“धर्मत्यागी पुरुष” याला उघड करणे
“माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीही पिडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा.”—प्रकटीरकण १८:४.
१, २. (अ) धर्मत्यागी पुरुषाची ओळख कशी मिळू शकेल? (ब) देवाची सेवा करीत असल्याचा दावा करणाऱ्या पण रक्तदोषी असणाऱ्यांच्या बाबतीत देवाचा दृष्टीकोण काय आहे?
“धर्मत्यागी पुरुष” येत असल्याचे भाकित देवाच्या वचनाने केले होते. शिवाय या धर्मत्यागी घटकाला देवाच्या स्वर्गीय दंडाधिकारी ख्रिस्त येशू ‘नाहीसे करणार’ असेही भाकित करण्यात आले आहे. (२ थेस्सलनीकाकर २:३-८) मागील लेखांनी हे दाखविलेच आहे की तो धर्मत्यागी पुरुष ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढारीवर्ग आहे. याने बऱ्याच पूर्वी देवाच्या वचनातील सत्याचा त्याग केला आणि त्रैक्य, नरकाग्नी, व जीवाचे अमरत्व यासारख्या मूर्तिपूजक शिक्षणाला आपलेसे केले. याखेरीज, त्याने देवाच्या कायद्यांविरुद्धची कर्मे आचरली. पौलाने तीताला जे कळविले होते त्याचप्रमाणे “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.”—तीतास पत्र १:१६.
२ येशूने म्हटलेः “खोट्या संदेष्ट्याविषयी जपा. ते मेंढरांच्या वेषाने तुम्हाकडे येतात तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत. तुम्ही त्यांच्या फळावरुन त्यांस ओळखाल.” खोटे संदेष्टे “वाईट फळे” देतील. (मत्तय ७:१५-१७) धार्मिक पुढाऱ्यांच्या वाईट फळाचे उदाहरण म्हणजे त्यांनी घडवून आणलेला प्रचंड रक्तपात. कित्येक शतके त्यांनी धर्मयुद्धे, चौकशीसत्रे, आणि युद्धे की ज्यामुळे लाखोंचे रक्त सांडले गेले त्याला आपली मान्यता दिली होती. त्यांनी युद्धाच्या दोन्ही बाजूच्या पक्षाच्या वतीने प्रार्थना करुन आशीर्वाद मागितले. अशा युद्धात त्यांच्याच धर्माच्या लोकांनी एकमेकांची कत्तल केली. तथापि, प्रेषित पौल याविरुद्ध असे म्हणू शकलाः “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे.” (प्रे. कृत्ये २०:२६) धर्मपुढारी तसे नाहीत. अशा लोकांना देव म्हणतोः “तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही, तुमचे हात रक्ताने भरले आहेत.”—यशया १:१५.
३. गोलार्धिक स्वरुपाच्या कोणत्या अभूतपूर्व घटना त्वरेने घडणार आहेत?
३ देवाने या धर्मत्यागी पुरुषावर आपला न्यायदंड बजावण्याची वेळ त्वरेने येत आहे. येशूने भाकित केले त्याप्रमाणे लवकरच “जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट [या] काळी येईल.” (मत्तय २४:२१) हा त्रासाचा अपूर्व काळ मोठी बाबेल, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य याच्या हत्येने सुरु होईल; यात ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मही समाविष्ट आहेत. राजकारणी घटक “कळवंतिणीचा द्वेष करतील, तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळून टाकतील.” (प्रकटीकरण १७:१६) सरतेशेवटी, सैतानाच्या जगाच्या राहिलेल्या घटकांचा “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाची लढाई,” हर्मगिदोन यामध्ये नाश झाल्यावर ते मोठे संकट संपेल.—प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११-२१.
इतरांवर प्रीती करण्याचे बंधन
४. देवाची “आत्म्याने व खरेपणाने उपासना” करणाऱ्यांनी काय लक्षात ठेवण्यास हवे?
४ अशा या जगास हादरविणाऱ्या घटना लवकरच पृथ्वीवर घडणार आहेत तर मग, “आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना” करणाऱ्यांवर कोणती जबाबदारी येते? (योहान ४:२३) एक गोष्ट म्हणजे त्यांनी, येशूच्या या गोष्टीचे स्मरण ठेवले पाहिजेः “जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. . . . जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.”—योहान १५:१०-१४; १ योहान ५:३.
५, ६. (अ) येशूने आपल्या शिष्यांना असे काय करावयास सांगितले, ज्यामुळे त्यांची ओळख पटू शकेल? (ब) ही कोणत्या अर्थी एक नवी आज्ञा होती?
५ अशाप्रकारे, इतर लोकांवर व खासपणे सर्व देशातील आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींवर प्रीती करण्याचे कर्तव्य खऱ्या ख्रिश्चनांवर आहे. (प्रे. कृत्ये १०:३४; गलतीकर ६:१०; १ योहान ४:२०, २१) खरे म्हणजे, सह-ख्रिश्चनांनी “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती” केली पाहिजे. (१ पेत्र ४:८) जगव्याप्तपणे दाखविले जाणारे या प्रकारातील प्रेम, त्यांची खरे उपासक अशी ओळख देते. येशूनेही हेच म्हटले होतेः “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३४, ३५.
६ त्या आज्ञेमध्ये नवेपण असे काय होते? मोशेच्या नियमशास्त्राधीन असणाऱ्या यहुद्यांनाही ही आज्ञा दिली नव्हती का की, “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखेच प्रेम कर”? (लेवीय १९:१८) होय, पण येशूने आणखी एक विशिष्ट गोष्ट आपल्या वक्तव्यात म्हटली होती. तो म्हणालाः “जशी मी तुम्हावर प्रीती केली.” त्याच्या या प्रेमात त्याने इतरांसाठी आपले जीवन अर्पिण्याचेही समाविष्ट होते; आणि त्याच्या अनुयायांनीही देखील तेच करण्याची इच्छा धरली पाहिजे. (योहान १५:१३) हे श्रेष्ठ स्वरुपाचे प्रेम होते, कारण अशा यज्ञार्पणाची मोशेच्या नियमशास्त्रात गरज नव्हती.
७. या शतकात कोणत्या धर्माने प्रीतीच्या नियमाचे पालन करून दाखविले आहे?
७ आमच्या या शतकात या प्रेमाच्या नियमाचे कोणी अवलंबन केले आहे? खिस्ती धर्मराज्यातील धर्मांनी निश्चितच नाही, कारण त्यांनी दोन जागतिक महायुद्धात व इतर झगड्यात लाखोंची हत्या केली आहे. तर ते यहोवाचे साक्षीदार आहेत, ज्यांनी या प्रेमाच्या आज्ञेचे जगभरात पालन केले आहे. त्यांनी राष्ट्रांमधील युद्धात आपली कडक तटस्थता आचरली, कारण येशूने म्हटलेच होते की, त्याचे अनुयायी “या जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) यामुळेच ते, प्रेषित पौलाने म्हटले तसे म्हणू शकतात की, ते “सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहेत.” याचे एक उदाहरण म्हणून वॉशिंग्टन डी. सी. येथील अधिवेशनात नोव्हेंबर २७, १९२१ रोजी जो ठराव संमत करण्यात आला, त्याचा पहिलाच भाग लक्षात घ्याः
“ख्रिस्त येशू आमचा प्रभु याच्या तसेच त्याच्या प्रेषितांचे शिक्षण कटाक्षाने आचरणारे ख्रिस्ती या नात्याने आम्ही हे घोषित करतोः युद्धे ही क्रूरतेचा अवशेष, चांगल्या नीतीमूल्यांचा नाश करणारी असून ती ख्रिस्ती लोकांवर निंदा आणत आहेत; प्रभु येशू ख्रिस्ताने शिकविलेली तत्त्वे पवित्र कार्यासाठी वाहिलेल्या ख्रिश्चनांना युद्ध करण्यापासून, कोणत्याही प्रकारचा रक्तपात किंवा हिंसाचार करण्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रवर्तक ठरतात.”
८. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील यहोवाच्या साक्षीदारांचा ऐतिहासिक अहवाल काय सांगतो?
८ दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळादरम्यान या तत्त्वाचे अवलंबन कितपत घडले? सबंध मानवी इतिहासाच्या त्या अत्यंत वाईट युद्धात ५ कोटी लोकांची हत्या झाली. पण यापैकी कोणालाही कोणाही यहोवाच्या साक्षीदाराने ठार केले नाही! उदाहरणार्थ, बहुतेक सर्व जर्मन धर्मपुढाऱ्यांनी नाझी तत्त्वाचा क्रियाशीलपणे अवलंब करून त्याला आपले पाठबळ दिले. तथापि, नाझी राजवटीखाली असणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांनी कडक तटस्थता आचरली आणि त्यांनी हिटलरची स्तुती गाण्याचे तसेच त्याच्या लष्करात सदस्य बनण्याचे नाकारले. या कारणास्तव, त्यांनी इतर राष्ट्रातील आपल्या कोणाही आध्यात्मिक बांधवाला किंवा इतर कोणालाही ठार केले नाही. याशिवाय, बाकीच्या सर्व देशातील यहोवाच्या साक्षीदारांनी देखील आपली तटस्थता सांभाळली.
९. जर्मनी व ऑस्ट्रीयामध्ये नाझी राजवटीत यहोवाच्या साक्षीदारांचे काय घडले?
९ प्रीतीच्या आज्ञेच्या पालनार्थ पुष्कळ यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या मित्रांसाठी आपले प्राण वाहिले. किरचेनकाम्फ इन डचस्क्लाण्ड (जर्मनीतील चर्चेसची युद्धे) या फ्रेडरीक झिपफेल लिखित पुस्तकात साक्षीदारांविषयी असे म्हणण्यात आलेः “या छोट्या धार्मिक गटाचे सत्यान्नव टक्के लोक [नाझीच्या] नॅशनल सोशालिस्टिक छळास बळी पडले. यापैकीच्या एक तृतीयांशाना फासाकरवी तर इतरांना हिंसाचारी मार्गाने, उपासमार, आजार किंवा गुलामासारखे परिश्रम करवून ठार करण्यात आले. अशी कडक कारवाई पूर्वी कधी झाली नव्हती; ती हातमिळवणी न करणाऱ्या विश्वासामुळे घडली. तो विश्वास नॅशनल सोशालिस्टिक तत्त्वप्रणालीला जुळणारा नव्हता.” ऑस्ट्रीयामध्ये २५ टक्के यहोवाच्या साक्षीदारांना ठार करण्यात आले, मारहाणीमुळे मरण आले किंवा आजार वा नाझी छावण्यातील ग्लानीमुळे मृत्यु आला.
१०. प्रीतीच्या नियमाच्या पालनार्थ ज्यांनी मरण पत्करले त्यांना कोणता आत्मविश्वास होता?
१० प्रीतीच्या नियमाच्या पालनासाठी ज्यांनी हुतात्मिक मरण पत्करले त्यांचा हा पूर्ण आत्मविश्वास होता की, “[त्यांचे] कार्य व [त्यांनी] देवावर दाखविलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्रीकर ६:१०) त्यांना हेही ठाऊक होते की, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) सार्वकालिक जीवन मिळणार या आशेने ते पुनरुत्थानावर पूर्ण आशा ठेऊन होते.—योहान ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५.
११. यहोवाचे सेवक कोणत्या दृष्टीने अद्वितीय आहेत, आणि कोणता भविष्यवाद त्यांच्यामध्ये पूर्ण होत आहे?
११ पेत्र तसेच इतर प्रेषितांनी उच्च न्यायालयासमोर जो नियम मोठ्या निर्भिडपणे घोषित केला त्याचे पालन यहोवाचे सेवक सर्वत्र अप्रतिमपणे करीत आहेत. प्रेषितांनी म्हटलेः “आम्ही माणसापेक्षा देवाला आपला अधिपती मानून त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे.” (प्रे. कृत्ये ५:२९) हे यहोवाचे साक्षीदार करीत असल्यामुळे “देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे” त्याचे पाठबळ यांना मिळत आहे. (प्रे. कृत्ये ५:३२) हे तेच सामर्थ्य आहे ज्यामुळे त्यांना यशया २:२-४ मधील भविष्यवाणी पूर्ण करण्यास मदत मिळते. ती म्हणते की, आमच्या काळी खऱ्या उपासनेची पुनर्स्थापना होईल व सर्व राष्ट्रे आणि धर्मातील लोक तिजकडे वळतील. याचा एक परिणाम हा दिसेलः “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील; आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाहीत. ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” यहोवाचे सेवक शांतीमय जगातील जीवनाची तयारी करीत असल्यामुळे ते युद्धकला कधीच शिकणार नाहीत. ते प्रीतीचा नियम शिकून त्याचे आचरण करतात.—योहान १३:३४, ३५.
१२. प्रीतीच्या नियमाचे पालन करणाऱ्यांनी इतरांसाठी काय करण्यास हवे?
१२ ख्रिस्ती प्रेमात ‘स्वतःप्रमाणे शेजाऱ्यावर प्रीती कर’ण्याचे समाविष्ट असल्यामुळे देवाच्या सेवकांना जे माहीत आहे ते, ते स्वतःपुरते ठेवण्याइतके स्वार्थी नाहीत. (मत्तय २२:३९) देवाची सेवा करावी व त्याच्या नवीन जगात जगावे अशी इच्छा असणारे आणखी काही लोक आहेत. तेव्हा जोपर्यंत वेळ आहे, तोपर्यंत यांनीही प्रेमाचा नियम तसेच विश्वाचा सार्वभौम प्रभु यहोवा याविषयीची इतर सत्ये शिकून घेण्याची गरज आहे. यहोवा हा केवळ एकटाच आमची भक्ती मिळविण्याच्या पात्रतेचा आहे हे त्यांना शिकवले गेले पाहिजे आणि ती भक्ती कशी करावी हेही त्यांना दाखविले पाहिजे. (मत्तय ४:१०; प्रकटीकरण ४:११) ज्यांनी या गोष्टी आधीच शिकून घेतल्या आहेत अशांवर इतरांना सांगण्याचे बंधन आहे म्हणजे आणखी लोक यहोवाच्या मर्जीत येऊ शकतील.—यहेज्केल ३३:७-९, १४-१६.
धर्मत्यागी पुरुषास उघड करणे
१३. जागतिक साक्षीकार्याचा भाग म्हणून आम्ही काय जाहीर केले पाहिजे, व का?
१३ येशूने म्हटले होते की, “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) जगभरातील साक्षीकार्याचा भाग म्हणून देवाच्या सेवकांवर खोट्या धर्मावर व खासपणे ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्यांवर देवाचे न्यायदंड घोषित करण्याचे बंधन आहे. ख्रिस्ती आहोत असा दावा करीत असल्यामुळे ते देवाच्या दृष्टीने अधिक दुष्य आहेत. अशांना उघड केलेच पाहिजे म्हणजे देवाची सेवा करणाऱ्यांची त्यांच्या तावडीतून मुक्तता होऊ शकेल व त्यांना बचावासाठी योग्य ती पावले घेता येतील. येशूने म्हटले त्याप्रमाणे, “सत्य [त्यांना] स्वतंत्र करील.”—योहान ८:३२.
१४. खोट्या धर्माविषयी कोणता स्पष्ट संदेश घोषित केला पाहिजे?
१४ या कारणास्तव, खोट्या धर्माविषयीचा हा प्रेरित संदेश यहोवाच्या साक्षीदारांनी घोषित केला पाहिजेः “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पिडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे. . . . ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एका दिवशीच येतील, आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल. कारण तिचा न्यायनिवाडा करणारा यहोवा देव सामर्थ्यवान आहे.”—प्रकटीकरण १८:४-८.
१५. १९१४ या वर्षाने यहोवाच्या वेळापत्रकानुसार कोणता भाग पूर्ण केला, व पहिल्या जागतिक युद्धानंतर काय घडले?
१५ पवित्र शास्त्रातील भविष्यवाद दाखवितात की १९१४ या खडतर वर्षापासून या व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या दिवसां”ची सुरवात झाली. (२ तीमथ्य ३:१-५, १३; मत्तय २४:३-१३) त्या वर्षापासून आपण “अंतसमया”त आहोत. (दानीएल १२:४) यहोवाच्या वेळापत्रकाच्या सहमतात पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतर लगेच त्याच्या सेवकांनी मत्तय २४:१४ मध्ये भाकित केलेल्या देवाच्या राज्याची घोषणा विस्तृतपणे सांगण्यासाठी आवेशाने कार्य आरंभिले. यासोबत त्यांनी खोट्या धर्मास व खासपणे ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मत्यागी धर्मपुढाऱ्यांना अधिक जोरदारपणे उघड करण्याची सुरवात केली.
१६. धर्मत्यागी पुरुषाला ७० पेक्षा अधिक वर्षे उघड करून दाखविण्याचा केवढा प्रबळ परिणाम संग्रहीत झाला आहे?
१६ आता सत्तरपेक्षा अधिक वर्षे देवाच्या सेवकांनी धर्मत्यागी पुरुषाच्या फसव्या हालचालीविषयी लोकांना जागृत करण्याचे काम केले आहे. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर केवळ काही हजार साक्षीदार होते. पण आता ते ३७ लक्षांपेक्षा अधिक क्रियाशील सेवकांचे “बलाढ्य राष्ट्र” बनले आहे व ते पृथ्वीभरात ६०,००० पेक्षा अधिक मंडळ्यात पसरलेले आहेत. (यशया ६०:२२) आता अधिक विस्तृतपणे, देवाचे सेवक, देवाचे राज्य ही मानवजातीची एकमात्र आशा आहे हे मोठ्या आवेशाने घोषित करीत आहेत व याच वेळी ते धार्मिक पुढाऱ्यांविषयी की ते फसव्या धर्मत्यागी पुरुषाचा भाग आहेत असे उघड करीत आहेत.
इतके सामर्थ्ययुक्त का?
१७. यहोवाच्या सेवकांनी धर्मत्यागी पुरुषाला इतक्या प्रभावीपणे का उघड केले?
१७ यहोवाच्या सेवकांनी एवढ्या समर्थपणे धर्मत्यागी पुरुषाला या सर्व वर्षांत का उघड केले आहे? कारण आता तारणाच्या मार्गावर असलेल्या यहोवाच्या मेंढरांच्या लाखोंच्या मोठा लोकसमुदायाला सैतानी जग व त्याच्या खोट्या धर्मापासून संरक्षित ठेवले पाहिजे. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९-१४) तसेच, धर्मपुढाऱ्यांना उघड करून दाखविल्याविना देवाच्या कळपाचा अद्याप भाग न बनलेल्या सुहृदयी लोकांना चुकीचे मार्गाक्रमण कसे टाळावे ते समजू शकणार नाही. यासाठीच त्यांना कळविले गेले पाहिजे. हेच येशूनेही केले. त्याने त्याच्या काळातील दांभिक धर्मपुढाऱ्यांविषयी म्हटले होतेः “ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”—मत्तय १५:१४; तसेच २ करिंथकर ४:४; ११:१३-१५ पहा.
१८. सत्य शोधकांना कशाची माहिती करून दिली पाहिजे?
१८ धार्मिक पुढारी हे सैतानी जगाचा भाग आहेत. (योहान ८:४४) हेच ते जग आहे ज्याचा देव लवकरच चुराडा करून ते नष्ट करणार आहे. (२ पेत्र ३:११-१३; १ योहान २:१५-१७) यासाठीच देवाचे वचन ही ताकीद देतेः “जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) या इशाऱ्याकडे धर्मपुढाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून ते राजकारणी घडामोडीत मग्न झाले आहेत. ते आपल्या अनुयायांना सांगतात की, राजकारणी मुत्सद्यांच्या प्रयत्नांमुळेच चांगले जग येणार. पण ही खोटी आशा आहे, कारण सैतानाच्या वर्चस्वाखाली असणारे हे जग आता निघून जाण्याच्या बेतात आहे. यासाठी जे लोक मोठ्या आशेने या जगाकडे पहात आहेत त्यांची फसवणूक होत आहे. हे जग कोठे जात आहे व त्याऐवजी काय घडणार त्याची सत्यता त्यांना माहीत करून दिली पाहिजे.—नीतीसूत्रे १४:१२; १९:२१; मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:४, ५.
१९. काही धर्मपुढाऱ्यांचा जगीकपणा अलिकडेच विविध माध्यमातून कसा उघड झाला आहे?
१९ काही धर्मपुढाऱ्यांचा जगीकपणा हा अलिकडेच विविध माध्यमातून उघड झाला आहे. काही दूरदर्शनवरील धर्मप्रचारक बेबंद व ख्यालीखुशालीचे जीवन व्यतित करीत होते. एका आधुनिक गीतकाराने जे गीत रचले होते त्याचे शीर्षक होतेः “येशू दूरदर्शनवरील कार्यक्रमात दिसला तर [१०,००० डॉलर्स किंमतीचे] रोलेक्स [घड्याळ] हाती घालेल का?” गीतात पुढे म्हटले आहेः “येशू पृथ्वीवर आला तर तो राजकारणी असेल का, तो आपले दुसरे [विलासी] घर पाम र्स्प्रिग येथे करील का, आणि आपली महत्ता लपवून ठेवील का?” याचप्रमाणे अधिकाधिक धर्मपुढारी पुरुषगामी प्रवृत्तीचे समर्थन व जोपासना करीत आहेत. सध्याही अमेरिकेतील एक कॅथोलिक चर्च, मुलांसोबत लैंगिक आचाराचे दोषी ठरलेल्या पाळकांच्या नुकसान भरपाईसाठी लाखो डॉलर्स देत आहे.—रोमकर १:२४-२७; १ करिंथकर ६:९, १०.
२०. देवाच्या सेवकांनी धर्मत्यागी पुरुषाला का उघड करीत राहिले पाहिजे?
२० अशी ही चुकीची कर्मे देवाच्या सेवकांना नजरेआड करता येत नाहीत, त्यामुळेच इतरांच्या लाभास्तव ती त्यांनी उघड केली पाहिजेत. देवाच्या नियमांचा भंग करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांपासून मोठ्या लोकसमुदायाचे रक्षण झाले पाहिजे. तसेच जे “आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत” त्यांचा शोध करून त्यांना थोर मेंढपाळ यहोवा देव आणि त्याचा “उत्तम मेंढपाळ” येशू ख्रिस्त यांच्या संरक्षणयुक्त मार्गदर्शनाखाली एकत्रित आणले पाहिजे.—यहेज्केल ९:४; योहान १०:११; नीतीसूत्रे १८:१०.
२१. यहोवाचे साक्षीदार कशाविषयी घोषणा करीत राहतील?
२१ यासाठीच, देवाचे लोक सबंध सैतानी जगावर, त्याचा धर्मत्यागी पुरुष, ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्यांवरील देवाचा सूड घोषित करण्यात कुचराई करणार नाहीत. ते मोठ्या आवेशाने प्रकटीकरण १४:७ मधील देवदूताचा संदेश जाहीर करीत राहतीलः “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा; कारण न्यायनिवाडा करण्याची त्याची घटका आली आहे.” या घोषणेत ते खोट्या धर्माविषयी प्रकटीकरण १८:४ मध्ये देण्यात आलेला हा तातडीचा इशारा देखील समाविष्ट करतीलः ‘माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.”
उजळणीसाठी प्रश्न
◻ धर्मत्यागी पुरुषाला कोणता अंतिम परिणाम मिळणार व का?
◻ यहोवाच्या सेवकांवर इतरांसंबंधाने कोणती जबाबदारी आहे?
◻ यहोवाच्या लोकांनी स्वतःला सर्व लोकांच्या रक्तापासून कसे निर्दोष राखले आहे?
◻ मोठ्या बाबेलविषयी आम्ही काय केलेच पाहिजे?
◻ धर्मत्यागी पुरुषाविषयी आम्ही आपला प्रबळ संदेश देण्याचे का चालू ठेवू?
[२५ पानांवरील चित्रं]
प्रेषितांनी उच्च न्यायालयाला म्हटलेः “आम्ही माणसापेक्षा देवाला आपला अधिपती मानून त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे”
[२६ पानांवरील चित्रं]
हे जग व त्यातील धर्म कोठे जात आहेत याविषयी प्रांजळ लोकांनी माहिती करून घेतली पाहिजे