स्वयंपाकघर मजेचे ठिकाण असू शकते
“आधी बाहेर हो! स्वयंपाकघरात बिलकुल यायचं नाही!” पोटात कावळे ओरडत असल्यामुळे, जेवणाआधीच चव घ्यायला म्हणून एखादा मुलगा स्वयंपाकघरात गेलाच तर त्याला पुष्कळदा हे रागावणे मिळते. परंतु, त्यांना घालवून देण्याऐवजी पालकांनी आपल्या मुलांना स्वयंपाकघरात बोलावले पाहिजे. ते का? कारण स्वयंपाकघर म्हणजे प्रत्यक्षात एक मनोरंजक वर्ग आहे.
स्वयंपाकघर असे एक ठिकाण आहे जेथे, मुले आपली सर्जनशीलता आणि प्रश्न-निरसन कौशल्य वाढवू शकतात, जेथे ते इतरांची सेवा करायला आणि एकत्र मिळून काम करायला शिकू शकतात, जेथे अर्थपूर्ण हृदयस्पर्शी संभाषणे अनायास सुरू होऊ शकतात, जेथे अतिमहत्त्वाची तत्त्वे नकळत बिंबवली जाऊ शकतात. होय, स्वयंपाकाची तयारी करताना स्वयंपाकघरातील कपाटांमधल्या, कप्प्यांमधल्या आणि फळ्यांवरच्या वस्तूंवरून पुष्कळसे मौल्यवान धडे शिकता येतात.
पण तंत्रज्ञान आणि माहितीच्या या युगात, मुलांना शिकवण्यासाठी स्वयंपाकघर का निवडावे? त्याचे उत्तर म्हणजे, वेळ. आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला—आणि तेसुद्धा भरपूर वेळ घालवायला इतर कोणताही मार्ग नाही हे पालकांना कळून चुकले आहे!a आता तो वेळ कोठून काढावा असा प्रश्न उभा राहतो. पालकांनी घरातल्या दररोजच्या कामांचा विचार करून आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याची आणि त्यांना शिकवण्याची ती संधी समजावी असे काही तज्ज्ञ पालकांना आर्जवत आहेत. ही गोष्ट, देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्रातल्या पालकांना जी आज्ञा दिली होती त्याच्या एकवाक्यतेत आहेत: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:६, ७.
आपल्याला नाहीतरी स्वयंपाकघरात रोज वेळ घालवावा लागत असल्यामुळे कुटुंबाने एकत्र मिळून काम करायला हे सर्वात उत्तम ठिकाण असू शकते. वेळ, शक्ती आणि पैसा नसल्यामुळे सहली रद्द केल्या जाऊ शकतात तसे जेवणाच्या बाबतीत करता येत नाही. शिवाय, स्वयंपाकघराची मुलांना स्वाभाविकपणे ओढ असते. शेवटी, सुऱ्या काळजीपूर्वक कशा वापराव्यात आणि इतर भांडी कशी हाताळावीत ते त्यांना आणखी कोठे शिकवले जाते? मस्तीखोर मुले एखादवेळी पसाराही करतील! तरीही, स्वयंपाकघरातून कोणते धडे मिळू शकतात?
स्वयंपाकघरातल्या “वर्गात” शिकणे
लईज स्मिथ—जी आपल्या चार वर्षांच्या विद्यार्थ्यांना बिस्किट आन्टी या नावाने परिचित आहे—या महिलेने लहान मुलांना स्वयंपाक शिकवण्यात आपल्या १७ वर्षांच्या अनुभवावरून असे निरीक्षण केले: “खाण्यापिण्यावरून आपण मुलांना पुष्कळ काही शिकवू शकतो कारण ती सर्व मुलांना कळण्यासारखी गोष्ट आहे. या कोवळ्या वयात वास, चव आणि स्पर्श ही त्यांची ज्ञानेंद्रिये इतकी तीव्र असतात की ते स्वयंपाकात पूर्णपणे रमून जातात. स्वयंपाकाद्वारे त्यांना वाचायला, गणितं सोडवायला आणि प्रश्न-निरसन कौशल्य शिकवले जाऊ शकते.” ओतणे, पूड करणे, सोलणे, चाळणे, ढवळणे आणि लाटणे यांमुळे मुलांना, हातोटी तसेच डोळे व हातांमधली सहकारिता विकसित करण्यास मदत मिळते. वेगवेगळे करणे (काजू-मनुके वेगवेगळे करणे) आणि क्रमवार लावणे (मापे एकातएक घालून ठेवणे) या गोष्टी गणिते शिकवणारी मूलतत्त्वे आहेत. दिलेल्या पाककृतीनुसार करणे हा अंकांचा वापर, मापे, वेळ-नियोजन, अनुमान काढणे आणि भाषा यांचा अभ्यास असतो. त्याचप्रमाणे, सुरक्षा, जबाबदारी, व्यक्तिगत सुव्यवस्था आणि मिळून काम करणे यांबद्दल शिकल्याशिवाय स्वयंपाकघरातल्या गुंतागुंतीच्या आणि धोकेदायक परिसरात वावरण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही.
तसेच स्वयंपाक करता येणे देखील किती महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघरात सुरवातीला मदत करणाऱ्या मुलांना किशोरवयीन झाल्यावर सगळा स्वयंपाक करण्यास काही जड जात नाही. कामात गढलेल्या कोणत्या पालकाला अधूनमधून असे केलेले आवडणार नाही? शिवाय, स्वयंपाकामुळे मुले आत्मविश्वासी आणि स्वावलंबी देखील होतात—पुढे त्यांनी विवाह केला अथवा केला नाही तरी त्यांच्या खांद्यावर प्रौढांच्या जबाबदाऱ्या पडतात तेव्हा त्यांना या गुणांचा निश्चितच फायदा होतो.—पडताळा १ तीमथ्य ६:६.
ली, जो ३० वर्षांचा होईस्तोवर अविवाहित होता तो आठवून सांगतो: “साधारण सहा वर्षांचा असतानाच माझी आई मला स्वयंपाक घरातली लहानसहान कामं देऊ लागली. सुरवातीला, कुकीज, केक आणि दुसरे गोड पदार्थ करायला मला जास्त आवड होती. पण मी नऊ वर्षांचा झाल्यावर मला सगळा स्वयंपाक करता येत होता आणि मी नेहमी असा स्वयंपाक करायचो. मग लग्नाआधी, घरातली वेगवेगळी कामं आणि स्वयंपाक करता येत असल्यामुळे मला इतकं काही अवघड वाटलं नाही. आणि त्यामुळे आता माझं वैवाहिक जीवन यशस्वी होण्याकरता मला मदत मिळाली आहे असं मी निश्चितपणे सांगू शकतो.”
स्वयंपाक म्हणजे मजा!
स्वयंपाकघरात मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी पालक कोणता वेळ निवडणार? जेव्हा कमीतकमी विकर्षणे असतात अशा वेळी शिक्षण देण्याचा सल्ला एका मातेने दिला. अनेक मुले असल्यास, सुरवातीला, तुम्ही कदाचित प्रत्येकासोबत वेगवेगळ्या समयी काम कराल. त्यासाठी, दुसरी मुले झोपलेली असतात तेव्हा किंवा शाळेला गेलेली असतात तेव्हा वेळ काढा. एकटे असताना तुम्हाला स्वयंपाकाला जितका वेळ लागतो त्यापेक्षा जरा जास्त वेळ घ्या. आणि हो, स्वयंपाकघरात मजा येईल अशी तयारी करून ठेवा!
आता पहिल्याच वेळी, तुमच्या मुलाला अथवा मुलीला त्यांचा आवडता खाद्यपदार्थ निवडू द्या.b अशी एखादी साधीसुधी पाककृती पाहा जी लवकर तयार करता येते. त्याला किंवा तिला यशस्वीरित्या पूर्ण करता येतील अशी कामे त्यात असण्याची खात्री करा. तुमच्या मुलाला कंटाळा येऊ नये म्हणून आधीच त्याला आवश्यक ते साहित्य आणि भांडी वगैरे काढून ठेवायला सांगा. आधीच लागणाऱ्या काही गोष्टी तुम्ही तयार करूनही ठेवू शकता म्हणजे स्वयंपाक करायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्यामुळे थकवाही येणार नाही.
तुमच्या मुलासोबत पाककृती वाचून काढा आणि प्रत्येक गोष्ट कशी करावी ते त्याला दाखवा. तुमच्या मुलाला वेगळी जागा द्या—एखादा टेबल आणि काही भांडी—आणि एक एप्रन सुद्धा द्या. मुलाला, मुलीचा एप्रन देण्याऐवजी पुरुषांसाठी असलेला एप्रन तुम्ही त्याला देऊ शकता. सुरवातीपासूनच, सुरक्षिततेच्या महत्त्वावर जोर द्या आणि स्वयंपाकघरासाठी योग्य नियम ठरवा.—“पहिला धडा—सुरक्षा,” ही पृष्ठ ८ वरील पेटी पाहा.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या मुलाला मजा येईल अशी योजना करा. त्याला फक्त तुमचे निरीक्षण करायला लावू नका; तर त्याला हात धुवायला सांगून खाद्यपदार्थाची तयारी करण्यात गुंतवा. स्वतःच्या पद्धतीने करायला, नवीन प्रयोग करायला आणि प्रश्न विचारायला वाव द्या. आणि पदार्थ जर बिघडला तर चिंता करू नका. तुमच्या मुलाने तो केला असल्यास, तो नक्कीच खाईल!
कौटुंबिक एकता
एकता आणि कौटुंबिक तत्त्वे स्वयंपाकघरातल्या फायद्यांपैकी सर्वात मोठे फायदे आहेत यात शंका नाही. तुम्हाला आढळून आले असेल की, काही घरांमध्ये, कौटुंबिक सदस्य आपआपल्या कामातच इतके गर्क असतात की त्यांचा एकमेकांशी जास्त संपर्कच येत नसतो. अशा परिस्थितींमध्ये, घर म्हणजे फक्त विश्राम करण्याचे ठिकाण किंवा खाणावळ बनू शकते. त्याउलट, एकत्र मिळून स्वयंपाक करणारे कुटुंब एकत्र बसून जेवते आणि त्यानंतरची साफसफाई सुद्धा एकत्र मिळूनच करते. या गोष्टींमुळे, त्यांना नेहमी दळणवळण ठेवायला, एकमेकांशी बोलायला आणि गप्पागोष्टी करायला वाव मिळतो. एक आई म्हणते: “किचनमधल्या सिंकपाशी काम करत असतानाच माझ्या मुलांशी खूप चर्चा व्हायच्या.” तसेच एक ख्रिस्ती पिता, हर्मन असे म्हणतात: “आम्हालाच भांडी घासून-पुसून ठेवता यावीत म्हणून आम्ही मुद्दामहून कित्येक वर्षं डिशवॉशर घेतला नाही. आमच्या मुलांना आळीपाळीने भांडी पुसायचं काम आम्ही दिलं होतं. नाहीतर, गप्पागोष्टी करायला दुसरा वेळ असायचाच कुठे?”
होय, कित्येक आठवडे आणि कित्येक वर्षे आपल्या मुलांसोबत स्वयंपाकघरात घालवत असलेल्या वेळेच्या आधारावरच आध्यात्मिक तत्त्वे आणि ईश्वरी गुण विकसित करता येतात. एकमेकांसोबत घालवलेल्या या निवांत क्षणांतच, पालक आणि मुलांमध्ये खुल्या अंतःकरणाने सहजगत्या चर्चा होऊ शकतात आणि पालकाच्या उदाहरणाची मुलांच्या अंतःकरणावर नकळत छाप पडू शकते. अशाप्रकारचे प्रशिक्षण मुलाला सबंध जीवनभर फायदेकारक ठरू शकते, कारण नीतिसूत्रे २२:६ म्हणते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”
म्हणून, तुम्ही पालक या नात्याने आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवण्याचा विचार करत असल्यास, त्यांना एखादा केक बनवायला किंवा संपूर्ण स्वयंपाक करायला का सांगू नये? मग तुम्हाला दिसून येईल की, स्वयंपाकघरात त्यांच्यासोबत काम करण्याद्वारे तुम्ही कुटुंबाचे भरणपोषण आणि पालनपोषणही करू शकता.
[तळटीपा]
a या विषयावरील चर्चेसाठी “मर्यादित प्रमाणात विभागलेला ‘उत्तम समय’” हा मे २२, १९९३, सावध राहा! (इंग्रजी) अंकातील लेख, पृष्ठे १६-१७ वर पाहा.
b संक्षिप्त असण्यासाठी येथून पुढे मुलाला “तो” असे संबोधण्यात येईल. परंतु, ही माहिती मुलींना देखील लागू होते.
[२२ पानांवरील चौकट]
पहिला धडा—सुरक्षा
सुरक्षिततेची जाणीव राखा
• वाहनांची सतत वर्दळ असलेल्या रस्त्याचे धोके तुम्ही समजावून सांगता त्याचप्रमाणे, गंभीरतेने पण मनात भीती न घालता, स्वयंपाकघरात काम करण्याच्या धोक्यांविषयी समजावून सांगा. स्वतः एक आदर्श असा.
• मुले स्वयंपाकघरात काम करतात त्या प्रत्येक वेळी त्यांच्यावर मोठ्या लोकांची देखरेख असावी. तुमच्या मुलाला कोणतीही भांडी किंवा यंत्रे, विशेषतः इलेक्ट्रिकल यंत्रे सुरक्षितपणे वापरता येत नाहीत तोपर्यंत वापरायला देऊ नका.
• स्वयंपाकघर सुव्यवस्थित ठेवा. काही सांडले तर लागलीच स्वच्छ करा आणि पसारा तेव्हाच्या तेव्हाच आवरून घ्या. स्वयंपाक करताना पाळीव प्राणी किंवा इतर विकर्षणे स्वयंपाकघराबाहेर ठेवा.
बोटे संभाळा
• कोणा प्रौढ व्यक्तीचे लक्ष असतानाच, इलेक्ट्रिक मिक्सर्स, ब्लेंडर्स आणि फूड प्रोसेसर्स वापरली जावीत. तुमचा मुलगा मिक्सर वगैरेमध्ये चमचा घालून हलवत असल्यास, ते यंत्र बंद आहे का याची खात्री करा.
• सुऱ्यांना नेहमी धार लावा, कारण बोथट सुरीला जास्त जोर द्यावा लागतो आणि ती घसरण्याची जास्त शक्यता असते.
• तुमचे मूल सुरी वापरण्याचे शिकत असताना, त्याला या गोष्टी करायला सांगा: (१) सुरीची मूठ धरून सुरी उचलावी, (२) मग सुरी पदार्थावर ठेवावी, (३) वरच्या बोथट भागावर दुसरा हात ठेवा, आणि (४) दाब द्या म्हणजे पदार्थाचे तुकडे होतील.
• कटींग बोर्डचा उपयोग करा. तुमचे मूल भाज्या चिरण्याचा प्रयत्न करत असताना त्या सटकून जाऊन नयेत म्हणून त्यांचे आधी दोन भाग करा मग कटींगबोर्डवर चपटी बाजू खाली ठेवा.
भाजू नये म्हणून सांभाळा
• वापर होत नसताना नेहमी बर्नर आणि ओवनचे बटण बंद ठेवा. टॉवेल, पाककृतीची पुस्तके आणि भांडी पकडण्याची कपडे बर्नर्सपासून दूर ठेवा.
• भांड्यांचे हँडल स्टोव्हच्या मध्यभागी ठेवा जेथे त्यांना सहजासहजी धक्का लागून काही सांडासांडी होणार नाही.
• तुमच्या मुलाला स्टोव्हवर काम करायला दिलेले असताना तो भक्कम आणि स्थिर पाटावर उभा आहे याची खात्री करा.
• गरम भांडे कोठे ठेवणार हे आधी ठरवल्याशिवाय ते उचलू नका. हातात गरम भांडे असते तेव्हा इतरांना त्याची सूचना द्या विशेषतः तुम्ही कोणाच्या मागून चालत असता तेव्हा.