आम्ही यहोवाच्या सेवेकरता खपण्यास तयार आहोत!
१ प्रेषित पौलाने आपल्यावर सोपवण्यात आलेले ख्रिस्ती सेवाकार्य पूर्ण करण्याकरता ‘सर्वस्वी खर्ची पडण्यात’ आनंद मानला. (२ करिंथ. १२:१५) त्याचप्रकारे आजही, बरेच ख्रिस्ती पायनियर सेवा करण्याकरता परिश्रम घेतात. काहीजण कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यग्र असूनही दर आठवडी सेवाकार्यात नियमित सहभाग घेण्याकरता वेळ काढतात. काहींना गंभीर आरोग्याच्या समस्या असूनही ते आपली मर्यादित शक्ती राज्याच्या कार्यांकरता खर्च करतात. अशा निरनिराळ्या वयोगटाचे आणि निरनिराळ्या परिस्थितीला तोंड देणारे यहोवाचे लोक त्याच्या सेवेकरता आनंदाने खपतात हे पाहून खरोखर किती प्रोत्साहन मिळते!
२ शेजाऱ्याबद्दल प्रेम: यहोवाच्या सेवेत आपल्या परीने होईल तितके केल्याने व याद्वारे देवाबद्दल व शेजाऱ्याबद्दल प्रेम प्रदर्शित केल्याने आपल्याला निर्दोष विवेक लाभतो. पौलाने सुवार्तेच्या प्रसाराकरता आपल्या जिवाचे दान केले आणि म्हणून तो आनंदाने असे म्हणू शकला की “आजच्या दिवशी मी तुम्हाला खातरीपूर्वक सांगतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे.” (प्रे. कृत्ये २०:२४, २६; १ थेस्सलनी. २:८) आपल्या परिस्थितीनुसार शक्य असेल तितक्या प्रमाणात सेवाकार्यात सहभाग घेतल्यामुळे आपणही रक्तदोष टाळू शकतो.—यहे. ३:१८-२१.
३ इतरांना साहाय्य करण्याकरता मेहनत घेतल्याने आपल्याला आनंद मिळतो. (प्रे. कृत्ये २०:३५) एका बांधवाने असे म्हटले: “यहोवाच्या सेवेत आणखी एक दिवस घालवल्यावर संध्याकाळी मी घरी परततो, तेव्हा थकलेलो असतो हे कबूल आहे. पण मी आनंदी असतो आणि हा आनंद कोणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही याबद्दल मी यहोवाचे उपकार मानतो.”
४ देवाबद्दल प्रेम: यहोवाच्या सेवेत खपण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यामुळे आपल्या स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो. देवाबद्दल प्रेम असल्यामुळेच आपण त्याच्या आज्ञांचे पालन करतो. आणि या आज्ञांपैकी एक आज्ञा अशी आहे की आपण प्रचार करावा व शिष्य बनवावेत. (१ योहा. ५:३) लोक आपल्याला थंड प्रतिसाद देतात किंवा विरोध करतात तरीसुद्धा आपण आनंदाने यहोवाकरता परिश्रम करण्याचे चालूच ठेवतो.
५ ही वेळ सेवेत धीमे पडण्याची नाही! आपण कापणीच्या काळात राहात आहोत. (मत्त. ९:३७) कापणी सुरू असताना सहसा शेतकरी एरवीपेक्षा जास्त तास शेतात काम करतो कारण पीक गोळा करण्याकरता त्याच्याजवळ मर्यादित वेळ असतो. आणि त्या वेळेचा चांगला उपयोग न केल्यास पीक खराब होऊ शकते. आध्यात्मिक कापणीकरता नियुक्त केलेला काळही मर्यादित आहे. आपण ज्या काळात राहात आहोत त्याचे सतत भान ठेवून, आपण सर्वांनी ख्रिस्ती सेवेत जोमाने कार्य करत राहिले पाहिजे.—लूक १३:२४; १ करिंथ. ७:२९-३१.