वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ९/१५ पृ. ८-९
  • एका मगरूर शासकाच्या साम्राज्याचा अंत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एका मगरूर शासकाच्या साम्राज्याचा अंत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सहशासक की राजा?
  • फाजील आत्मविश्‍वासी आणि मगरूर शासक
  • तुम्हाला माहीत होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ९/१५ पृ. ८-९

एका मगरूर शासकाच्या साम्राज्याचा अंत

संदेष्टा दानीएल याने लिहिले, “बेलशस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांस मोठी मेजवानी केली; त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला.” पण मैफल रंगात आली असताना “राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.” ती रात्र सरण्याआधीच, “खास्द्यांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला. आणि दारयावेश मेदी हा . . . राज्यपदारूढ झाला.”—दानीएल ५:१, ६, ३०, ३१.

बेलशस्सर कोण होता? त्याला “खास्द्यांचा राजा” का म्हणण्यात आले? नव्याने उदयास आलेल्या बॅबिलोनच्या साम्राज्यात त्याचे नेमके कोणते पद होते? त्याचे साम्राज्य त्याच्या हातून कसे गेले?

सहशासक की राजा?

दानीएलाने नबुखद्‌नेस्सर बेलशस्सर याचा पिता म्हटले आहे. (दानीएल ५:२, ११, १८, २२) पण याचा शब्दशः अर्थ लावला जाऊ नये. नबॉनिडस ॲण्ड बेलशस्सर या रेमन्ड डाउअर्टी यांच्या पुस्तकात असे सुचविण्यात आले आहे की नबुखद्‌नेस्सर कदाचित बेलशस्सरची आई नाइटोक्रिस हिचा पिता म्हणजेच त्याचा आजोबा असावा. किंवा बेलशस्सरला राज्य मिळण्याआधी नबुखद्‌नेस्सर गादीवर असल्यामुळे केवळ या अर्थाने त्याला बेलशस्सरचा “बाप” म्हटले असावे, अशीही शक्यता नाकारता येत नाही. (पडताळा उत्पत्ति २८:१०, १३.) तथापि, १९ व्या शतकात दक्षिण इराकमध्ये गवसलेल्या कित्येक कीलाकार शिलालेखांत मात्र बेलशस्सर हा बॅबिलोनचा राजा नबोनिडस याचा सर्वात थोरला मुलगा असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

दानीएलच्या ५ व्या अध्यायाचा रोख, सा.यु.पू. ५३९ साली बॅबिलोन पडले त्या रात्री घडलेल्या घटनांवर असल्यामुळे राज्याधिकार बेलशस्सरच्या हाती कसा आला याचे त्या अध्यायात स्पष्टीकरण दिलेले नाही. तथापि, पुरातत्त्व शास्त्राच्या अभ्यासातून नबोनिडस आणि बेलशस्सर यांच्यात काय नाते होते, यावर थोडाफार प्रकाश टाकता येतो. पुरातत्त्ववेत्ते आणि हिब्रू भाषेतून आलेल्या पुरातन भाषांवर संशोधन करणारे ॲलन मिलर्ड याविषयी माहिती देतात; ते म्हणतात, “बॅबिलोनियन लिखाणांवरून असे दिसते की नबोनिडस हा एक तऱ्‍हेवाईक राजा होता.” ते पुढे म्हणतात: “तो बॅबिलोनच्या दैवतांचा तर भक्‍त होताच, . . . पण ऊर आणि हारान या दोन शहरातल्या चंद्रदेवतेवरही त्याची गाढ श्रद्धा होती. त्याच्या शासनकाळातील कितीतरी वर्षे तो बॅबिलोनला राहायला आला देखील नाही; उलट उत्तर अरेबियातील तेइमा [किंवा, तेमा] या दूरवर्ती मरुवनात तो राहात असे.” याचा अर्थ असा होतो, की नबोनिडस हा आपल्या शासनकाळातील बराच काळ राजधानीत, म्हणजेच बॅबिलोनमध्ये नसायचा. त्याच्या अनुपस्थितीत, राज्यकारभार सांभाळण्याचा अधिकार बेलशस्सरला देण्यात आला होता.

बेलशस्सरच्या खऱ्‍या पदाविषयी आणखी माहिती “नबोनिडस याचे काव्यरूप जीवनचरित्र” नावाच्या एका कीलाकार अभिलेखात आढळते; त्यात म्हटले आहे: “त्याने [नबोनिडसने] आपला सर्वात थोरला (पुत्र), अर्थात ज्येष्ठपुत्र याला ‘लष्कर’ सोपवून दिले, सबंध देशातील सैन्यांवर त्याने त्याला (अधिकार) दिला. त्याने त्याला (सर्वकाही) सोपवले, राज्यपद देखील [त्याने] त्याच्या हाती दिले.” अशारितीने बेलशस्सर हा सहशासक झाला.

तथापि, सहशासकाला राजा म्हणणे योग्य आहे का? उत्तर सिरिया येथे १९७० च्या दशकात प्राचीन काळच्या एका शासकाचा पुतळा गवसला होता; तेव्हा हे स्पष्ट झाले की शासन सांभाळणाऱ्‍या एखाद्याचे पद कायदेशीरपणे खुद्द राजापेक्षा कमी दर्जाचे असले तरीसुद्धा त्याला राजा म्हणण्याची प्रथा काही नवीन नव्हती. हा पुतळा गोझानच्या एका शासकाचा असून, त्यावर अस्सिरियन आणि ॲरमेइक भाषांतून लिखाण केलेले होते. अस्सिरियन भाषेतील आलेखात त्याला गोझानचा सुभेदार म्हटले होते, तर त्यासोबतच्या ॲरमेइक आलेखात त्याला राजा म्हटलेले होते. त्यामुळे बेलशस्सर याला अधिकृत बॅबिलोनियन आलेखांत राजपुत्र म्हटलेले असताना, दानीएलाच्या ॲरमेइक लिखाणात राजा म्हटल्या जाण्याचा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नव्हता.

नबोनिडस आणि बेलशस्सर यांचे सहशासन नव्याने उदयास आलेल्या बॅबिलोनच्या साम्राज्याचा जवळजवळ शेवट होईपर्यंत चालले. म्हणूनच बॅबिलोनचे पतन झाले त्या रात्री, बेलशस्सरने दानीएल याला राज्याचा दुसरा नव्हे तर तिसरा अधिपती होण्याची संधी देऊ केली.—दानीएल ५:१६.

फाजील आत्मविश्‍वासी आणि मगरूर शासक

बेलशस्सर हा फाजील आत्मविश्‍वासी आणि मगरूर होता, हे त्याच्या कारकीर्दीतल्या शेवटल्या काही घटनांवरून स्पष्ट होते. सा.यु.पू. ५३९ साली, ऑक्टोबर ५ रोजी त्याचे राज्य संपुष्टात आले, तेव्हा नबोनिडसने मेद-पारस यांच्या सैन्याकडून पराजित होऊन बोरसिप्पा येथे आश्रय घेतला होता. बॅबिलोनला देखील शत्रूने वेढले होते. पण शहराच्या सभोवताल भरभक्कम भिंती असल्यामुळे बेलशस्सर अगदी निर्धास्त होता; इतकेच काय तर त्या रात्री त्याने ‘आपल्या एक हजार सरदारांना चक्क मोठी मेजवानी दिली.’ सा.यु.पू. पाचव्या शतकातील ग्रीक इतिहासकार हेरोडिटस सांगतो की शहरातले लोक “त्यावेळी नाचगाणी आणि मौजमजा करण्यात दंग होते.”

बाहेर बॅबिलोनच्या भिंतीपलीकडे, मेद आणि पारसचे सैन्य अत्यंत सावधगिरीने हालचाल करीत होते. कोरेशच्या आदेशानुसार, शहराच्या मधून जाणाऱ्‍या फरात नदीचा प्रवाह दुसऱ्‍या दिशेला वळवण्यात आला. त्याचे सैनिक, पाण्याची पातळी थोडी कमी होताच नदीचा प्रवाह चिरत आगेकूच करण्यासाठी थांबून होते. नदीच्या कडेने असणाऱ्‍या भिंतींपर्यंत चढत जाऊन उघड्याच ठेवण्यात आलेल्या ताम्र वेशींतून शहरात प्रवेश करणार होते.

शहराबाहेर काय चालले आहे याची बेलशस्सरला चाहूल नव्हती. नाहीतर त्याने त्या ताम्र वेशी बंद करण्याचा आदेश दिला असता आणि नदीच्या कडेने असणाऱ्‍या भिंतींवर आपल्या बलाढ्य सैनिकांना तैनात करून तो शत्रू सैन्याला जाळ्यात अडकवू शकला असता. उलट, मद्याच्या धुंदीत, मगरूर बेलशस्सरने यहोवाच्या मंदिरातून आणलेली पात्रे आपल्यापुढे पेश करण्याचा हुकूम केला. मग त्याच्या मेजवानीला आलेले सरदार, त्याच्या पत्नी आणि उपपत्नी, सर्व बॅबिलोनी दैवतांचे गुणगान करीत त्या पात्रांतून द्राक्षारस प्याले. अचानक, चमत्कारिकरित्या एक हात दिसला आणि तो राजवाड्याच्या भिंतीवर काहीतरी लिहू लागला. भितीने गाळण उडालेल्या बेलशस्सरने त्या लिहिलेल्या मजकुराचा अर्थ समजावून सांगण्यासाठी आपल्या ज्ञान्यांना बोलावून घेतले. पण “त्यांस तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना.” शेवटी, त्यांनी दानीएलास “राजापुढे आणिले.” देवाच्या प्रेरणेने, यहोवाच्या या धैर्यवान संदेष्ट्याने त्या चमत्कारिक संदेशाचा अर्थ सांगितला आणि मेद व पारस यांच्याकडून बॅबिलोनचे पतन होईल असे भाकीत केले.—दानीएल ५:२-२८.

मेद आणि पारसच्या सैन्याने बॅबिलोन शहराला सहज काबीज केले; पहाट होईपर्यंत बेलशस्सर जिवंत राहिला नाही. त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर साहजिकच नबोनिडसही कोरेशला शरण गेला, तेव्हा बॅबिलोनचे नव्याने उदयास आलेले साम्राज्य कायमचे इतिहासजमा झाले.

[८ पानांवरील चित्र]

बॅबिलोन साम्राज्याच्या सर्वनाशाचा संदेश समजावून सांगताना दानीएल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा