आपल्या संग्रहातून
पोर्तुगालमध्ये सत्याचं बी कसं पेरण्यात आलं?
युरोपच्या प्रवासाला निघालेल्या जहाजाला अटलांटिक समुद्राच्या लाटा धडकत होत्या. त्या जहाजावरचे जॉर्ज यंग नावाचे एक प्रवासी ब्राझीलमध्येa त्यांनी केलेल्या समाधानकारक सेवाकार्याबद्दल विचार करत होते. जहाज जसजसं पुढे प्रवास करू लागलं तसतसं बंधू यंग आपल्या नवीन नेमणुकीचा विचार करू लागले. स्पेन आणि पोर्तुगालमधली सर्वात मोठी क्षेत्रं, जिथे आधी कोणीच प्रचार केला नव्हता तिथे त्यांना जायचं होतं. तिथे जाऊन त्यांना बंधू जे.एफ. रदरफर्ड यांच्या भाषणांसाठी व्यवस्था करायची होती आणि ३,००,००० पत्रिकांचं वाटप करायचं होतं.
जॉर्ज यंग यांनी समुद्री प्रवास करून अनेक प्रचार दौरे केले
१९२५ साली बंधू यंग लिस्बनला आले तेव्हा तिथे खळबळ माजली होती. १९१० मध्ये जी प्रजासत्ताक चळवळ झाली होती त्यामुळे राजेशाही संपुष्टात आली आणि कॅथलीक चर्चचा लोकांवर असलेला दबाव कमी झाला. यामुळे त्या देशातली जनता तर स्वतंत्र झाली पण तिथे दंगली चालूच राहिल्या.
बंधू रदरफर्ड यांच्या भाषणासाठी बंधू यंग यांनी व्यवस्था केली पण तेव्हाच सरकारने लष्करी कायदा जाहीर केला कारण तिथे तत्कालीन सरकार उलथून पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. बंधू यंग यांना विरोधाचा सामना करावा लागेल अशी कल्पना ब्रिटिश व परदेशी बायबल संस्थेच्या सचिवाने त्यांना दिली. पण तरीही त्यांनी कमॉइंश माध्यमिक शाळेच्या व्यायामशाळेत भाषणासाठी परवानगी मागितली आणि ती मंजूर करण्यात आली.
मग १३ मे हा बंधू रदरफर्डच्या भाषणाचा दिवस उजाडला! सर्वांना उत्सुकता लागली होती. इमारतींवर प्लॅकार्ड लावण्यात आले. “पृथ्वीवर सदासर्वकाळ राहणं शक्य आहे” या जाहीर भाषणाची जाहिरात पेपरमध्ये छापण्यात आली. म्हणून मग, विरोधकांनीही आपल्या वाचकांना सावध करण्यासाठी त्यांच्या पेपरमध्ये लगेच या नवीनच आलेल्या ‘खोट्या भविष्यवक्तांबद्दल’ बातमी छापली. व्यायामशाळेच्या दाराशी या विरोधकांनी बंधू रदरफर्ड यांच्या शिकवणींच्या विरोधात असलेली हजारो माहितीपत्रके लोकांना दिली.
असं असूनही सुमारे ४,००० लोक तिथे भाषणासाठी आले. पण जागा नसल्यामुळे जवळपास २,००० लोकांना परत जावं लागलं. बसायला जागा नसल्यामुळे भाषण ऐकण्यासाठी काही उत्सुक श्रोते दोरीच्या शिडीवर लटकले; तर काही व्यायामाच्या साधनांवर चढून बसले.
पण सगळंकाही सुरळीत पार पडलं नाही. विरोधकांनी आरडाओरडा केला आणि खुर्च्या तोडल्या. पण बंधू रदरफर्ड शांत राहिले. ते टेबलावर चढले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात त्यांनी भाषणाची सुरुवात केली. मध्यरात्र होत आली तेव्हा त्यांचे भाषण संपलं. मग जवळजवळ १,२०० आस्थेवाईक लोकांनी बायबल आधारित प्रकाशने मिळावीत, म्हणून आपलं नाव आणि पत्ता नोंदवला. लगेचच दुसऱ्या दिवशी ओ सिकउलू नावाच्या वृत्तपत्राने बंधू रदरफर्ड यांच्या प्रकाशनाबद्दल एक लेख छापला.
सप्टेंबर १९२५ पर्यंत पोर्तुगालमध्ये पोर्तुगीज भाषेत टेहळणी बुरूज हे नियतकालिक प्रकाशित होऊ लागलं. (ब्राझिलमध्ये पोर्तुगीज भाषेत ते आधीच प्रकाशित झालं होतं.) साधारण त्याच काळात ब्राझीलचे एक बंधू वर्गुलिओ फर्ग्युसन पोर्तुगालमध्ये येऊन प्रचार कार्याला हातभार लावण्याचा विचार करू लागले. आधी एकदा त्यांनी ब्राझीलच्या छोट्या शाखा कार्यालयात बंधू यंगसोबत कार्य केलं होतं. त्यांच्यासोबत पुन्हा कार्य करण्यासाठी ते आपली पत्नी लीझी हीच्यासोबत लांबचा प्रवास करून तिथे पोहोचले. ते अगदी योग्य वेळी तिथे पोहोचले, कारण लवकरच बंधू यंग यांना प्रचारासाठी दुसरीकडे जावं लागणार होतं. ते सोव्हियत युनियन इथेही जाणार होते.
१९२८ मधला वर्गुलिओ फर्ग्युसन आणि लीझी यांचा रेसिडेन्शल परवाना
पोर्तुगालमध्ये लष्कराने हुकुमशाही लागू केली तेव्हा आपल्या साक्षकार्याला होणारा विरोध वाढला. पण या परिस्थितीतही बंधू फर्ग्युसन तिथे राहिले आणि बायबल विद्यार्थ्याच्या लहान गटाचं संरक्षण व्हावं आणि आपलं कार्य आणखी वाढावं म्हणून त्यांनी महत्त्वाची पावलं उचलली. आपल्या घरात नियमित सभा चालवता याव्यात म्हणून त्यांनी परवानगी मागितली. १९२७ च्या ऑक्टोबर महिन्यात त्यांना परवानगी मिळाली.
हुकुमशाहीच्या पहिल्या वर्षी पोर्तुगालमध्ये जवळजवळ ४५० लोकांनी टेहळणी बुरूज नियतकालिकासाठी वर्गणी केली होती. शिवाय पत्रिका आणि पुस्तिकांमुळे सत्य पोर्तुगीज साम्राज्याखाली दूरवर असलेल्या ठिकाणांपर्यंत म्हणजे, अंगोला अझोर्स, केप वर्डे, गोवा, पूर्व तिमोर, मडिएरा आणि मोझंबिक इथपर्यंत पोहोचलं.
१९२९ या वर्षी मॅन्युएल डा सिल्वी जॉर्डेव नावाचा एक गरीब पोर्तुगीज माळी लिस्बनला आला. ब्राझीलमध्ये असताना त्याने बंधू यंग यांचं जाहीर भाषण ऐकलं होतं. हेच सत्य आहे हे त्याने ओळखलं आणि प्रचारकार्यात बंधू फर्ग्युसनची मदत करण्यासाठी तो खूप उत्सुक होता. हे करण्यासाठी मॅन्युएल सर्वात आधी कॉलपोर्टर (त्या काळातला पायनियर) बनला. बायबल साहित्याची छपाई आणि वितरण या कार्यात सुव्यवस्था आल्यामुळे लिस्बनमधल्या छोट्याशा मंडळीत चांगली वाढ झाली.
१९३४ मध्ये फर्ग्युसन जोडप्याला ब्राझीलला परत जावं लागलं. पण सत्याचं बी पेरण्यात आलं होतं. स्पॅनिश मुलकी युद्ध आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान युरोपमध्ये बरीच उलथापालथ चालू होती पण त्यातही पोर्तुगालमधला विश्वासू बांधवांचा गट आध्यात्मिक रीत्या टिकून राहिला. थोड्या काळासाठी ते जळत्या निखाऱ्यासारखे होते. पण १९४७ मध्ये गिलियड प्रशिक्षित असलेले पहिले मिशनरी बंधू जॉन कुक तिथे आले तेव्हा सत्याची आग पुन्हा धगधगली. मग राज्य प्रचारकांची संख्या वाढतच गेली. १९६२ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांवर सरकारने बंदी आणली पण त्यांची संख्या वाढतच गेली. १९७४ च्या डिसेंबर महिन्यात यहोवाच्या साक्षीदारांना कायदेशीर मान्यता मिळाली तेव्हा तिथे १३,००० पेक्षा जास्त प्रचारक होते.
आज पोर्तुगालमध्ये आणि अझोर्स, मडिएरा यांसारख्या पोर्तुगीज भाषा बोलणाऱ्या अनेक बेटांमध्ये ५०,००० पेक्षा जास्त प्रचारक देवाच्या राज्याची आनंदाची बातमी सांगत आहेत. त्या प्रचारकांपैकी अनेक जण त्या बंधुभगिनींचे वंशज आहेत, ज्यांनी १९२५ मध्ये बंधू रदरफर्ड यांचं ते ऐतिहासिक भाषण ऐकलं होतं.
आम्ही यहोवाचे आणि सुरुवातीच्या विश्वासू बंधुभगिनींचे आभारी आहोत ज्यांनी ‘विदेशी राष्ट्रांसाठी ख्रिस्त येशूचा जनसेवक’ म्हणून धैर्याने प्रचारकार्यात पुढाकार घेतला.—रोम. १५:१५, १६.—पोर्तुगालमधल्या आपल्या संग्रहातून.
a टेहळणी बुरूज १५ मे २०१४ यातला पृष्ठं ३१-३२ वरील ‘कापणीचे अद्याप बरेच कार्य बाकी आहे’ हा लेख पाहा.