पुरवणी
रक्तः कोणाची निवड व कोणाचा सद्सद्विवेक?
लेखकः जे. लावेल डिक्सन, एम. डी.
न्यूयॉर्क स्टेट जर्नल ऑफ मेडिसिन, १९८८; ८८:४६३-४६४, यांच्या परवानगीने पुनर्मुद्रित, सर्वाधिकार मेडिकल सोसायटी ऑफ द स्टेट ऑफ न्यूयॉर्क.
आजार व मृत्यु यांच्याशी लढा देण्यासाठी आपले ज्ञान, कौशल्य व अनुभव वापरण्याचा डॉक्टरांनी अंगिकार केला आहे. तरी पण, एखाद्या रूग्णाने सुचवलेला इलाज नाकारल्यास काय? हे बहुधा, तो रूग्ण यहोवाचा साक्षीदार असून त्याला संपूर्ण रक्त, समूहित लाल पेशी, प्लास्मा वा प्लेटलेट देणे हा इलाज करावा लागेल असे सांगितले असल्यास, घडण्याची शक्यता आहे.
रक्ताचा वापर म्हटला म्हणजे रूग्णाच्या रक्तविरहीत इलाजाच्या निवडीमुळे सेवेला वाहून घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हात बांधले जातील असे एखाद्या डॉक्टरला वाटेल. तरीही, यहोवाच्या साक्षीदारांव्यतिरिक्त इतर रूग्णही डॉक्टरांचा सल्ला न अनुसरण्याचे पसंत करीत असतात हे विसरता कामा नये. ॲपलबॉम व रॉथ१ यांच्या मते विद्यालयीन हॉस्पिटलमधील १९% रूग्णांनी निदान एक तरी औषधोपचार वा कार्यपद्धती नाकारली. खरे म्हणजे यातील १५ टक्क्यांचा नकार “जीवनाला हानीकारक ठरू शकत होता” तरीही ते नाकारले.
“डॉक्टरला सर्वात जास्त कळते” या सर्वसामान्य धोरणामुळे बहुतेक रूग्ण आपल्या डॉक्टरांठायी असणारी कुशलता व ज्ञान याच्यापुढे नमते घेतात. परंतु हा वाक्प्रचार जणू शास्त्रोक्त सत्य आहे असे मानून डॉक्टरने काम करावे व रूग्णावर इलाज करावा हे किती सुप्त धोक्याचे ठरेल. आपले वैद्यकीय प्रशिक्षण, कामाचा अधिकृत परवाना व अनुभव यामुळे आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात विशेष अधिकार मिळतात हे खरे. परंतु आपल्या रूग्णांनाही त्यांचे हक्क आहेत. शिवाय बहुधा आपल्याला माहीत असल्याप्रमाणे कायदा (आणि राज्य घटनासुद्धा) हक्कांना अधिक महत्त्व देते.
बहुतेक इस्पितळांच्या भिंतींवर “पेशन्टस् बील ऑफ राइट्स्” हे ब्रीद दिसते. मान्यता कळविणे हा त्यातील एक हक्क आहे. त्याला मान्यतापूर्वक निवड म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. वेगवेगळ्या उपचारांचे (किंवा उपचार न करण्याचे) शक्य ते परिणाम रूग्णाला सांगितल्यावर, काय करून घ्यायला तो तयार होईल ही त्याची निवड आहे. ब्रॉन्क्स्, न्यूयॉर्क येथील आल्बर्ट आईन्स्टाईन हॉस्पिटलमध्ये रक्त संक्रमण व यहोवाच्या साक्षीदारांबद्दलच्या धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहेः “असमर्थ नसलेल्या प्रौढ रूग्णाला इलाज नाकारण्याचा हक्क आहे, मग तो नकार त्याच्या स्वास्थ्याला कितीही हानिकारक असो.”२
नैतिक तत्त्वे व जबाबदारीविषयी डॉक्टर चिंता व्यक्त करतील, परंतु न्यायालयांनी रूग्णाच्या निवडीच्या श्रेष्ठत्वावर जोर दिलेला आहे.३ न्यूयॉर्कच्या कोर्ट ऑफ अपील्सने म्हटले की, “आपल्या स्वतःच्या इलाजाचा मार्ग निश्चित करण्याचा रूग्णाचा हक्क सर्वश्रेष्ठ [आहे] . . . वैद्यकीय उपचाराला सक्षम प्रौढ रूग्णाच्या नकाराचा डॉक्टरने आदर केल्यास, त्याने आपली कायदेशीर व व्यावसायिक जबाबदारी पाळली नाही असे मानता येत नाही.”४ त्या न्यायालयाने असेही म्हटले की, “वैद्यकीय व्यवसायाची नैतिक सचोटी महत्त्वाची असली तरी येथे बजावल्या गेलेल्या वैयक्तीक मूलभूत हक्कापेक्षा ती अधिक महत्त्वाची ठरू शकत नाही. संस्थेच्या अपेक्षा नव्हे तर व्यक्तीच्या गरजा व इच्छा सर्वश्रेष्ठ आहेत.”५
एखादा साक्षीदार जेव्हा रक्त घेण्याचे नाकारतो तेव्हा शक्य असेल त्यापेक्षा कमी सेवा करावी लागण्याच्या संभावनेने डॉक्टरांच्या विवेक बुद्धीला टोचणी लागण्याची शक्यता आहे. तथापि, तो साक्षीदार, जाणकार डॉक्टरांना प्राप्त परिस्थितीमध्ये फक्त सर्वोत्तम पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याची विचारणा करीत असतो. अतिरक्तदाब, प्रतिजैविकांना (अँटिबायोटिक्सना) प्रखर संवेदनशीलता तसेच विशिष्ट महाग उपकरणांच्या उपलब्धतेचा अभाव अशा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपल्या उपचार पद्धतीमध्ये आपल्याला अनेकदा बदल करावा लागतो. साक्षीदार रूग्णांच्या बाबतीत, रूग्णाची निवड व सद्सद्विवेक बुद्धी, रक्तापासून दूर राहण्याचा त्यांचा नैतिक/धार्मिक निर्णय, यांना अनुसरुन डॉक्टरांनी वैद्यकीय व शल्यशास्त्रीय समस्या हाताळाव्या अशी मागणी होत असते.
साक्षीदार रूग्णांवर करण्यात आलेल्या मोठ्या शस्त्रक्रियेवरील अनेक अहवाल असे दर्शवितात की, रक्त वापरू नये या रूग्णाने केलेल्या विनंतीस अनेक डॉक्टरांना स्वच्छ विवेकाने व यशस्वीरित्या जुळवून घेता येते. उदाहरणार्थ, १९८१ मध्ये कूले यांनी १,०२६ हृदय व रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रियाचे परिक्षण केले, यात २२ टक्के लहान मुले होती. त्यांनी हा निर्णय दिलाः “यहोवाच्या साक्षीदारांच्या गटातील रूग्णांमधील धोका, इतरांपेक्षा विशेष जास्त नाही.”६ साक्षीदारांवर करण्यात आलेल्या मोठ्या शस्त्रक्रियांच्या बाबतीत कॅम्बूरी यांनीही लिहिले.७ यामध्ये अशाही साक्षीदार रूग्णांचा समावेश होता, ज्यांना “रक्त स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निकडीचा शल्यशास्त्रीय इलाज नाकारण्यात आला.” त्यांनी म्हटलेः “शस्त्रक्रियेच्या खोलीमध्ये परिस्थिती कशीही असली तरी त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा आदर केला जाईल अशी आश्वासने, उपचारापूर्वी सर्व रूग्णांना मिळाली होती. या धोरणाचे काहीही वाईट परिणाम झाले नाहीत.”
एखादा रूग्ण यहोवाचा साक्षीदार असतो तेव्हा पसंतीपेक्षा सद्सद्विवेक बुद्धीला महत्त्व येते. फक्त डॉक्टरांच्याच विवेकाचा विचार करता येत नाही. रूग्णाच्या विवेकाचे काय? यहोवाचे साक्षीदार जीवनाकडे, रक्ताकरवी प्रतिनिधित्व करणारी देवाची भेट या दृष्टीने बघतात. ख्रिस्ती लोकांना “रक्तापासून दूर” राहिले पाहिजे या पवित्र शास्त्रातील आज्ञेवर त्यांचा विश्वास आहे. (प्रे. कृत्ये १५:२८, २९).८ या कारणास्तव कोणा डॉक्टरने पितृत्वाचा आव आणून अशा रूग्णाच्या प्रगाढ व दीर्घकालीन धार्मिक श्रद्धेचा भंग केल्यास शोचनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. पोप जॉन पॉल दुसरे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या विवेकबुद्धीच्या विरुद्ध वागण्याची जबरदस्ती एखाद्यावर करणे म्हणजे “मानवी प्रतिष्ठेला मारलेला सर्वात दुःखद टोला होय. एका विशिष्ट अर्थाने ते शारीरिक मृत्यु वा हत्येपेक्षा अधिक वाईट आहे.”९
यहोवाचे साक्षीदार धार्मिक कारणांसाठी रक्त नाकारीत असले तरी साक्षीदार नसणारे अधिकाधिक रूग्ण एड्स्, अ-वर्ग, ब-वर्ग नसलेली कावीळ; तसेच प्रतिक्षमतेच्या (इम्यूनॉलॉजिकल) प्रतिक्रियांच्या धोक्यांमुळे रक्त टाळण्याची निवड करीत आहेत. फायद्यांशी तुलना करता असे धोके लहान वाटतात किंवा कसे याबद्दल आपण रूग्णांना आपली मते सांगू शकतो. परंतु अमेरिकन मेडिकल असोसिएशनने निर्देश केल्याप्रमाणे, “सुचवलेला उपचार किंवा शस्त्रक्रियेचा धोका पत्करण्यास तो तयार आहे की त्याविना जगण्याचा धोका पत्करील याचा शेवटचा निर्णय करणारा [रुग्णच होय]. हा व्यक्तीचा स्वाभाविक हक्क आहे, त्याला कायदाही मान्यता देतो.”१०
याच संदर्भात “संक्रमणाविना रक्तस्रावाने मरणाचा धोका पत्करलेल्या” साक्षीदाराबद्दल जोखीम/फायदा याविषयीचा प्रश्न मॅक्लीन११ यांनी उठवला. एक वैद्यकीय विद्यार्थी म्हणालाः “त्याची विचारशक्ती अबाधित होती. पण धार्मिक श्रद्धा उपचाराच्या एकमेव साधनाच्या आड येतात तेव्हा तुम्ही काय करणार?” मॅक्लीनने विवाद मांडलाः “हा माणूस चूक करीत आहे असे आपल्याला प्रकर्षाने वाटेल. परंतु यहोवाच्या साक्षीदारांची श्रद्धा आहे की, संक्रमण झाल्याने . . . कायमचा नाश होण्याच्या परिणामाची शक्यता आहे. वैद्यकशास्त्रामध्ये जोखीमा/फायदा यांच्या अभ्यासाचे प्रशिक्षण आपल्याला मिळाले आहे. परंतु कायमच्या नाशाची पृथ्वीवरील उर्वरित आयुष्यासोबत तुलना केल्यास त्या परिक्षणाला वेगळाच कौल मिळतो.”११
व्हर्सिलो व ड्यूप्रे१२ हे जर्नलच्या अंकात, आश्रितांच्या सुरक्षिततेच्या खबरदारीच्या हेतूवर भर देण्यासाठी इन रि ओस्बोर्न या खटल्याचा संदर्भ देतात. परंतु या खटल्याचा काय निकाल लागला? दोन लहान मुलांच्या अतिशय जखमी झालेल्या पित्याशी या प्रकरणाचा संबंध होता. त्याचा मृत्यु घडल्यास त्याचे नातेवाईक मुलांची भौतिक व आध्यात्मिक काळजी घेऊ शकतील असा निर्वाळा न्यायालयाने दिला. तेव्हा अलिकडच्या इतर खटल्यांप्रमाणे,१३ रूग्णाच्या उपचाराच्या निवडीला डावलण्याचे समर्थन करील असा कोणताही शासनाचा महत्त्वपूर्ण हितसंबंध न्यायालयाला सापडला नाही. रूग्णाला अतिशय आक्षेपार्ह वाटेल असा उपचार करण्याचा अधिकार देण्यासाठी न्यायालयीन हस्तक्षेप असमर्थनीय होता.१४ पर्यायी उपचारांनी तो रूग्ण बरा झाला व आपल्या कुटुंबाची परत काळजी वाहू लागला.
डॉक्टरांनी ज्यांना तोंड दिले आहे वा पुढे तोंड द्यावे लागेल अशा प्रकरणातील बहुतेक उपचार रक्ताशिवाय हाताळता येतात वा येतील हे खरे नाही का? आपण ज्याचा अभ्यास केला आहे व जे आपल्याला उत्तम प्रकारे कळते ते सर्व वैद्यकीय समस्यांशी संबंधित आहे. तथापि, आपले रूग्ण हे मानव आहेत. त्यांची व्यक्तीगत मूल्ये व ध्येये यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. स्वतःला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी, त्यांची स्वतःची नैतिक मूल्ये व सद्सद्विवेक बुद्धी याविषयी त्यांना सर्वोत्तम माहिती आहे. या गोष्टी त्यांच्या मते त्यांच्या जीवनाला अर्थ देत असतात.
साक्षीदार रूग्णांच्या धार्मिक विवेकाचा आदर केल्याने आपल्या कौशल्याला आव्हान मिळते. परंतु या आव्हानाला आपण सामोरे जातो, तेव्हा आपण सर्व ज्याचे इतक्या कटाक्षाने जतन करीत असतो त्या अमूल्य स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून सांगत असतो. जॉन स्टुअर्ट मिल् यांनी अगदी योग्यपणे असे म्हटले आहे की, “या स्वातंत्र्याचा जेथे सर्वसाधारणतः आदर केला जात नाही असा कोणताही समाज, मग त्याचे शासन कोणत्याही प्रकारचे असो, तो स्वतंत्र आहे असे म्हणता येणार नाही. . . . आपले आरोग्य, मग ते शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक असो, त्याचा संभाळणारा प्रत्येक जण स्वतःच असतो. इतरांना वाटते त्याप्रमाणे जगण्याची जबरदस्ती प्रत्येकावर करण्यापेक्षा, त्यांना जसे बरे वाटते तसे जगू देऊन प्रत्येकाने परस्परांचे सहन केल्यास मानवजातीला अधिक प्राप्ती करून घेता येईल.”१५
संदर्भ