येशू ख्रिस्तावर विश्वास का ठेवावा?
“अनेक लोक जे ख्रिस्ती नाहीत तेही मानतात की तो एक महान व सुज्ञ शिक्षक होता. खरोखरच तो सर्वकाळातील सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक होता.” (द वर्ल्ड बुक ऑफ एन्सायक्लोपिडिआ) “तो” म्हणजे कोण? ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, येशू ख्रिस्त.
पण हा विश्वकोश असे म्हणत असला तरी, अतिपूर्वेकडील आणि इतर देशांतील असंख्य लोकांना, येशू ख्रिस्ताची ओळख नाही; त्यांना फक्त माध्यमिक शाळेतील शालेय पुस्तकात त्याचे नाव वाचल्याचे आठवते. ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसमध्येसुद्धा, असे वेदान्ती व पाळक आहेत जे, आम्ही येशूला इतक्या चांगल्याप्रकारे ओळखत नाही असे म्हणतात व बायबलमधील त्याच्या जीवनाच्या चार शाबूत अहवालांच्या (शुभवर्तमान) अस्सलतेवर शंका घेतात.
शुभवर्तमान लेखकांनी येशूची जीवनकथा कल्पनेने रचली असावी का? मुळीच नाही! शुभवर्तमान अहवालांचे बारकाईने परीक्षण केल्यावर मान्यवर इतिहासकार वील ड्युरंट यांनी असे लिहिले: “मूठभर साध्या लोकांनी, एका पिढीमध्ये, इतके जबरदस्त व आकर्षक व्यक्तिमत्त्व, इतकी उदात्त नैतिकता आणि मानवी बंधुत्वाचा इतका प्रेरणादायक दृष्टान्त कल्पित बनवणे हा, येशूच्या चरित्रांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही चमत्कारापेक्षा अविश्वसनीय चमत्कार ठरेल. उच्च समीक्षेच्या दोन शतकांनंतर येशूचे जीवन, त्याचा स्वभाव आणि त्याच्या शिकवणी यांचे संक्षिप्त वर्णन, वाजवीपणे सुस्पष्ट राहिले आहे व पाश्चिमात्य मनुष्याच्या इतिहासातील सर्वात मोहक वैशिष्ट्य बनले.”
असेही लोक आहेत ज्यांना, येशूच्या नामधारी अनुयायांनी जे केले त्यामुळे येशू ख्रिस्ताविषयी जाणून घ्यायची काही गरज नाही असे वाटते. जपानमधील काही म्हणतील, ‘त्यांनी नागासाकीवर बॉम्ब फेकला. आणि जपानच्या इतर शहरांपेक्षा नागासाकीतच जास्त ख्रिश्चन होते.’ परंतु, एखाद्या रुग्णाने डॉक्टरच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा आजार बळावला तर तुम्ही डॉक्टरला दोष द्याल का? स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या अनेकांनी मानवजातीच्या समस्यांवर येशूने दिलेल्या उपायाकडे कानाडोळा केला आहे. तरीपण, येशूने आपल्या दैनंदिन समस्यांवर आणि संपूर्ण जगभरातील मानवजातीच्या पीडांवर उपाय दिला आहे. यास्तव, आम्ही आपल्याला पुढील लेख वाचण्याचे व तो कशाप्रकारचा मनुष्य होता हे तुम्ही स्वतःच पडताळून पाहण्याचे आमंत्रण देतो.