जागृत राहणारे ते धन्य!
“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. . . . जो जागृत राहतो व आपली [बाह्य] वस्त्रे राखतो तो धन्य.”—प्रकटीकरण १६:१५.
१. यहोवाचा दिवस जवळ असल्यामुळे आपण काय अपेक्षा करू शकतो?
यहोवाचा महान दिवस जवळ येऊन ठेपला आहे, व याचा अर्थ युद्ध होणार! प्रेषित योहानाने दृष्टान्तात, बेडकासमान “भुतांचे आत्मे” सर्व पृथ्वीच्या ‘राजांकडे’ किंवा सत्ताधीशांकडे जात असलेले पाहिले. कशासाठी? तर, “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस एकत्र करावयास”! पुढे योहानाने म्हटले: “त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.”—प्रकटीकरण १६:१३-१६.
२. मागोगचा गोग कोण आहे, आणि यहोवाच्या लोकांवर तो हल्ला चढवील तेव्हा काय घडेल?
२ लवकरच, यहोवा या व्यवस्थीकरणाच्या राजकीय घटकाला मोठ्या बाबेलीचा अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा नाश करण्यास प्रवृत्त करील. (प्रकटीकरण १७:१-५, १५-१७) मग, पृथ्वीच्या परिसरात टाकलेला मागोगचा गोग, दियाबल सैतान आपले सैन्य एकत्र करून यहोवाच्या शांतीमय, असुरक्षित भासणाऱ्या लोकांवर संपूर्णपणे हल्ला चढवील. (यहेज्केल ३८:१-१२) परंतु, आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी देव पुढे सरसावेल. तेच, ‘यहोवाच्या महान व भयंकर दिवसाच्या’ आरंभाचे चिन्ह असेल.—योएल २:३१; यहेज्केल ३८:१८-२०.
३. यहेज्केल ३८:२१-२३ मध्ये भाकीत केलेल्या घटनांचे वर्णन तुम्ही कसे द्याल?
३ होय, हर्मगिदोन किंवा अर्मगिद्दोन म्हटल्या जाणाऱ्या जागतिक स्थितीला पोहंचल्यावर, यहोवा आपल्या लोकांना वाचवेल आणि सैतानाच्या व्यवस्थीकरणाचा मागमूसही राहू देणार नाही. यहेज्केल ३८:२१-२३ मधील भविष्यसूचक शब्द वाचा आणि ते दृश्य मनासमोर उभे करा. यहोवा आपल्या शक्तीने मुसळधार पावसाची वृष्टी करतो, विनाशकारी गारा पाडतो, अग्नी वर्षावतो, घातक मरी पसरवतो. गोगच्या सैन्यात गोंधळ माजवून ते एकमेकांविरुद्ध लढू लागतात तेव्हा जगभर हुल्लड माजते. अलौकिक माध्यमांचा उपयोग करून यहोवा आपल्या सेवकांना वाचवत असता सर्वशक्तिमान देवाच्या उरलेल्या शत्रुंचा नायनाट केला जातो. पूर्वभाकीत “मोठे संकट” येऊन गेल्यावर सैतानाच्या अभक्त व्यवस्थीकरणाचे नामोनिशाण राहिलेले नसेल. (मत्तय २४:२१) तथापि, मरणाला टेकलेले असतानाही, आपल्या विपत्तीसाठी कोण जबाबदार आहे हे दुष्टांना कळेल. आपला विजयी देव स्वतः म्हणतो: “तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्वर [“यहोवा,” NW] आहे.” या असाधारण घटना आपल्या दिवसांमध्ये अर्थात येशूच्या उपस्थितीच्या वेळी घडतील.
चोराप्रमाणे येणे
४. येशू या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करावयास कसा येणार?
४ वैभवी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला: “पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन.” चोरासमान येणे अचानक, अनपेक्षित समयी म्हणजे जेव्हा बहुतांश लोक झोपेत असतील तेव्हा घडेल. जेव्हा येशू या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्यासाठी चोरासारखा येईल तेव्हा खरोखर जागृत असलेल्यांचाच तो बचाव करील. त्याने योहानाला म्हटले: “आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली [बाह्य] वस्त्रे राखतो तो धन्य.” (प्रकटीकरण १६:१५) त्या शब्दांचा अर्थ काय आहे? तसेच, आपण आध्यात्मिकरित्या जागृत कसे राहू शकतो?
५. येशू पृथ्वीवर होता त्यावेळी मंदिराच्या सेवेची काय व्यवस्था होती?
५ सर्वसाधारणपणे, एखाद्या पहारेकऱ्याला कामावर असताना डुलकी लागली, तर त्याचे कपडे उतरवले जाणार नाहीत. पण येशू पृथ्वीवर होता आणि जेरूसलेमच्या मंदिरात याजक आणि लेव्यांचे वर्ग सेवा करायचे तेव्हा त्या जेरूसलेमच्या मंदिरात अगदी हेच घडायचे. सा. यु. पू. ११ व्या शतकात, राजा दावीदाने, इस्राएलच्या शेकडो याजकांची व त्यांच्या हजारो लेवीय सहायकांची व्यवस्था करून २४ वर्ग असलेले एक मंडळ तयार केले. (१ इतिहास २४:१-१८) एका वेळी, एक हजार प्रशिक्षित कामकऱ्यांचा एक वर्ग, वर्षातून दोनदा तरी संपूर्ण आठवड्यासाठी मंदिरातील सेवेच्या सर्व गोष्टींची काळजी घेत असे. परंतु, मंडपांच्या सणाच्या दरम्यान सर्व २४ वर्ग कामासाठी हजर असत. वल्हांडणाच्या सणांकरता अतिरिक्त मदत देखील लागायची.
६. “जो जागृत राहतो व आपली [बाह्य] वस्त्रे राखतो तो धन्य” असे येशूने म्हटले तेव्हा त्याने काय सुचवले असावे?
६ “जो जागृत राहतो व आपली [बाह्य] वस्त्रे राखतो तो धन्य” असे येशूने म्हटले तेव्हा, मंदिरात पहारेकऱ्याचे काम कराव्या लागणाऱ्या त्याकाळच्या पद्धतीविषयी तो बोलत असावा. यहुदी मिशना म्हणतो: “मंदिरातल्या तीन जागांची याजक रखवाली करत: अब्टीनासचा कक्ष, ज्वालेचा कक्ष आणि शेकोटीचा कक्ष; त्याचप्रमाणे लेवी एकवीस ठिकाणी असत: मंदिरातील उंचावर असलेल्या पाच दरवाजांवर पाचजण, त्याच्या आतील बाजूस चार कोपऱ्यांवर चारजण, मंदिराच्या अंगणातील पाच दरवाजांवर पाचजण, त्याच्या बाहेरील बाजूस चार कोपऱ्यांवर चारजण आणि अर्पणाच्या कक्षावर एक, पडद्याच्या कक्षावर एक, दयासनाच्या मागील बाजूस एक [परम पवित्र स्थानाच्या मागील भिंतीच्या बाहेरील बाजूस]. मंदिरातील उंचावरचा अधिकारी, आपल्या समोर जळती मशाल घेऊन प्रत्येक पहारेकऱ्याजवळ जात असे, आणि त्यांतील कोणा एका पहारेकऱ्याने उठून ‘हे मंदिरातील उंचावरचा अधिकारी, तुजबरोबर शांती असो!’ असे त्याला म्हटले नाही, आणि पहारेकरी झोपलेला आहे हे सिद्ध झाल्यावर तो त्याला आपल्या काठीने मारीत असे आणि त्याचे वस्त्र जाळून टाकण्याचा अधिकार त्याला होता.”—हर्बट डॅनबाय यांनी अनुवादित केलेले द मिशना, मिडोथ (“मापे”), १, परिच्छेद १-२.
७. मंदिरात पहाऱ्यावर असणाऱ्या याजकांना व लेव्यांना जागृत राहण्याची गरज का होती?
७ सेवक वर्गातील पुष्कळ लेवी आणि याजक, राखण करण्यासाठी आणि मंदिराच्या अंगणात कोणा अशुद्ध व्यक्तीला प्रवेश करू न देण्यासाठी संपूर्ण रात्र जागे राहत असत. “मंदिरातील उंचावरचा अधिकारी” किंवा “मंदिराचा प्रमुख” रात्रीच्या पहाऱ्यादरम्यान सबंध २४ ठिकाणी फेऱ्या मारीत असल्यामुळे पहारेकऱ्याला आपण पकडले जाऊ नये असे वाटत असल्यास, त्याला आपल्या ठिकाणी जागृत राहणे आवश्यक होते.—प्रेषितांची कृत्ये ४:१.
८. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीची लाक्षणिक बाह्य वस्त्रे कोणती आहेत?
८ अभिषिक्त ख्रिश्चनांना आणि त्यांच्या सहसेवकांना आध्यात्मिकरित्या जागृत राहून आपली लाक्षणिक बाह्य वस्त्रे सांभाळणे आवश्यक आहे. यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात आपल्याला सेवेकरता नियुक्त केले आहे याचे हे बाह्य पुरावे आहेत. हे ओळखून, राज्य उद्घोषक या नात्याने आपले कर्तव्य आणि सुहक्क पार पाडण्यामध्ये आपली मदत करण्यासाठी आपल्याकडे देवाचा पवित्र आत्मा किंवा कार्यकारी शक्ती आहे. देवाचे सेवक या नात्याने आपल्या कामाच्या ठिकाणी झोपी गेल्यामुळे, येशू ख्रिस्त अर्थात मोठ्या आध्यात्मिक मंदिराचा प्रमुख आपल्याला पकडेल असा धोका आहे. त्या वेळी आपण आध्यात्मिकरित्या झोपलेले असल्यास, लाक्षणिकरित्या आपली वस्त्रे उतरवण्यात येतील आणि आपली ही लाक्षणिक वस्त्रे जाळण्यात येतील. म्हणून आपण आध्यात्मिकरित्या जागृत कसे राहू शकतो?
आपण जागृत कसे राहू शकतो
९. ख्रिस्ती प्रकाशनांच्या साहाय्याने बायबलचा अभ्यास करणे इतके महत्त्वपूर्ण का आहे?
९ ख्रिस्ती प्रकाशनांच्या साहाय्याने शास्त्रवचनांचा परिश्रमपूर्वक अभ्यास आपल्याला आध्यात्मिकरित्या जागे ठेवण्यास उत्तेजक आहे. अशाप्रकारचा अभ्यास आपल्याला सेवेकरता सज्ज करील, संकटप्रसंगांना तोंड देण्यास मदत करील आणि अनंतकालिक आनंदाचा मार्ग आपल्याला दाखवील. (नीतिसूत्रे ८:३४, ३५; याकोब १:५-८) आपला अभ्यास पक्का आणि प्रगतीशील असला पाहिजे. (इब्री लोकांस ५:१४—६:३) नियमितरित्या सकस आहार घेतल्याने आपल्याला जागृत आणि दक्ष राहण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे कुपोषणाचे चिन्ह असणारा आळस आपल्याला जाणवणार नाही. आपल्याला आध्यात्मिकरित्या कुपोषित आणि झोपेत असण्याची गरज नाही कारण देव, अभिषिक्त ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाकरवी’ आध्यात्मिक भोजनाची विपुल तरतूद करत आहे. (मत्तय २४:४५-४७) जागृत राहण्याचा आणि ‘विश्वासात खंबीर होण्याचा’ एक मार्ग म्हणजे, व्यक्तिगत आणि कौटुंबिक अभ्यासाद्वारे नियमाने आध्यात्मिक भोजन सेवन करणे.—तीत १:१४.
१०. ख्रिस्ती सभा, संमेलने आणि अधिवेशने आपल्याला आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास कशी मदत करतात?
१० ख्रिस्ती सभा, संमेलने आणि अधिवेशने आपल्याला आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास मदत करतात. ‘एकमेकांना प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन देण्यासाठी’ ते प्रोत्साहन आणि संधी देतात. विशेषतः, “तो दिवस . . . जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते” तसे आपण नियमितपणे एकत्रित झाले पाहिजे. तो दिवस आता निश्चितच जवळ आला आहे. “यहोवाचा दिवस” येईल त्यावेळी तो आपल्या सार्वभौमत्वाचे समर्थन करील. आपण ‘एकत्र मिळणे सोडणार नाही’ विशेषतः आपल्याकरता तो दिवस महत्त्वपूर्ण असल्यास आणि तो महत्त्वपूर्ण असलाच पाहिजे.—इब्री लोकांस १०:२४, २५; २ पेत्र ३:१०.
११. ख्रिस्ती सेवाकार्य आध्यात्मिकरित्या जागृत अवस्थेकरता अत्यावश्यक आहे असे का म्हटले जाऊ शकते?
११ ख्रिस्ती सेवाकार्यात संपूर्ण अंतःकरणाने घेतलेला सहभाग आध्यात्मिकरित्या जागृत अवस्थेकरता अत्यावश्यक आहे. सुवार्तेचा प्रचार करण्यामध्ये नियमित व आवेशी भाग असल्यामुळे आपण दक्ष असतो. आपल्या सेवाकार्यामुळे लोकांसोबत देवाच्या वचनाबद्दल, त्याच्या राज्याबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल बोलण्यास आपल्याला पुष्कळ संधी प्राप्त होतात. घरोघरी जाऊन प्रचार करणे, पुनर्भेटी करणे आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान यासारख्या प्रकाशनांच्या साहाय्याने गृह बायबल अभ्यास चालवणे समाधानकारक आहे. पौलाने “चार लोकांत व घरोघरी” जाऊन शिकवले यास प्राचीन इफिसस येथील वडील पुष्टी देऊ शकत होते. (प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१) अर्थात, यहोवाच्या काही विश्वासू साक्षीदारांना गंभीर स्वास्थ्य समस्यांमुळे आपल्या सेवाकार्यात थोडीफार दिक्कत होते, पण यहोवाविषयी आणि त्याच्या राजपदाविषयी इतरांना सांगण्याचे इतर मार्ग ते शोधून काढतात आणि तसे करण्यात त्यांना भरपूर आनंद मिळतो.—स्तोत्र १४५:१०-१४.
१२, १३. कोणत्या कारणांसाठी आपण खाण्यापिण्यात अतिरेक करू नये?
१२ खाण्यापिण्याविषयी अतिरेक न केल्याने आपल्याला आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास मदत मिळते. आपल्या उपस्थितीविषयी बोलताना येशूने स्वतःच्या प्रेषितांना आर्जवले: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित् अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.” (लूक २१:७, ३४, ३५) खादाडपणा आणि दारूबाजी बायबल तत्त्वांच्या अगदीच विरोधात आहेत. (अनुवाद २१:१८-२१) नीतिसूत्रे २३:२०, २१ म्हणते: “मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको; कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो.”—पडताळा, नीतिसूत्रे २८:७.
१३ तथापि, अधाशीपणा आणि दारूबाजी अगदी टोकाला गेली नसली, तरी त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुंगी येऊ शकते, एवढेच नव्हे तर तो आळशी आणि देवाची इच्छा करण्यामध्ये हलगर्जी देखील होऊ शकतो. साहजिकच, कौटुंबिक जीवन, स्वास्थ्य वगैरे गोष्टींची चिंता तर असणारच. तरीही, आपण आपल्या जीवनात राज्य हितांना प्रथमस्थानी ठेवले तर आपण खूष असू आणि आपला स्वर्गीय पिता आपल्याला सर्वकाही पुरवेल असा आत्मविश्वास आपल्याला असेल. (मत्तय ६:२५-३४) नाहीतर, “तो दिवस” आपल्यावर “पाशाप्रमाणे” येईल, कदाचित बेमालूमपणे जखडणाऱ्या अनपेक्षित सापळ्याप्रमाणे किंवा अजाण प्राण्यांना आधी आकर्षित करून मग त्यांना पकडणाऱ्या आमिषयुक्त सापळ्याप्रमाणे. पण आपण जागृत राहिलो आणि ‘अंतसमयात’ जगत आहोत याची पूर्ण जाणीव आपल्याला असली, तर असे कदापि घडणार नाही.—दानीएल १२:४.
१४. आपण कळकळीची प्रार्थना का करत राहावी?
१४ कळकळीची प्रार्थना आध्यात्मिक जागृत अवस्थेकरता आणखी एक मदत आहे. येशूने आपल्या मोठ्या भविष्यवाणीत पुढे असे आर्जवले: “तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.” (लूक २१:३६) होय, आपण सतत यहोवाच्या बाजूला राहू या आणि मनुष्याचा पुत्र, येशू ह्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्यास येईल तेव्हा आपली स्वीकृत भूमिका असावी अशी आपण प्रार्थना करू या. आपल्या तसेच आपण ज्यांविषयी प्रार्थना करतो त्या आपल्या सहविश्वासूंच्या कल्याणाकरता “उपकारस्तुति करत जागृत” राहण्याची आपल्याला आवश्यकता आहे.—कलस्सैकर ४:२; इफिसकर ६:१८-२०.
वेळ निघून जात आहे
१५. नीतिमत्त्वाचे उद्घोषक या नात्याने आपल्या सेवेद्वारे काय साध्य केले जाते?
१५ यहोवाच्या महान दिवसाची वाट पाहत असता, त्याच्या सेवेत होता होईल तितके करण्याची इच्छा आपल्याला निःसंशये असेल. याविषयी आपण त्याच्याकडे कळकळीने प्रार्थना केल्यास, “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” आपल्यासाठी उघडले जाईल. (१ करिंथकर १६:८, ९) देवाच्या नियुक्त समयी, येशू न्याय करील आणि सार्वकालिक जीवनास योग्य असणाऱ्या नीतिमान ‘मेंढरांना’ तो अनंतकालिक नाशास पात्र असलेल्या अभक्त ‘शेरडांपासून’ वेगळे करील. (योहान ५:२२) मेंढरांना शेरडांपासून वेगळे करण्याचे काम आपले नव्हे. पण, नीतिमत्त्वाचे उद्घोषक अशी आपली ही सेवा, लोकांना देवाच्या सेवेला समर्पित असलेले जीवन निवडण्याची आता संधी देऊन येशू “आपल्या वैभवाने . . . येईल” तेव्हा जीवनाकरता त्यांना राखले जाण्याची आशा देत आहे. या व्यवस्थीकरणासाठी संक्षिप्त काळ उरलेला असल्यामुळे, आपण ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांचा’ शोध घेत असता संपूर्ण अंतःकरणाने कार्य करण्याची गरज आणखीनच वाढते.—मत्तय २५:३१-४६; प्रेषितांची कृत्ये १३:४८.
१६. आपण आवेशी राज्य उद्घोषक का असावे?
१६ नोहाच्या दिवसातील जगासाठी वेळ थांबला नाही, आणि लवकरच या व्यवस्थीकरणासाठी देखील वेळ थांबणार नाही. म्हणून आपण आवेशी राज्य उद्घोषक बनू या. आपल्या प्रचाराचे कार्य प्रगतीपथावर आहे कारण दर वर्षी लाखो जण देवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेत आहेत. ते यहोवाच्या आशीर्वादित संघटनेचा भाग बनत आहेत, अर्थात “त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप.” (स्तोत्र १००:३) ‘यहोवाच्या महान व भयंकर दिवसाआधी’ पुष्कळांना आशा देणाऱ्या राज्य-प्रचाराच्या कार्यात सहभाग घेणे किती हर्षप्रद आहे!
१७, १८. (अ) प्रचार करत असताना, काहींकडून आपण कशाप्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करावी? (ब) थट्टेखोरांचे निश्चितच काय होईल?
१७ नोहाप्रमाणे, आपल्यालाही देवाचा पाठिंबा आणि त्याचे संरक्षण आहे. होय, लोकांनी, देह धारण केलेल्या देवदूतांनी आणि नफिलीमांनी नोहाच्या संदेशाची थट्टा केली असेल, पण म्हणून तो काही थांबला नाही. आपण ‘शेवटल्या काळात’ जगत असल्याचा भरमसाट पुरावा लोकांना दाखवतो तेव्हा आज काहीजण आपली थट्टा करतात. (२ तीमथ्य ३:१-५) असा हा उपहास, ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयी असलेल्या बायबलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आहे, कारण पेत्राने लिहिले: “स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे [उपस्थितीचे] वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हांपासून सर्व कांही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (तिरपे वळण आमचे.)—२ पेत्र १:१६; ३:३, ४.
१८ सद्य काळातील थट्टेखोर लोक विचार करतील: ‘निर्मितीपासून काहीच बदललेलं नाही. खाणं-पिणं, लग्न करणं, कुटुंब वाढवणं असे हे जीवन चालतच आहे. येशू उपस्थित असला तरीही, निदान माझ्या काळात तरी तो न्याय करणार नाही.’ हा त्यांचा केवढा भ्रम आहे! दरम्यान, इतर कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही, तर नोहाच्या दिवसातील दुष्ट पिढीचा, प्रलयात संकटमय नाशाद्वारे अंत झाला त्याचप्रमाणे यहोवाच्या भयंकर दिवशी त्यांचा मुळीच निभाव लागणार नाही.—मत्तय २४:३४.
निश्चितपणे जागृत राहा!
१९. शिष्य बनवण्याच्या आपल्या कार्यहालचालींकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
१९ आपण यहोवाला समर्पित असल्यास, अनुचित कारणमीमांसेद्वारे झोपेचा अंमल आपल्यावर कधीच चढू नये. ही, जागृत राहण्याची, ईश्वरी भविष्यवाणीवर विश्वास प्रदर्शित करण्याची आणि “सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य” करण्याची कामगिरी पार पाडण्याची वेळ आहे. (मत्तय २८:१९, २०) या व्यवस्थीकरणाचा कायमचा अंत होणार असल्यामुळे येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली यहोवा देवाची सेवा करणे आणि अंत येण्याआधी “राज्याची ही सुवार्ता” प्रचार करण्याच्या जागतिक कार्यात सहभागी होणे यापेक्षा इतर कोणताही मोठा सुहक्क असणार नाही.—मत्तय २४:१४; मार्क १३:१०.
२०. कालेब आणि यहोशवाने कोणते उदाहरण मांडले आणि त्यांचे मार्गाक्रमण आपल्याला काय सुचवते?
२० यहोवाचे काही लोक कित्येक दशकांपासून कदाचित सबंध आयुष्यभर त्याची सेवा करत आले आहेत. आपण अलीकडेच खरी उपासना स्वीकारली असली, तरीही ‘यहोवाला पूर्णपणे अनुसरलेल्या’ इस्राएली कालेबासारखे आपण असू या. (अनुवाद १:३४-३६) इजिप्तच्या बंदिवासातून इस्राएलची सुटका झाल्याच्या काही काळानंतरच तो व यहोशवा वाग्दत्त देशात प्रवेश करण्यास पूर्णपणे तयार होते. तथापि, सर्वसाधारण प्रौढ इस्राएली लोकांचा विश्वास नसल्यामुळे ते ४० वर्षे अरण्यात भटकत राहिले आणि तेथेच मरण पावले. कालेब आणि यहोशवाने त्या काळादरम्यान त्यांच्यासोबत सगळ्या अडचणी सहन केल्या पण सरतेशेवटी त्या दोघांनीही वाग्दत्त देशात प्रवेश केला. (गणना १४:३०-३४; यहोशवा १४:६-१५) आपण ‘पूर्णपणे यहोवाला अनुसरले’ आणि आध्यात्मिकरित्या जागृत राहिलो, तर देवाच्या वचनयुक्त नवीन जगात प्रवेश करण्याचा आनंद आपल्यालाही लाभेल.
२१. आपण आध्यात्मिकरित्या जागृत अवस्थेत असल्यास, आपला अनुभव काय असेल?
२१ आपण अंतसमयात जगत असून यहोवाचा महान दिवस जवळ येऊन ठेपला आहे असे पुराव्यावरून स्पष्ट दिसते. ही झोपी जाण्याची आणि ईश्वरी इच्छा करण्यात हलगर्जीपणा करण्याची वेळ नाही. आपण आध्यात्मिकरित्या जागृत अवस्थेत राहून ख्रिस्ती सेवक व यहोवाचे दास अशी ओळख पटविणारे आपले वस्त्र राहू दिले, तरच आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. ‘सावध, विश्वासात स्थिर, मर्दासारखे आणि खंबीर होण्याचा’ आपला निर्धार असू द्या. (१ करिंथकर १६:१३) यहोवाचे सेवक या नात्याने आपण सर्वजण खंबीर आणि धीट असू या. मग यहोवाच्या महान दिवसाचा तडाखा बसेल तेव्हा आपण तयारीत असलेल्यांपैकी व जागृत राहणाऱ्या आनंदी लोकांमध्ये विश्वासाने सेवा करणाऱ्यांपैकी असू.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ आपल्या लाक्षणिक बाह्य वस्त्रांचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल आणि आपण त्यांस कसे राखू शकतो?
◻ आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
◻ आपण थट्टेखोरांची अपेक्षा का धरावी आणि त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
◻ या शेवटल्या दिवसात आपल्या शिष्य बनवण्याच्या कार्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]
जागृत राहण्यास व आपापली कार्ये पार पाडण्यास ख्रिश्चनांना देवाच्या पवित्र आत्म्याची मदत मिळते
[१५ पानांवरील चित्र]
आध्यात्मिकरित्या जागृत अवस्थेत राहून तुमची लाक्षणिक बाह्य वस्त्रे राखण्याचा निर्धार तुम्ही केला आहे का?