गिलियडच्या १०४ वर्गाचा पदवीदान समारंभ—एक आनंदाचा प्रसंग
“हा आनंदाचा दिवस आहे आणि आपण सर्व आनंद करत आहोत.” या शब्दात, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे कॅरी बार्बर यांनी, मार्च १४, १९९८ रोजी वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १०४ वर्गाच्या आनंदी पदवीदान समारंभाची सुरवात केली. जमलेल्या ४,९४५ जणांना, “हर्षोत्सवाचे गीत” हे शीर्षक असलेले राज्यगीत क्रमांक २०८ गाण्याद्वारे समारंभाची सुरवात करण्याचे आमंत्रण देण्यात आले.
आनंदी राहण्याकरता व्यावहारिक सल्ला
कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भागात, बायबल आधारित पाच लघू भाषणांच्या शृंखलेद्वारे, पदवीदानाच्या दिवशी सर्वत्र असलेला आनंदी आत्मा कसा टिकवता येईल यावर काही व्यावहारिक सल्ले देण्यात आले.
पहिले भाषण, लेखन विभागाचे जोसफ एम्स यांनी दिले. “एकनिष्ठ जणांच्या आत्म्याचे अनुकरण करा,” हा विषय असलेले त्यांचे भाषण बायबलमधील २ शमुवेल १५ व १७ अध्यायांतील अहवालावर आधारित होते; तेथे, दावीदाचा पुत्र अबशालोम, बंड चेतवून आपल्या पित्याचे देव-प्रदत्त राज्य हिसकावून घेण्याचा कट रचतो. परंतु, यहोवाचा अभिषिक्त राजा दावीद याजशी एकनिष्ठ राहणारे देखील होते. यातून नवीन मिशनरी कोणता धडा शिकू शकतात? “तुमच्या मिशनरी नेमणुकीत तुम्ही कोठेही गेलात तरी, ईश्वरशासित अधिकाराबद्दल सहकार्याचा आणि आदराचा आत्मा एकनिष्ठपणे दाखवा. इतरांना असे करण्यास साहाय्य करा,” असे म्हणून बंधू एम्स यांनी समारोप केला.
नंतर, डेव्हिड सिंक्लेर यांनी ‘यहोवाच्या मंडपात’ अतिथी म्हणून वास करणाऱ्यांसाठी स्तोत्र १५ मध्ये उल्लेखण्यात आलेल्या दहा अटींचे वर्णन दिले. “तुमच्या मिशनरी मंडपात अतिथी म्हणून टिकून राहा,” असा विषय असलेल्या त्यांच्या भाषणाने, पदवीधर विद्यार्थ्यांना, ते जेथे अतिथी असतील त्या त्यांच्या मिशनरी नेमणुकींना हे स्तोत्र लागू करण्याचे उत्तेजन दिले. बंधू सिंक्लेर यांनी, सर्व वेळी ईश्वरी दर्जांनुरूप जगण्याच्या महत्त्वावर जोर दिला. याचा परिणाम काय होईल? स्तोत्र १५:५ म्हणते: “जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.”
यानंतर, नियमन मंडळाचे जॉन बार यांनी, ख्रिस्ती सभांमध्ये गीत गायिल्याने मिळणाऱ्या उत्साहाकडे सर्वांचे लक्ष वेधले. पण, आज पृथ्वीवर गायिले जाणारे सर्वात हर्षमय गीत कोणते आहे? देवाच्या मशिही राज्याची सुवार्ता! हे गीत गायिल्यामुळे किंवा राज्याच्या प्रचारामुळे काय परिणाम होतो? गीत क्रमांक २०८ मधील दुसरे स्वरवाक्य संक्षिप्तपणे असे आहे: “राज्य प्रचार, ख्रिस्ती शिक्षण, आणे अनेका याहप्रत. हर्षोत्सवाने, गाती उत्साहे, गुंजे गगन, सर्वदूर!” होय, प्रत्येक दिवशी सुमारे १,००० नवीन शिष्य बाप्तिस्मा घेत आहेत. समारोपात बंधू बार म्हणाले: “बांधवांनो, क्षेत्रांमध्ये तुमचे स्तुतीचे गीत ऐकण्याची वाट पाहत असलेल्या लोकांना जाऊन भेटण्याकरता तुम्हाला पाठवण्यात येत आहे, हे आनंदविणारे नाही का?”
कार्यक्रमात, यानंतरचे भाषण लेखन विभागाच्या जेम्स मॅन्ट्स यांचे होते; त्यांच्या भाषणाचा विषय होता: “अनुभवी मिशनऱ्यांचे ऐका.” काही गोष्टी व्यक्तिगत अनुभवातूनच शिकता येतात, हे त्यांनी दर्शवले. (इब्री लोकांस ५:८) तरीसुद्धा, नीतिसूत्रे २२:१७ आपल्याला “ज्ञान्यांची” किंवा अनुभव असलेल्यांची “वचने कान लावून” ऐकण्याचे उत्तेजन देते. पदवीधर विद्यार्थी, त्यांच्याआधीच्या मिशनऱ्यांकडून पुष्कळ काही शिकू शकतात. “स्थानिक दुकानदारांबरोबर घासाघीस कशी करायची हे त्यांना माहीत असते. शारीरिक किंवा नैतिकरीत्या घातक असलेल्या शहरातील कोणत्या क्षेत्रात जाऊ नये हे त्यांना माहीत असते. स्थानिक लोकांच्या भावना कशाने दुखावल्या जातील हेही त्यांना माहीत असते. दीर्घकाळापासून मिशनरी असलेल्यांना, तुमच्या नेमणुकीत आनंदी व यशस्वी होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे हे माहीत असते,” असे बंधू मॅन्ट्स म्हणाले.
गिलियड प्रशालेचे कुलसचिव, वॅलस लिव्हरन्स “तुमच्या ईश्वरशासित नेमणुकीची कदर बाळगा,” या विषयावर बोलले; ते म्हणाले, की प्रेषित पौल, तीमथ्य आणि बर्णबा यांसारख्या काही मिशनऱ्यांना पवित्र आत्मा किंवा काही चमत्कारिक प्रदर्शनाद्वारे देवाकडून नेमणुका मिळाल्या होत्या, आणि गिलियड प्रशिक्षित मिशनऱ्यांना जगव्याप्त क्षेत्रात ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ एखाद्या ठिकाणी नेमले जाते. (मत्तय २४:४५-४७) मिशनऱ्यांच्या नेमणुकींची तुलना त्यांनी, मिद्यानी लोकांविरुद्ध लढावयास गेलेल्या गिदोनच्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी उभे केले होते त्या त्या ठिकाणाशी केली. (शास्ते ७:१६-२१) “तुमच्या ईश्वरशासित मिशनरी नेमणुकीची कदर बाळगा. गिदोनचा प्रत्येक सैनिक जसा ‘आपापल्या ठिकाणी उभा राहिला’ तसेच तुमची नेमणूक तुमचे उभे राहण्याचे ठिकाण आहे असे समजा. यहोवाने जसे गिदोनच्या तीनशे लोकांचा उपयोग करून घेतला त्याचप्रमाणे तो तुमचाही उपयोग करून घेईल असा विश्वास बाळगा,” असे बंधू लिव्हरन्स यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
लोकांकडे लक्ष दिल्याने आनंद मिळतो
टेहळणी बुरूज नियतकालिकाने एकदा असे म्हटले होते: “टिकण्याची निश्चितता नसलेल्या सद्य व्यवस्थीकरणातील उत्पादित चीजवस्तू व उपकरणांची जिज्ञासा वाढवून व त्यांच्याभोवती आपले जीवन उभारण्याऐवजी, लोकांबद्दल खरी आस्था बाळगणे व इतरांसाठी काही करण्यात खरा आनंद मिळवण्यास शिकणे किती उत्तम व सुज्ञपणाचे आहे.” याच्या सुसंगतेत, गिलियड प्रशालेच्या शिक्षकांपैकी एक, बंधू मार्क न्यूमर यांनी विद्यार्थ्यांच्या एका गटाबरोबर क्षेत्र सेवेतील त्यांच्या अनुभवांची चर्चा केली व म्हटले: “इतरांबद्दल व्यक्तिगत आस्था दाखवल्याने तुम्ही उत्तम मिशनरी बनाल.”
विदेशी क्षेत्रात आनंद मिळण्याच्या गुरुकिल्ल्या
मिशनरी कार्यात यश आणि आनंद मिळण्याच्या काही गुरुकिल्ल्या कोणत्या आहेत? सेवा विभागाचे चार्ल्स वूडी आणि लॅटिन अमेरिकेत पूर्वी मिशनरी म्हणून काम केलेले तसेच शिक्षण समितीचे सहायक हेराल्ड जॅकसन यांनी, शाखा सेवकांसाठी असलेल्या नवव्या प्रशालेसाठी आलेल्या विविध शाखा समितीच्या सदस्यांची मुलाखत घेतली. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा नमुना खालीलप्रमाणे आहे:
झांबियाहून आलेले अल्बर्ट मुसोन्ड म्हणाले: “एक मिशनरी जेव्हा स्वतःहून बांधकांकडे जाऊन त्यांना अभिवादन करतो तेव्हा तेथे एक उभारणीकारक आत्मा तयार होतो कारण मग बंधूजन व मिशनरी हे एकमेकांच्या समीप येतील.”
ग्वातेमालाचे रोलॅन्डो मोरल्स यांनी नवीन मिशनऱ्यांना सूचना दिली, की क्षेत्रातील काही स्नेही लोक पेय देतात तेव्हा ते दयाळूपणे व हुशारीने त्यांना म्हणू शकतात की, “मी ह्या देशात नवीनच आलो आहे. मला घ्यायला काही हरकत नाही, पण अजूनतर मला इथल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींची तुमच्यासारखी सवय झालेली नाही. थोड्या दिवसांनी सवय तर होईल मग मला घ्यायला काही हरकत नसणार.” अशा दयाळूपणे दिलेल्या उत्तराचा परिणाम काय असतो? “लोकांना वाईट वाटत नाही आणि मिशनरीसुद्धा इतरांबरोबर दयाळूपणे वागू शकतात.”
कोणती गोष्ट मिशनऱ्यांना आपल्या नेमणुकीत राहावयास साहाय्य करू शकेल? गिलियडच्या ७९ व्या वर्गाचे पदवीधर, आणि गेल्या १२ वर्षांपासून लायबेरियात सेवा करणारे बंधू पॉल क्रूड्स म्हणाले: “पालकांना आपल्या मुलांची आठवण येते हे मला माहीत आहे. पण असे होते की, मिशनरी जेव्हा दुसऱ्या एका देशात जातो तेव्हा तेथील वातावरणाशी, संस्कृतीशी आणि लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला कदाचित सर्वकाही सोडून पुन्हा जावेसे वाटेल. आणि यातच त्याला घरून एखादे पत्र येते, ‘आम्हाला तुझी खूप आठवण येते; तुझ्याविना आमचं कसं होणार माहीत नाही;’ बस्स, सामानसुमान बांधून आपल्या घरी जाण्यासाठी त्याला कारण मिळू शकतं. त्यासाठी आज येथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी ही गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाची आहे.”
मुलाखतींनंतर, कार्यक्रमातील शेवटले भाषण नियमन मंडळाचे सदस्य बंधू थिओडोर झरॅक्स यांचे होते. “राज्याला तुमच्या जीवनात प्रथमस्थानी ठेवा,” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. मिशनरी विचलित न होता आपल्या कार्यावर आपले मन केंद्रित कसे ठेवू शकतात? त्यांनी त्यांना व्यक्तिगत बायबल अभ्यासाचा आराखडा बनवण्यास सांगितला जेणेकरून ते राज्य आस्थांना आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवू शकतात. शिवाय त्यांनी त्यांना ही समयोचित स्मरणिका दिली: “काही मिशनरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांत, ई-मेल आणि संगणक यांमध्ये अतिशय मग्न झाल्यामुळे त्यांनी आपल्या व्यक्तिगत अभ्यासाकडे दुर्लक्ष केले आहे. कोणत्याही साधनाचा उपयोग करण्यात समतोल राखण्याबाबत तसेच देवाच्या वचनाच्या आपल्या व्यक्तिगत अभ्यासावर अतिक्रमण करू शकणाऱ्या गोष्टींवर बेसुमार वेळ खर्च न करण्याबाबत आपल्याजवळ उचित विचारशक्ती असली पाहिजे.”
बंधू झरॅक्स यांच्या भाषणानंतर, डिप्लोमा सादर करण्याची व वर्गाकडून आलेले गुणग्राहकतेचे पत्र वाचून दाखवण्याची वेळ आली. वर्ग प्रतिनिधीने अशाप्रकारे सर्वांच्या भावना व्यक्त केल्या: “येशूने म्हटले होते, की प्रेम त्याच्या शिष्यांचे ओळखचिन्ह असेल आणि त्याच प्रेमाचा प्रत्यक्ष पुरावा आम्ही पाहिला; यामुळे, आम्ही कोठेही असलो तरी, एक प्रेमळ, स्नेही मातेसमान संघटना आम्हाला आधार देते अशी आमची खात्री झाली आहे. या आधारामुळेच आम्ही पृथ्वीच्या कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहोत.” गिलियडच्या १०४ वर्गाच्या पदवीदानाच्या आनंदी दिवसाचा समारोप हेलावणारा होता.
[२४ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ९
नेमलेले देश: १६
एकूण विद्यार्थी: ४८
विवाहित जोडप्यांची संख्या: २४
सरासरी वय: ३३
सत्यात सरासरी वर्षे: १६
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२
[२५ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधारकांचा १०४ वर्ग
खालील यादीत, पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आलेली आहेत
(१) रोमेरो, एम.; हॉवर्थ, जे.; ब्लॅकबर्न-केन, डी.; होहेनगॅसर, ई.; वेस्ट, एस.; थॉम, एस. (२) कोलोन, डब्ल्यू.; ग्लान्सी, जे.; कोनो, वाय.; ड्रूज, पी.; टॉम, एस.; कोनो, टी. (३) टॉम, डी.; झेकमिस्टर, एस.; गर्डल, एस.; एलवेल, जे.; डनेक, पी.; टिबडो, एच. (४) टेलर, ई.; हिल्ड्रेड, एल.; सॅनचेस, एम.; ॲन्डरसन, सी.; बकनॉर, टी.; होहेनगॅसर, ई. (५) हॉवर्थ, डी.; वॉर्ड, सी.; हिन्च, पी.; मॅकडॉनल्ड, वाय.; सॅनचेस, टी.; थॉम, ओ. (६) ड्रूज, टी.; टिबडो, ई.; एलवेल, डी.; डनेक, डब्ल्यू.; ब्लॅकबर्न-केन, डी.; वॉर्ड, डब्ल्यू. (७) ॲन्डरसन, एम.; झेकमिस्टर, आर.; मॅकडॉनल्ड, आर.; बकनॉर, आर.; ग्लान्सी, एस.; गर्डल, जी. (८) रोमेरो, डी.; हिन्च, आर.; हिल्ड्रेड, एस.; टेलर, जे.; कोलोन, ए.; वेस्ट, डब्ल्यू.
[२६ पानांवरील चित्र]
गिलियडच्या १०४ वर्गाचे काही शिक्षक बांधव: (डावीकडून) डब्ल्यू. लिव्हरन्स, यू. ग्लास, के. ॲड्म्स, एम. न्यूमर