?
‘चांदीचा छंद’
आपल्यापेक्षा वयाने लहान असणारा ख्रिस्ती सहकर्मी तीमथ्य, याला पत्र लिहिताना पौलाने “द्रव्याचा लोभ” किंवा शब्दशः, ‘चांदीचा छंद’ याविषयी पुष्कळ चर्चा केली. पौलाचा सल्ला १ तीमथ्य ६:६-१९ मध्ये सापडतो. हर तऱ्हेच्या भौतिक वस्तूंविषयी चर्चा करताना त्याने “द्रव्याचा लोभ” हा उल्लेख केला. आजचा समाज पैशावर फार जोर देत असल्यामुळे पौलाच्या प्रेरित शब्दांचा आपण नीट अभ्यास करू या. हे परीक्षण अत्यंत फायद्याचे ठरू शकते कारण ‘खरे जीवन बळकट धरण्यास’ काय केले जावे याचे रहस्य आपल्याला कळेल.
पौल इशारा देतो: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:१०) या वचनात किंवा इतर कोणत्याही वचनात असे म्हटलेले नाही की, पैसा वाईट आहे. किंवा प्रेषित पौलाने असेही म्हटले नाही, की पैसा सर्व “वाईटाचे” एकमेव मूळ आहे किंवा प्रत्येक समस्येचे तेच कारण आहे. तर, पैशाचा किंवा द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या “वाईटाचे” एकमेव कारण नसले तरी एक कारण बनू शकते.
लोभापासून सावधान
शास्त्रवचनांमध्ये पैसा मुळात चूक आहे असे म्हटलेले नाही म्हणून पौलाने दिलेली सूचना इतकी काही गंभीर नाही असा विचार आपण करता कामा नये. पैशाचा नाद लागलेले ख्रिस्ती कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सहजासहजी बळी पडू शकतात. विश्वासापासून बहकणे हा सर्वात मोठा धोका असू शकतो. पौलाने कलस्सैमधील ख्रिश्चनांना जे म्हटले त्यामुळे या सत्याला पुष्टी मिळते; तो म्हणाला: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे . . . कुवासना व लोभ—ह्याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.” (कलस्सैकर ३:५) कुवासना, लोभ किंवा “द्रव्याचा लोभ” यांना मूर्तिपूजा कशी म्हणता येईल? याचा अर्थ, आणखी मोठे घर, नवीन कार किंवा जास्त पगाराची नोकरी मिळण्याची इच्छा धरणे चुकीचे आहे का? नाही, या गोष्टी मुळात वाईट नाहीत. पण प्रश्न हा आहे की, एखाद्या व्यक्तीला या गोष्टी प्राप्त करण्याची गरज का वाटते, आणि त्या खरोखर आवश्यक आहेत का?
सर्वसाधारण इच्छा असणे आणि लोभ असणे यांच्यातल्या असमानतेची तुलना स्वयंपाकासाठी पेटवलेली लहानशी आग आणि जंगलाला गिळंकृत करणारा वणवा यांच्याशी केली जाऊ शकते. योग्य प्रकारची इच्छा धरणे फायदेकारक असू शकते. त्यामुळे आपल्याला काम करण्यास व फलदायी असण्यास प्रेरणा मिळते. नीतिसूत्रे १६:२६ म्हणते: “मजुराची क्षुधा त्याच्या हातून मजुरी करविते, कारण त्याचे तोंड त्याला ती करावयास लाविते.” परंतु लोभ घातक आणि नाशकारक आहे. लोभ ही अनियंत्रित वासना आहे.
नियंत्रण ठेवणे हीच मोठी समस्या आहे. आपला पैसा किंवा भौतिक वस्तू आपल्या गुलाम असाव्यात की आपण त्यांचे गुलाम असावे? म्हणूनच पौल म्हणतो की, “लोभी, हा मूर्तिपूजक आहे.” (इफिसकर ५:५) कोणत्याही गोष्टीचा लोभ धरणे म्हणजे तिच्या स्वाधीन होणे—अशाप्रकारे ती गोष्ट आपला धनी, आपला देव बनते आणि आपण तिचे गुलाम बनतो. याच्या उलट देव असे आर्जवतो: “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.”—निर्गम २०:३.
लोभी असण्याचा असा अर्थ देखील होतो की, आपल्या गरजा पुरवण्यासंबंधी देवाने आपल्याला दिलेल्या वचनावर आपला भरवसा नाही. (मत्तय ६:३३) त्यामुळे, लोभ धरणे देवाकडे पाठ फिरवण्यासारखे आहे. या अर्थाने देखील ती “मूर्तिपूजा” आहे. म्हणूनच पौल इतक्या स्पष्टपणे आपल्याला त्यापासून सावध राहायला ताकीद देतो!
येशूने देखील लोभीपणाविषयी एक स्पष्ट सूचना दिली. आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीची इच्छा आपण धरू नये अशी आज्ञा त्याने दिली: “आणखी त्याने त्यांना म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) या उताऱ्यावरून आणि त्याने यानंतर दिलेल्या उदाहरणावरून दिसून येते की, आपल्याजवळ जे काही आहे तेच जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे या मूर्खपणाच्या कल्पनेवर लोभ आधारलेला आहे. मग ही संपत्ती पैशांच्या, पदाच्या, सत्तेच्या नाहीतर इतर संबंधित गोष्टींच्या रूपात असू शकते. साध्य करण्याजोग्या कोणत्याही गोष्टीबद्दल लोभ असू शकतो. ती गोष्ट मिळाल्याने मी समाधानी होईन अशी त्यामागची कल्पना असते. पण येशूने त्याच्या अनुयायांना सांगितल्याप्रमाणे बायबलमधून व मानवी अनुभवातून हे दिसून येते की, फक्त देव आपल्या खऱ्या गरजा पूर्ण करू शकतो आणि तो निश्चित करेल.—लूक १२:२२-३१.
खरेदी-विक्रीवर जोर देणारी आजची संस्कृती लोभीपणाची इच्छा वाढवण्यात तरबेज आहे. फार धूर्त परंतु प्रभावशाली असलेल्या माध्यमांनी प्रभावित होऊन अनेकांना असे वाटू लागले आहे की, त्यांच्याजवळ आहे तितके पुरे नाही. त्यांना आणखी जास्त, आणखी मोठ्या आणि आणखी चांगल्या गोष्टी हव्या आहेत. आपल्या अवतीभोवतीच्या जगाला बदलवण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही; परंतु ही मनोवृत्ती आपण व्यक्तिगतरित्या कशाप्रकारे टाळू शकतो?
समाधान विरुद्ध लोभ
लोभासाठी पौलाने एक पर्याय दिला आहे. तो म्हणतो: “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीमथ्य ६:८) आपल्या मूलभूत गरजांचे “अन्नवस्त्र” असे जे वर्णन केले आहे ते अगदी साधेसुधे वाटेल. टीव्हीच्या कार्यक्रमांमधून अनेकांना नामवंत लोकांचे आलिशान बंगले पाहायला खूप आवडते. पण अशाने मनाला समाधान लाभत नाही.
अर्थात, देवाच्या सेवकांनी मुद्दामहून दारिद्र्यात दिवस कंठण्याची गरज नाही. (नीतिसूत्रे ३०:८, ९) तरीसुद्धा पौल आपल्याला आठवण करून देतो की, जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेले अन्न, वस्त्र, निवारा नसणे याला गरिबी म्हणतात. आणि जर आपल्याजवळ या गोष्टी असल्या तर मग आपण समाधानी असू शकतो.
समाधानाचे पौलाने केलेले हे वर्णन खरे आहे का? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मिळाल्यावर समाधानी होणे खरोखर शक्य आहे का? पौलाला याची कल्पना असेल. कारण यहुदी समाजात उच्च पदावर असल्यामुळे आणि रोमन नागरिक असल्यामुळे मिळणाऱ्या ऐषारामाचा व खास सवलतींचा त्याने स्वतःहून उपभोग घेतला होता. (प्रेषितांची कृत्ये २२:२८; २३:६; फिलिप्पैकर ३:५) मिशनरी कार्य करताना पौलाला अनेक संकटांचाही सामना करावा लागला. (२ करिंथकर ११:२३-२८) या सर्व गोष्टींकरवी, समाधानी राहण्यामागचे रहस्य काय हे तो शिकला होता. आणि ते रहस्य काय होते?
“ह्यांचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे”
पौलाने त्याच्या एका पत्रात असे म्हटले: “गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे.” (फिलिप्पैकर ४:१२, ईजी-टू-रीड व्हर्शन) पौल किती आत्मविश्वासाने आणि आशावादाने हे म्हणाला. त्याने हे शब्द लिहिले तेव्हा तो ऐषारामात असेल असे आपण गृहीत धरू परंतु तसे नव्हते. तो रोममध्ये तुरुंगात होता!—फिलिप्पैकर १:१२-१४.
याचे गांभीर्य लक्षात घेता, या उताऱ्यात केवळ भौतिक वस्तूंच्या बाबतीत नव्हे तर परिस्थितींच्या बाबतीतही समाधानी असण्याविषयी जोरदार संदेश दिला आहे. प्रमाणापेक्षा जास्त संपत्ती किंवा कठीण संकटे या दोन्हींमुळे आपल्या जीवनात कशाला महत्त्व आहे याची परीक्षा घेतली जाऊ शकते. पौलाने आध्यात्मिक गोष्टींचा उल्लेख केला ज्यामुळे भौतिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही तो समाधानी असू शकला. तो म्हणाला: “मला जो सामर्थ्य देतो [त्या देवाकडून] मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) आपल्याजवळ भौतिक वस्तू कमी आहेत की जास्त किंवा आपली परिस्थिती चांगली आहे की वाईट हे पाहण्याऐवजी पौल स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी देवावर विसंबून राहिला. परिणाम? तो समाधानी होता.
पौलाचे उदाहरण विशेषकरून तीमथ्यासाठी फार महत्त्वाचे होते. प्रेषित पौलाने या तरुणाला संपत्तीपेक्षा ईश्वरी भक्ती आणि देवासोबत जवळचा नातेसंबंध यांना जास्त महत्त्व देणाऱ्या जीवनशैलीचे अनुकरण करायला उत्तेजन दिले. पौल म्हणाला: “हे देवभक्ता, तू ह्यापासून पळ, आणि नीतिमत्त्व, सुभक्ति, विश्वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग.” (१ तीमथ्य ६:११) ते शब्द तीमथ्याला उद्देशून म्हटले असावेत, पण देवाचा सन्मान करू इच्छिणाऱ्या आणि खरे आनंदी जीवन हवे असणाऱ्या कोणालाही ते लागू होतात.
इतर कोणत्याही ख्रिश्चनाप्रमाणे तीमथ्याला लोभापासून सावधान राहण्याची गरज होती. पौलाने त्याला हे पत्र लिहिले तेव्हा तो ज्या ठिकाणी होता त्या इफिसमधील मंडळीत कदाचित विश्वासात असलेले काही श्रीमंत लोक होते. (१ तीमथ्य १:३) ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन व्यापाराचे केंद्रस्थान असलेल्या या संपन्न ठिकाणी पौल आला आणि त्याने अनेकांना विश्वासातही आणले. यापैकी पुष्कळजण निश्चितच श्रीमंत राहिले असतील; आजच्या ख्रिस्ती मंडळीतही काही श्रीमंत बांधव आहेत.
त्यामुळे, खासकरून १ तीमथ्य ६:६-१० येथील शिकवणीनुसार हा प्रश्न उभा राहतो: जे लोक धनवान आहेत त्यांना जर देवाचा सन्मान करायचा असेल तर त्यांनी काय करावे? पौल म्हणतो की, त्यांनी सर्वात आधी आपल्या मनोवृत्तीचे परीक्षण करावे. पैसा जवळ असला की आपल्याला कशाचीही गरज नाही असे माणसाला वाटू लागते. पौल म्हणतो: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.” (१ तीमथ्य ६:१७) ज्यांच्याजवळ सर्वकाही आहे त्यांना पैशापलीकडे पाहायची गरज आहे; त्यांना, धनसंपत्तीचा मूळ उगम असलेल्या देवाकडे पाहायची गरज आहे.
पण मनोवृत्ती बदलणे हा फक्त एक भाग झाला. श्रीमंत ख्रिश्चनांनी आपल्या धनसंपत्तीचा योग्य वापर करण्याची आवश्यकता आहे. पौल असा सल्ला देतो: “चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे.”—१ तीमथ्य ६:१८.
“खरे जीवन”
पौलाने दिलेल्या सल्ल्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, भौतिक वस्तू मर्यादित उपयोगाच्या आहेत अशी आपण स्वतःला नेहमी आठवण करून द्यावी. देवाचे वचन म्हणते: “धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.” (नीतिसूत्रे १८:११) धनसंपत्तीने मिळणारी सुरक्षितता केवळ काल्पनिक आहे; ती खरे पाहता फसवी आहे. देवाची संमती प्राप्त करण्यावर जोर देण्याऐवजी धनसंपत्ती प्राप्त करण्यावर जोर देणे चुकीचे आहे.
भौतिक संपत्ती आज आहे तर उद्या नाही; त्यामुळे, आपली आशा तिच्यावर ठेवण्याइतकी ती स्थिर नाही. खरी आशा मजबूत, अर्थपूर्ण आणि चिरस्थायी गोष्टीवर केंद्रित केली पाहिजे. ख्रिस्ती आशा, आपल्या निर्माणकर्त्यावर अर्थात यहोवा देवावर आणि सार्वकालिक जीवनाच्या त्याने दिलेल्या वचनावर केंद्रीत आहे. पैशाने आनंद विकत घेता येऊ शकत नाही ही गोष्टी जितकी खरी तितकेच पैशाच्या जोरावर तारण साधणे शक्य नाही हे देखील खरे आहे. देवावरील आपल्या विश्वासानेच आपल्याला अशी आशा मिळू शकते.
त्यामुळे, आपण धनवान असलो किंवा गरीब असलो तरी आपल्याला “देवविषयक बाबतीत धनवान” बनवणाऱ्या मार्गावर आपण चालू या. (लूक १२:२१) निर्माणकर्त्याची कृपापसंती मिळवण्यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट जास्त महत्त्वाची नाही. ही कृपापसंती सतत मिळवण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांमुळे, “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.”—१ तीमथ्य ६:१९.
[७ पानांवरील चित्र]
समाधानी असण्यामागचे रहस्य पौलाने जाणून घेतले
[८ पानांवरील चित्रे]
आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये आपण आनंदी व समाधानी असू शकतो