भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या
१ ‘अधिक निश्चित असे भविष्यसूचक वचन आम्हाजवळ आहे.’ (२ पेत्र १:१९) पेत्राने असे का म्हटले? सुमारे ३२ वर्षांपूर्वी, पेत्राने व इतर दोन शिष्यांनी रुपांतराच्या दृश्यात जे पाहिले आणि ऐकले त्यामुळे इब्री शास्त्रवचनातील तसेच स्वतः येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाण्यांची खात्री पटली होती किंवा त्यांना “अधिक निश्चित असे,” करण्यात आले होते. या नाट्यमय दृष्टांताने त्यांना ही खात्री दिली होती की, ख्रिस्त तेजस्वी गौरवाने आणि त्याच्या पित्याच्या संपूर्ण पाठिंब्याने राज्य सत्तेत निश्चितच येईल. पहिल्या शतकातील ख्रिस्ती ‘प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे, त्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देऊन बरे करीत होते’ नाहीतर त्यांची अंतःकरणे अंधारलेली राहिली असती. प्रकाशणाऱ्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिल्यामुळे, “पहाटचा तारा,” ख्रिस्त राज्य वैभवात येईल त्या नव्या दिवसाच्या उदयाबद्दल त्यांना जागृत आणि प्रज्वलित ठेवले जाईल.—२ पेत्र १:१६-१९; मत्त. १७:१-९.
२ पेत्रासोबत त्या भव्य रुपांतराचे दृश्य पाहण्यासाठी आपण तेथे उपस्थित नव्हतो. तरीसुद्धा, भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिलेल्या या पिढीतील ख्रिश्चनांना, ख्रिस्ताच्या राज्य सत्तेचे आगाऊ दर्शन नव्हे, तर वैभवी राजा वास्तविकतेत राज्य करत असल्याचा पुष्कळ पुरावा पाहण्याचा मोठा विशेषाधिकार आहे! १९१४ नंतर उलटणाऱ्या प्रत्येक वर्षी, येशूने त्याच्या राजेशाही ‘उपस्थितीसाठी’ दिलेल्या उल्लेखनीय ‘चिन्हाच्या’ विविध घटकांची पूर्तता आपण पाहतो, तेव्हा भविष्यसूचक वचन अधिक निश्चित केले जाते. त्या चिन्हाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, राजा या व्यवस्थीकरणाचा अंत करण्याआधी त्याच्या सरकाराची किंवा राज्याची घोषणा सर्व राष्ट्रात केली जाईल. खिस्ताच्या मार्गदर्शनाखाली, राज्य-प्रचाराचे कार्य २३१ देशांमध्ये पूर्वी कधी कल्पनाही केली नव्हती अशा प्रमाणात केले जात आहे. (मत्त. २४:३-१४) त्याशिवाय, ‘मोठे संकट’ समीप येते तसे, सिंहासनाधिष्ठ राजा, ‘सर्व राष्ट्रांतून’ आलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायास’ एकत्र करीत आहे व ते ‘कोकऱ्याच्या खंडणी रक्तावर’ विश्वास ठेवतात. त्यांना देखील त्याच्या उपस्थितीची समज होते.—प्रकटी. ७:९, १०, १४.
३ “पहाटचा तारा” उगवला असताना, म्हणजेच ख्रिस्त राज्य सत्तेत आला असताना, भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देण्यासाठी अजूनही कारण आहे का? होय! वैभवी येशू ख्रिस्ताने प्रेषित योहानाला दृष्टांताची एक मालिका दाखवली. प्रकटीकरणाचे पुस्तक दृष्टांतांनीच मिळून बनलेले आहे. आरंभीच्या ख्रिश्चनांसाठी ती उत्तेजन आणि सूचना देणारी होती, तरी “प्रभूच्या दिवशी,” जगणाऱ्यांसाठी ही विशेष महत्त्व राखून आहेत. आता आपण स्वतःला याच काळात पाहतो. (प्रकटी. १:१०) यास्तव, यहोवाच्या लोकांच्या मंडळ्या प्रकटीकरणाचा कळस या पुस्तकाचा अधिक अभ्यास करीत आहेत.
४ “ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य [आनंदी, NW]; कारण समय जवळ आला आहे.” (प्रकटी. १:३) आपल्याला आनंदी राहावयाचे असल्यास, या संदेष्ट्याच्या दृष्टांताची समज झाली पाहिजे, होय, त्याचा खरा अर्थ समजला पाहिजे. त्यासाठी कशाची आवश्यकता आहे? आपल्या अंतःकरणांना प्रकटीकरणाच्या अहवालाच्या महत्त्वाची पूर्ण समज देण्याकरता पुनरुक्तीची आवश्यकता आहे. पहिल्या शतकातील नियमन मंडळाचा सदस्य, प्रेषित पेत्र याने त्याच्या बांधवांना आध्यात्मिकरित्या ‘जागृत करण्यासाठी’ मूलभूत सत्याची पुनरुक्ती करण्याचे मूल्य ओळखले. (२ पेत्र १:१२, १३) आधुनिक दिवसातील ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ देखील अशाचप्रकारे वारंवार भविष्यसूचक वचनाकडे लक्ष आकर्षित करून आपली गुणग्राहकता जिवंत ठेवण्यास मदत करतो.—मत्त. २४:४५-४७.
५ लक्ष कसे द्यावे: प्रकटीकरणातील भविष्यसूचक वचनाकडे कोणत्या प्रकारचे लक्ष देण्याची गरज आहे? प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो की, देवाने आपल्या पूर्व-ख्रिस्ती सेवकांशी दळणवळण केले त्याप्रमाणे तो ख्रिश्चनांशी देवदूतांद्वारे किंवा संदेष्ट्यांद्वारे बोलला नाही. त्याऐवजी, यहोवाने प्रेमाने काळजी घेतलेल्या त्याच्या पुत्राद्वारे, व ज्याला त्याने “सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले” आहे त्याद्वारे आपल्याशी दळणवळण केले आहे. (इब्री. १:१, २) “ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ.” (इब्री. २:१) होय, आपण देवाच्या वचनाकडे आणि विशेषतः येशू ख्रिस्ताद्वारे येणाऱ्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण प्रकटीकरणाच्या आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष कसे देऊ शकतो?
६ प्रथम, मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी प्रत्येक आठवडी उपस्थित राहणे अधिक महत्त्वाचे आहे. हे खरे की, आपल्यापैकी पुष्कळजण प्रकटीकरणाचा कळस या पुस्तकाचा तिसऱ्यांदा अभ्यास करणार आहोत. यास्तव, काहीजण पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहण्याबद्दल बेफिकीरीचा दृष्टिकोन बाळगतील. त्यांना असे वाटेल की, एखादी सभा चुकवली तरी त्यांना साहित्य माहीतच आहे. तथापि, आपण १९८९ मध्ये मंडळीच्या पुस्तक अभ्यासात पहिल्यांदा प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाचा अभ्यास करू लागलो त्या काळापासून ही भविष्यसूचक माहिती प्रत्येक उलटणाऱ्या वर्षापेक्षा अधिक प्रसंगोचित आणि समयोचित होत आहे. प्रकटीकरणाच्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेत सद्य दिवसातील घडामोडी वेगाने पुढे जात असता, आम्हा सर्वांना जागृत राहण्याची गरज आहे. मग आपण यहोवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत कार्य करण्यास तयार असू शकतो. शक्य असल्यास, प्रकटीकरणाचा हा महत्त्वपूर्ण अभ्यास करताना, एकही पुस्तक अभ्यास न चुकवण्याचे व्यक्तिगत ध्येय ठेवा.
७ दुसरी गोष्ट, तुमचा धडा चांगल्यारितीने तयार करा. उल्लेखिलेली शास्त्रवचने काढून पाहा आणि अभ्यासल्या जाणाऱ्या प्रकटीकरणाच्या वचनांच्या स्पष्टीकरणाला ते कशी पुष्टी देतात याचा विचार करा. या पद्धतीने तुम्हाला केवळ प्रश्नांची उत्तरे मिळण्यापेक्षा अधिक काही मिळू शकेल. केवळ ज्ञानच नव्हे तर बुद्धी आणि समज प्राप्त करण्याचा यत्न करा. (नीती. ४:७) तिसरी गोष्ट, विवेचने देऊन आणि शास्त्रवचने वाचून सक्रिय सहभाग घ्या. निदान एकदा तरी आणि जमेल तसे अनेक वेळा प्रत्येक अभ्यासात उत्तरे देण्याचे ध्येय ठेवा. असे केल्याने, तुम्हाला तुमचे मन धड्यावर केंद्रित करण्यास मदत होईल.
८ भविष्यसूचक वचनाकडे विशेष लक्ष लावण्यामध्ये, तयारी, उपस्थिती आणि सहभाग यापेक्षाही अधिक काही गोवलेले आहे. याचा असाही अर्थ होतो की, अभ्यासानंतरही आपण ‘ह्या गोष्टींचे मनन करून त्यात गढून जाण्याचे’ चालू ठेवतो. (१ तीम. ४:१५) भविष्यसूचक वचनाने आपल्या हृदयात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे असावयाचे असेल, तर आपण त्याला आपल्या आंतरिक व्यक्तीवर—आपले विचार, इच्छा, भावना, उद्देश आणि ध्येयांवर—प्रभाव पाडण्यास वाव दिला पाहिजे. (२ पेत्र १:१९) यास्तव, आपण स्वतःला अशाप्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत: या माहितीचा माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या काय अर्थ होतो? मी यहोवा व त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताबद्दल काय शिकलो आहे? या साहित्यामागे कोणते सिद्धांत आहेत? मला माझ्या अंतःकरणात या अभ्यासाचा अर्थबोध होत आहे का? हे सत्य मी माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात, मंडळीत कशाप्रकारे लागू करू शकतो? शिकत असलेल्या गोष्टींचा व्यावहारिक अवलंब केल्याने, आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणू शकतो: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.”—स्तोत्र ११९:१०५; ईयो. २९:३, ४.
९ कठीण काळामध्ये सावध राहा: सा. यु. ३३ मध्ये येशूने आपल्या शिष्यांना, जेरूसलेमच्या होणाऱ्या नाशाबद्दल आणि त्यांना सुरक्षित जागी पळून जाण्याच्या वेळेचा संकेत करणाऱ्या परिस्थितीबद्दल इशारा दिला. (लूक १९:४१-४४; २१:७-२१) त्यानंतर ३० पेक्षा अधिक वर्षे लोटली. काही यहुदी ख्रिश्चनांना कदाचित असे वाटले असावे की, भविष्यात काहीच बदल होणार नाही. अतिप्रिय प्रेषित पेत्राने, सुमारे सा. यु. ६४ मध्ये त्याच्या दुसऱ्या पत्रात, ‘भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देण्याबद्दल’ दिलेले उत्तेजन किती समयोचित होते! (२ पेत्र १:१९) त्यानंतर काही काळातच, सा. यु. ६६ मध्ये रोमी सैन्याने जेरूसलेमला वेढा घातला. रोमी सैन्य कोणतेही स्पष्ट कारण नसताना, अचानकपणे निघून गेल्यावर, जागृत असणाऱ्या यहुदी ख्रिश्चनांनी येशूची सूचना अनुसरली आणि तेथून पळून गेले. नंतर, सा. यु. ७० मध्ये रोमी सैन्य पुन्हा परतले आणि जेरूसलेमचा संपूर्ण नाश केला. त्या ख्रिश्चनांनी येशूच्या भविष्यसूचक वचनाकडे नीट लक्ष दिले याबद्दल त्यांना किती आनंद झाला असेल!
१० आपण, आधुनिक दिवसातील ख्रिस्ती, कोणत्या गोष्टीबद्दल दक्ष आहोत? प्रकटीकरणाच्या दृष्टांतात, येशूने आता जगत असलेल्या ख्रिश्चनांना, प्रभूच्या दिवसात घडणाऱ्या पुष्कळ घटनांबद्दल जागृत केले आहे. गेल्या ८० वर्षात, यापैकीच्या पुष्कळ घटना आधीच घडल्या आहेत: राज्याचा जन्म; स्वर्गातील युद्ध आणि त्यामुळे सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा झालेला पराजय व त्यानंतर त्यांना पृथ्वीच्या सान्निध्यातच मर्यादित करण्यात आले; मोठ्या बाबेलचा पाडाव; तसेच आठवी जागतिक शक्ती, किरमिजी रंगाच्या जंगली पशुचे आगमन. प्रकटीकरणातील या भविष्यसूचक वचनाच्या पैलूंची पूर्तता झाल्यामुळे लवकरच आपण या उर्वरित नाट्यमय घटनांना पाहू याची अधिक निश्चितता मिळते: १,४४,००० यातील शेवटल्या सदस्यांचा शिक्कामोर्तब, मोठ्या लोकसमुदायाचे पूर्ण झालेले एकत्रीकरण, मोठ्या बाबेलचा नाश, हर्मगिदोनाचे युद्ध, सैतानाला अगाध कूपात टाकणे आणि ख्रिस्ताची हजार वर्षांची राजवट. आपण येशूच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावे हे किती महत्त्वपूर्ण आहे: “पाहा! जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य”!—प्रकटी. १६:१५.
११ आपण जागृत राहत आहोत का? आपण भविष्यसूचक वचन केवढ्या गंभीरतेने घेतो? आपण यहोवाला आपले जीवन ५ वर्षे किंवा ५० वर्षांआधी समर्पित केले असले, तरी पौलाने रोमी ख्रिश्चनांना लिहिलेले शब्द उचितपणे आपल्याला लागू होतात: “तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे.” त्यानंतर, पौल खिश्चनांना ‘अंधकाराची कामे टाकून शिष्टाचाराने चालण्यास’ आर्जवतो. (रोम. १३:११-१३) आपण नैतिकरित्या निबिड अंधकारात असणाऱ्या जगात राहात आहोत. ३० किंवा ४० वर्षांआधी धक्कादायक समजली जाणारी वागणूक आता या २० व्या शतकाच्या शेवटल्या दशकात पुष्कळ जगिक लोकांसाठी सर्वसामान्य अशी बनली आहे. बांधवांनो, तुम्ही स्वतःला जगाच्या अंधकारात वाहवत जाण्यास आणि नैतिकरित्या निष्काळजी होण्यास वाव देणार नाही याबद्दल सावध राहा. तुम्ही स्वतःला या जगाच्या खालावलेल्या विचारासाठी आणि जीवन पद्धतीसाठी अनुमती देण्यास किंवा सहनशील असण्यास वाव दिला, तर आपल्या समोर असणाऱ्या आणि लवकरच सर्वकाळासाठी सोडवल्या जाणाऱ्या, देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण, या मोठ्या वादविषयांकडे तुम्ही दुर्लक्ष कराल. आध्यात्मिक गुंगीमुळे, निकट असणारे एखाद्याचे तारण धोक्यात येईल.
१२ भविष्यसूचक वचनाबद्दल मनःपूर्वक गुणग्राहकता दाखवण्यात वाढत जा: प्राचीन इब्री संदेष्टे, मशीहाबद्दलच्या आत्म्याने प्रेरित असलेल्या वाणींच्या पूर्णतेबद्दल उत्सुकतेने आस्थेवाईक होते. देवाच्या उद्देशांच्या पूर्ततेबद्दल त्यांनी “परिश्रमपूर्वक चौकशी केली व बारकाईने शोध केला.” (१ पेत्र १:१० NW, ११) त्याचप्रमाणे, तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकातील भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देता तसे, तुम्ही आध्यात्मिक गोष्टींबद्दल गुणग्राहकता दाखवण्यात वाढत जाल. तुमची आध्यात्मिक भूक वाढल्यामुळे, “देवाच्या गहन गोष्टींचाहि” शोध घेण्यास तुम्ही उद्युक्त व्हाल. (१ करिंथ. २:१०) भविष्यसूचक वचनाबद्दल तुम्ही तुमच्या अंतःकरणात गुणग्राहकता आणि प्रेम वाढवत गेल्यास, इतरांनी तुम्हाला सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन देण्याची गरज नाही; नियमितरित्या उपस्थित राहण्यास आणि सहभाग घेण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल. (लूक ६:४५) तसेच ‘ते वचन तुमच्या अंतःकरणात असले,’ तर तुम्ही ‘तारण मिळण्याकरता मुखाने कबूल करण्यास’ प्रवृत्त व्हाल.—रोम. १०:८-१०.
१३ आपण अंतिम समयात अधिक खोलवर जातो, तसे देवाच्या भविष्यसूचक घोषणांवर विश्वास ठेवण्यात टिकून राहिल्यामुळे उपहास करणारे आपली टर उडवतील. (२ पेत्र ३:३, ४) तरीसुद्धा, आपण भविष्यसूचक वचनाबद्दल जागृत राहू. देवाच्या वचनाचा दिवा आपल्याला आपण वेळेच्या ओघात कोठे आहोत ते दाखवतो. आपण या अंधकारमय जगाच्या शेवटल्या काळात आहोत या वास्तविकतेला तो प्रखरतेने स्पष्ट करतो. पहाटचा तारा उगवला आहे! ख्रिस्त राज्य सत्तेत आहे! आपल्या दृष्टीत आपण आधीच नव्या दिवसाचे उजडणे पाहत आहोत. येशूच्या रुपांतराच्या वेळी, त्या चमत्कारिक दृष्टांतात, सुसंधी मिळालेल्या तीन प्रेषितांना राज्याचे आगाऊ दर्शन मिळाल्यावर जे वाटले त्याप्रमाणे आपल्यालाही देवाचे अभिवचन दिलेले नवीन जग वास्तविक वाटत राहो!