आधुनिक औषधोपचाराचे—हात कोठपर्यंत पोचतील?
लहान मुले, आंबे तोडताना एखादा आंबा हाती लागत नसेल तर मित्राच्या खांद्यावर चढून हात पुरवण्याचा प्रयत्न करतात. औषधोपचाराच्या क्षेत्रात देखील काहीसे असेच घडले आहे. इतिहासातील सुप्रसिद्ध वैद्यांच्या खांद्यावर चढून आधुनिक वैद्यकीय संशोधकांनी आपल्या क्षेत्रात अधिकाधिक वरपर्यंत मजल मारली आहे.
अगदी जुन्या काळातील डॉक्टरांपैकी हिप्पोक्रेटीस आणि पाश्चर यांसारखी काही सुप्रसिद्ध नावे आहेत, तर व्हिसेलियस आणि विल्यम मॉर्टन यांसारख्या तितक्याशा प्रसिद्ध नसलेल्या नावांचाही त्यांमध्ये समावेश आहे. यांनी आधुनिक वैद्यकीय क्षेत्राला कितपत योगदान दिले आहे?
प्राचीन काळात शास्त्रोक्त पद्धतीने औषधोपचार केला जात नसे, तर त्याचा संबंध अंधविश्वास आणि धार्मिक रितीरिवाजांशी जोडला जात असे. डॉ. फीलिक्स मार्टिइबान्यझ यांनी संपादित केलेल्या औषधोपचाराची परंपरा (इंग्रजी) या ग्रंथात ते म्हणतात: “रोगांवर मात करण्यासाठी . . . मेसोपोटेमियाचे लोक वैद्यकीय व धार्मिक पद्धतींची सांगड घालायचे; कारण त्यांचा असा विश्वास होता, की आजार देवाच्या कोपामुळे होतात.” यानंतर काही काळातच विकसित झालेल्या इजिप्शियन औषधोपचार पद्धती देखील धार्मिक रितीरिवाजांतच मुळावलेल्या होत्या. अशारितीने अगदी सुरवातीपासून, औषधोपचार करणाऱ्याकडे श्रद्धेने पाहिले जायचे.
द क्ले पेडेस्टल या पुस्तकात डॉ. थॉमस ए. प्रेस्टन म्हणतात: “जुन्या काळातील लोकांच्या बऱ्याच समजुतींची आजही वैद्यकीय उपचारपद्धतींवर छाप दिसून येते. यांपैकी एक समजूत अशी होती, की रुग्णाचे रोगावर काहीही नियंत्रण नसते, डॉक्टरच्या जादुई शक्तीनेच त्यावर उपाय करता येतो.”
भविष्यातील प्रगतीचा पाया घालणे
पण कालांतराने वैद्यकीय उपचारपद्धती अधिकाधिक शास्त्रोक्त होत गेल्या. प्राचीन काळात शास्त्रोक्त पद्धतीने उपचार करणाऱ्यांपैकी सर्वात पहिला हिप्पोक्रेटीस होता. त्याचा जन्म सा.यु.पू. ४६० साली कॉस नावाच्या ग्रीक बेटावर झाला होता. बरेचजण त्याला पाश्चात्त्य वैद्यकीय उपचारपद्धतींचा जनक मानतात. हिप्पोक्रेटीसने वैद्यकीय उपचाराकडे सयुक्तिक दृष्टिकोनाने पाहण्यास सुरवात केली आणि हाच पुढील प्रगतीचा आधार बनला. देवीदेवतांच्या कोपामुळे आजार होतात या समजुतीला नाकारून, ते नैसर्गिक कारणांमुळे होतात असे त्याने प्रतिपादित केले. उदाहरणार्थ, मिर्गीच्या रोगाला कित्येक वर्षांपासून देवाधर्माशी संबंधित असलेला दैवी रोग मानले जायचे कारण केवळ देवताच हा रोग बरा करू शकतात असे लोकांचे मत होते. पण हिप्पोक्रेटीसने लिहिले: “दैवी म्हटलेला हा रोग मला तरी इतर कोणत्याही रोगापेक्षा जास्त पवित्र किंवा दैवी वाटत नाही, हा रोगही नैसर्गिक कारणांमुळेच होतो.” वेगवेगळ्या रोगांच्या लक्षणांचा अभ्यास करून भविष्यात संदर्भ पाहण्याकरता या लक्षणांची नोंद करून ठेवणारा हिप्पोक्रेटीस पहिला होता असेही मानले जाते.
कित्येक शतकांनंतर गॅलन या सा.यु. १२९ साली जन्मलेल्या ग्रीक वैद्याने देखील नवनवीन पद्धतींनी वैज्ञानिक संशोधन केले. मानवांच्या व प्राण्यांच्या शरीरांचे विच्छेदन करून गॅलनने शरीरशास्त्राचे एक पाठ्यपुस्तक तयार केले. डॉक्टरांनी हे पाठ्यपुस्तक कित्येक शतके वापरले! पण १५१४ साली ब्रुसेल्स येथे जन्मलेल्या आंद्रियास व्हेसेलियस याने मानवी शरीररचना (इंग्रजी) या नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा कडाडून विरोध करण्यात आला कारण त्यात गॅलेनच्या बऱ्याच निष्कर्षांचे खंडन करण्यात आले होते. पण या ग्रंथाने आधुनिक शरीरशास्त्राचा पाया घातला. डाय ग्रोस्सेन (थोर लोक) या ग्रंथानुसार, व्हेसेलियस “सर्व राष्ट्रांतील आणि सर्व कालखंडांतील सर्वात प्रमुख वैद्यकीय संशोधक ठरला.”
कालांतराने गॅलेनच्या हृदय व रक्ताभिसरणाविषयीचे सिद्धान्त कालबाह्य ठरवण्यात आले.a इंग्रज वैद्य विल्यम हार्वे याने कित्येक वर्षांपर्यंत पशूपक्ष्यांच्या शरीराचे विच्छेदन करून त्यांचा अभ्यास केला. त्याने हृदयातील झडपांच्या कार्याचे निरीक्षण केले, हृदयाच्या कप्प्यांतील रक्ताचे प्रमाण मोजले आणि शरीरातील रक्ताच्या एकूण प्रमाणाचा अंदाज काढला. हार्वे याने आपले निष्कर्ष १६२८ साली, प्राण्यांतील हृदयाचे आणि रक्ताचे कार्य (इंग्रजी) या पुस्तकात प्रकाशित केले. त्याची बरीच टीका व विरोध करण्यात आला; त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याचा अपमानही करण्यात आला. पण त्याच्या कार्याने वैद्यकीय अभ्यासाला कलाटणी दिली; याचे कारण म्हणजे शरीरातल्या रक्ताभिसरण संस्थेचा त्याने लावलेला शोध!
न्हाव्यांपासून शल्यचिकित्सेपर्यंत
शल्यचिकित्सेच्या कौशल्यांतही अभूतपूर्व प्रगती होऊ लागली. मध्ययुगांदरम्यान शल्यक्रिया सहसा न्हाव्यांचे काम होते. म्हणूनच की काय, काहीजणांचे असे म्हणणे आहे, की १६ व्या शतकातील फ्रान्सचा ॲम्ब्रिओस पारे आधुनिक शल्यचिकित्सेचा जनक आहे. या पहिल्या शल्यचिकित्सकाने फ्रान्सच्या चार राजांची सेवा केली होती. पारे याने शल्यचिकित्सेत वापरल्या जाणाऱ्या कित्येक साधनांचाही शोध लावला.
१९ व्या शतकात शल्यचिकित्सकांपुढे असणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला होणाऱ्या वेदना कशा कमी करता येतील? पण १८४६ साली विल्यम मॉर्टन नावाच्या एका दंतवैद्याच्या प्रयत्नांमुळे शस्त्रक्रियेत भूल देण्याच्या पद्धतीचा सर्रास वापर करण्यात येऊ लागला.b
जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्हेल्म रॉएन्टजन यांना १८९५ साली विद्युतशक्तीचा उपयोग करून काही प्रयोग करत असताना असे आढळले की प्रकाशकिरणे मांसातून आरपार जात होती पण हाडे मात्र या किरणांना अडवत होती. त्यांना या किरणांच्या उगमाविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांनी त्यांना क्ष किरणे असे नाव दिले. आजही बऱ्याच भाषांत हेच नाव वापरले जाते. (जर्मन भाषेत या किरणांना रॉएन्टजेनस्ट्रालन म्हणतात.) दी ग्रोसन डॉइशन (महान जर्मन) या पुस्तकानुसार रॉएन्टजन आपल्या पत्नीला म्हणाले: “लोक म्हणतील: ‘रॉएन्टजनला वेड लागले आहे.’” काहींनी खरेच त्यांना वेड्यांत काढले. पण त्यांचा हा शोध शल्यचिकित्सेच्या क्षेत्रात क्रांतीकारक ठरला. आता शल्यचिकित्सकांना शरीराचा कोणताही भाग न कापता आतले चित्र पाहणे शक्य झाले होते.
रोगांवर मात
कित्येक शतकांपर्यंत देवीसारख्या संसर्गजन्य रोगांमुळे वारंवार भयानक जीवघेण्या साथी यायच्या. नवव्या शतकातील अर-राझी या इराणी वैद्याला काहीजण त्या काळच्या इस्लामी जगातील सर्वात महान वैद्य मानतात. देवीच्या रोगाचे शास्त्रोक्त विवरण करणारा तो पहिला होता. पण कित्येक शतकांनंतर एडवर्ड जेनर नावाच्या एका ब्रिटिश डॉक्टरने या रोगावर औषध शोधून काढले. जेनर यांच्या लक्षात आले की एखाद्या रुग्णाला काऊपॉक्स नावाच्या एका अबाधक रोगाची लागण झाल्यास त्याला देवीची लागण होत नसे. या निरीक्षणाच्या आधारावर, जेनरने कॉउपॉक्सच्या फोडांतील द्रवाचा उपयोग करून देवीच्या रोगावर प्रतिबंधक लस तयार केली. ही लस १७९६ साली तयार करण्यात आली. इतर नवीन शोध लावणाऱ्यांप्रमाणेच जेनरची देखील टीका करण्यात आली आणि त्याला बराच विरोधही सहन करावा लागला. पण लस तयार करण्याची पद्धत शोधून काढल्यामुळे देवीच्या रोगाचे पूर्णपणे निर्मूलन करण्यात आले आणि वैद्यकीय शास्त्राला एक अतिशय शक्तीशाली साधन लाभले.
फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर याने रेबीज व काळपुळीच्या (ॲन्थ्रेक्स) आजारावर उपचार करण्यासाठी लशींचा उपयोग केला. तसेच, रोग प्रामुख्याने जिवाणूंमुळे होतात हे देखील त्याने शाबीत केले. एका इतिहासकाराने ज्याला “एकोणीसाव्या शतकातील सर्वात भयंकर जीवघेणा रोग” म्हटले त्या क्षयरोगाचे जिवाणू १८८२ साली, रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढले. जवळजवळ एका वर्षाने, कॉकने कॉलेरा या रोगाचे जिवाणू देखील शोधून काढले. लाईफ नियतकालिक म्हणते: “पाश्चर व कॉक यांच्या कार्यामुळे सूक्ष्म जीवजंतूशास्त्राचा जन्म झाला, तसेच प्रतिबंधकशास्त्र, स्वच्छता व आरोग्य या क्षेत्रांतही लक्षणीय प्रगती घडून आली. मागील १,००० वर्षांत वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीशील पावलांपैकी, जीवशास्त्राच्या अभ्यासामुळे झालेल्या प्रगतीचे मनुष्यांचे आयुष्यमान वाढवण्यास सर्वात जास्त योगदान मिळाले आहे.”
विसाव्या शतकातील वैद्यकीय प्रगती
विसाव्या शतकाच्या सुरवातीला वैद्यकीय शास्त्र वरती उल्लेख केलेल्या आणि इतर उल्लेखनीय वैद्यांच्या खांद्यावर उभे होते. तेव्हापासून, वैद्यकीय क्षेत्रात अतिशय झपाट्याने प्रगती झाली आहे. मधुमेहींकरता इन्सुलिन, कर्करोगाकरता कीमोथेरपी, ग्रंथीसंबंधीत विकारांकरता हार्मोन उपचार, क्षयरोगाकरता प्रतिजैवी औषधे, विशिष्ट प्रकारच्या मलेरियावर क्लोरोक्वीन, आणि मूत्रपिंडाच्या विकारांकरता डायलिसिस तसेच ओपन हार्ट शस्त्रक्रिया आणि अवयवांचे रोपण ही त्यांपैकी काही उदाहरणे.
पण आज आपण २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत; “जगातील सर्व लोकांना समाधानकारक प्रमाणात आरोग्य” मिळवून देण्याचे ध्येय वैद्यकीय शास्त्राच्या कितपत अवाक्यात आले आहे?
अवाक्याबाहेरचे ध्येय?
मित्रांच्या खांद्यावर चढूनही काही आंबे हाती लागतच नाहीत याचा मुलांना अनुभव असतो. सगळ्यात रसाळ आंबे कधीकधी झाडाच्या शेंड्यावर असतात; प्रयत्न करूनही ते अवाक्याबाहेरच राहतात. त्याचप्रकारे वैद्यकीय शास्त्राने प्रगतीचा एकापाठोपाठ एक पल्ला गाठला आहे. पण जगातल्या सर्व लोकांना चांगले आरोग्य मिळवून देण्याचे सर्वात हवेहवेसे ध्येय मात्र—अजूनही झाडाच्या शेंड्यावर आहे.
म्हणूनच, “युरोपियन लोकांच्या आयुष्यमानात आणि आरोग्यात अभूतपूर्व सुधारणा झाली आहे” असे १९९८ साली युरोपियन कमिशनने म्हटले तरीसुद्धा, सदर वृत्तात असेही म्हणण्यात आले की “प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एकाला वयाची ६५ वर्षे गाठण्याआधीच अकाली मृत्यू येईल. यांपैकी, कर्करोग ४०% लोकांचा बळी घेईल तर हृदयरोगांमुळे ३०% लोक मृत्यूमुखी पडतील . . . शिवाय नवीन धोकेदायक रोगांविरुद्धही पूर्वीपेक्षा अधिक चांगले संरक्षण आताच पुरवणे आवश्यक आहे.”
गेझुन्डहाइट नावाच्या जर्मन आरोग्य नियतकालिकाच्या नोव्हेंबर १९९८ च्या अंकात प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार कॉलेरा व क्षयरोगासारख्या संसर्गजन्य रोगांचा धोका वाढत आहे. असे का घडत आहे? प्रतिजैवी औषधे “परिणाम करीनाशी झाली आहेत. अधिकाधिक जिवाणू कमीतकमी एका औषधाचा प्रतिकार करू लागले आहेत; बरेचशे जिवाणू तर कित्येक औषधांना प्रतिकारक ठरत आहेत.” जुने रोग परत येत आहेत, आणि त्यात एड्स यासारख्या नव्या रोगांची देखील भर पडत आहे. स्टॅटिसटिक्स ’९७ नावाचे जर्मन औषधक्रियासंबंधी प्रकाशन आपल्याला आठवण करून देते: “जगातल्या एकूण ज्ञात रोगांपैकी दोन तृतीयांश, म्हणजे जवळजवळ २०,००० रोगांवर अद्याप कोणताही उपाय नाही.”
जनुक उपचारपद्धत उपाय ठरेल का?
नवनवीन उपचारपद्धतींचा आजही शोध लावला जात आहे यात शंका नाही. उदाहरणार्थ, बऱ्याच जणांना वाटते की जनुकांमध्ये फेरबदल करण्याच्या शास्त्रामुळे उत्तम आरोग्याचे ध्येय सुसाध्य होईल. १९९० च्या दशकात संयुक्त संस्थानांत डब्ल्यु. फ्रेंच ॲन्डरसन यांसारख्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनातून दिसून आल्याप्रमाणे जनुक उपचारपद्धत “वैद्यकीय संशोधनातील नवे सनसनाटी पाऊल” असल्याचे सांगण्यात आले. हायलिन माईट जेनेन (जनुकांद्वारे बरे होणे) या पुस्तकानुसार जीन उपचारपद्धतीमुळे, “वैद्यकीय शास्त्रात विकासाचे एक नवे पर्व येऊ घातले आहे. खासकरून आजपर्यंत असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांच्या उपचारासंबंधी असे मानले जात आहे.”
वैज्ञानिकांना आशा आहे की कालांतराने त्यांना रोग्यांच्या शरीरात निरोगी जनुके टोचून उपजत जननिक रोग बरे करता येतील. कर्करोगाच्या पेशींसारख्या अपायकारक पेशी देखील स्वतःलाच नष्ट करू शकतील. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट रोग होण्याची कितपत शक्यता आहे हे जननिक तपासणी करून शोधून काढणे आताच शक्य झाले आहे. काहींचे म्हणणे आहे की प्रत्येक व्यक्तीची जनुकीय घडण पाहून तिला खास उपचार देणे ही पुढची पायरी असेल. एका नामवंत संशोधकाने असे सुचवले आहे की एक दिवस असाही येईल जेव्हा डॉक्टर “आपल्या रोग्यांच्या आजाराचे निदान करून त्या आजारासाठी आवश्यक असलेल्या रेणवीय धाग्याचा तुकडा औषध म्हणून देतील.”
पण, जननिक उपचार भविष्यातील “जादुई औषध” ठरेल या गोष्टीशी सर्वचजण सहमत नाहीत. किंबहुना, सर्वेक्षणांनुसार बऱ्याच लोकांना आपली जननिक घडण तपासून पाहण्याचीही इच्छा नाही. काहींना अशीही भीती वाटते की कदाचित जनुक उपचारपद्धतीमुळे नैसर्गिक नियमांचे उल्लंघन होईल आणि हे मानवजातीकरता धोकेदायक ठरू शकेल.
जनुकांमध्ये फेरबदल करण्याचे शास्त्र किंवा इतर उच्च तांत्रिक वैद्यकीय पद्धतींची महत्त्वाकांक्षी आश्वासने खरी ठरतील किंवा नाहीत हे येणारा काळच सांगेल. पण अनाठायी आशा बाळगण्यात अर्थ नाही; आणि याला कारण आहे. द क्ले पेडेस्टल नावाच्या पुस्तकात सांगितल्यानुसार सहसा असेच घडते: “एखाद्या नवीन उपचाराचा शोध लावला जातो, वैद्यकीय परिषदांमध्ये आणि माहितीपत्रकांमध्ये त्याचा बराच उदोउदो केला जातो. शोध लावणारे रातोरात सुप्रसिद्ध होतात आणि प्रसार माध्यमाकडूनही या नव्या प्रगतीचे तोंडभर कौतुक केले जाते. पण मग या जादुई उपचाराची बरीच यशस्वी प्रकरणे नोंदल्यावर हा सुरवातीचा उत्साह मावळतो आणि हळूहळू काही महिन्यांत किंवा काही दशकांत सर्वांचा भ्रम नाहीसा झालेला असतो. मग दुसऱ्या एखाद्या उपचाराचा शोध लावला जातो आणि एका रात्रीत त्या जुन्या उपचाराला कालबाह्य आणि निरुपयोगी ठरवून त्याची जागा घेतो.” किंबहुना बहुतेक डॉक्टरांनी कालबाह्य ठरवून टाकून दिलेले बरेच उपचार काही काळाआधीच प्रमाणभूत समजले जात होते.
आज डॉक्टरांकडे पूर्वीसारख्या धार्मिक श्रद्धेने जरी पाहिले जात नसले तरीसुद्धा काही लोक अजूनही वैद्यकीय चिकित्सकांना देवच समजतात. आणि त्यांची अशी समजूत आहे की आज ना उद्या विज्ञान मानवांच्या सर्व रोगांवर औषध शोधून काढण्यात यशस्वी होईल. पण आदर्श आणि वस्तूस्थिती यात जमीनअस्मानाचा फरक आहे. माणूस कसा आणि का वृद्ध होतो (इंग्रजी) या पुस्तकात डॉ. लिओनर्ड हेफ्लिक असे म्हणतात: “१९०० साली संयुक्त संस्थानांतील ७५ टक्के लोक पासष्ट वर्षे पूर्ण करण्याआधीच मरण पावले. आज ही आकडेवारी अगदी उलट आहे: जवळजवळ ७० टक्के लोक पासष्ट वर्षांच्या नंतरच मरण पावतात.” आयुष्यमान वाढण्याचे काय कारण असू शकते? हेफ्लिक स्पष्ट करतात की “नवजात शिशुंच्या मृत्यूदरात घट झाल्यामुळे हे शक्य झाले आहे.” वैद्यकीय शास्त्र वयस्क लोकांमधील मृत्यूची प्रमुख कारणे, अर्थात, हृदरोग, कर्करोग आणि पक्षाघात कायमचे काढून टाकण्यात यशस्वी झाले तर काय होईल याची कल्पना करा. यामुळे माणूस अमर होईल का? मुळीच नाही. डॉ. हेफ्लिक सांगतात की तरीसुद्धा “बहुतेक लोक जवळजवळ शंभर वर्षांचे होऊ लागतील.” ते पुढे म्हणतात: “शंभरी गाठलेले हे लोक देखील अमर होणार नाहीत. पण ते कोणत्या कारणांनी मरतील? काही विशिष्ट कारण नसतानाही ते हळूहळू अशक्त होत होत शेवटी मरण पावतील.”
वैद्यकीय शास्त्राने प्रयत्नांची शिकस्त करूनही मृत्यू काढून टाकण्याचे ध्येय अवाक्याबाहेरच आहे. असे का? आणि सर्वांकरता उत्तम आरोग्य हे कायम एक स्वप्नच राहील का? (g०१ ६/८)
[तळटीपा]
a द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यानुसार गॅलनची अशी धारणा होती की अन्नाचे पाचन झाल्यानंतर यकृतात त्यापासून रक्त तयार केले जाते आणि तेथून ते सबंध शरीरात वाहते आणि शोषले जाते.
b सावध राहा! मासिकाच्या जानेवारी-मार्च २००१ अंकातील “वेदना घालवणारा अनेस्थेशिया” हा लेख पाहा.
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
“पुरातन काळातील लोकांच्या बऱ्याच विश्वासांची आजपर्यंत वैद्यकीय शास्त्रावर छाप आहे.”—द क्ले पेडेस्टल
[४, ५ पानांवरील चित्रे]
हिप्पोक्रेटीस, गॅलन, आणि व्हिसेलियस यांनी आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा पाया घातला
[चित्राचे श्रेय]
कॉस बेट, ग्रीस
Courtesy National Library of Medicine
Woodcut by Jan Steven von Kalkar of A. Vesalius, taken from Meyer’s Encyclopedic Lexicon
[६ पानांवरील चित्रे]
ॲम्ब्रिओस पारे अगदी पहिल्या शल्यचिकित्सकांपैकी होता आणि त्याने फ्रान्सच्या चार राजांची सेवा केली होती
पर्शियन वैद्य अर-राझी (डावीकडे) आणि ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर (उजवीकडे)
[चित्राचे श्रेय]
पारे आणि अर-राझी: Courtesy National Library of Medicine
थोर पुरूष व सुप्रसिद्ध स्त्रिया या पुस्तकातून
[७ पानांवरील चित्र]
फ्रेंच वैज्ञानिक लुई पाश्चर याने सिद्ध केले की रोग जंतुंमुळे होतात
[चित्राचे श्रेय]
© Institut Pasteur
[८ पानांवरील चित्रे]
मृत्यूची प्रमुख कारणे काढून टाकली तरीसुद्धा वृद्धापकाळामुळे मृत्यू येईल