नियमन मंडळाकडून पत्र
यहोवावर प्रेम करणाऱ्या प्रिय भाऊबहिणींनो:
१९७१ चं वर्ष होतं. त्या वर्षी “पवित्र नाव” हे प्रांतीय अधिवेशन (इंग्रजीत) झालं होतं. त्या अधिवेशनात अनेक पुस्तकं प्रकाशित झाली होती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सगळयांना खूप आनंद झाला. या प्रकाशनांबद्दल म्हटलं गेलं, की “ही खूपच जबरदस्त प्रकाशनं आहेत!” त्यांपैकीच एक पुस्तक वाचल्यावर एका भावाने असं म्हटलं, “पुढे होणाऱ्या रोमांचक गोष्टींची झलक देणारं असं पुस्तक मी आजपर्यंत वाचलं नव्हतं!” तो भाऊ नेमकं कोणत्या पुस्तकाबद्दल बोलत होता? इंग्रजीत प्रकाशित झालेल्या त्या पुस्तकाचं नाव होतं, “तेव्हा राष्ट्रांना कळून येईल की मी यहोवा आहे—ते कसं?” पण या पुस्तकाबद्दल भाऊबहिणींना इतकी उत्सुकता का होती? कारण त्यात यहेज्केल पुस्तकातल्या अनेक भविष्यवाण्यांबद्दल नवीन समज देण्यात आली होती. आणि त्यांतून मानवांच्या भविष्याबद्दल त्यांना बरंच काही शिकायला मिळणार होतं.
ते पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा देवाच्या लोकांची संख्या १५ लाखांच्या आसपास होती. पण त्यानंतर ती झपाट्याने वाढून, आता त्यांची संख्या ८५ लाखांपेक्षा जास्त आहे. (यश. ६०:२२) वेगवेगळ्या देशांतले हे लोक हजारपेक्षा जास्त भाषा बोलतात. (जख. ८:२३) पण यांपैकी बहुतेकांना अशा पुस्तकाचा अभ्यास करायची संधी कधीच मिळाली नाही, ज्यात यहेज्केलच्या भविष्यवाण्यांची स्पष्ट आणि बारीकसारीक माहिती दिली आहे.
याशिवाय १९७१ नंतरच्या दशकांमध्ये, सत्याचा प्रकाश वाढत गेला तशी बायबलच्या सत्यांबद्दलची आपली समज आणखी स्पष्ट होत गेली. (नीति. ४:१८) उदाहरणार्थ, १९८५ मध्ये आपल्याला हे स्पष्टपणे समजलं, की ‘दुसऱ्या मेंढरांतल्या’ लोकांना कशा प्रकारे नीतिमान ठरवलं जातं आणि ते देवाचे मित्र कसे बनतात. (योहा. १०:१६; रोम. ५:१८; याको. २:२३) मग १९९५ मध्ये पहिल्यांदाच आपल्याला हे समजलं, की ‘मेंढरांसारखे’ आणि ‘बकऱ्यांसारखे’ लोक कोण आहेत याबद्दलचा शेवटचा निर्णय येणाऱ्या मोठ्या संकटाच्या काळात होईल. (मत्त. २४:२१; २५:३१, ३२) या विषयांवर आपल्याला जी नवीन समज मिळाली त्यामुळे यहेज्केल पुस्तकाबद्दलही आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या आहेत.
“मनुष्याच्या मुला! मी तुला दाखवीन ते सगळं लक्षपूर्वक बघ. मी सांगीन ते सगळं कान देऊन ऐक आणि त्याकडे लक्ष दे. कारण त्यासाठीच तुला इथे आणण्यात आलंय.”—यहेज्केल ४०:४
अलीकडच्या काही वर्षांत तर सत्याचा प्रकाश आणखीनच वाढत चालला आहे. येशूने दिलेल्या उदाहरणांतून आपण जे धडे शिकलो त्यांचाच विचार करा. त्यांतले अनेक धडे आता आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजतात आणि ते आपल्या मनात अगदी पक्के बसले आहेत. आपण हेही शिकलो, की येशूने दिलेली बरीच उदाहरणं, मोठ्या संकटाच्या वेळी होणाऱ्या घटनांना सूचित करतात. त्याचप्रमाणे, यहेज्केलच्या पुस्तकातल्या काही भविष्यवाण्यांबद्दलही आपली समज आणखी स्पष्ट झाली आहे. जसं की, मागोग देशाचा गोग (अध्याय ३८ आणि ३९), सचिवाची दौत असलेल्या माणसाचं काम (अध्याय ९), तसंच वाळलेल्या हाडांनी भरलेलं खोरं आणि दोन काठ्या जोडून एक करणं (अध्याय ३७) यांबद्दलच्या भविष्यवाण्या. या विषयांवर, १९७१ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात जी माहिती दिली होती तिच्या तुलनेत आता आपल्याजवळ बरीच नवीन माहिती आहे.
म्हणूनच यहेज्केलच्या भविष्यवाण्यांबद्दलची नवीन समज असलेलं पुस्तक केव्हा वाचायला मिळेल असं जेव्हा यहोवाचे लोक विचारतात, तेव्हा आश्चर्य वाटत नाही. शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना! हे पुस्तकच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पुस्तकात २२ अध्याय आणि अनेक सुंदर चित्रं आहेत. आपण ते अध्याय वाचतो आणि ती चित्रं पाहतो त्या वेळी आपल्या लक्षात येतं, की हे तयार करण्यासाठी किती संशोधन करण्यात आलं आहे आणि किती मेहनत घेण्यात आली आहे. यहोवाने बायबलमध्ये यहेज्केलचं रोमांचक पुस्तक का दिलं हे समजून घेण्यासाठी खूप प्रार्थना आणि विचार करण्यात आला. तसंच, त्यासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांवरही विचार करण्यात आला. जसं की, यहेज्केलच्या काळातल्या आणि आपल्या काळातल्या लोकांना यहेज्केलच्या पुस्तकातून कोणते धडे शिकायला मिळतात? अशा कोणत्या भविष्यवाण्या आहेत ज्यांत पुढे होणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे? त्यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट भविष्यात होणाऱ्या कुठल्या तरी गोष्टीला सूचित करते असा आपण विचार करावा का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शुद्ध उपासना नावाच्या या पुस्तकात दिली आहेत. त्याचा अभ्यास केल्यामुळे बायबलमधलं यहेज्केलचं पुस्तक आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होईल.
बायबलमधलं यहेज्केलचं पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल, की यहोवाच्या संघटनेचा स्वर्गातला भाग किती वैभवशाली आणि भारावून टाकणारा आहे. तसंच, यहोवाने स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या आपल्या सेवकांसाठी उपासनेच्या बाबतीत किती उच्च स्तर घालून दिले आहेत, हे पाहून यहोवाबद्दल तुमच्या मनात नक्कीच आदर दाटून येईल. शुद्ध उपासना या पुस्तकाचा अभ्यास केल्यावर, यहोवाने आपल्या लोकांसाठी काय केलं आहे आणि येणाऱ्या काळातही तो काय करणार आहे हे जाणून त्याच्याबद्दलची तुमची कदर आणखीनच वाढेल. तुमच्या लक्षात येईल, की या पुस्तकात दोन मुख्य विषयांवर वारंवार भर देण्यात आला आहे. एक म्हणजे, आपल्याला जर यहोवाला खूश करायचं असेल, तर तो या विश्वाचा सर्वोच्च अधिकारी आहे हे आपण मनापासून मान्य केलं पाहिजे. दुसरा म्हणजे, आपण यहोवाच्या उच्च स्तरांप्रमाणे जीवन जगलं पाहिजे आणि त्याला मान्य असलेल्या पद्धतीनेच त्याची उपासना केली पाहिजे.
आमची मनापासून हीच इच्छा आहे, की या प्रकाशनामुळे यहोवाची उपासना करण्याचा तुमचा निर्धार आणखी पक्का व्हावा आणि त्यामुळे त्याच्या महान आणि पवित्र नावाचा गौरव व्हावा. तसंच, आमची अशीही इच्छा आहे, की पुढे येणाऱ्या रोमांचक काळाची वाट पाहायलाही या प्रकाशनामुळे तुम्हाला मदत व्हावी. कारण त्या वेळी सर्व राष्ट्रांना हे कळून येईल की यहोवाच खरा देव आहे!—यहे. ३६:२३; ३८:२३.
देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं यहेज्केलचं पुस्तक समजण्यासाठी आपला प्रेमळ स्वर्गातला पिता, यहोवा तुम्हाला मदत करो हीच आमची प्रार्थना आहे.
तुमचे भाऊ,
यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ