तुमचा धर्म कधीही त्याग करू नये असे जहाज?
एक जहाज तुफानात अडकले आहे. त्यावरचे खलाशी जे त्यांचे जहाज वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत त्यांना एक नाट्यमय निर्णय घ्यावयाचा आहे: जहाजावरच राहायचे की ते सोडून स्वतःचा जीव वाचवायचा. तुम्हाला माहीत होते का, की ह्या भीतीदायक दृश्याचा उपयोग ईश्वरशास्त्रीय उदाहरण म्हणून केला जातो?
ईश्वरशास्त्रवेत्ते, विशेषकरून कॅथलिक विद्वान, अनेकवेळा त्यांच्या चर्चची तुलना तुफानाचा सामना करणाऱ्या एखाद्या जहाजासोबत करतात. ते म्हणतात, की सुकाणाजवळ येशू किंवा पेत्र आहेत असे हे जहाज उद्धाराच्या एकमात्र मार्गाला चित्रित करते. पाळकांची भूमिका अशी आहे: ‘जहाजाला कधीही सोडून देऊ नये. चर्चने पूर्वी अतिशय कठीण प्रसंगांचा अनुभव घेतला आहे, परंतु ते असे एक जहाज आहे की जे इतिहासाच्या सर्व कठीण प्रसंगातून निभावले आहे.’ काही म्हणतात, ‘त्याला का सोडावे बरे? कोणते पर्याय आहेत? त्यातच राहून त्याला संथ पाण्यात नेण्यास मदत का करू नये?’
या लाक्षणिक भाषेच्या सुसंगतेत, सर्व प्रकारच्या धर्माचे अनेक लोक असा तर्क करतात, ‘माझा धर्म अनेक बाबींमध्ये चुकीचा आहे हे मला माहीत आहे परंतु तो एक ना एक दिवस बदलेल अशी मला आशा आहे. मला तो सोडून द्यावयाचा नाही. त्याला त्याच्या अडचणींवर मात करण्यात मदत करण्यासाठी मलाही त्यामध्ये सहभाग घ्यावयास आवडेल.’ अशाप्रकारचे तर्क आपल्या पूर्वजांकडून आलेल्या धर्माबद्दलची प्रामाणिक आपुलकी असल्यामुळे किंवा त्याच्याशी “विश्वासघात” करण्याची भीती असल्यामुळे केले जातात.
याचे अगदी समयोचित उदाहरण हॉन्स कुंग यांचे आहे. ते एक प्रख्यात कॅथलिक भिन्न मताचे ईश्वरशास्त्रवेत्ता आहेत, ज्यांनी त्यावर चिंतन करून म्हटले: “तुफानाच्या वेळी मी ते जहाज सोडून, आजपर्यंत मी ज्यांच्यासोबत प्रवास केला त्यांना वाऱ्याचा सामना करावयास, जहाजातील पाणी बाहेर काढण्यास आणि कदाचित बचावण्यासाठी लढण्यास सोडून द्यावे का?” ते उत्तरले: “मी चर्चमध्ये उपयुक्त असण्याचे सोडून देणार नाही.” “उच्च मूल्यांबद्दल प्रेम राखण्याचे आणि कदाचित अधिक खरे ख्रिस्ती असण्याचे सोडून दिल्यामुळे या चर्चमधून वेगळे होणे” हा आणखी एक पर्याय असू शकतो.—दाय होफनंग बेवारेन पुस्तक.
परंतु, देव त्याच्या कृपेमुळे सर्व धर्मांच्या सुधारणेसाठी एक अमर्यादित समय देईल ही आशा ठेवून एखादी व्यक्ती स्वतःच्या चर्चच्या जहाजात राहू शकते का? हा एक गंभीर प्रश्न आहे. उदाहरणात सूचित केल्याप्रमाणे, संकटात सापडलेल्या जहाजाला घाईघाईने सोडून असुरक्षित प्राणरक्षक नौकेत उतरणे, बुडत जाणाऱ्या जहाजात राहण्याप्रमाणेच अधिक धोकादायक आहे. कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही किंमतीवर चर्चमध्येच राहणे शहाणपणाचे ठरेल का? आज धर्म, सुधारणेच्या कोणत्या आशा सादर करीत आहेत? देव त्यांना त्याच्या इच्छेविरूद्ध कार्य करण्यास आणखी किती काळ अनुमती देईल?