वाचकांचे प्रश्न
दानीएल ९:२४ [पं.र.भा.] येथे भाकीत केल्याप्रमाणे, ‘परमपवित्राचा’ अभिषेक केव्हा करण्यात आला?
दानीएल ९:२४-२७ ही भविष्यवाणी, “मशीहा जो अधिपती” अर्थात ख्रिस्त याच्या प्रकट होण्यासंबंधी आहे. त्यामुळे, येथे ‘परमपवित्राचा’ अभिषेक करणे म्हणजे जेरूसलेमच्या मंदिरातील अति पवित्र स्थानाचा अभिषेक करण्याविषयी सांगितलेले नाही. त्याऐवजी, ‘परमपवित्र’ हा शब्द, यहोवाच्या महान आत्मिक मंदिरातल्या देवाच्या स्वर्गीय पवित्र स्थानाला—स्वर्गीय अति पवित्र स्थानाला—सूचित करतो.a—इब्री लोकांस ८:१-५; ९:२-१०, २३.
देवाचे आत्मिक मंदिर केव्हापासून कार्यरत झाले? सा.यु. २९ मध्ये येशूने बाप्तिस्मा घेतला तेव्हा काय घडले ते आपण पाहू या. येशूने आपल्या जीवनातील त्या घटकेपासून स्तोत्र ४०:६-८ मधील शब्द पूर्ण केले. प्रेषित पौलाने नंतर सांगितले की, येशूने देवाला अशी प्रार्थना केली: “यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले.” (इब्री लोकांस १०:५) जेरूसलेमच्या मंदिरात, प्राण्यांची यज्ञार्पणे दिली जावीत अशी देवाची “इच्छा नव्हती” हे येशूला ठाऊक होते. त्याऐवजी, येशूला स्वतःचे अर्पण देता यावे म्हणून यहोवाने त्याला एक परिपूर्ण मानवी शरीर दिले. आपली मनीषा व्यक्त करत येशू पुढे म्हणाला: “पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” (इब्री लोकांस १०:७) आणि मग, यहोवाचा काय प्रतिसाद होता? मत्तयाच्या शुभवर्तमानात म्हटले आहे: “मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”—मत्तय ३:१६, १७.
येशूने अर्पण केलेले शरीर यहोवा देवाने स्वीकारल्यामुळे हे सिद्ध झाले, की जेरूसलेम मंदिरातल्या खऱ्या वेदीपेक्षाही एक मोठी वेदी अस्तित्वात आली होती. ही देवाच्या ‘इच्छेची’ वेदी किंवा येशूचे मानवी जीवन अर्पण म्हणून स्वीकारण्याची व्यवस्था होती. (इब्री लोकांस १०:१०) पवित्र आत्म्याने येशूचा अभिषेक करण्याचा अर्थ, देवाने त्याच्या संपूर्ण आत्मिक मंदिराची व्यवस्था तयार केली होती.b म्हणूनच, येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा, देवाच्या स्वर्गीय निवासस्थानाचा अभिषेक करण्यात आला किंवा महान आत्मिक मंदिराच्या व्यवस्थेत ते ‘परमपवित्र’ म्हणून निवडण्यात आले.
[तळटीपा]
a देवाच्या आत्मिक मंदिराच्या विविध वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर चर्चा जुलै १, १९९६ टेहळणी बुरूज, पृष्ठे १४-१९ वर आढळेल.
b दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! या इंग्रजी पुस्तकाच्या पृष्ठ १९५ वर हे सुचवले होते.
[२७ पानांवरील चित्र]
येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा ‘परमपवित्र’ स्थानाचा अभिषेक झाला