आधुनिक काळासाठी उपयोगी असलेलं एक प्राचीन पुस्तक
बायबल हा धार्मिक ग्रंथ आहे असं अनेक लोक म्हणतात. पण बायबलमध्ये देवाची उपासना कशी करावी एवढंच सांगितलेलं नाही तर त्यात दररोजच्या जीवनासाठी व्यावहारिक सल्लेदेखील दिले आहेत.
उदाहरणार्थ, बायबल वाचल्यामुळे आणि त्यातल्या सल्ल्यांचं पालन केल्यामुळे काही जणांना कसा फायदा झाला आहे, याबद्दल ते आपला अनुभव सांगतात.
फियोना म्हणते: “बायबलमुळे माझं जीवन बरंच सुधारलंय. माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत चांगला बदल झाला आहे. आज मी आधीपेक्षा खूप खूश आहे.”
निटको म्हणते: “बायबलचा अभ्यास केल्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आणि उद्देश लाभला आहे.”
ॲन्ड्रु म्हणतो: “माझ्या जीवनात कमालीचा बदल झाला आहे. मी आधी कामाला खूपच जास्त महत्त्व द्यायचो, पण आता कामामागे बराच वेळ घालवण्याऐवजी मी कुटुंबाला जास्त वेळ देतो.”
हे तर फक्त काही अनुभव आहेत. बायबलमुळे ज्यांचं जीवन सुधारलं आहे अशी इतरही अनेक उदाहरणं आहेत. बायबलमध्ये दररोजच्या जीवनासाठी व्यावहारिक सल्ले दिले आहेत असं जगभरातल्या अनेकांचं मत आहे.
बायबलमुळे लोकांचं जीवन पुढील गोष्टींबाबतीत कसं सुधारू शकतं यावर आता आपण चर्चा करू या.
शारीरिक आरोग्य
भावनिक स्वास्थ्य
कौटुंबिक जीवन आणि मैत्री
पैशाचं नियोजन
देवाच्या मार्गदर्शनानुसार चालणं
पुढे चर्चा केलेल्या लेखातून आपल्याला कळेल की बायबल हे फक्त एक धार्मिक व पवित्र पुस्तक नाही, तर त्यात अशी व्यावहारिक माहिती दिली आहे जिचा उपयोग आपल्याला दररोजच्या जीवनात होऊ शकतो.