तुम्ही तुमच्या प्रार्थना समृद्ध कशा बनवाल?
प्रार्थना यहोवा देवाच्या प्रेमळ तरतुदींमध्ये अद्वितीय आहे. विरोधक तुमचे बायबल हिरावून घेऊ शकतात किंवा तुम्हाला सहउपासकांसोबत एकत्र येण्यास प्रतिबंध घालू शकतात. परंतु, प्रार्थना करण्यापासून कोणीही तुम्हाला वंचित करू शकत नाही. प्रार्थना अतिशय मौल्यवान आहेत. तर मग, आपण प्रत्येकाने या विशेषाधिकाराचा पूर्णपणे आनंद व लाभ घेणे किती महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रार्थना समृद्ध बनवण्यासाठी तुम्हाला काय मदत करू शकेल?
बायबल हे प्रार्थनेचे पुस्तक नाही. तरीसुद्धा त्याचे वर्णन प्रार्थनेचे मानवजातीचे सर्वात महान पाठ्यपुस्तक असे केले जाऊ शकते. केवळ इब्री शास्त्रवचनातच सुमारे १५० प्रार्थना आहेत. काही लहान तर काही लांबलचक आहेत. त्या सार्वजनिक किंवा खाजगीरित्या म्हटल्या होत्या. त्या राजे किंवा कैदी, विजयी झाल्यावर अथवा क्लेश सहन करत असताना म्हटल्या जात होत्या. दाविदाने स्तोत्र ६५:२ मध्ये गायिले त्याप्रमाणे, ‘सर्व मानवजात प्रार्थना ऐकणाऱ्या’ यहोवा देवाकडे येते. देवाने, बायबलच्या लेखकांना प्रार्थनांचा इतका विस्तारित संग्रह नमूद करून ठेवण्यास प्रेरित का केले असावे बरे?
त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी २ तीमथ्य ३:१६ या वचनाचा विचार करा. ते म्हणते: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख . . . उपयोगी आहे.” अशाप्रकारे, शास्त्रवचनीय भविष्यवाद, तत्त्वे आणि इतिहास यांच्याप्रमाणेच बायबलमधील प्रार्थना आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आहेत. या प्रार्थना आपल्या लाभास्तव कशा असू शकतात?
शास्त्रवचनीय प्रार्थनांचे जवळून परीक्षण केल्यावर त्या आपल्यासारख्याच परिस्थितीत म्हटलेल्या प्रार्थना आहेत हे आपण ओळखू शकतो. प्रार्थनांचा उद्देश आणि कोणत्या पार्श्वभूमीत त्या केल्या होत्या त्याच्या विविधतेविषयी आपण शिकू शकतो. शिवाय, आपल्याला स्तुती आणि उपकाराचे नवे शब्द दिसतील व त्यामुळे आपल्याला आपल्या प्रार्थना आणि विनंत्यांसाठी नवनवे शब्द मिळतील. थोडक्यात सांगायचे म्हणजे, बायबलमधील प्रार्थना आपल्याला स्वतःच्या प्रार्थना समृद्ध करण्यास मदत करू शकतात.
येशूची आई झालेल्या मरीयेलादेखील बायबलमध्ये नमूद केलेल्या प्रार्थनेत वापरण्यात आलेल्या शब्दांचा लाभ झाला. मरीया आणि तिची नातेवाईक अलीशिबा या दोघींना ईश्वरी साहाय्याने पुत्रगर्भ राहिल्यावर मरीयेने अलीशिबाला भेट दिली. मरीयेने देवाची स्तुती करून उपकार मानले. आणि तिने उद्गारलेले काही शब्द इब्री शास्त्रवचनातील एका प्रार्थनेतील शब्दांशी उल्लेखनीयरीत्या समांतर आहेत. असे दिसते की, संदेष्टा शमुवेलाची आई हन्नाने प्रार्थनेत जे उद्गार काढले त्या शब्दांशी मरीया परिचित असावी. १,००० वर्षांपूर्वी हन्नाला देखील देवाच्या मदतीने पुत्रगर्भ राहिला होता. मरीयेने कदाचित या प्रार्थनेचे मनन केले नसावे का, कारण यामध्ये तिच्या स्वतःच्या भावना प्रतिबिंबित होत होत्या?—१ शमुवेल २:१-१०; लूक १:४६-५५.
तुमच्याविषयी काय? तुमच्यासारख्याच परिस्थितीत म्हटलेली बायबलमधील एखादी प्रार्थना तुम्हाला आठवते का? अशा प्रार्थना शोधणे, त्यांचे वाचन करणे आणि त्यावर मनन केल्याने देवासोबतचे तुमचे दळणवळण समृद्ध करण्यास तुम्हाला मदत होईल. पुढील लेखात, आम्ही तुम्हाला पवित्र शास्त्रवचनातील तीन प्रार्थनांचे परीक्षण करण्याचे आमंत्रण देत आहोत. त्या प्रार्थना वेगवेगळ्या प्रसंगी म्हणण्यात आल्या होत्या कदाचित तुमच्याप्रसंगासारखेच ते असावेत.