पाठ १०
तुम्हाला खरी उपासना कशी ओळखता येईल?
१. फक्त एकच खरा धर्म आहे का?
“खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा.”—मत्तय ७:१५.
खऱ्या धर्माने लोकांना सत्य शिकवलं पाहिजे हे तुम्हीही मान्य करता का? काही जण म्हणतात की सगळेच धर्म चांगले असतात. पण सगळ्या धर्मांत वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मग ते सगळेच सत्य शिकवतात असं आपण म्हणू शकतो का? बायबलमध्ये याबद्दल काय सांगितलं आहे? बायबलमध्ये आपला निर्माणकर्ता यहोवा म्हणतो, की तो फक्त अशीच उपासना स्वीकारतो जी त्याच्या वचनावर आधारित आहे. येशूने या धर्माची तुलना अशा रस्त्यासोबत केली, जो सर्वकाळाच्या जीवनाकडे जातो. त्याने म्हटलं, की “फार कमी लोकांना तो सापडतो.” (मत्तय ७:१४) सगळ्या खऱ्या उपासकांचा एकसारख्याच शिकवणींवर विश्वास असतो.—योहान ४:२३, २४, १४:६; इफिसकर ४:४, ५ वाचा.
देवाच्या नजरेत सर्वच धर्म सारखे आहेत का? हा व्हिडिओ पाहा
२. खोट्या ख्रिश्चनांबद्दल येशूने काय सांगितलं?
“चारचौघांत ते देवाला ओळखत असल्याचा दावा तर करतात, पण आपल्या कामांनी ते त्याला नाकारतात.”—तीत १:१६.
येशूने आधीच इशारा दिला, की खऱ्या ख्रिश्चनांमध्ये काही खोटी शिक्षक येतील. आणि ते लोकांना चुकीच्या गोष्टी शिकवतील. वरवर पाहिलं तर ते खरे उपासक आहेत असं वाटतं. ते ख्रिस्ती असण्याचा दावाही करतात. पण ते खरे ख्रिस्ती नाहीत हे आपण लगेच ओळखू शकतो. का? कारण जे खरी उपासना करतात त्यांच्या चांगल्या गुणांमुळे आणि कार्यांमुळे दिसून येतं, की ते खरे उपासक आहेत.—मत्तय ७:१३-२३ वाचा.
३. तुम्ही खऱ्या उपासकांना कसं ओळखू शकता?
खऱ्या उपासकांची ओळख करून देणाऱ्या या पाच गोष्टींवर विचार करा:
खरे उपासक मानतात, की बायबल हे देवाचं वचन आहे. ते बायबलच्या तत्त्वांप्रमाणे जगायचा प्रयत्न करतात. म्हणूनच मानवांच्या विचारांवर अधारित असलेल्या धर्मापेक्षा खरा धर्म वेगळा आहे. (मत्तय १५:७-९) खरे उपासक जसं लोकांना शिकवतात, तसंच ते वागतातसुद्धा.—योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.
येशूचे खरे शिष्य यहोवा या देवाच्या नावाचा आदर करतात. येशूने लोकांना देवाचं नाव सांगून त्याच्या नावाचा आदर केला. त्याने लोकांना देवाबद्दल शिकून घ्यायला मदत केली. आणि देवाचं नाव पवित्र मानलं जावो, अशी प्रार्थना करायला त्याने त्यांना शिकवलं. (मत्तय ६:९) तुमच्या मते देवाचं नाव यहोवा आहे, असं कोण शिकवतात?—योहान १७:२६; रोमकर १०:१३, १४ वाचा.
खरे ख्रिस्ती लोकांना जाऊन देवाच्या राज्याबद्दल सांगतात. देवाने राज्याचा आनंदाचा संदेश सांगायला, येशूला पृथ्वीवर पाठवलं होतं. फक्त देवाचं राज्यच मानवजातीच्या सगळ्या समस्या सोडवू शकतं. आणि येशूने पृथ्वीवर त्याच्या जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना या राज्याबद्दल शिकवलं. (लूक ४:४३; ८:१; २३:४२, ४३) त्याने सांगितलं, की जे माझ्या शिकवणींप्रमाणे चालतील, तेसुद्धा या राज्याबद्दल लोकांना सांगतील. येशूप्रमाणे आज कोण घरोघरी जाऊन, लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगतात?—मत्तय २४:१४ वाचा.
जे येशूच्या शिकवणींचं पालन करतात, ते स्वतःला या दुष्ट जगापासून वेगळं ठेवतात. ते कोणत्याच राजकीय किंवा सामाजिक वादात सामील होत नाहीत. (योहान १७:१६; १८:३६) तसंच, ते जगातल्या वाईट गोष्टींचं आणि विचारसरणींचं अनुकरण करत नाहीत.—याकोब ४:४ वाचा.
खरे ख्रिश्चन एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. देवाच्या वचनातून सत्य शिकल्यामुळे, ते सगळ्या संस्कृतींच्या लोकांचा आदर करतात. खोटे धर्म सहसा युद्धांना पाठिंबा देतात. पण खरे उपासक युद्धात कधीही भाग घेत नाहीत. (मीखा ४:१-३) याउलट, खरे ख्रिस्ती इतरांना मदत करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या वेळेचा आणि साधनांचा निस्वार्थपणे उपयोग करतात.—योहान १३:३४, ३५; १ योहान ४:२० वाचा.
४. तुम्ही खरा धर्म ओळखू शकता का?
असा कोणता धर्म आहे, ज्याच्या शिकवणी देवाच्या वचनावर आधारलेल्या आहेत आणि जो देवाच्या नावाचा आदर करतो? असे कोण लोक आहेत, जे इतरांना जाऊन सांगतात, की देवाचं राज्यच मानवजातीच्या सगळ्या समस्या सोडवू शकतं? असा कोणता धर्म आहे, ज्यातले लोक एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि युद्धात भाग घ्यायला नकार देतात? तुम्हाला काय वाटतं?—१ योहान ३:१०-१२ वाचा.