८०१ उड्डाण—अपघातातून मी वाचलो
आमचं विमान ग्वाममध्ये उतरू लागलं तेव्हा मी खिडकीतून बाहेर डोकावलं. ‘अरेच्या! नवलच की; किती अंधार वाटतोय,’ असा विचार माझ्या मनात आला. मध्यरात्र टळून गेली होती आणि जोरदार पावसामुळे काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. पण, बेटावर नेहमी दिसणारे दिवे आणि विमानतळावरील चकाकणाऱ्या धावपट्ट्या आज कुठं गायब झाल्या होत्या? आमच्या जंबो जेटच्या पंखांखालच्या अंधूक दिव्यांशिवाय काहीच दिसत नव्हतं.
एका हवाई परिचारकाने, विमान उतरण्याआधी केली जाते ती नेहमीची घोषणा केली आणि विमानाखालचा गाडा व चाके आपल्या जागी चपखल बसल्याचंही मी ऐकलं. आमचं विमान जमिनीला घासलं तोच अचानक एक मोठा आवाज झाला. विमान अगदी जोरजोरानं हलू लागलं आणि प्रवाशांनी आपापल्या सीट्सच्या हातांवरील आपली पकड घट्ट केली आणि ओरडले, “काय चाललंय काय?”
थोड्याच समयानंतर आमचं बोईंग ७४७, विमानतळापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगराला जाऊन धडकलं; आमच्या वैमानिकाचा अंदाज फसल्यामुळेच हे घडलं होतं. ऑगस्ट ६, १९९७ रोजी झालेल्या या हवाई दुर्घटनेमुळं एकूण २२८ प्रवासी आणि कर्मचारी मृत्यूच्या दरीत कोसळले. बचावलेल्या केवळ २६ जणांपैकी मी एक होतो.
सेऊल, कोरिया इथं, विमानात बसण्याआधी एका हवाई परिवहन प्रतिनिधीनं माझी कोच क्लासची सीट बदलून फर्स्ट क्लासमध्ये शिल्लक असलेली शेवटची सीट मला दिली. मी इतका खूष झालो, की माझ्या पत्नीला म्हणजे सून डक हिला मी फोन केला; ग्वामच्या विमानतळावर ती मला भेटणार होती. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, की माझी सीट बदलल्यामुळे पुढं माझा इतका फायदा होणार होता.
अपघात आणि त्यानंतरचे दृश्य
अगदी अंधूक अंधूक दिसत असल्यामुळे विमान कर्मचाऱ्यांना कदाचित पुढील धोक्याची पुसटशी देखील कल्पना आली नसावी. सर्व काही केवळ एका क्षणात घडलं होतं! एक क्षण मी पुढे येणाऱ्या संकटाला तोड देण्याची तयारी करत होतो तर दुसऱ्या क्षणी मी विमानाच्या बाहेर, जमिनीवर होतो आणि तेव्हाही मी माझ्या सीटला जखडलेलो होतो. माझी शुद्ध हरपली होती की काय ते मला निश्चित माहीत नाही.
मी विचार केला, ‘हे स्वप्न तर नाही?’ ही एक वास्तविकता असल्याचं माझ्या लक्षात आलं तेव्हा माझे सगळ्यात पहिले विचार, या अपघाताबद्दल ऐकल्यावर माझ्या पत्नीची दशा काय असेल याविषयीचे होते. नंतर तिनं मला सांगितलं, की एका क्षणासाठी देखील तिनं आशा सोडली नव्हती. केवळ सात प्रवासी बचावले आहेत असं विमानतळावर तिनं उडत उडत ऐकलं, अगदी तेव्हा देखील तिचा पक्का विश्वास होता की त्या सात जणांपैकी मी एक होतो.
आमच्या विमानाचे चार तुकडे होऊन जंगलाच्या उंचसखल भागात ते विखुरले गेले होते. लोकांची शवं इतरत्र फेकली गेली होती. विमानांच्या काही भागांनी पेट घेतला होता आणि भयंकर कण्हण्याच्या आणि रडण्याच्या आवाजांसह विस्फोटांचे आवाजही माझ्या कानी आले. “वाचवा! अरे कोणी वाचवा मला! असं जीवाच्या आकांतानं लोक ओरडत होते. माझी सीट, १.८ मिटर उंच काटेरी गवतात सापडली आणि अग्नीच्या भीतीदायक प्रकाशात, जवळच मला एक उभा डोंगरकडा दिसला. रात्रीचे सुमारे दोन वाजले होते आणि पावसाची धारही चालूच होती.
मला इतका जबरदस्त धक्का बसला होता की मला काही दुखापत झाली असेल याचा विचारही मी केला नाही; एका लहान मुलीची कवटी पाठीवर लोंबकळत असल्याचं मी पाहिलं तेव्हा कुठं मी भानावर आलो. मी लगेच माझं डोकं चाचपून पाहिलं, डाव्या डोळ्याच्या वरती झालेल्या जखमेतून रक्त वाहत होतं. मी सबंध शरीर चाचपून पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं, की मला आणखीनही पुष्कळ लहानसहान जखमा झाल्या होत्या. मात्र गंभीर काही झालं नव्हतं, एवढं तरी बरं. पण, माझ्या पायांमध्ये असह्य वेदना होत असल्यामुळे हालचाल करणं अगदीच अशक्यप्राय झालं होतं. दोन्ही पाय मोडले होते.
नंतर रुग्णालयात पोहंचल्यावर, माझ्या जखमा अगदी “किरकोळ” असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आणि खरंच, बचावलेल्या इतर लोकांच्या तुलनेत माझ्या जखमा तशा किरकोळच होत्या. एका माणसाला तर त्या छिन्नविच्छिन्न झालेल्या विमानातून बाहेर काढलं तेव्हा त्याचे दोन्ही पाय गायब होते. इतर जण बरेच होरपळले होते; यांमध्ये तीन जण असे होते जे अपघातातून बचावले खरं, पण कित्येक आठवडे भयंकर वेदना सहन करून शेवटी मरण पावले.
आगीच्या लोळांची भीती
माझ्या जखमांचा विचार करण्याऐवजी बचाव कार्यकर्ते वेळेवर माझ्यापर्यंत पोहंचतील की नाही याचीच मला जास्त हुरहूर लागली होती. विमानाचे मधले भाग—जिथं सुरवातीला मी बसणार होतो—संपूर्णतः उद्ध्वस्त झाले होते. जे काही उरले होते त्याने पेट घेतला होता आणि आत सापडलेल्या प्रवाशांनी यातनामय मरण सोसले. त्यांनी मदतीसाठी फोडलेल्या किंकाळ्या मी कधीच विसरू शकणार नाही.
मी विमानाच्या अगदी पुढच्या बाजूला बसलो होतो. आणि हाताच्या अंतरावरच मोडतोड झाली होती. मान वळवून मागे पाहिल्यावर मला आगीचे लोळ दिसत होते. लवकरच ते माझ्यापाशी पोहंचतील अशी भयशंका मला वाटली; पण बरं झालं तसं काही घडलं नाही.
शेवटी सुटका झाली!
एक एक क्षण मुंगीच्या गतीनं उलटत होता. एक तास होऊन गेला. शेवटी, पहाटे तीनच्या सुमारास काही बचाव कार्यकर्त्यांना अपघात स्थळ सापडलं. डोंगराच्या शिखरावरून त्यांना जे काही दिसत होतं त्यावर ते आश्चर्योद्गार काढत असल्याचं मी ऐकलं. त्यातल्या एकानं ओरडून विचारलं: “कोणी आहे का?”
त्यावर, “आहे, आहे मी आहे, मला वाचवा” असं मोठ्यानं ओरडून मी प्रत्युत्तर दिलं. इतर प्रवाशांनीही प्रतिसाद दिला. एका बचाव कार्यकर्त्यानं दुसऱ्याचा “टेड” म्हणून उल्लेख केला. त्यामुळे, “टेड, मी इथं आहे,” आणि “टेड लवकर ये, आम्हाला वाचव!” असं मी ओरडू लागलो.
“आम्ही आलोच खाली! जरा थांबा.” असं उत्तर मिळालं.
धुवाँदार पावसामुळे कदाचित आगीच्या लोळांपासून अनेकांचे जीव वाचले असले तरी त्यामुळे निसरड्या उतारावरून खाली उतरणं कठीण झालं होतं. म्हणून मग, आमच्यापर्यंत पोहंचण्यात बचाव कार्यकर्त्यांना आणखीन एक तास उशीर झाला. मला हुडकून काढण्यासाठी त्यांना जणू युगांतरे लागली.
फ्लॅशलाईट्स घेऊन आलेल्या दोन बचाव कार्यकर्त्यांनी म्हटलं: “घाबरू नका, आता आम्ही आलोय.” लवकरच आणखीन दोन कार्यकर्ते आले आणि त्या सगळ्यांनी मिळून मला हालवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी माझे हात धरले आणि दुसऱ्या दोघांनी माझे पाय धरले. या अवस्थेत उचलणं आणि विशेषतः ते सारखे मातीत घसरत असल्यामुळे, अतिशय वेदनामय होतं. थोडंसं अंतर कापून गेल्यावर त्यांनी मला खाली ठेवलं. त्यातल्या एकानं स्ट्रेचर आणला आणि डोंगराच्या माथ्यावर असलेल्या एका रुग्णवाहिकेपर्यंत पोहंचवणाऱ्या लष्करी हेलिकॉप्टरपाशी मला हलवण्यात आलं.
शेवटी पत्नीला भेटलो!
मला रुग्णालयातील तातडीच्या विभागात नेलं गेलं तेव्हा सकाळचे सुमारे साडेपाच वाजले होते. माझ्या जखमा अतिशय नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी मला फोन करू दिला नाही. त्यामुळे अपघात झाल्याच्या जवळजवळ नऊ तासांनंतर म्हणजे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत माझ्या पत्नीला कळालं नव्हतं, की मी दुर्घटनेतून वाचलो होतो. बचावलेल्या लोकांच्या यादीत माझं नाव पाहिलेल्या एका निकटवर्तीने तिला ही बातमी कळवली होती.
शेवटी, संध्याकाळी सुमारे चार वाजता माझ्या पत्नीला मला पाहण्याची परवानगी दिली गेली तेव्हा मी तिला लगेच ओळखलं नाही. वेदनाशामक औषधांमुळे मला थोडी गुंगी आली होती. “तुम्ही जिवंत आहात यातच मला सर्वकाही मिळालं; याचेच मी आभारी आहे,” हे तिचे पहिले शब्द होते. आमच्या दोघांमध्ये झालेलं बोलणं मला आठवत नाही पण मी असं उत्तर दिल्याचं नंतर मला सांगण्यात आलं: “माझे आभार मानू नकोस. यहोवाचे आभार मान.”
क्रमवार प्राथमिकता राखणे
रुग्णालयात असताना मला होत असणाऱ्या वेदना काहीशा परिचित वाटल्या. सन १९८७ मध्ये, कोरियामधून ग्वामला येऊन एक वर्षही झालं नसेल, तर एका बांधकाम अपघातात मी चवथ्या मजल्यावरून पडलो आणि माझे दोन्ही पाय मोडले. हाच माझ्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग ठरला. यहोवाची साक्षीदार असलेली माझी थोरली बहीण मला बायबलचा अभ्यास करण्याचा सतत आग्रह करायची. प्रकृती सुधारातील सहा महिन्यांच्या कालावधीत मला हा अभ्यास करण्याची संधी मिळाली. परिणामस्वरूपी, त्याच वर्षी मी यहोवाला माझं जीवन समर्पित करून पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे ते चिन्हांकित केलं.
विमान अपघात झाला तेव्हापासून मी माझ्या एका आवडत्या शास्त्रवचनाचा सारखा विचार करतो आहे, जे म्हणते: “तुम्ही पहिल्याने त्याचे [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) विमान दुर्घटनेनंतर माझी प्रकृती सुधारत असताना मला माझ्या जीवनाचं पुन्हा एकदा परीक्षण करण्याची संधी मिळाली.
अतिशय शक्तिशाली मार्गानं उड्डाण ८०१ अपघातानं, माझ्या मनावर जीवनाचं मूल्य बिंबवलं. किती सहजासहजी माझा मृत्यू झाला असता! (उपदेशक ९:११) माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया तर करावयाच्या होत्याच होत्या शिवाय महिन्याभरापेक्षा अधिक काळ मी रुग्णालयात काढला.
जीवनाच्या अद्भुत देणगीसाठी तसेच पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाचा आस्वाद घेण्याकरता आपल्या महान सृष्टीकर्त्यानं केलेल्या तरतुदींसाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे हे मी त्याला प्रकट करू इच्छितो. (स्तोत्र ३७:९-११, २९; प्रकटीकरण २१:३, ४) मला याची जाणीव झाली आहे, की आपल्या जीवनात राज्य हितांना सतत प्रथम स्थानी ठेवणे, कृतज्ञता दाखविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.—सौजन्याने.
[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]
US Navy/Sipa Press