अभ्यासासाठी विषय
यहोवा तुम्हाला वाचवू शकतो यावरचा भरवसा वाढवा
गणना १३:२५–१४:४ वाचा. इस्राएली लोक यहोवावर भरवसा ठेवायला कसे कमी पडले ते पाहा.
संदर्भ लक्षात घ्या. यहोवाने इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर पडताना जसं वाचवलं होतं तसंच तो आताही वाचवेल असा इस्राएली लोकांनी भरवसा ठेवायला हवा होता. (स्तो. ७८:१२-१६, ४३-५३) कोणत्या गोष्टींमुळे यहोवावरचा त्यांचा भरवसा कमी पडला? (अनु. १:२६-२८) यहोशवा आणि कालेबने यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवलं?—गण. १४:६-९.
सखोल संशोधन करा. यहोवावरचा भरवसा मजबूत करण्यासाठी इस्राएली लोकांना काय करायची गरज होती? (स्तो. ९:१०; २२:४; ७८:११) यहोवावर भरवसा ठेवणं आणि त्याचा आदर करणं यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?—गण. १४:११.
तुम्हाला काय शिकायला मिळतंय यावर विचार करा. स्वतःला विचारा:
‘कोणत्या परिस्थितींत यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवणं मला कठीण जाऊ शकतं?’
‘मला यहोवावरचा भरवसा वाढवता यावा म्हणून मी आता आणि पुढेही काय करू शकतो?’
‘मोठं संकट सुरू होईल तेव्हा मी कोणत्या गोष्टीवर पूर्ण भरवसा ठेवू शकतो?’—लूक २१:२५-२८.