स्मारकविधीचा काळ—सेवा कार्यात अधिक सहभाग घेण्याचा काळ
१. वर्षाकाठी येणाऱ्या ‘नेमलेल्या सणांचा’ देवाला भिऊन वागणाऱ्या इस्राएली लोकांवर कोणता परिणाम होत होता?
१ वर्षातल्या ठराविक वेळी, प्राचीन इस्राएली लोक “यहोवाचे नेमलेले सण” साजरे करीत. (लेवी. २३:२, पं.र.भा.) आपल्या देवाच्या चांगुलपणावर मनन केल्यामुळे त्यांना अत्यानंद व्हायचा शिवाय शुद्ध उपासनेत आणखी आवेशी सेवा करण्यास ते प्रवृत्त व्हायचे.—२ इति. ३०:२१–३१:२.
२, ३. स्मारकविधीच्या काळात आपल्या आध्यात्मिक कार्यात वाढ करणे उचित का आहे आणि आपण स्मारकविधी केव्हा साजरा करणार आहोत?
२ आधुनिक दिवसांत, दर वर्षी स्मारकविधीच्या काळात, आपल्या आनंदमय ईश्वरशासित कार्यांना तेजी येते. या काळात आपण यहोवाने आपल्यासाठी दिलेल्या अमुल्य देणगीवर अर्थात त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या बलिदानावर चिंतन करतो. (योहा. ३:१६; १ पेत्र १:१८, १९) देवाने व त्याचा पुत्र येशूने दाखवलेल्या प्रेमावर जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपण, यहोवाची स्तुती करण्यास प्रवृत्त होतो आणि यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात आवेशाने भाग घेतो.—२ करिंथ. ५:१४, १५.
३ या वर्षी प्रभूचे सांज भोजन गुरूवार, मार्च २४ रोजी सूर्यास्तानंतर साजरे केले जाईल. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान आपण आपली सेवा आणखी कशाप्रकारे वाढवू शकतो?
४, ५. (क) कोणत्या गोष्टीने काही लोकांना, अधिक लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जाण्यास मदत केली आहे? (ख) स्थानीयरीत्या कोणती पद्धत प्रभावी असल्याचे तुम्हाला आढळले आहे?
४ जास्तीतजास्त लोकांप्रत पोहंचण्याचा प्रयत्न करणे: क्षेत्र सेवेत भाग घेत असताना होता होईल तितक्या लोकांप्रत पोहंचण्यासाठी संधी शोधा. बहुतेक लोक घरी असतात अशा वेळी, जसे की दुपारी किंवा संध्याकाळी घरोघरच्या कार्यात भाग घेण्याची तुम्ही योजना करू शकता का? तुमच्या पुस्तक अभ्यास गटांतील काही, जर पुस्तक अभ्यासाआधी सेवेत भाग घेऊ इच्छित असतील तर पुस्तक अभ्यास संचालक, जवळपासच्या क्षेत्रात सेवा करण्याकरता एक लहानशी क्षेत्र सेवा सभा घेऊ शकतात.
५ पुष्कळ लोकांप्रत पोहंचण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करणे. जपानमध्ये एक भगिनी पूर्णवेळ काम करत होती; पण तिला साहाय्यक पायनियरींग करण्याची इच्छा होती. एका वडिलांनी तिला सुचवले, की दररोज कामाला निघण्याआधी ती जवळच्या रेल्वेस्थानकावर साक्षकार्य करू शकते. आपल्या लाजाळू स्वभावावर मात केल्यानंतर व तिच्याबरोबर येणाऱ्या-जाणाऱ्यांची थट्टा सहन करत तिने जवळजवळ ४० लोकांचा मॅग्झीन रुट तयार केला; या लोकांमध्ये रेल्वेस्थानकावर भेटलेले, रोज कामाला येणारे-जाणारे तसेच जवळच असलेल्या दुकानांचे मालक, यांचा समावेश होता. एका महिन्यात तिने सरासरी २३५ मासिकांचे वाटप केले. दररोज लोकांना बायबलमधील एखाददोन मुद्दे सांगून ती सहा बायबल अभ्यास सुरू करू शकली.
६. ख्रिस्ती तरुण आपले आध्यात्मिक कार्य कशाप्रकारे वाढवू शकतात?
६ साक्ष देण्याच्या संधी: शाळेला जाणाऱ्या पुष्कळ प्रचारकांना वर्षाकाठी सुट्या मिळतात. या सुट्या साहाय्यक पायनियरींगसाठी उत्तम संधी असू शकतात. शिवाय, शाळेत साक्ष देण्याद्वारे ख्रिस्ती तरुण आपली सेवा वाढवू शकतात. तुमच्या वर्गमित्रांना, तुमच्या विश्वासांविषयी जाणून घेण्याची किती उत्सुकता आहे, हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तेव्हा, वर्गात चर्चा करण्याची किंवा निबंध लिहिण्याची संधी मिळते तेव्हा त्या संधीचा उपयोग साक्ष देण्यासाठी करायला काय हरकत आहे? पुष्कळ विद्यार्थी आपल्या व्हिडिओंद्वारे साक्ष देऊ शकले आहेत. काहींनी आपल्या वर्गमित्रांबरोबर बायबल अभ्यास सुरू करून त्यांना समर्पण व बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करण्यास मदत केली आहे. “परमेश्वराच्या नावाचे स्तवन” करण्याचे हे उत्तम मार्ग आहेत.—स्तो. १४८:१२, १३.
७. (क) एका बांधवाने साक्ष देण्याच्या संधींचा फायदा कसा घेतला? (ख) तुमचाही असाच एखादा अनुभव आहे का?
७ दररोजचे काम करत असताना लोकांना, आपला अद्भुत देव आणि त्याच्या आश्चर्यकारक वचनांविषयी सांगण्याचा प्रयत्न करा. दररोज ट्रेनने प्रवास करणारा एक बांधव उचित संधी शोधून आपल्या सहप्रवाशांना साक्ष देतो. जसे की, एका रेल्वेस्थानकावर दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत असताना त्याने फक्त पाच मिनिटांसाठी एका तरुण मनुष्याला साक्ष द्यायला सुरवात केली. याचा परिणाम असा झाला, की हा तरुण मनुष्य आणि त्याचा मित्र बायबल अभ्यास करायला तयार झाले. हा बायबल अभ्यास ते ज्या ट्रेनने प्रवास करायचे त्याच ट्रेनमध्ये होऊ लागला. कालांतराने, एक वृद्ध स्त्री जी यांचे संभाषण ऐकायची ती बांधवाकडे आली आणि आपल्यालासुद्धा बायबलचा अभ्यास हवा आहे, असे म्हणाली. तिला ट्रेनने ज्या ज्या दिवशी जावे लागते त्या त्या दिवशी बायबल अभ्यास करण्यात आनंद वाटतो. अशाप्रकारे, या बांधवाने ट्रेनमध्ये दहा वेगवेगळ्या लोकांबरोबर बायबलचा अभ्यास केला आहे.
८. वाढत्या वयामुळे किंवा आजारपणामुळे सेवेत मर्यादित भाग घेऊ शकणाऱ्यांना, आपली सेवा वाढवण्याचा कोणता मार्ग असू शकतो?
८ पण वाढत्या वयामुळे किंवा तुमच्या तब्येतीमुळे तुम्ही सेवेत हवा तितका भाग घेऊ शकत नसला तर? तरीपण तुम्ही इतर अनेक मार्गांनी यहोवाची स्तुती करू शकता. तुम्ही टेलिफोनवरून साक्ष देण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? टेलिफोनवरून साक्ष कशी द्यायची याबद्दल तुमच्या मनात शंका असतील तर आपल्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांशी बोला. जे प्रचारक या पद्धतीने साक्षकार्य करतात त्यांना तुमच्याबरोबर कार्य करण्याची ते व्यवस्था करतील. सोबत कार्य केल्यामुळे तुम्ही एकमेकांकडून शिकू शकता आणि प्रभावी साक्ष देण्यास एकमेकांना मदत करू शकता. टेलिफोनवरून साक्षकार्य कसे करता येईल यासंबंधाने प्रभावी मार्ग आमची राज्य सेवा याच्या फेब्रुवारी २००१ अंकातील पृष्ठे ५-६ वर सुचवण्यात आले आहेत.
९. मंडळीसोबत सेवेत भाग घेण्याच्या पात्रतेचे होण्यासाठी आपण बायबल विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो?
९ स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे नवीन बंधूभगिनी यहोवाची स्तुती करण्याचे कार्य वाढवण्यास प्रवृत्त होतील. औपचारिक साक्षकार्यात भाग घेण्याविषयी त्यांच्या मनात काही न्यूनगंड असतील तर त्यावर मात करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता; जसे की तुम्ही त्यांना क्षेत्र सेवेतील प्रोत्साहनदायक अनुभव सांगू शकता आणि बायबलच्या शिकवणुकींचे स्पष्टीकरण देण्यास व आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यास तुम्ही त्यांना हळूहळू प्रशिक्षित करू शकता. (१ पेत्र ३:१५) एखादा बायबल विद्यार्थी सुवार्तेची घोषणा करण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर अध्यक्षीय पर्यवेक्षकांशी बोला. तो/ती मंडळीसोबत सेवेत भाग घेण्यास पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी ते त्याला/तिला भेटण्याची व्यवस्था करतील. यहोवा जेव्हा या नवीन लोकांना त्याच्या सार्वभौमत्त्वाची बाजू घेताना पाहतो तेव्हा त्याला किती आनंद होत असेल!—नीति. २७:११.
१०. (क) एक उत्तम आराखडा आपल्याला साहाय्यक पायनियरींग करायला कशाप्रकारे मदत करू शकेल? (ख) मागच्या वर्षाच्या स्मारकविधीच्या काळात तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकला होता का? तुम्हाला ते कसे जमले होते?
१० तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकाल का? साहाय्यक पायनियरींगमध्ये ५० तास भरण्याची जी अपेक्षा केली जाते तिला आपण क्षुल्लक समजू नये. (मत्त. ५:३७) यासाठी तुम्हाला दर आठवडी सरासरी १२ तास सेवेत खर्च करावे लागतील. पृष्ठ ५ वर साहाय्यक पायनियरींगचे तास भरण्यासाठी दिलेल्या नमुन्यांपैकी एखादा नमुना तुमच्या परिस्थितीनुसार आहे का? नसल्यास मार्च, एप्रिल किंवा मे महिन्यांदरम्यान तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करता येईल असा एखादा आराखडा तुम्ही बनवू शकाल का? सेवेत तुम्ही जादा भाग घेण्यासाठी जे प्रयत्न करत आहात त्यावर यहोवाचे आशीर्वाद मागा.—नीति. १६:३.
११. साहाय्यक पायनियरींग करणाऱ्यांना वडीलजन व सेवा सेवक कशाप्रकारे सहयोग देऊ शकतात?
११ हा स्मारकविधी यहोवाची स्तुती करणारा खास प्रसंग बनवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना मंडळीतील वडील आणि सेवा सेवक तुम्हाला पूर्ण सहयोग देतील. कदाचित त्यांच्यापैकी अनेकजण साहाय्यक पायनियरींगही करतील. वडिलांना, आवश्यकतेनुसार, दुपारी, सप्ताहातल्या दिवशी संध्याकाळी, शनिवार-रविवारी, जादा क्षेत्र सेवेच्या सभांचे आयोजन करावे लागेल. या सभा कोठे आणि केव्हा होतील आणि पुढाकार घ्यायला कोण असेल हे ठरवताना, वडीलजन अशांसोबत बोलतील ज्यांनी पायनियरींग करण्याची निश्चित योजना बनवली आहे किंवा योजना बनवण्याचा विचार करत आहेत. ज्या दिवशी तुम्ही सेवेत जाण्याचे ठरवले आहे त्या दिवशी तुमच्याबरोबर इतरही प्रचारक असतील याची वडीलजन व्यवस्था करतील. अशाप्रकारे, निश्चित योजना बनवता येऊ शकतात आणि याद्वारे चांगले परिणामही साध्य होतात.—नीति. २०:१८.
१२. कोणत्या कारणामुळे आपण यहोवाची सर्ववेळी स्तुती करण्यास प्रवृत्त होतो?
१२ सर्वतोपरी प्रयत्न करा: तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करायला जमत नसेल तर ‘आपल्यापाशी जे नाही त्याप्रमाणे नव्हे तर आपल्यापाशी आहे त्याप्रमाणे’ आपण करत असलेले प्रयत्न आणि त्याग यहोवा स्वीकारतो हे आठवणीत ठेवा. (२ करिंथ. ८:१२, पं.र.भा.) यहोवाचे आभार मानण्याकरता आपल्याजवळ किती कारणे आहेत. म्हणूनच दावीदाने असे लिहिले: “परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.” (स्तो. ३४:१) या स्मारकविधीच्या काळात आपणही हाच दृढनिश्चय करूया.
[३ पानांवरील चौकट]
तुम्ही तुमचे कार्य आणखी कसे वाढवू शकता?
▪ लोक घरी असतात तेव्हा त्यांना प्रचार करा
▪ सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करा
▪ कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत साक्ष द्या
▪ टेलिफोनवरून साक्ष द्या
▪ साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करा
[५ पानांवरील चार्ट]
साहाय्यक पायनियरसाठी आराखड्यांचे नमुने—दर आठवडी १२ तास क्षेत्र सेवा करण्याचा मार्ग
सकाळ—सोमवार ते शनिवार
खाली सुचवलेल्या कोणत्याही दिवसांऐवजी तुम्ही रविवारी प्रचारकार्याची योजना करू शकता.
दिवस वेळ तास
सोमवार सकाळ २
मंगळवार सकाळ २
बुधवार सकाळ २
गुरुवार सकाळ २
शुक्रवार सकाळ २
शनिवार सकाळ २
एकूण तास: १२
दोन पूर्ण दिवस
आठवड्यातील कोणतेही दोन दिवस निवडू शकता. (निवडलेल्या दिवसांनुसार या आराखड्याप्रमाणे महिन्याला ४८ तास होतील)
दिवस वेळ तास
बुधवार पूर्ण दिवस ६
शनिवार पूर्ण दिवस ६
एकूण तास: १२
दोन संध्याकाळ आणि सप्ताहांत
कोणत्याही दोन संध्याकाळ निवडू शकता.
दिवस वेळ तास
सोमवार संध्याकाळ १ १/२
बुधवार संध्याकाळ १ १/२
शनिवार पूर्ण दिवस ६
रविवार अर्धा दिवस ३
एकूण तास: १२
तीन दुपार आणि शनिवार
खाली सुचवलेल्या कोणत्याही दिवसांऐवजी तुम्ही रविवारी प्रचारकार्याची योजना करू शकता.
दिवस वेळ तास
सोमवार दुपार २
बुधवार दुपार २
शुक्रवार दुपार २
शनिवार पूर्ण दिवस ६
एकूण तास: १२
माझा वैयक्तिक सेवेचा आराखडा
केव्हा किती तास करणार ते ठरवा
दिवस वेळ तास
सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार
रविवार
एकूण तास: १२