पतित शरीरावरील पापाच्या पकडीबरोबर लढत देणे
“देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.”—रोमकर ८:६.
१. मानवांना कोणत्या उद्देशास्तव निर्माण करण्यात आले होते?
“देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्पत्ती १:२७) प्रतिरूप म्हणजे, एखाद्या वस्तुचे किंवा उगमाचे प्रतिबिंब होय. अशाप्रकारे, मानवांना देवाच्या गौरवाचे प्रतिबिंब होण्याकरता निर्माण केले होते. ईश्वरी गुण—जसे की प्रेम, चांगुलपणा, न्याय, आणि आध्यात्मिकता—त्यांच्या सर्व कामांमध्ये प्रदर्शित करण्याद्वारे मानव, त्यांच्या निर्माणकर्त्याची स्तुती व आदर दाखवतात तसेच, स्वतःला आनंद आणि समाधान प्राप्त करून घेतात.—१ करिंथकर ११:७; १ पेत्र २:१२.
२. पहिल्या मानवी जोडप्याने ते लक्ष्य कसे गमावले?
२ पहिल्या मानवी जोडप्याला परिपूर्ण असे निर्माण केले होते, व ते या भूमिकेला पूर्णपणे सिद्ध असे होते. मोठ्या कुशलतेने तयार केलेल्या चकाकणाऱ्या आरशाप्रमाणे ते, देवाच्या गौरवाला तेजस्वीपणे व तंतोतंतपणे प्रतिबिंबित करण्याच्या पात्रतेचे होते. परंतु, त्यांनी त्यांचा निर्माणकर्ता आणि देव याची बुद्धिपुरस्सरपणे आज्ञाभंग करण्याची निवड केली तेव्हा, मोठ्या कुशलतेने तयार केलेल्या त्या स्वतःला कलंकित होऊ दिले. (उत्पत्ती ३:६) त्यानंतर, ते कधीही देवाच्या गौरवाला परिपूर्णपणे प्रतिबिंबित करू शकले नाही. ते देवाच्या गौरवाला उणे पडले. त्यांनी, देवाच्या प्रतिरूपात निर्माण केल्याचा उद्देश गमावला. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, त्यांनी पाप केले.a
३. पापाचा मूळ स्वभाव काय आहे?
३ हे आम्हाला, पापाचा मुळ स्वभाव समजण्यास मदत करते जे, देवाच्या प्रतिरूपाचे आणि गौरवाचे असलेल्या मानवाच्या प्रतिबिंबाला बिघडविते. पाप मनुष्याला अपवित्र, म्हणजे आध्यात्मिक आणि नैतिक अर्थाने अशुद्ध व कलंकित करते. सर्व मानवजात, आदाम आणि हव्वेचे वंशज असल्यामुळे, कलंकित व अशुद्ध स्थितीत जन्मली, व त्याची मुले अशा देवाच्या अपेक्षेला उणे पडले. याचा परिणाम? पवित्र शास्त्र सांगते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२; पडताळा यशया ६४:६.
पतित शरीरावरील पापाची पकड
४-६. (अ) आज अनेक लोक पापाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? (ब) पापाकडे पाहण्याच्या आधुनिक दृष्टिकोनाचा कोणता परिणाम आहे?
४ आज अनेक लोक स्वतःला, अशुद्ध, कलंकित किंवा पापी आहेत असे समजत नाहीत. वास्तविक पाहता, पाप हा शब्द अनेक लोकांच्या शब्दसंग्रहातून खरोखर नाहीसा झाला आहे. ते कदाचित चुकांबद्दल, उतावळेपणाबद्दल व चुकीच्या अंदाजाबद्दल बोलतील. परंतु, पापाबद्दल बोलणे? बहुधा नाहीच! समाजशास्त्राचे प्राध्यापक, ॲलन. वुल्फे यांच्या निरीक्षणानुसार, देवावर भाव असल्याचा दावा करणारे देखील, “देवाच्या शिकवणी नैतिकतेविषयीचा कायदा नव्हे तर, नैतिक गोष्टींचा केवळ विश्वास आहे असे समजतात. त्यांच्यासाठी १० आज्ञा, या केवळ ‘१० सूचना’ आहेत.”
५ अशा प्रकारच्या विचारसरणीचा परिणाम काय झाला आहे? पापाच्या वास्तविकतेला नकार, किंवा त्याला टाळणे हा आहे. याने, बरोबर आणि चुक याचा अगदी वाईटरीतीने विपर्यस्त अर्थ बाळगणाऱ्या पिढीच्या लोकांना जन्म दिला आहे. त्यांना वर्तणूकीविषयी त्यांचे स्वतःचे दर्जे स्थापित करण्याची मोकळीक आहे असे वाटते. शिवाय ते जे काही करण्याची निवड करतात त्याबद्दल कोणासही जबाबदार नाहीत असे त्यांना वाटते. अशा लोकांसाठी, एखादी कृती योग्य आहे की नाही हे ठरविण्यात दोषी वाटू न देणे हेच मानक असते.—नीतीसूत्रे ३०:१२, १३; पडताळा अनुवाद ३२:५, २०.
६ उदाहरणार्थ, दूरदर्शनवरील एका मुलाखतीत, तरुण लोकांना आजच्या सात महापातकाबद्दल त्यांचा दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी आमंत्रण दिले होते.b भाग घेणाऱ्या एकाने सरळ सांगून टाकले की, “गर्व करणे हे काही पाप नाही. तुम्ही स्वतःला चांगले असे समजलेच पाहिजे.” खूपच आळशीपणाबद्दल दुसरीने म्हटले: “काहीवेळा आळशी होणे चांगले असते. . . . कधीतरी निवांत बसून तुमच्या वेळेनुसार काम करणे बरे असते.” भाष्यकाराने देखील असेच संक्षिप्त विवेचन दिले: ‘ही सात महापातके काही दुष्कृत्ये नाहीत. उलट तो विश्वव्यापी मानवी आवेश आहे जो, त्रासदायक व आनंदविणारा असू शकतो.’ होय, पापाची कल्पना जशी नाहीशी झाली आहे त्याप्रकारे दोषी वाटण्याची भावना देखील नाहीशी झाली आहे. कारण शेवटी, दोष, हा चांगले वाटण्याच्या अगदी विरूद्धतेत आहे.—इफिसकर ४:१७-१९.
७. पवित्र शास्त्रानुसार, मानवांवर पापाचा कसा परिणाम झाला आहे?
७ या सर्व गोष्टींच्या अगदी विरूद्धतेत, पवित्र शास्त्र स्पष्टपणे म्हणते: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) प्रेषित पौलाने देखील कबूल केले: “मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले ते करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो.” (रोमकर ७:१८, १९) पौल येथे, स्वतःस आत्म-सहानुभूती दाखवत नव्हता. तर, मानवजात देवाच्या गौरवाला कशी उणी पडली हे त्याने पूर्णपणे ओळखले होते. त्याला पतित शरीरावरील पापाची पकड तीव्रतेने जाणवली. त्याने म्हटले: “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?”—रोमकर ७:२४.
८. आम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? का?
८ या बाबतीत तुमचा काय दृष्टिकोन आहे? तुम्ही हे कबूल कराल की, आदामाचे वंशज असल्यामुळे इतरांप्रमाणे तुम्हीही अपूर्ण आहात. परंतु, या माहितीचा तुमच्या विचारसरणीवर आणि तुमच्या जीवन मार्गावर कसा प्रभाव होतो? ती जीवनाची वस्तुस्थिती आहे असे स्वीकारून तुम्ही तुमच्या स्वभावानुसार करत राहता का? किंवा पतित शरीरावरील पापाच्या पकडीबरोबर लढत देण्यास नित्य प्रयत्न करीत आहात का? तुम्ही जे काही करता त्यामध्ये शक्य तितक्या तेजस्वीपणे देवाचे गौरव प्रतिबिंबित करण्यासाठी झटत आहात का? या गोष्टी आम्हा सर्वांच्या गंभीर चिंतेच्या असल्या पाहिजेत, व पौलाने जे म्हटले त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे की: “जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.”—रोमकर ८:५, ६.
देहस्वभावाचे चिंतन
९. “देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे” असे का बरे?
९ “देहस्वभावाचे चिंतन हे मरण” आहे असे पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता? पवित्र शास्त्रामध्ये, “देहस्वभाव” हा शब्द अनेकदा, मानवाला त्याच्या अपूर्ण स्थितीत, बंडखोर आदामाचे वंशज ‘जन्मताच पापी’ असे चित्रित करण्यासाठी वापरला आहे. (स्तोत्र ५१:५; ईयोब १४:४) अशाप्रकारे, पौल ख्रिश्चनांना त्यांचे मन पापी प्रवृत्त्या, मनोविकार, आणि अपूर्ण मर्त्य देहाच्या वासनांवर लावू नये अशी ताकीद देत होता. पण का बरे? अन्य ठिकाणी, पौलाने आम्हाला देहाची कोणकोणती कर्मे आहेत ते सांगितले आणि मग पुढे ही ताकीद दिली: “अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही.”—गलतीकर ५:१९-२१.
१०. “चिंतन” याचा काय अर्थ होतो?
१० परंतु, देहस्वभावाचे चिंतन करण्यात आणि त्याचे आचरण करण्यात फारच मोठा फरक नाही का? हे खरे की, कोणत्यातरी गोष्टीचा विचार केल्याने ती गोष्ट करण्याकडे नेहमीच निरवले जात नाही. परंतु, चिंतन करणे हे, एखाद्या गोष्टीवर थोड्याच वेळासाठी विचार करण्याच्याही पलिकडे जाते. पौलाने वापरलेला शब्द ग्रीक भाषेत, फ्रोʹने·मा हा आहे, आणि तो “विचार करण्याची पद्धत, निश्चय, . . . हेतु, आकांक्षा, झटापट” यांना चित्रित करतो. यास्तव, “देहस्वभावाचे चिंतन” करणे याचा अर्थ, पतित शरीराच्या इच्छांनी नियंत्रित, निर्देशित, शासित, व प्रेरित होणे असा होतो.—१ योहान २:१६.
११. काईन देहस्वभावाचे चिंतन कसे करत होता, आणि याचा काय परिणाम झाला?
११ काईनाने जो मार्ग अनुसरला यावरून हा मुद्दा फार उत्तम प्रकारे स्पष्ट होतो. काईनाच्या अंतःकरणात द्वेष आणि क्रोध निर्माण झाला तेव्हा, देवाने त्याला ताकीद दिली होती: “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुजवर आहे. करिता तू त्यास दाबात ठेव.” (उत्पत्ती ४:६, ७) काईनापुढे निवड होती. तो “बरे” करण्याकडे, म्हणजे, त्याचे मन, हेतू आणि आकांक्षा काही तरी चांगले करण्याकडे वळणार होते का? की तो देहस्वभावाचे चिंतन करण्याचे चालू ठेवून त्याच्या अंतःकरणात दबा धरून बसलेल्या वाईट प्रवृत्तींवर त्याचे मन केंद्रित करणार होता? यहोवाने स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे, काईनाने त्याला अनुमती दिल्यास, पाप “दाराशी टपूनच” होते व त्याच्यावर झडप घालून त्याला गिळून टाकण्यास ते थांबून होते. यास्तव, त्याच्याबरोबर लढत देऊन त्याच्या शारीरिक इच्छांना ‘दाबात ठेवण्याऐवजी,’ काईनाने त्याच्यावर वर्चस्व गाजवण्यास त्यांना अनुमती दिली. तो एक संकटमय शेवट होता.
१२. आम्ही “काईनाच्या मार्गाने” जाऊ नये यासाठी काय केले पाहिजे?
१२ आज आमच्याबद्दल काय? आम्हाला देखील, यहूदाने पहिल्या शतकातील काही विशिष्ट ख्रिश्चनांविषयी जसा विलाप केला तसे, “काईनाच्या मार्गाने” चालण्यास मुळीच आवडणार नाही. (यहुदा ११) आम्ही कधीही असा युक्तीवाद करू नये व विचार करू नये की, थोड्या प्रमाणात स्वतःचे लाड पुरवावे किंवा क्वचित एकदा मोकळीक घेणे निरुपद्रवी आहे. या ऐवजी आम्ही, आमच्या अंतःकरणात व मनात आलेल्या कोणत्याही अभक्त व भ्रष्ट प्रभावांना ओळखण्यास जागृत असले पाहिजे व त्यांनी मनात घर करण्याच्या आतच त्यांना काढून टाकले पाहिजे. तेथूनच, पतित शरीरावरील पापाच्या पकडीबरोबरची लढत चालू होते.—मार्क ७:२१.
१३. एखादा माणूस कसा “आपल्या वासनेने ओढला” जाऊ शकतो?
१३ उदाहरणार्थ, तुम्हाला, धक्कादायक किंवा भयानक दृश्य वा विशेषतः अश्लील गोष्टीची सूचना देणारे, किंवा चिथावणारे चित्र क्षणभर दिसले. ते कदाचित एखाद्या पुस्तकातील, किंवा मासिकातील, किंवा चित्रपटातील वा दूरदर्शनवरील एखादे दृश्य, जाहिरात फलकावरील एखादी जाहिरात, किंवा जीवनातील खरोखरची परिस्थिती असू शकते. या गोष्टींमुळे भीती वाटण्याची काही गरज नाही कारण असे होऊ शकते. तथापि, ते चित्र किंवा दृश्य जरी क्षणासाठीच होते तरी, ते मनामध्ये दबा धरून बसण्याची शक्यता आहे आणि अधूनमधून वर येऊ शकते. असे होते तेव्हा तुम्ही काय करता? त्या विचाराबरोबर लढत देण्यासाठी तुम्ही लगेचच पाऊल उचलून त्याला तुमच्या मनाबाहेर काढून टाकता का? तुम्ही त्या विचाराला तुमच्या मनामध्ये खेळू देता का? तो विचार जेव्हाजेव्हा येतो तेव्हातेव्हा तुम्ही त्याची पुनःकल्पना करता का? असे करणे म्हणजे, ज्या घटना एकामागोमाग घडतात असे याकोबाने म्हटले त्याला गती देण्याचा धोका पत्करणे होय. तो म्हणतो: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” या कारणास्तव पौल म्हणाला की: “देहस्वभावाचे चिंतन हे मरण” आहे.—याकोब १:१४, १५; रोमकर ८:६.
१४. आम्ही दररोज कशाचा सामना करीत आहोत, आणि कशी प्रतिक्रिया केली पाहिजे?
१४ आज आम्ही अशा जगात राहात आहोत जेथे लैंगिक अनैतिकता, हिंसा, आणि भौतिकतेची प्रशंसा केली जाते. त्यांना अगदी उघड व मोकाटपणे पुस्तके, मासिके, चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम यातून दाखवले जाते. आम्हावर अक्षरशः दररोज, चुकीच्या विचारांचा आणि कल्पनांचा भडिमार होत आहे. तुमची प्रतिक्रिया काय आहे? या सर्व गोष्टी तुम्हाला मनोरंजक आणि तुमच्या करमणूकीसाठी आहेत असे वाटते का? की नीतीमान लोट, “अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला . . . स्वैराचाराची कृत्ये पाहून . . . त्याचा नीतीमान जीव कासावीस” झाला होता, त्याप्रमाणे तुम्हालाही वाटते का? (२ पेत्र २:७, ८) पतित शरीरावरील पापाच्या पकडीबरोबर लढत देण्यात यश मिळवण्यासाठी, आम्हाला, स्तोत्रकर्त्याने जसा निश्चय केला त्याप्रमाणे करण्याची गरज आहे की: “मी अनुचित गोष्टी आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करितो; तो मला बिलगणार नाही.”—स्तोत्रसंहिता १०१:३.
आत्म्याचे चिंतन
१५. आमच्यावरील पापाच्या पकडीबरोबर लढत देण्यासाठी आम्हाला कोणती मदत पुरवली आहे?
१५ पतित शरीरावरील पापाच्या पकडीबरोबर लढत देण्यासाठी एक गोष्ट आम्हाला मदत करू शकते त्याविषयी पौल म्हणतो: “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” (रोमकर ८:६) अशा तऱ्हेने, आमच्यावर देहस्वभावाला वर्चस्व गाजवू देण्याऐवजी, आम्ही आमचे मन आत्म्याच्या प्रभावाखाली आणावे. आम्ही आत्म्याच्या गोष्टींमध्ये प्रगती केली पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या आहेत? फिलिप्पैकर ४:८ मध्ये, पौल त्यांची यादी करतो: “शेवटी, भावांनो, जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण व जर काही स्तुतीपात्र असेल, तर त्याचे मनन करा.” (पंडिता रमाबाई भाषांतर) आम्ही कोणत्या गोष्टींचे मनन केले पाहिजे त्यांना जवळून पाहू या, व त्यांची योग्यरीतीने समज प्राप्त करून घेऊ या.
१६. पौलाने आम्हाला कोणत्या गुणांवर “मनन” करण्याचे उत्तेजन दिले आहे, आणि प्रत्येकामध्ये काय गोवलेले आहे?
१६ सर्वात पहिल्यांदा, पौलाने आठ नैतिक गुणांची यादी केली आणि प्रत्येक गुणापुढे “जे काही” हे शब्द लावले. या शब्दांवरून हे सूचित होते की, ख्रिश्चनांनी सर्वच वेळी केवळ शास्त्रवचनीय किंवा तत्त्वज्ञानी विचार केले पाहिजेत असे नाही. आम्ही, विस्तृत मालिकांच्या विषयांवर विचार करू शकतो. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे विचार, पौलाने स्पष्ट केलेल्या नैतिक गुणांच्या प्रमाणात बसले पाहिजेत. पौलाने अवतरलेल्या “गोष्टींच्या” प्रत्येक वर्गाकडे आम्ही लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांचा एक एक करून विचार करू या.
▫ “खरे” यामध्ये खरे आणि खोटे असणे यापेक्षा अधिक काही गोवलेले आहे. याचा अर्थ, सत्यशील, प्रामाणिक व विश्वासू असणे असा होतो. तो केवळ दिखाऊपणा नव्हे तर ते वास्तविक आहे.—१ तीमथ्य ६:२०.
▫ “सन्मान्य” ही गोष्ट प्रतिष्ठित व आदरणीय गोष्टींना सूचित होते. ते भीतीयुक्त आदराच्या जाणीवेला उत्तेजन देते. ते उदात्त, थोर, आणि सन्माननीय आहे. ते अश्लील व नीच नाही.
▫ “न्यायी” म्हणजे मनुष्याचे नव्हे तर देवाच्या दर्जांना पूर्ण करणे. जगिक लोक त्यांचे मन अन्यायी प्रकल्पांनी व्यापून टाकतात. परंतु, आम्हाला देवाच्या नजरेत ज्या गोष्टी न्याय्य आहेत त्यांच्यावर विचार केला पाहिजे आणि त्यातच रस घेतला पाहिजे.—पडताळा स्तोत्रसंहिता २६:४; आमोस ८:४-६.
▫ “शुद्ध” म्हणजे, केवळ वर्तणुकीतच नव्हे (लैंगिक किंवा इतर कोणत्याही बाबतीत) तर विचार आणि हेतुमध्ये देखील शुद्ध आणि पवित्र असणे होय. याकोब म्हणतो: “वरून येणारे ज्ञान, हे मुळात शुद्ध असते.” येशू हा “शुद्ध” आहे, आणि आम्हा सर्वांसाठी विचार करण्याजोगे परिपूर्ण उदाहरण आहे.—याकोब ३:१७; १ योहान ३:३.
▫ “प्रिय,” ही तीच गोष्ट आहे जी, इतरांमध्ये प्रीती प्रोत्साहित व प्रेरित करते. आम्हा सर्वांना आमचे मन, द्वेष, कटुता, व तंटा, या गोष्टींवर लावण्याऐवजी, “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” द्यावयाचे आहे.—इब्रीकर १०:२४.
▫ “सत्कीर्तिमान” याचा अर्थ केवळ “सन्माननीय” किंवा “कीर्तिमान” असणे असा होत नाही. तर सक्रियतेने उभारणीकारक व प्रशंसनीय होणे असाही होतो. आम्ही आमचे मन हिणकस व हल्लेखोर गोष्टींवर ठेवण्याऐवजी हितकारक आणि उभारणीकारक गोष्टींवर लावतो.—इफिसकर ४:२९.
▫ “सद्गुण” याचा मुलतः अर्थ “चांगुलपणा” किंवा “नैतिक उत्कृष्टपणा” असा होतो. परंतु त्याचा अर्थ, कोणत्याही प्रकारची उत्कृष्टता असा देखील होऊ शकतो. यास्तव, आम्ही देवाच्या दर्जानुरूप वागणाऱ्या इतरांचे मौल्यवान गुण, योग्यता, आणि कौशल्याची गुणग्राहकता बाळगू शकतो.
▫ “स्तुतीपात्र” गोष्टी जर देवाकडून आलेल्या आहेत किंवा त्याने मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांकडून आल्या आहेत तरच, त्या खऱ्या असू शकतात.—१ करिंथकर ४:५; १ पेत्र २:१४.
जीवन आणि शांतीचे अभिवचन
१७. “आत्म्याचे चिंतन” केल्यावर परिणामतः कोणते आशीर्वाद मिळतील?
१७ जर आम्ही पौलाच्या सूचनांना अनुसरले व या गोष्टींवर “मनन” केले तर आम्ही, “आत्म्याचे चिंतन” करण्यात यशस्वी होऊ शकतो. याचा परिणाम, जीवनाचा आशीर्वाद म्हणजेच अभिवचन दिलेल्या नव्या जगात अनंतकाळचे जीवन इतकेच नव्हे, तर यासोबत शांती देखील मिळू शकते. (रोमकर ८:६) असे का बरे? कारण आमचे मन शारीरिक गोष्टींच्या दुष्ट प्रभावापासून सुरक्षित राखले जाते, आणि तेथून पुढे पौलाने वर्णन केल्याप्रमाणे शरीर आणि आत्म्यामध्ये होणारी अतिशय दुःखित झुंज, तिचा आमच्या मनावर खोलवर परिणाम होणार नाही. शरीराच्या प्रभावाचा प्रतिकार केल्यामुळे, आम्ही देवासोबत शांती प्राप्त करू शकतो “कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे.”—रोमकर ७:२१-२४; ८:७.
१८. सैतानाने कोणते युद्ध चालू ठेवले आहे, व आम्ही विजयी कसे होऊ शकतो?
१८ सैतान आणि त्याचे प्रतिनिधी, देवाच्या गौरवाच्या आमच्या प्रतिबिंबाला काळवंडण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत. ते, आमच्या मनावर शारीरिक इच्छांचा भडिमार करून त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना माहीत आहे की, ते सरतेशेवटी देवाबरोबर वैर करण्याकडे आणि मृत्यूकडे निरवतात. परंतु आम्ही या झगड्यातून विजयी होऊ शकतो. आम्हाला, पतित शरीरावरील पापाच्या पकडीबरोबर लढत देण्यासाठी योग्य ते साधन पुरविल्याबद्दल पौलाप्रमाणे, आम्ही देखील: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्यांच्याद्वारे देवाचे आभार” असे म्हणू शकतो.—रोमकर ७:२५.
[तळटीपा]
a पवित्र शास्त्र सर्वसामान्यपणे, “पाप” हा शब्द दर्शविण्यासाठी, ख·ताʼʹ हे इब्री क्रियापद आणि ह·मर·ताʹनो हे ग्रीक क्रियापद वापरते. या दोन्हींचा अर्थ “चुकणे,” काही तरी चुकल्याचा, किंवा एखाद्या ध्येयापर्यंत, चिन्हापर्यंत किंवा निशाणापर्यंत न पोंहचणे असा होतो.
b परंपरागतपणे, ती सात महापातके, गर्व, लोभ, हाव, क्रोध, खादाडपणा, द्वेष आणि आळस ही आहेत.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल का?
▫ पाप काय आहे, व ते पतित शरीरावर पकड कशी वाढवू शकते?
▫ आम्ही ‘देहस्वभावाच्या चिंतनाविरुद्ध’ लढत कशी देऊ शकतो?
▫ आम्ही ‘आत्म्याच्या चिंतनाला’ वाढवण्यासाठी काय करू शकतो?
▫ “आत्म्याचे चिंतन” जीवन आणि शांती कशी आणते?
[१५ पानांवरील चित्रं]
काईनाने शारीरिक प्रवृत्तींना त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याची अनुमती दिली व शेवटी त्याचा नाश झाला
[१६ पानांवरील चित्रं]
आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे