जीवन कथा
आम्हाला “अतिशय मौल्यवान असा मोती सापडला!”
विनस्टन आणि पॅमेला (पॅम) पेन हे ऑस्ट्रेलेशिया शाखा कार्यालयात सेवा करत आहेत. या सुखी जोडप्याच्या जीवनात बरेचसे चढउतार आले. जसं की, वेगवेगळ्या संस्कृतींशी जुळवून घेणं आणि आपल्या न जन्मलेल्या बाळाला गमावणं. पण तरी यहोवा आणि त्याच्या लोकांसाठी असलेलं त्यांचं प्रेम कमी झालं नाही. तसंच, सेवाकार्यातला त्यांचा आनंदही कमी झाला नाही. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
ब्रदर विनस्टन तुम्हाला सत्य कसं मिळालं?
ऑस्ट्रेलिया इथल्या क्वीन्झलँड या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. माझ्या कुटुंबाला धार्मिक विषयांबद्दल इतकी आवड नव्हती. आजूबाजूला कोणीच राहात नव्हतं. त्यामुळे आमची जास्त कोणाशी ओळखपाळख नव्हती. मग मी १२ वर्षांचा झालो तेव्हा मला देवाबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं. मला त्याच्याबद्दल कळावं म्हणून मी त्याला प्रार्थना करायचो. मी शेतात काम करायचो पण मग मी ते काम सोडलं. आणि मला दक्षिण ऑस्ट्रेलिया इथल्या ॲडिलेडमध्ये काम मिळालं. मी २१ वर्षांचा असताना माझी भेट पॅमशी झाली. मी तेव्हा सुट्टीसाठी सिडनीला गेलो होतो. तेव्हा तिने मला एका ब्रिटिश-इस्राएल धार्मिक गटाबद्दल सांगितलं. ती म्हणाली की त्यांच्या मते ब्रिटेनचे लोक हे हरवलेल्या इस्राएली लोकांचे वंशज आहेत. हे इस्राएली लोक उत्तर राज्यातले दहा गोत्र होते, जे इ.स.पू ८व्या शतकात बंदीवासात गेले होते. या विषयाबद्दल मी ॲडिलेडला परतल्यावर माझ्या कामावरच्या सोबत्याशी बोललो. तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करत होता. यहोवाचे साक्षीदार काय मानतात यावर त्याच्याशी काही तास चर्चा झाल्यावर मला जाणीव झाली, की मी लहानपणापासून करत असलेल्या प्रार्थनांचं उत्तर मला मिळालं आहे. मला माझ्या निर्माणकर्त्याबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल सत्य मिळालं होतं. मला “अतिशय मौल्यवान असा मोती सापडला.”—मत्त. १३:४५, ४६.
सिस्टर पॅम तुम्हीसुद्धा लहान वयापासून या मौल्यवान मोतीच्या शोधात होतात. तुम्हाला तो कसा सापडला?
मी न्यू साउथ वेल्झ मधल्या कॉफ्स हार्बर इथली आहे. माझ्या कुटुंबाला धार्मिक विषयांबद्दल आवड होती. माझ्या आजीआजोबांनी आणि आईवडिलांनी ब्रिटिश-इस्राएल धार्मिक गटाच्या शिकवणी स्वीकारल्या होत्या. मला, माझ्या मोठ्या बहिणीला, लहान भावाला आणि माझ्या बऱ्याचशा चुलत भाऊबहिणीला लहानपणापासून हेच सांगण्यात आलं होतं, की देवाची ब्रिटिश पूर्वजांवर खास कृपादृष्टी आहे. मला हे काही पटायचं नाही आणि देवासोबत माझं जवळचं नातं नव्हतं. मग १४ वर्षांची असताना मी पुष्कळशा चर्चमध्ये गेले. जसं की, अँग्लिकन बॅप्टिस्ट आणि सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट. पण तरी मी देवाबद्दल जास्त काही जाणून घेऊ शकले नाही.
मग आम्ही सिडनीला राहायला आलो. विन्सटन तिथे फिरायला आले होते, तेव्हा आमची भेट झाली. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं आमच्यात धार्मिक विषयांवर चर्चा झाली. मग कालांतराने मीही साक्षीदारांसोबत अभ्यास करू लागले. आम्ही एकमेकांना पत्रं पाठवायचो आणि यांची पत्रं वचनांनी भरलेली असायची! खरं सांगू तर मला आधी खूप चिंता वाटली आणि रागही आला. पण मला हळूहळू खात्री पटली की हेच सत्य आहे.
मग १९६२ मध्ये मी अडिलेडला राहायला आले कारण विनस्टन तिथे राहायचे. यांनी माझ्या राहण्याची सोय थॉमस आणि जॅनीस स्लोमन नावाच्या एका साक्षीदार जोडप्यासोबत करून दिली. त्या दोघांनी पापुआ न्यू गिनी इथे मिशनरी म्हणून सेवा केली होती. त्यांनी मला खूप प्रेम दाखवलं. मी फक्त १८ वर्षांची होते आणि यहोवाला जाणून घ्यायला त्यांनी मला मदत केली. मग मीही देवाच्या वचनाचा अभ्यास करू लागले आणि मला खात्री पटली की हेच सत्य आहे. विनस्टन आणि माझं लग्न झालं. त्यानंतर आम्ही लगेच यहोवाच्या सेवेतला प्रवास सुरू केला. प्रवास खडतर होता खरा, पण यामुळे आमच्या मनात त्या मौल्यवान मोत्याची कदर आणखी वाढली.
ब्रदर विनस्टन यहोवाच्या सेवेत तुमची सुरुवातीची वर्षं कशी होती?
१. विभागीय पर्यवेक्षक म्हणून आम्ही दौरा केल्याचा नकाशा
२. काही बेटांच्या पोस्टाची टिकिटं. किरिबॅती आणि तुवालु यांना आधी गिल्बर्ट आणि एलीस बेटे असं म्हटलं जायचं
३. तुवालु इथल्या फूनाफूटी बेटावर असलेलं सुंदर प्रवाळ बेट. मिशनरींची इथे नेमणूक होण्याआधी आम्ही तिथे गेलो होतो
आमच्या लग्नानंतर लगेच यहोवाने आमच्यासाठी सेवा वाढवणारे “मोठे दार” उघडले. (१ करिंथ. १६:९) ब्रदर जॅक पॉर्टर यांनी आम्हाला पहिलं दार कोणतं ते दाखवलं. ते त्या वेळी आमचे विभागीय पर्यवेक्षक होते. (आज तेही माझ्या सारखे ऑस्ट्रेलेशिया शाखा समितीचे सदस्य आहेत.) त्यांनी आणि त्यांची पत्नी रोझलीनने आम्हाला पायनियरींगसाठी प्रोत्साहन दिलं. आमच्या लहान मंडळीत आम्ही पाच वर्षं पायनियरींग केली. मग मी जेव्हा २९ वर्षांचा झालो तेव्हा मला विभागीय पर्यवेक्षकाची नेमणूक मिळाली. मला आणि पॅमला दक्षिण पॅसिफिकच्या द्वीपांवर जावं लागणार होतं. नंतर ते फीजी शाखाच्या देखरेखीखाली आलं. अमेरीकन सामोआ, सामोआ, किरिबॅती, नाउरू, निऊवे, टोकेलाऊ, टाँगा, तुवालु आणि वॅनूॲतू या बेटांवर आम्हाला दौरा करावा लागणार होता.
त्या काळात फार दूरवर असलेल्या काही बेटांवरच्या लोकांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल खूप शंका होत्या म्हणून मग आम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागायची. (मत्त. १०:१६) तिथल्या मंडळ्या लहान होत्या आणि काही ठिकाणी तर बंधुभगिनींना आमच्यासाठी त्यांच्या घरी राहण्याची सोय करून देणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही गावातल्या लोकांना विचारायचो की आम्ही त्यांच्या घरी राहू शकतो का आणि ते आम्हाला त्यांच्या घरी राहू द्यायचे.
ब्रदर विनस्टन तुम्हाला भाषांतराची आवड आहे. ही आवड कशी निर्माण झाली?
सामोआ इथे विनस्टन वडिलांसाठी असलेल्या प्रशालेचं संचालन करताना
त्या वेळी टाँगा बेटावर राहणाऱ्या बांधवांकडे टाँगन या पॉलिनीशियन भाषेतल्या फक्त काही पत्रिका आणि पुस्तिका होत्या. सेवाकार्यादरम्यान ते सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे बायबल अभ्यासासाठी असलेलं इंग्रजीतले पुस्तक वापरायचे. मग चार आठवड्यांकरता असलेल्या वडिलांसाठीच्या प्रशालेत तीन स्थानिक वडिलांनी हे पुस्तक टाँगनमध्ये भाषांतर करण्यासाठी तयार झाले. त्यांना इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे येत नव्हती तरी त्यांनी तयारी दाखवली. पॅमने सर्व काही टाईप केलं आणि मग आम्ही ते छपाईसाठी अमेरिकेच्या शाखा कार्यालयाला पाठवलं. सर्व काही जवळपास आठ आठवड्यांत पूर्ण झालं. भाषांतर म्हणावं तितकं चांगलं झालं नाही पण या साहित्यामुळे बऱ्याचशा टाँगन भाषिक लोकांना सत्यात यायला मदत झाली. पॅम आणि मी भाषांतरकार नाही पण या कामामुळे भाषांतराप्रती आम्हाला आवड निर्माण झाली.
सिस्टर पॅम, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत बेटांवर राहण्याचा तुमचा अनुभव कसा होता?
विभागीय कार्यात असताना आम्ही एकदा यात राहिलेलो
खूपच वेगळं म्हणेन मी. काही ठिकाणी आम्हाला उष्णता व दमट हवामान, डास, उंदीर, आजारपण यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. कधीकधी तर आमच्याकडे पुरेसं अन्नंही नसायचं. पण दिवसाच्या शेवटी आमच्या घरातून समुद्राचं दृश्य पाहून खूप बरं वाटायचं. तिथल्या घरांना सामोअन भाषेत फेल असं म्हणतात. वर गवताचं छप्पर आणि भिंती नसलेली ही घरं असतात. पौर्णिमेच्या रात्री नारळाच्या झाडांच्या झावळ्या अगदी स्पष्ट दिसायच्या आणि समुद्रात चंद्राचं प्रतिबिंब दिसायचं. या सर्व मौल्यवान क्षणांमुळे आम्हाला मनन आणि प्रार्थना करण्याचं उत्तेजन मिळायचं. यामुळे आम्हाला नकारात्मक गोष्टींपेक्षा सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला मदत व्हायची.
आम्हाला लहान मुलं आवडायची. त्यांच्यासोबत आम्हाला खूप मजा यायची. ते जेव्हा परदेशातल्या गोऱ्या लोकांना पाहायचे तेव्हा त्यांना खूप उत्सुकता वाटायची. एकदा आम्ही निऊवे या बेटावर गेलो होतो. तेव्हा एका लहान मुलाने विनस्टनच्या केसाळ हातावर हात फिरवत म्हटलं: “मला तुमची पिसं आवडली.” त्याने असे केसाळ हात कधीच पाहिले नसावेत आणि म्हणून त्यांचं वर्णन कसं करावं हे त्याला सुचलं नसावं!
तिथले पुष्कळ लोक खूप हलाखीचे जीवन जगायचे. त्यांना पाहून खूप दुःख व्हायचं. तिथला परिसर खूप सुंदर होता पण पिण्याच्या पाण्याची टंचाई होती आणि आजारी पडलं की व्यवस्थित असे दवाखाने फार कमी होते. पण तरीही आपल्या बांधवांना आम्ही कधी चिंतित पाहिलं नाही. त्यांच्यासाठी ही सर्वसामान्य गोष्ट होती. त्यांची कुटुंबं एकत्रित होती, उपासनेसाठी त्यांच्याकडे एक ठिकाण होतं आणि ते यहोवाची सेवा करू शकत होते म्हणून ते खूप आनंदी होते. त्यांच्या या सुंदर उदाहरणामुळे आम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला आणि एक साधी जीवनशैली ठेवायला मदत झाली.
सिस्टर पॅम तुम्हाला पाणी बाहेरून आणावं लागायचं आणि वेगळ्या पद्धतीने जेवण बनवावं लागायचं. मग तुम्ही या नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घेतलं?
टाँगा इथे पॅम आमचे कपडे धुताना
यासाठी मी माझ्या बाबांची खूप आभारी आहे. त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या ज्या मला कामी आल्या. जसं की, चूल कशी पेटवावी आणि त्यावर जेवण कसं बनवावं. तसंच, कमी गोष्टींमध्ये जीवन कसं भागवावं हेही त्यांनी मला शिकवलं. एकदा की नाही, आम्ही किरिबॅती इथे असताना खूप लहानशा घरात राहिलो. त्या घराला गवती छप्पर होतं, जमीन खडबडीत होती आणि भिंती बांबूंनी बनलेल्या होत्या. जेवण बनवण्यासाठी मला आधी चूल बनवावी लागायची. सगळ्यात आधी जमीन खणून एक खड्डा करावा लागायचा आणि मग त्यात नारळाच्या शेंड्या जाळाव्या लागायच्या. तसंच, पाण्यासाठी मला विहिरीवर जावं लागायचं. मला इतर स्त्रियांसारखंच रांगेत उभं राहावं लागायचं. एका सहा फूट लांब काठीला पातळ दोरी बांधलेली असायची. मासे पकडण्यासाठी काठी असते ना अगदी तशी. पण फरक इतकाच की तिच्या टोकाला गळाऐवजी कॅन लावलेला असायचा. मग आपला नंबर आला, की तो कॅन विहिरीत टाकायचा. मग अगदी योग्य वेळी आपला हात थोडासा हलवायचा. यामुळे कॅन उलटायचा आणि त्यात पाणी भरू लागायचं. मला वाटलं हे तर खूप सोपं आहे. पण माझा नंबर आल्यावर मला कळलं हे वाटतं तितकं सोपं नाही. मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला. पण कॅन उलटा न होता, नुसताच तरंगायचा. हे पाहून सर्व हसले. मग सर्वांचं हसणं थांबल्यावर एका स्त्रीने मला मदत केली. तिथले स्थानिक लोक नेहमीच आम्हाला मदत करायचे आणि आमच्याशी अगदी प्रेमाने वागायचे.
बेटांवरची नेमणूक तुम्हा दोघांसाठी खूप प्रिय होती. तिथले काही विशेष अनुभव सांगाल का?
विनस्टन: आम्हाला तिथल्या पद्धती समजून घ्यायला जरा वेळ लागला. उदाहरणार्थ, बंधुभगिनींनी आम्हाला जेवायला बोलवायचे तेव्हा ते सर्व अन्न आमच्यासमोर ठेवायचे. आम्हाला वाटायचं की ते फक्त आमच्यासाठी आहे. पाहुण्यांनी काही अन्न घरच्यांसाठीही ठेवायचं असतं, ही तिथली पद्धत आम्हाला सुरुवातीला माहीत नव्हती. पण नंतर तिथली पद्धत कळल्यावर आम्ही त्यांच्यासाठीही काही अन्न ठेवू लागलो. चुका व्हायच्या पण बंधुभगिनींनी आम्हाला समजून घेतलं. सहा महिन्यानंतर आम्ही विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान पुन्हा त्यांच्याकडे जायचो. ते आम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक असायचे, कारण इतर वेळी त्यांची भेट फक्त त्यांच्या मंडळीतल्या लोकांशीच व्हायची आणि परदेशातून साक्षीदार म्हणून फक्त आम्ही दोघंच त्यांना भेटायचो.
निऊवे बेटावर विनस्टन एका गटाला सेवाकार्यात घेऊन जाताना
आमच्या भेटीमुळे तिथल्या स्थानिक लोकांना चांगली साक्ष मिळाली. गावातल्या बऱ्याच लोकांना वाटलं की आपल्या बंधुभगिनींनी नवीनच धर्म सुरू केला आहे. म्हणून मग आपले एखादे बंधू आणि त्यांची पत्नी परदेशातून तिथे जायचे तेव्हा स्थानिक लोकांना खूप आश्चर्य वाटायचं आणि त्यांच्यावर चांगली छापही पडायची.
पॅम: माझ्या सर्वात आवडत्या आठवणी किरिबॅती इथल्या आहेत. तिथल्या मंडळीमध्ये फार कमी बंधुभगिनी होते. तिथे फक्त एकच वडील होते. त्यांचं नाव होतं इतीनीकाय मटेरा. त्यांनी आमची खूप काळजी घेतली. एकदा तर ते आमच्याकडे एक बास्केट घेऊन आले आणि त्यात एकच अंड होतं. त्यांनी म्हटलं: “हे तुमच्यासाठी.” त्या काळात तिथे कोंबडीचं अंड क्वचितच मिळायचं. ही लहानशी पण मोठ्या मनाने दिलेली भेट आमच्या मनाला भिडली.
सिस्टर पॅम, काही वर्षांनी तुमचा गर्भपात झाला आणि तुम्ही आपलं मूल गमावलं. या दुःखातून सावरायला तुम्हाला कशामुळे मदत झाली?
आम्ही १९७३ मध्ये दक्षिण पॅसिफिक इथे असताना मी गरोदर राहिले. आम्ही ऑस्ट्रेलियाला परत यायचं ठरवलं. मग चार महिन्यांनी आम्ही आमचं बाळ गमावलं. विनस्टनलाही खूप दुःख झालं. माझं दुःख हळूहळू कमी झालं पण मी पूर्णपणे त्यातून बाहेर पडले नाही. मग १५ एप्रिल, २००९ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्न” यातला “ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू होतो त्याच्या पुनरुत्थानाची काही आशा आहे का?” हा लेख वाचल्यावर मला खूप बरं वाटलं. या लेखामुळे मला आश्वासन मिळालं की यहोवा नेहमी योग्य तेच करतो त्यामुळे आपण काही विषय त्याच्या हाती सोपवून देणंच उत्तम असतं. आपण या दुष्ट जगात अनुभवलेले सर्व दुःख तो काढून टाकेल. यासाठी त्याने आपल्या पुत्राला “सैतानाची कार्ये उद्ध्वस्त” करायला नेमलं आहे. (१ योहा. ३:८) या लेखामुळे यहोवाचे लोक या नात्याने आपल्याजवळ असलेला “मोती” किती मौल्यवान आहे याबद्दलही आमची कदर आणखी वाढली आहे. जर राज्याची आशा आम्हाला मिळाली नसती तर आमचं काय झालं असतं काय माहीत!
त्यानंतर आम्ही पुन्हा पूर्ण वेळेची सेवा सुरू केली. आम्ही काही वर्षं ऑस्ट्रेलिया बेथेलमध्ये सेवा केली आणि नंतर पुन्हा विभागीय कार्य सुरू केलं. आम्ही चार वर्षं न्यू साउथ वेल्झ इथल्या गावांमध्ये आणि सिडनी इथे सेवा केली. मग १९८१ मध्ये आम्हाला ऑस्ट्रेलिया बेथेलमध्ये बोलवण्यात आलं आणि आता त्याचं नाव ऑस्ट्रेलेशिया शाखा असं आहे. तेव्हापासून आम्ही इथेच आहोत.
ब्रदर विनस्टन, दक्षिण पॅसिफिक बेटांवरच्या अनुभवामुळे तुम्हाला ऑस्ट्रेलेशिया शाखा समितीचे सदस्य म्हणून तुमच्या नेमणुकीत काही मदत झाली का?
हो पुष्कळ मदत झाली मी म्हणेन. सुरुवातीला अमेरीकन सामोआ आणि सामोआ यांची देखरेख ऑस्ट्रेलिया शाखा करायची. मग न्यूझीलंड शाखा आणि ऑस्ट्रेलिया मिळून एक शाखा बनली. आता आस्ट्रेलिया, अमेरीकन सामोआ व सामोआ, कुक बेटे, न्यूझीलंड, निऊवे, तिमोर लेस्टे, टोकेलाऊ आणि टाँगा ही सर्व क्षेत्रं ऑस्ट्रेलेशियाच्या देखरेखीत येतात. यांपैकी बऱ्याच ठिकाणी मी शाखेचा प्रतिनिधी म्हणून भेट दिली आहे. या बेटांवर असलेल्या विश्वासू बंधुभगिनींसोबत मी त्या वेळी काम केल्यामुळे, आज मला शाखा कार्यालयात त्यांच्यासाठी काम करताना खूप मदत होत आहे.
ऑस्ट्रेलेशिया शाखेत विनस्टन आणि पॅम
शेवटी मला हेच म्हणावंसं वाटतं, की आमच्यासारखे प्रौढ जणच देवाच्या शोधात आहेत असं नाही. आज तरुणांनाही तो ‘अतिशय मौल्यवान मोती’ हवा आहे. मग जरी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी त्याप्रती आवड दाखवली नसली तरीही. (२ राजे ५:२, ३; २ इति. ३४:१-३) यहोवा हा प्रेमळ देव आहे आणि त्याची इच्छा आहे की सर्वांना जीवन मिळावं, मग ते वृद्ध असो किंवा तरुण!
पॅम आणि मी ५० वर्षांपूर्वी देवाचा शोध सुरू केला होता. पण त्या वेळी आम्हाला माहीत नव्हतं की हा शोध आम्हाला कुठे नेईल. देवाच्या राज्याबद्दचं सत्य हा अतिशय मौल्यवान मोती आहे, यात काडीमात्रही शंका नाही. आणि हा मौल्यवान मोती नेहमी जपून ठेवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याचा आम्ही पक्का निर्धार केला आहे!