नियमन मंडळाकडून पत्र
यहोवाच्या प्रिय सहसाक्षीदारांनो:
सुमारे सत्तर लाखांपेक्षा अधिक असलेल्या यहोवाच्या प्रिय विश्वासू सेवकांना लिहिण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्या देशातील एखाद्या बंधू किंवा भगिनीला भेटता तेव्हा लगेच ते तुम्हाला आपलेसे वाटू लागतात. (योहा. १३:३४, ३५) आपल्या प्रकाशनांमध्ये विविध देशांतील बांधवांनी विश्वास आणि एकनिष्ठा कशी दाखवली यांविषयीचे रोचक अहवाल तुम्ही वाचता तेव्हा पुन्हा एकदा एकतेच्या बंधनाची नक्कीच जाणीव होते.
संपूर्ण जगभरातील अहवाल दाखवतात की तुमच्यापैकी पुष्कळ जण तुमच्या कौटुंबिक उपासनेचा कार्यक्रम गांभीर्याने घेत आहेत. लहान मुले असलेले पालक, मुलांचे लक्ष वेधून त्यांना एकाग्र ठेवण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग करत आहेत. (इफिस. ६:४) या कार्यक्रमामुळे पती-पत्नी दोघांनाही उत्तेजन मिळते; याचा परिणाम ते एकमेकांच्या जवळ आले आहेत. (इफिस. ५:२८-३३) देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करण्याच्या या योजनेमुळे वैयक्तिकांना आणि कुटुंबांना फायदा होत आहे.—यहो. १:८, ९.
अलीकडील नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या बांधवांविषयी आम्हाला खरोखरच वाईट वाटते. या आपत्तींच्या काळादरम्यान कसलीही हयगय न करता मदत कार्यात भाग घेतलेल्या अनेक बंधुभगिनींचे आम्ही आभार मानतो. (प्रे. कृत्ये ११:२८-३०; गलती. ६:९, १०) याशिवाय, प्रत्येक मंडळीत असे बंधुभगिनी आहेत जे गरजू बांधवांची परिस्थिती ओळखून कोणताही गवगवा न करता त्यांना भौतिक गोष्टी पुरवत आहेत. प्राचीन काळातील दुर्कसप्रमाणे तुम्ही मोठ्या मनाने “सत्कृत्ये व दानधर्म” करता. (प्रे. कृत्ये ९:३६) यहोवा याची दखल घेतो व याचा मोबदला तो जरूर देईल याची खातरी बाळगा.—मत्त. ६:३, ४.
काही देशांत “कायद्याने अरिष्ट” आणण्यासाठी नियमांचा डावपेच खेळणारे, देवाची सेवा करण्याच्या बाबतीत तुमच्या हक्कांना पायदळी तुडवत आहेत. (स्तो. ९४:२०-२२, पं.र.भा.) येशूने अशा छळाविषयी आधीच सांगितले होते ही जाणीव बाळगून तुम्ही धैर्याने हे सहन करीत आहात आणि आश्रयासाठी यहोवाकडे पाहात आहात. (योहा. १५:१९, २०) “तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास [तुम्ही] नेहमी सिद्ध” असल्यामुळे आमच्या प्रार्थनांमध्ये आम्ही नेहमी तुमचा उल्लेख करतो, ही खातरी बाळगा.—१ पेत्र ३:१३-१५.
सैतान अतिशय धूर्तपणे अनैतिक चालींना बढावा देत आहे, पण या चालींचा वर्षानुवर्षे सामना करून नैतिक शुद्धता राखणाऱ्या तुम्हा लाखो जणांची आम्ही मनापासून प्रशंसा करतो. जगाचे नैतिक स्तर दिवसेंदिवस खालावत चाललेले असताना तुम्ही मात्र “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत” चालला आहात. (इफिस. ६:१०) तुम्ही “देवाची शस्त्रसामग्री धारण” केल्यामुळे “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता” आला आहे. (इफिस. ६:११, १२) यहोवा तुमच्या उदाहरणाचा उपयोग करून त्याची निंदा करणाऱ्या सैतानाला खणखणीत प्रत्युत्तर देत आहे, हे लक्षात घ्या.—नीति. २७:११.
सन २०११ मध्ये, आपल्या प्रभूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला १,९३,७४,७३७ जण उपस्थित होते हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. ही भारावून टाकणारी उपस्थिती काही अंशी, मागील एप्रिल महिन्यात साहाय्यक पायनियरींग करण्याविषयी देण्यात आलेल्या आमंत्रणाला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे होती. सबंध पृथ्वीवरील कोट्यवधी लोक, यहोवाचे निष्ठावान साक्षीदार एकसुराने करत असलेली स्तुती ऐकू शकले! (रोम. १०:१८) गेल्या एप्रिल महिन्यात साहाय्यक पायनियरींग केलेल्या २६,५७,३७७ जणांपैकी किंवा सेवा वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी तुम्ही एक असाल; काहीही असो तुम्ही सर्वांनी स्वेच्छेने व आवेशाने केलेल्या कार्यामुळे आम्ही खूप संतुष्ट झालो.—स्तो. ११०:३; कलस्सै. ३:२३.
मागील वर्षी २,६३,१३१ नवोदितांनी यहोवाला त्यांचे जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. याबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे “ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो” हे आमंत्रण तुम्हीही आमच्यासोबत इतरांना देत आहात म्हणून तुमचेही आभार. (प्रकटी. २२:१७) खासकरून, २०११ च्या प्रांतीय अधिवेशनात देवाच्या स्थापित राज्याच्या पैलूंवर चर्चा केल्यानंतर आम्ही पहिल्यापेक्षा आता अधिक आग्रहाने “देवाचे राज्य येवो” असे म्हणत आहोत. “मी लवकर येतो” या येशूच्या आश्वासनाने प्रवृत्त होऊन आम्हीदेखील प्रेषित योहानाप्रमाणे “आमेन. ये, प्रभु येशू, ये” असे म्हणत आहोत.—प्रकटी. २२:२०.
त्या रोमांचकारी घटनेची जागृत राहून वाट पाहात असताना “कृतीने व सत्याने” यहोवावरील तुमचे प्रेम सिद्ध करणाऱ्या प्रिय बंधुभगिनींनो, आम्ही मनापासून तुमच्यावर प्रेम करतो ही खातरी बाळगा.—१ योहा. ३:१८.
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ