उत्क्रांती की निर्मिती?
पेशींची विशिष्ट काम करण्याची क्षमता
तुमच्या आईला तुमचा गर्भ राहिला, तेव्हा तुमची सुरुवात एका लहानशा पेशीने झाली. त्या पेशीला झायगोट असं म्हणतात. ती इतकी लहान असते, की तिला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग काही महिन्यांनंतर त्या पेशीचं रूपांतर एका पूर्ण वाढ झालेल्या बाळात झालं. ती एक पेशी अनेक पेशींमध्ये विभागली आणि मग २०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या पेशींमध्ये तिचं रूपांतर झालं. त्यांचा आकार आणि कामं वेगवेगळी असतात.
विचार करा: झायगोट त्याच्या डी.एन.ए. ची एक प्रत तयार करतं आणि दोन भागांत विभागतं. विभागलेला हा प्रत्येक भाग पुढे हीच प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत राहतं. सुरुवातीला हे सगळे भाग एकसारखेच दिसतात. त्यांच्या डी.एन.ए. मध्ये प्रत्येक प्रकारची पेशी तयार करण्यासाठी गरजेच्या सर्व सूचना असतात.
गर्भधारणेच्या एका आठवड्यानंतर पेशींचे दोन भाग बनतात. काही पेशी भ्रूण (embryo) बनतात तर काही पेशी प्लासेंटा बनतात आणि तयार झालेलं भ्रूण वाढायला मदत करतात.
तिसऱ्या आठवड्यापर्यंत भ्रूणाच्या पेशींचे तीन थर बनतात. बाहेरच्या थरापासून मज्जातंतू, तोंड, मेंदू, बाहेरची त्वचा आणि इतर पेशी बनतात. मधल्या थरापासून रक्त, हाडं, मूत्रपिंड, स्नायू आणि इतर पेशी, तर तिसऱ्या म्हणजे आतल्या थरापासून आतले अवयव बनतात, जसं की फुप्फुसं, मूत्राशय आणि पचनसंस्थेचे काही भाग.
न जन्मलेल्या बाळाची वाढ होताना, पेशी विभागतात आणि त्यांचं रूपांतर २०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या पेशींमध्ये होतं
गर्भधारणेच्या संपूर्ण काळात काही पेशी किंवा पेशींचा समूह भ्रूणाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो. इतर पेशी एकत्र येऊन सपाट आकाराच्या किंवा दोरीसारख्या आकाराच्या बनतात, किंवा मग त्यांच्यात पोकळी निर्माण होते. हे सर्व होण्यासाठी पेशींमध्ये कमालीचा ताळमेळ असावा लागतो. मग काही काळाने, सपाट आकाराच्या पेशी वळण घेऊन छोट्या-छोट्या नळीच्या आकाराच्या बनतात. हे सगळं एकाच वेळी भ्रूणाच्या वेगवेगळ्या भागात घडत असतं. पुढे या नळ्यांची लांबी वाढू लागते आणि त्यांना फाटे फुटून त्या एकमेकांना जुळतात. अशा प्रकारे रक्तवाहिन्यांची जाळी तयार होतात.
बाळाचा जन्म होतो त्या काळापर्यंत अब्जावधी पेशी योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य रितीने काम करण्यासाठी तयार असतात.
तुम्हाला काय वाटतं? पेशींची विशिष्ट काम करण्याची क्षमता उत्क्रांतीने अस्तित्त्वात आली की तिची रचना करण्यात आली?