अक्रियाशील झालेल्यांना विसरू नका
१. अक्रियाशील झालेल्यांना प्रोत्साहन देण्याचा आपण का प्रयत्न केला पाहिजे?
१ तुम्ही एखाद्या अक्रियाशील झालेल्या व्यक्तीला ओळखता का? कदाचित त्याने मंडळीच्या सभांना येण्याचे बंद केले असेल आणि हळूहळू तो यहोवाच्या संघटनेपासून वाहवत गेला असेल. किंवा, कदाचित तुम्हाला घरोघरचे सेवाकार्य करताना अशी व्यक्ती भेटली असेल. आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की ही अक्रियाशील व्यक्ती अजूनही आपला आध्यात्मिक भाऊ किंवा बहीण आहे. आणि म्हणून आपण या व्यक्तीला आपल्या प्रेमाचे आश्वासन देऊन तिला मंडळीकडे व आपल्या “जिवांचा मेंढपाळ व संरक्षक” याच्याकडे परत येण्यास मदत केली पाहिजे.—१ पेत्र २:२५.
२. अक्रियाशील व्यक्तीला आपण कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?
२ आस्था व्यक्त करा: अक्रियाशील व्यक्तींना आपण फोन केला किंवा भेट दिली तर त्यांना हा दिलासा मिळेल की आपण त्यांना अजून विसरलेलो नाही. पण आपण त्यांना काय म्हणावे? आपण तिच्याविषयी विचार करत होतो एवढे जरी त्या व्यक्तीला कळले तरी तिला यामुळे प्रोत्साहन मिळू शकते. सकारात्मक व त्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळेल अशा रितीने संभाषण करा. (फिलिप्पै. ४:८) अलीकडील सभेत आपल्याला आवडलेला एखादा मुद्दा आपण त्यांना सांगू शकतो. तसेच, आपण त्यांना येणाऱ्या दिवसांत एखाद्या सभेला, संमेलनाला निमंत्रित करू शकतो आणि त्यांच्याकरता आपण जागा राखून ठेवू किंवा ते आपल्या गाडीत येऊ शकतात असे त्यांना सांगू शकतो.
३. एक बहीण कशाप्रकारे पुन्हा सक्रिय प्रचारक बनली?
३ एका बहिणीला क्षेत्र सेवाकार्य करताना, २० पेक्षा जास्त वर्षांपासून अक्रियाशील असणारी एक बहीण भेटली. तिने बायबल अभ्यास तर स्वीकारला नाही, पण तिच्या घरी आलेली बहीण पुन्हा तिच्याकडे गेली आणि तिला अलीकडील मासिके देऊ लागली. प्रांतीय अधिवेशनानंतर तिने जाऊन अक्रियाशील बहिणीला अधिवेशनातील काही ठळक मुद्दे सांगितले. कालांतराने ती बहीण पुन्हा सक्रिय प्रचारक बनली.
४. पुन्हा सभांना येऊ लागलेल्या व्यक्तीशी आपण कशाप्रकारे वागावे?
४ कोणी परत येते तेव्हा: अक्रियाशील झालेला एखादा भाऊ सभांना पुन्हा येऊ लागतो तेव्हा आपण त्याच्याशी कसे वागावे? येशूच्या शिष्यांनी तात्पुरत्या काळासाठी त्याला सोडून दिल्यानंतर येशूने त्यांच्याशी कशाप्रकारे व्यवहार केला? त्याने प्रेमाने त्यांना आपले “बंधू” म्हणून संबोधले आणि त्यांच्याविषयी भरवसा व्यक्त केला. त्याने त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी देखील सोपवली. (मत्त. २८:१०, १८, १९) यानंतर लगेच ते सुवार्ता सांगण्यात व्यग्र झाले आणि अनेक संकटांना तोंड द्यावे लागले तरी त्यांनी ‘सुवार्ता गाजवण्याचे सोडले नाही.’—प्रे. कृत्ये ५:४२.
५. कोणत्या परिस्थितीत आपण अक्रियाशील व्यक्तीबद्दल वडिलांचा सल्ला घेतला पाहिजे?
५ अक्रियाशील झालेल्या व्यक्तीसोबत बायबल अभ्यास सुरू करण्याअगोदर, किंवा बऱ्याच काळापासून अक्रियाशील असलेल्या बांधवाला आपल्यासोबत सेवाकार्याला येण्याचे निमंत्रण देण्याअगोदर आपण वडिलांचा सल्ला घेतला पाहिजे. जर आपल्याला क्षेत्रात एखादी अक्रियाशील व्यक्ती भेटली तर आपण याविषयी वडिलांना सूचना दिली पाहिजे, जेणेकरून ते त्या व्यक्तीला आवश्यक साहाय्य पुरवू शकतील.
६. अक्रियाशील झालेल्यांना साहाय्य केल्यामुळे आपल्याला कदाचित कोणता आनंद अनुभवण्यास मिळेल?
६ बायबल स्पष्टपणे सांगते की जे जीवनाच्या शर्यतीत शेवटपर्यंत धावतील त्यांचेच तारण होईल. (मत्त. २४:१३) म्हणूनच, जे अडखळून पडले आहेत किंवा सत्यापासून भटकले आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जर यहोवाच्या प्रेमाविषयी मनन करून आपण अशा अक्रियाशील झालेल्या व्यक्तींबद्दल मनःपूर्वक आस्था व्यक्त केली तर कोण जाणे, कदाचित ते पुन्हा एकदा आपल्यासोबत पवित्र सेवा करू लागतील. आणि असे घडले तर आपल्याला किती आनंद होईल याची कल्पना करा.—लूक १५:४-१०.