परमेश्वराविरुद्ध लढणाऱ्यांचा कदापि विजय होणार नाही!
“ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही.”—यिर्मया १:१९.
१. यिर्मयाला कोणते कार्य सोपवण्यात आले, आणि तो केव्हापर्यंत हे कार्य करत राहिला?
यहोवाने यिर्मयाला राष्ट्रांना जाऊन त्याचे संदेश घोषित करण्यासाठी नेमले, तेव्हा यिर्मया अगदी तरुण होता. (यिर्मया १:५) त्यावेळी यहूदात, योशिया नावाच्या एका चांगल्या राजाचे राज्य होते. तेव्हापासून तर बॅबिलोनने जेरूसलेमवर विजय मिळवून देवाच्या लोकांना बंदिवान बनवून नेईपर्यंतच्या भयंकर उलथापालथीच्या काळात यिर्मया विश्वासूपणे देवाचे संदेश घोषित करण्याचे कार्य करत राहिला.—यिर्मया १:१-३.
२. यहोवाने कशाप्रकारे यिर्मयाचे धैर्य वाढवले आणि यिर्मयाविरुद्ध लढणारे खरे तर कोणाविरुद्ध लढत होते?
२ यिर्मयाला देवाचे न्यायदंड घोषित करायला सांगण्यात आले होते आणि त्यामुळे साहजिकच त्याच्या कार्याला विरोध होणार हे अपेक्षितच होते. या दृष्टीने देवाने आधीच त्याची मानसिक तयारी देखील केली होती. (यिर्मया १:८-१०) उदाहरणार्थ, पुढील आश्वासन यहोवाने दिले, तेव्हा यिर्मयाचे धैर्य किती वाढले असेल याची कल्पना करा; यहोवाने त्याला सांगितले: “ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” (यिर्मया १:१९) यिर्मयाशी लढणे खुद्द यहोवाशी लढण्यासारखे होते. आज देखील, आपले संदेश घोषित करण्याकरता यहोवाने आपल्या सेवकांना नेमले आहे; त्यांचे कार्य यिर्मयाच्या कार्यासारखेच आहे. यिर्मयाप्रमाणे ते देखील देवाचा भविष्यसूचक संदेश निर्भयपणे घोषित करतात. हा संदेश जगातल्या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांना सांगणे आवश्यक आहे; कारण या संदेशाला त्यांची जी प्रतिक्रिया असेल त्यावरच त्यांचे भविष्य अवलंबून आहे. यिर्मयाला ज्याप्रमाणे विरोध झाला त्याचप्रमाणे आजही देवाच्या सेवकांविरुद्ध लढणारे व त्यांना देवाने जे कार्य सोपवले आहे त्या कार्याला विरोध करणारे आहेतच.
यहोवाच्या सेवकांवर हल्ला
३. यहोवाच्या सेवकांना सतत विरोधाला का तोंड द्यावे लागले आहे?
३ विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच यहोवाच्या लोकांना अनेक शत्रूंना तोंड द्यावे लागले. बऱ्याच देशांत, दुष्ट हेतू बाळगणाऱ्यांनी देवाच्या राज्याच्या सुवार्ता प्रचारात अडथळे आणण्याचा, किंबहुना हा प्रचार पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. अर्थात असे करण्यासाठी त्यांना चालना देणारा दुसरा कोणी नसून आपला सर्वात मोठा शत्रू, दियाबल सैतानच होता जो “गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) १९१४ साली “परराष्ट्रीयांची सद्दी” संपल्यानंतर, देवाने त्याच्या पुत्राला पृथ्वीचा नवा राजा नेमले आणि “आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर,” अशी त्याला आज्ञा दिली. (लूक २१:२४; स्तोत्र ११०:२) त्याप्रमाणे, ख्रिस्ताने सैतानाला स्वर्गातून कायमचे काढून या पृथ्वीवर फेकले आणि अशाप्रकारे आपले सामर्थ्य दाखवले. आता सैतानाला पूर्ण कल्पना आहे की त्याचा फार कमी वेळ उरला आहे आणि म्हणून तो अभिषिक्त ख्रिश्चनांविरुद्ध आणि त्यांना सहयोग देणाऱ्यांविरुद्ध त्याचा सगळा क्रोध व्यक्त करतो. (प्रकटीकरण १२:९, १७) देवाविरुद्ध लढणाऱ्यांनी वारंवार केलेल्या हल्ल्यांमुळे परिणाम काय झाला?
४. पहिल्या महायुद्धादरम्यान यहोवाच्या लोकांना कशाप्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागले, पण १९१९ व १९२२ साली काय घडले?
४ पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान यहोवाच्या सेवकांच्या विश्वासाची अनेक प्रकारे परीक्षा झाली. त्यांची थट्टा केली जायची, लोकांचे मोठमोठे जमाव त्यांच्यावर चालून यायचे आणि अनेकदा तर त्यांना मारहाण देखील केली जायची. “सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील,” हे येशूचे भाकीत अगदी खरे ठरले. (मत्तय २४:९) त्यावेळी सबंध जगात युद्धाचे वातावरण होते; परिस्थितीचा फायदा घेऊन देवाच्या राज्याच्या वैऱ्यांनी एक असा डाव खेळला, जो त्यांनी येशू ख्रिस्ताविरुद्धही खेळला होता. यहोवाच्या लोकांवर देशद्रोही असल्याचा आरोप करून त्यांनी देवाच्या दृश्य संघटनेचा पायाच खिळखिळा करण्याचा कट रचला. १९१८ सालच्या मे महिन्यात वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष, जे. एफ. रदरफोर्ड व त्यांच्या सर्वात जवळच्या सात सहकाऱ्यांना अटक करण्याचे सरकारी वॉरंट काढण्यात आले. या आठ बांधवांना मोठ्या कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली; अमेरिकेतील ॲटलांटा, जॉर्जिया या ठिकाणी असलेल्या सरकारी कारागृहात त्यांना पाठवण्यात आले. पण नऊ महिन्यांनी त्यांची सुटका करण्यात आली. १९१९ साली, मे महिन्यात सर्किट कोर्ट ऑफ अपील्सने असा न्याय दिला की आरोपींवर झालेला खटला निःपक्ष नव्हता आणि त्यामुळे त्यांना दिलेली शिक्षा रद्द करण्यात यावी. याप्रकरणी पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली, पण नंतर सरकारने हा खटलाच मागे घेतला. ब्रदर रदरफोर्ड व त्यांच्या साथीदारांना सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले. त्यांनी आपले कार्य पुन्हा हाती घेतले. १९१९ साली तसेच १९२२ साली सीडर पॉइंट ओहायो येथे झालेल्या अधिवेशनांमुळे राज्याच्या प्रचार कार्याला नवा वेग आला.
५. नात्सी जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांना काय सहन करावे लागले?
५ एकोणीशे तीसच्या दशकात हुकूमशाही राज्यपद्धती बऱ्याच ठिकाणी अस्तित्वात आली; जर्मनी, इटली व जपान ही राष्ट्रे एकत्र आली. या दशकाच्या सुरवातीलाच देवाच्या लोकांचा (खासकरून नात्सी सत्तेखाली असलेल्या जर्मनीत) अतिशय अमानुषपणे छळ करण्यात आला. त्यांच्या कार्यावर ठिकठिकाणी प्रतिबंध लावण्यात आले. घरांची झडती घेऊन लोकांना अटक केली जात होती. आपल्या विश्वासाचा त्याग करण्यास नकार देणाऱ्या हजारो लोकांना छळ छावण्यांमध्ये डांबले जात होते. देवाविरुद्ध आणि त्याच्या लोकांविरुद्ध लढल्या जाणाऱ्या या लढाईचा मुख्य उद्देश, या एकपक्षीय राष्ट्रातून यहोवाच्या साक्षीदारांचे नामोनिशाण मिटवून टाकणे हा होता.a साक्षीदारांनी आपल्या हक्कांसाठी जेव्हा जर्मनीच्या न्यायालयांचे दार ठोठावले तेव्हा त्यांना यश मिळू नये या उद्देशाने हिटलरच्या न्यायरक्षण मंत्रालयाने आपले मत व्यक्त करणारे एक लांबलचक पत्रक तयार केले. त्यात असे म्हटले होते: “न्यायालयांनी कायद्याच्या बंधनात अडकून आपले प्रथम कर्तव्य [नात्सी सरकारच्या प्रती] विसरता कामा नये; किंबहुना या कायदेशीर पेचांतून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी शोधावेत.” साहजिकच, साक्षीदारांना न्याय मिळण्याची आशाच नव्हती. नात्सी सरकारचे शेवटपर्यंत हेच म्हणणे होते की यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य ‘राष्ट्रीय समाजवादी रचनेत व्यत्यय आणणारे,’ अर्थात विरोधात्मक किंवा प्रतिकूल होते.
६. दुसऱ्या महायुद्धादरम्यान व त्यानंतर आपले कार्य थांबवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करण्यात आला?
६ दुसऱ्या महायुद्धादरम्यान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटिश राजवटीखाली येणाऱ्या इतर देशांत (आफ्रिका, आशिया तसेच कॅरिबियन व प्रशांत सागरातील द्वीपांत) देवाच्या लोकांच्या कार्यावर बंदी आणि प्रतिबंध आणले गेले. संयुक्त संस्थानांत देवाच्या लोकांचा द्वेष करणाऱ्या कितीतरी उच्चपदस्थांनी यहोवाच्या साक्षीदारांवर, ‘न्याय करण्याच्या मिषाने अन्याय केला.’ (स्तोत्र ९४:२०) पण साक्षीदारांनी ध्वजवंदनासंबंधीचे वाद तसेच घरोघरच्या प्रचार कार्यावर बंदी घालणाऱ्या नियमांसंबंधीचे प्रश्न अमेरिकेच्या कोर्टांत नेले तेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आले. यामुळे स्वतंत्रपणे उपासना करण्याचा मार्ग मोकळा झाला. अशारितीने, यहोवाच्या कृपेने त्याच्या लोकांच्या शत्रूंचे प्रयत्न निष्फळ ठरले. युरोपात युद्ध संपुष्टात आले तेव्हा साक्षीदारांवर लावण्यात आलेले प्रतिबंध काढून टाकण्यात आले. छळ छावण्यांतून हजारो साक्षीदारांची सुटका करण्यात आली. पण देवाच्या लोकांविरुद्धची लढाई अद्याप सुरूच होती. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच शीत युद्ध सुरू झाले. पूर्व युरोपीय देशांनी यहोवाच्या लोकांवर पुन्हा दबाव आणायला सुरवात केली. आपले साक्षकार्य, बायबल साहित्याचा पुरवठा, तसेच आपल्या सार्वजनिक सभा यांत अडथळे आणण्याकरता किंवा यांवर पूर्णपणे बंदी आणण्याकरता अधिकृत कारवाई करण्यात आली. बऱ्याच साक्षीदारांना अटक करण्यात आली आणि कित्येकांना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
प्रचार कार्य अविरत सुरू!
७. पोलंड, रशिया व इतर देशांमध्ये अलीकडच्या वर्षांत यहोवाच्या साक्षीदारांची काय स्थिती होती?
७ पुढे काही दशकांनंतर राज्य प्रचाराच्या कार्याचा मार्ग मोकळा होत गेला. पोलंड अद्याप कम्युनिस्ट सत्तेखाली असूनही १९८२ साली तेथे एक दिवसीय अधिवेशने आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली. १९८५ साली तेथे आंतरराष्ट्रीय अधिवेशने आयोजित करण्यात आली. मग १९८९ साली येथे खूप मोठी आंतरराष्ट्रीय अधिवेशने संपन्न झाली; या अधिवेशनांना रशिया व युक्रेन येथून हजारो लोक आले होते. त्याच वर्षी हंगेरी व पोलंड या दोन देशांनी यहोवाच्या साक्षीदारांना अधिकृत मान्यता दिली. १९८९ सालच्या हिवाळ्यात बर्लिनची भिंत जमीनदोस्त करण्यात आली. काही महिन्यांतच पूर्व जर्मनीत साक्षीदारांना कायदेशीर मान्यता मिळाली आणि लवकरच बर्लिन येथे आंतरराष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. २० व्या शतकाच्या शेवटल्या दशकाच्या सुरवातीला रशियातल्या बांधवांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मॉस्को येथे काही अधिकाऱ्यांची यासंबंधाने भेट घेण्यात आली आणि १९९१ साली यहोवाच्या साक्षीदारांची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. तेव्हापासून रशियात आणि भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या इतर प्रजासत्ताक राज्यांत साक्षीदारांच्या कार्यात अभूतपूर्व वाढ झाली आहे.
८. दुसरे जागतिक महायुद्ध संपुष्टात आल्यानंतरच्या ४५ वर्षांत यहोवाच्या लोकांना कशाप्रकारचे अनुभव आले आहेत?
८ काही देशांत साक्षीदारांची केली जाणारी छळवणूक बंद झाली तर इतर देशांत वाढली. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या ४५ वर्षांत अनेक देशांनी यहोवाच्या साक्षीदारांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला. शिवाय आफ्रिकेतील २३ देशांत, आशियातील ९ देशांत, युरोपातील ८, लॅटिन अमेरिकेतील ३ आणि इतर ४ द्वीप राष्ट्रांत आपल्या कार्यावर बंदी आणली गेली.
९. मलावीत यहोवाच्या सेवकांनी कशाप्रकारच्या परिस्थितीला तोंड दिले आहे?
९ मलावीत, १९६७ सालापासून यहोवाच्या साक्षीदारांना अतिशय अमानुष छळ सहन करावा लागला. खऱ्या ख्रिश्चनांना देण्यात आलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व राजकीय पक्षांबद्दल तटस्थ भूमिका बाळगत असल्यामुळे आपल्या बांधवांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्ड विकत घेण्यास नकार दिला. (योहान १७:१६) १९७२ साली मलावी काँग्रेस पार्टीच्या एका बैठकीनंतर बांधवांचा छळ पुन्हा सुरू झाला. त्यांना त्यांच्याच घरांतून बाहेर काढण्यात आले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या. हजारो बांधवांना आपला जीव वाचवण्यासाठी देशातून पळ काढावा लागला. पण देवाविरुद्ध आणि त्याच्या लोकांविरुद्ध लढणाऱ्या या लोकांना यश आले का? मुळीच नाही! कालांतराने परिस्थिती बदलली आणि १९९९ साली मलावीत ४३,७६७ प्रचारकांची शिखर संख्या नोंदण्यात आली; प्रांतीय अधिवेशनांना १,५०,००० हून अधिक लोक उपस्थित होते. मलावीच्या राजधानी शहरात आता नवे शाखा दफ्तर बांधण्यात आले आहे.
निमित्त शोधणारे
१०. दानीएलच्या विरोधकांप्रमाणे आज देवाच्या लोकांचा विरोध करणाऱ्यांनी काय केले आहे?
१० धर्मत्यागी, पाळक आणि इतरांना देवाच्या वचनातून आपण देत असलेला संदेश आवडत नाही. ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्यांकडून येणाऱ्या दबावाला बळी पडून हे विरोधक आपल्याविरुद्ध लढण्याचे रास्त, कायदेशीर कारण देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते कोणते डावपेच उपयोगात आणतात? दानीएल संदेष्ट्याविरुद्ध कट रचणाऱ्यांनी काय केले होते, तुम्हाला आठवते का? दानीएल ६:४, ५ या वचनांत आपण वाचतो: “राज्यकारभारासंबंधाने दानीएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालविला; पण त्यांस काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही. तेव्हा ती मनुष्ये म्हणाली, या दानीएलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्याविरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल.” आजदेखील देवाच्या लोकांचा विरोध करणारे अशाच निमित्ताच्या शोधात असतात. यहोवाचे साक्षीदार “धोकेदायक पंथ” आहेत वगैरे आरडाओरड करून त्यांना हे लेबल लावण्याचा या विरोधकांचा प्रयत्न आहे. आपल्याबद्दल खोटी माहिती प्रसारित करून, अप्रत्यक्षपणे आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करून, खोटे आरोप लावून ते आपल्या उपासनेवर आणि देवाच्या तत्त्वांप्रती असलेल्या निष्ठेवर घाला घालू पाहतात.
११. यहोवाच्या साक्षीदारांच्या काही विरोधकांनी कोणते खोटे दावे केले आहेत?
११ यहोवाचे साक्षीदार “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण” करत आहेत हे मान्य करायला काही देशांतील धार्मिक व राजकीय अधिकारी तयार नाहीत. (याकोब १:२७) आपले ख्रिस्ती कार्य २३४ देशांत सुरू असूनही विरोधकांचे असे म्हणणे आहे की हा “प्रचलित धर्म” नाही. १९९८ साली एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या आधी अथेन्सच्या एका वृत्तपत्राने ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाळकांचे शब्द उद्धृत करून असे म्हटले की “[यहोवाचे साक्षीदार] हा प्रचलित धर्म नाही.” विशेष म्हणजे युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्सने हे खरे नसल्याचे याआधीच स्थापित केले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याच शहरातल्या आणखी एका वृत्तपत्रात चर्चच्या एका प्रवक्त्याचे विधान प्रकाशित करण्यात आले होते. तो म्हणतो: “[यहोवाच्या साक्षीदारांना] ‘ख्रिस्ती मंडळी’ म्हणताच येणार नाही, कारण ख्रिस्ती धर्मात येशू ख्रिस्ताविषयी जो विश्वास केला जातो त्याच्यात आणि साक्षीदारांच्या विश्वासात काहीही साम्य नाही.” हे फारच आश्चर्याचे आहे, कारण खरे पाहता येशूचे अनुकरण करण्यावर यहोवाचे साक्षीदार जितका जोर देतात तितका आणखी कोणताच धार्मिक गट देत नाही!
१२. आपली आत्मिक लढाई लढत असताना आपण काय केले पाहिजे?
१२ सुवार्ता प्रसाराच्या कार्याचे समर्थन करण्यासाठी आपण कायदेशीर मार्गांचाच अवलंब करतो. (फिलिप्पैकर १:७) शिवाय, काही झाले तरी देवाच्या नीतिमान नियमांना जडून राहण्याचा आपला निर्धार आहे; याबाबतीत आपण कोणताच समझोता करणार नाही. (तीत २:१०, १२) यिर्मयाप्रमाणे, ‘यहोवाने आज्ञापिलेले सर्व काही सांगण्यास आपण आपली कंबर कसली आहे;’ देवाविरुद्ध लढणाऱ्यांना आपण घाबरत नाही. (यिर्मया १:१७, १८) यहोवाच्या पवित्र वचनातून त्याने आपल्याकरता असलेला योग्य मार्ग अगदी स्पष्टपणे दाखवला आहे. त्यामुळे आपण कधीही “मांसमय भुजांचा” आधार घेऊ इच्छित नाही किंवा ‘मिसराच्या छायेत लपण्याचा’ म्हणजेच या जगात आश्रय शोधण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. (२ इतिहास ३२:८; यशया ३०:३; ३१:१-३) आपली आत्मिक लढाई आहे आणि ही लढाई लढताना आपण सदैव यहोवावरच पूर्ण मनाने भरवसा करायला शिकले पाहिजे; स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याची आपल्याला गरज नाही कारण यहोवाच आपल्याला मार्ग दाखवील. (नीतिसूत्रे ३:५-७) यहोवाच्या पाठिंब्याशिवाय आणि त्याच्या संरक्षणाशिवाय आपली सर्व कार्ये ‘व्यर्थ आहेत.’—स्तोत्र १२७:१.
छळ झाला तरी समझोता नाही
१३. येशूवर सैतानाने केलेला हल्ला निष्फळ ठरला असे का म्हणता येईल?
१३ याबाबतीत सर्वात चांगले उदाहरण येशूचे आहे. तो शेवटपर्यंत तडजोड न करता यहोवाला विश्वासू राहिला. त्याच्यावर राजद्रोहाचा आणि रोमी सरकारच्या स्थापित व्यवस्थेचा भंग करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला होता. पिलाताने जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा तो येशूला सोडून देण्यास तयार झाला. पण धार्मिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून लोकांनी येशूला, तो निर्दोष असूनही वधस्तंभावर खिळण्याची मागणी केली. त्याच्याऐवजी, राजद्रोह व खून करण्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत असलेल्या बरब्बाला सोडून द्यावे अशी त्यांची इच्छा होती! कोणताही दोष नसताना येशूला शिक्षा देऊ इच्छिणाऱ्या या विरोधकांचे मन फिरवण्याचा पिलाताने पुन्हा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही; लोकांच्या आग्रहापुढे पिलाताने हात टेकले. (लूक २३:२, ५, १४, १८-२५) येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले; पण देवाच्या निर्दोष पुत्रावर सैतानाने केलेल्या या निर्दयी हल्ल्यामुळे त्याचा दुष्ट उद्देश मुळीच साध्य झाला नाही कारण यहोवाने येशूचे पुनरुत्थान केले आणि त्याला आपल्या उजवीकडे बसण्याचा सन्मान दिला. सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी, स्वर्गात गौरवशाली स्थान मिळालेल्या येशूने पृथ्वीवरील आपल्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला आणि अशारितीने एक “नवी उत्पत्ती,” अर्थात ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली.—२ करिंथकर ५:१७; प्रेषितांची कृत्ये २:१-४.
१४. यहुदी धार्मिक पुढारी येशूच्या अनुयायांचा विरोध करू लागले तेव्हा काय परिणाम झाला?
१४ यानंतर थोड्याच कालावधीत धार्मिक पुढाऱ्यांनी प्रेषितांवर दबाव आणायला सुरवात केली, त्यांना धमकावले. पण आपण पाहिलेल्या व ऐकलेल्या अद्भुत गोष्टींविषयी साक्ष देण्याचे ख्रिस्ताच्या या अनुयायांनी बंद केले नाही. त्यांनी यहोवाला प्रार्थना केली: “हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्यांकडे पाहा; आणि . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” (प्रेषितांची कृत्ये ४:२९, ३०) यहोवाने त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर दिले; त्याने त्यांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण करून निर्भयपणे प्रचार करत राहण्याचे धैर्य दिले. लवकरच प्रेषितांना पुन्हा प्रचार कार्य बंद करण्यास बजावण्यात आले, पण पेत्र आणि इतर प्रेषितांनी स्पष्ट उत्तर दिले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) त्यांना धमकावण्यात आले, तुरुंगात डांबण्यात आले, कोडे खावे लागले, पण त्यांचे धैर्य मात्र खचले नाही. राज्य प्रचाराचे कार्य उत्तरोत्तर वाढतच गेले.
१५. गमलियेल कोण होता, आणि येशूच्या अनुयायांचा विरोध करणाऱ्या धार्मिक पुढाऱ्यांना त्याने कोणता सल्ला दिला?
१५ धार्मिक पुढाऱ्यांची यावर काय प्रतिक्रिया होती? “ते चिडून गेले आणि [प्रेषितांना] जिवे मारण्याचा विचार करू लागले.” पण गमलियेल नावाचा नियमशास्त्राचा एक परूशी विद्वान त्याठिकाणी उपस्थित होता; सर्व लोक त्याचा आदर करायचे. प्रेषितांना थोडावेळ न्यायसभेच्या बाहेर पाठवून तो त्यांचा विरोध करणाऱ्या त्या धर्मगुरूंना म्हणाला: “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. . . . मी तुम्हाला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल; परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”—प्रेषितांची कृत्ये ५:३३-३९.
कोणतेही हत्यार चालणार नाही
१६. यहोवाने आपल्या लोकांना जी खात्री दिली आहे त्याचे आपल्या शब्दांत वर्णन करा.
१६ गमलियेलने किती योग्य सल्ला दिला! कधीकधी यहोवाच्या साक्षीदारांच्याही वतीने बोलण्याचे काही लोक धैर्य करतात; त्यांची आपण कदर बाळगतो. तसेच काही न्यायप्रिय न्यायाधीशांनी देखील आपल्या बाजूने निर्णय दिल्यामुळे उपासनेच्या स्वातंत्र्याला समर्थन मिळाले हेही आपण मान्य करतो. पण दुसरीकडे पाहता, ख्रिस्ती जगताचे धर्मगुरू तसेच खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्याचे, अर्थात मोठ्या बाबेलचे इतर पुढारी आपला द्वेष करतात कारण आपण देवाच्या वचनाला जडून राहतो. (प्रकटीकरण १८:१-३) त्यामुळे ते व त्यांच्या प्रभावाखाली येणारे इतरही आपला सतत विरोध करतात. पण यहोवा आपल्याला खात्री देतो: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळलेली त्याची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”—यशया ५४:१७.
१७. आपला विरोध करणारे सतत आपल्याविरुद्ध लढतात तरीसुद्धा आपण धीर का सोडू नये?
१७ आपले शत्रू खरे तर विनाकारण आपल्याविरुद्ध लढतात; पण आपण धीर सोडत नाही. (स्तोत्र १०९:१-३) बायबलच्या आधारावर जो संदेश आपण घोषित करत आहोत त्या संदेशाचा तिरस्कार करणारे कितीही विरोध करोत, आपण आपला विश्वास काही झाले तरी तजणार नाही. आपली आत्मिक लढाई भविष्यात अधिकच बिकट होईल हे अपेक्षितच आहे, पण शेवटी विजय कोणाचा होईल हे देखील आपल्याला ठाऊक आहे. यिर्मयाप्रमाणे आपण या भविष्यवाणीची पूर्तता स्वतः अनुभवू: “ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” (यिर्मया १:१९) होय, परमेश्वराविरुद्ध लढणाऱ्यांचा कदापि विजय होणार नाही!
[तळटीपा]
a याच अंकात २४-८ पृष्ठांवर, “नात्सी जुलूमाखाली असताना—विश्वासू व निडर” हा लेख पाहावा.
तुम्ही काय उत्तर द्याल?
• यहोवाच्या सेवकांना सतत विरोधाला का तोंड द्यावे लागले आहे?
• यहोवाच्या लोकांविरुद्ध शत्रू कशाप्रकारे लढले?
• परमेश्वराचा विरोध करणाऱ्यांचा कदापि विजय होणार नाही याची आपण खात्री का बाळगू शकतो?
[१७ पानांवरील चित्र]
यिर्मयाला यहोवाने खात्री दिली की “मी तुजबरोबर आहे”
[१८ पानांवरील चित्र]
छळ छावण्यांतून जिवंत बचावलेले
[१८ पानांवरील चित्र]
यहोवाच्या साक्षीदारांवर जमावांचा हल्ला
[१८ पानांवरील चित्र]
जे. एफ. रदरफोर्ड आणि त्यांचे साथीदार
[२१ पानांवरील चित्र]
देवाविरुद्ध लढणाऱ्यांचा कदापि विजय होणार नाही, हे येशूच्या बाबतीत खरे ठरले