बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी देवाची उपासना पुस्तकाचा उपयोग करा
नवीन लोकांना सत्यात प्रगती करण्यास आणि यहोवा व त्याची संघटना यांबद्दल आपली गुणग्राहकता आणखी वाढवण्यास मदत करण्यासाठी एकमेव खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. बायबल विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करण्यासाठी हे दुसरे पुस्तक म्हणून उपयोगात आणले जाऊ शकते. जून २००० च्या आमची राज्य सेवा अंकातील पृष्ठ ४ वर असे म्हटले होते: “असे समजा की अपेक्षा ब्रोशर व ज्ञान पुस्तकातून एखाद्याचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि त्याने अजूनही म्हणावी तितकी प्रगती केलेली नाही. अर्थात प्रगतीची चिन्हे दिसत आहेत आणि सत्याबद्दल त्याची आस्थाही वाढत आहे, पण हळूहळू. अशा परिस्थितीत आणखी दुसऱ्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास सुरू ठेवू शकता. . . . पण अपेक्षा ब्रोशर व ज्ञान पुस्तकाचा अभ्यास पूर्ण झाल्यावरच या दुसऱ्या पुस्तकांतून अभ्यास घेण्याचा विचार करावा. या दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास संपण्याआधीच विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाला तरीसुद्धा तुम्ही अभ्यास सुरू ठेवू शकता; तसेच अभ्यास, पुनर्भेटी आणि अभ्यासाचे तास देखील तुम्ही आधीसारखेच मोजू शकता आणि रिपोर्टमध्ये लिहू शकता.”
देवाची उपासना या पुस्तकाचा बायबल अभ्यास आणखी कोणाला फायदेकारक ठरू शकतो? त्याच लेखात पुढे म्हटले होते: “पण मंडळीत जर कोणाचा बऱ्याच दिवसांआधी [अपेक्षा माहितीपत्रकातून] ज्ञान पुस्तकातून अभ्यास पूर्ण झाला असूनही त्याने समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याइतकी प्रगती केली नसेल, तर अशा व्यक्तीला पुन्हा अभ्यास करायला आवडेल का असे तुम्ही स्वतः त्यांना विचारू शकता.” अशा लोकांबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्यांत देवाची उपासना या पुस्तकांतून अभ्यास सुरू करण्याचा आपण विशेष प्रयत्न करू या.