आध्यात्मिकरित्या मजबूत कुटुंबे—कशी?
१ ‘आपल्या घरच्यांबरोबर सुभक्तीने वागल्याबद्दल’ सर्व ख्रिस्ती कुटुंबांची प्रशंसा केली जाते. (१ तीम. ५:४) परंतु आपला विश्वास कमजोर करू शकणारे अनेक वाईट प्रभाव आपल्या सभोवार असल्यामुळे, कुटुंबांनी आध्यात्मिकरीत्या मजबूत राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे त्यांना कसे करता येईल?
२ ख्रिस्तासारखे मस्तकपद चालवा: आपल्या घराण्याला मजबूत करण्याची जबाबदारी सांभाळत असताना कुटुंब प्रमुखांनी येशू ख्रिस्ताचे अनुकरण केले पाहिजे. येशूने, स्वतःच्या बलिदानरूपी मृत्यूद्वारे आपल्या प्रेमाचे फक्त एकदाच प्रदर्शन केले नाही तर तो अजूनही “मंडळीचे पालनपोषण” करतो. (इफिस. ५:२५-२९) प्रेमळ पालक देखील आपल्या कुटुंबाच्या दररोजच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याद्वारे प्रेम दाखवतात. यामध्ये, दर आठवड्याचा कौटुंबिक बायबल अभ्यास घेणे, शक्य तेव्हा गहन आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करणे व समस्या येतात तेव्हा त्या सोडवणे, यांचा समावेश होतो.—अनुवाद ६:६, ७.
३ क्षेत्र सेवेच्या बाबतीत: कुटुंबातील सर्व सदस्यांनी समजून घेतले पाहिजे, की यहोवा आणि त्याचे उद्देश यांविषयी इतरांना साक्ष देण्याचे कार्य आपल्या उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. (यश. ४३:१०-१२) पालकांनो, आपल्या मुलांनी यहोवाचे विश्वासू साक्षीदार व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये सेवेबद्दलची आवड निर्माण करा. सेवेमध्ये स्वार्थ-त्यागी वृत्ती दाखवण्याची व त्यात दर आठवडी भाग घेण्याची गरज का आहे याची त्यांच्याबरोबर चर्चा करा. (मत्त. २२:३७-३९) मग, तुमच्याबरोबर क्षेत्र सेवेत त्यांनी नियमितरीत्या भाग घ्यावा म्हणून योजना करा.
४ आठवड्याच्या कौटुंबिक अभ्यासादरम्यान, एखाद्या प्रभावी सादरतेची तयारी करण्यासाठी व तिचा सराव करण्यासाठी वेळ काढून तुम्ही मुलांच्या मनात प्रचार कार्याचे महत्त्व वाढवू शकता. प्रत्येक मुलाला तुम्ही सेवेमध्ये प्रशिक्षण देऊ शकता; त्याचे वय, त्याची क्षमता लक्षात ठेवून प्रगती करायला तुम्ही प्रत्येकाला मदत करू शकता. सेवेला एकत्र जाऊन आल्यानंतर, यहोवाच्या चांगुलपणाचा त्यांना कशाप्रकारे अनुभव आला त्याची चर्चा करा. विश्वास वाढवणारे अनुभव त्यांना सांगा. ‘प्रभु कृपाळू आहे ह्याचा [ते जितका] अनुभव घेतील’ तितक्या अधिक ते यहोवाजवळ जातील आणि ‘सर्व दुष्टपणाचा’ प्रतिकार करण्यास ते दृढ होतील.—१ पेत्र २:१-३.
५ सभांच्या बाबतीत: मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्यासाठी कुटुंबातील सदस्य एकमेकांना आणि विशेषकरून त्यांच्यापैकी कोणी थकतो, निरुत्साहित किंवा निराश होतो तेव्हा मदत करतात हे किती चांगले आहे! एका तरुण भगिनीने म्हटले: “माझे वडील कामावरून येतात तेव्हा खूप थकलेले असतात. पण मी त्यांना संध्याकाळी सभेत ज्या चांगल्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे ते सांगते; त्यामुळे त्यांना सभा चुकवायला आवडत नाही. मी थकते तेव्हा ते मला सभेला जायला प्रोत्साहन देतात.”—इब्री १०:२४, २५.
६ एकत्र मिळून कार्य करणे: कुटुंबातील सदस्यांनी एकत्र मिळून काम करावे; जसे की, घरातली छोटी-मोठी कामे करणे. उचित प्रकारच्या मनोरंजनासाठीसुद्धा वेळ काढला पाहिजे. सहलींना जाणे, फिरायला जाणे, खेळ खेळणे आणि नातेवाईकांना किंवा मित्रांना भेटायला जाणे यांसारख्या गोष्टींमुळे मन आनंदित होते, गोड आठवणी राहतात.—उप. ३:४.
७ मजबूत कुटुंबे, त्यांच्या आध्यात्मिकतेसाठी धोका असलेल्या सर्व अडखळणांवर मात करू शकतात. यहोवाच्या आणखी निकट आल्याने तो देत असलेल्या शक्तीचा प्रत्यय कुटुंबांना येतो.—इफिस. ६:१०.