वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 नोव्हेंबर पृ. १८-१९
  • उदार मनाच्या व्यक्‍तीला अनेक आशीर्वाद मिळतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उदार मनाच्या व्यक्‍तीला अनेक आशीर्वाद मिळतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • हे काम मोठं आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • स्वेच्छेने पुढे येणाऱ्‍यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 नोव्हेंबर पृ. १८-१९
हन्‍ना बाळ शमुवेलला निवासमंडपात आणताना

उदार मनाच्या व्यक्‍तीला अनेक आशीर्वाद मिळतात

बलिदानं ही नेहमीच खऱ्‍या उपासनेचा महत्त्वाचा भाग राहिली आहेत. प्राचीन काळी, इस्राएली लोक प्राण्यांची बलिदानं द्यायचे. तसंच, खरे ख्रिस्तीही पहिल्यापासूनच “स्तुतीचे बलिदान” देण्यासाठी ओळखले जातात. पण, अशीही काही बलिदानं आहेत ज्यांमुळे देवाला खूप आनंद होतो. (इब्री १३:१५, १६) अशा बलिदानांमुळे आपल्यालाही आनंद आणि अनेक आशीर्वाद मिळतात. ही गोष्ट, खाली दिलेल्या काही उदाहरणांतून दिसून येते.

हन्‍ना ही प्राचीन काळातली देवाची एक विश्‍वासू सेवक होती. आपल्याला मूल व्हावं अशी तिची तीव्र इच्छा होती. पण तिला मूल होत नव्हतं. मग तिने प्रार्थनेत देवाला नवस केला, की जर तिला मुलगा झाला तर “तो आयुष्यभर परमेश्‍वराचा व्हावा” म्हणून ती त्याला समर्पित करेल. (१ शमु. १:१०, ११) काही काळानंतर, हन्‍ना गर्भवती राहिली आणि तिला मुलगा झाला. त्याचं नाव शमुवेल ठेवण्यात आलं. त्याचं दूध सुटल्यानंतर हन्‍ना आपला नवस पूर्ण करण्यासाठी त्याला निवासमंडपात घेऊन गेली. हन्‍नाने दाखवलेल्या या निःस्वार्थ मनोवृत्तीबद्दल यहोवाने तिला अनेक आशीर्वाद दिले. तिला आणखी पाच मुलं झाली आणि तिचा मुलगा शमुवेल पुढे एक संदेष्टा आणि बायबल लेखक बनला.—१ शमु. २:२१.

हन्‍ना आणि शमुवेल यांच्याप्रमाणेच, आज ख्रिश्‍चनांनाही आपल्या निर्माणकर्त्याची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्याचा बहुमान लाभला आहे. यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जे काही त्याग करू त्याबद्दल यहोवा आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल, असं वचन येशूने दिलं.—मार्क १०:२८-३०.

आणखी एक उदाहरण लक्षात घ्या. दुर्कस ही पहिल्या शतकातली एक ख्रिस्ती स्त्री होती. इतरांना मदत करण्यासाठी बलिदानं देण्यात, म्हणजेच “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात” ती तत्पर होती. पण दु:खाची गोष्ट म्हणजे “ती आजारी पडून मरण पावली.” त्यामुळे तिच्या मंडळीतले सर्वच जण शोकात बुडाले. त्यांनी जेव्हा ऐकलं की प्रेषित पेत्र जवळच्याच भागात आहे, तेव्हा त्यांनी त्याला लगेच तिथे येण्याची विनंती केली. पेत्रने येऊन दुर्कसला परत जिवंत केलं. बायबलमध्ये नमूद केलेलं हे पहिलं असं पुनरुत्थान आहे जे एका प्रेषिताने केलं होतं. पेत्रने केलेला हा चमत्कार पाहून सर्वांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! (प्रे. कार्ये ९:३६-४१) खरंच, दुर्कसने केलेली बलिदानं देव मुळीच विसरला नव्हता. (इब्री ६:१०) तिने दाखवलेल्या या उदार मनोवृत्तीचं आपल्याला अनुकरण करता यावं म्हणून देवाने दुर्कसचा अहवाल त्याच्या वचनात लिहून ठेवला आहे.

प्रेषित पौलनेसुद्धा इतरांची काळजी घेण्यासाठी आपला वेळ आणि ताकद खर्च करण्याद्वारे उदारतेच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. करिंथमधल्या आपल्या ख्रिस्ती बांधवांना लिहिताना तो म्हणाला: “माझ्याजवळ जे काही आहे ते सर्व मी तुमच्यासाठी आनंदाने खर्च करीन आणि स्वतःसुद्धा तुमच्यासाठी खर्ची पडेन.” (२ करिंथ. १२:१५) इतरांसाठी स्वतःला खर्ची केल्याने केवळ वैयक्‍तिक समाधान मिळतं असं नाही, तर सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला यहोवाचे आशीर्वाद आणि त्याची स्वीकृतीही मिळते. ही गोष्ट प्रेषित पौल स्वतःच्या अनुभवावरून शिकला होता.—प्रे. कार्ये २०:२४, ३५.

या उदाहरणांवरून स्पष्ट होतं, की राज्याच्या कार्यासाठी आणि आपल्या बंधुभगिनींच्या मदतीसाठी आपण आपला वेळ आणि ताकद खर्च करतो, तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. पण, राज्य प्रचाराच्या कार्याला योगदान देण्याचे आणखीनही काही मार्ग आहेत. उदाहरणार्थ, स्वेच्छेने अनुदान देण्याद्वारेही आपण देवाचा सन्मान करू शकतो. आपल्या दानाचा उपयोग जगव्याप्त प्रचारकार्यासाठी केला जातो; यातूनच मिशनरींना व खास पूर्ण वेळच्या सेवकांना मदत केली जाते. याशिवाय, आपण स्वेच्छेने देत असलेल्या दानांचा उपयोग प्रकाशनांचं भाषांतर करण्यासाठी, व्हिडिओ तयार करण्यासाठी, आपत्तीच्या वेळी मदतकार्य पुरवण्यासाठी आणि नवीन राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी केला जातो. आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की जो “उदार” मनोवृत्ती दाखवतो त्याला भरभरून आशीर्वाद मिळतील. शिवाय, आपल्या मौल्यवान वस्तू यहोवाला देण्याद्वारे आपण त्याचा सन्मान करतो.—नीति. ३:९; २२:९.

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान देण्याचे काही मार्ग

आज बरेच जण “काही रक्कम बाजूला काढून ठेवतात” आणि “जगभरात चाललेल्या कार्यासाठी” असं लिहिलेल्या मंडळीच्या दानपेटीत ती टाकतात. (१ करिंथ. १६:२) मंडळ्या दर महिन्याला हे दान संबंधित देशातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पाठवतात. तसंच, तुमच्या देशात यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या कायदेशीर निगमाला तुम्ही थेट आपलं दान पाठवू शकता.a तुम्ही कोणकोणत्या प्रकारे थेट अनुदान पाठवू शकता ते पुढे सांगितलं आहे:

देणग्या

  • इलेक्ट्रॉनिक बँक ट्रान्सफर, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यांद्वारे दान. काही शाखांमध्ये, jw.org याद्वारे किंवा खास यासाठी असलेल्या वेबसाईटद्वारे देणगी देणे शक्य आहे.b

  • पैसे, दागदागिने किंवा इतर वैयक्‍तिक मौल्यवान मालमत्ता देणगी म्हणून दिली जाऊ शकते. पैसे किंवा मालमत्ता ही देणगी आहे हे सूचित करणारं एक पत्र सोबत पाठवा.

धर्मादाय योजनाc

पैशांची देणगी आणि वैयक्‍तिक मौल्यवान मालमत्ता दान म्हणून देण्याव्यतिरिक्‍त जगभरातील राज्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी दान देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते खाली दिले आहेत. तुम्हाला कोणत्याही मार्गाने किंवा मार्गांनी दान देण्याची इच्छा असली, तरीसुद्धा प्रथम तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्या देशात कोणते मार्ग उपलब्ध आहेत याची खातरी करून घ्या. प्रत्येक देशातील कायदे आणि कराच्या (Tax) बाबतीत असलेले नियम वेगवेगळे असल्यामुळे दान करण्याचा सर्वात उत्तम मार्ग निवडण्याअगोदर करांविषयी व कायदेशीर बाबींविषयी योग्य सल्लागारांचं मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे.

विमा: यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला, जीवन विमा पॉलिसीचे, वैयक्‍तिक रिटायरमेन्ट खात्याचे किंवा रिटायरमेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवलं जाऊ शकतं.

बँक खाते: मृत्यूनंतर स्थानिक बँकेच्या नियमांनुसार यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला बँक खाते देय केलं जाऊ शकतं.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌सदेखील यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला थेट दान केले जाऊ शकतात किंवा मृत्यूनंतर हस्तांतर करण्यासंबंधी करार केला जाऊ शकतो.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करून, जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करू शकता किंवा या निगमाला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. या व्यवस्थेअंतर्गत करामध्ये (Tax) काही सवलती प्राप्त होऊ शकतात.

“धर्मादाय योजना” या शब्दांवरून सूचित होतं त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींना मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे.d एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, या बाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे. तुमच्या देशातील करासंबंधीचे किंवा इतर कायदे वेगळे असल्यामुळे या माहितीपत्रकातील सूचना तुमच्या परिस्थितीला कदाचित पूर्णपणे लागू होणार नाहीत. तेव्हा, हे माहितीपत्रक वाचल्यानंतर स्वतःच्या कर किंवा कायदा सल्लागारांशी चर्चा करा. दान देण्यासाठी या वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग केल्यामुळे अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असं केल्यानं मिळणाऱ्‍या कर सवलतीदेखील वाढवता आल्या आहेत. तुमच्या देशात हे माहितीपत्रक उपलब्ध असल्यास स्थानिक मंडळीच्या सचिवाला विनंती करून त्याची एक प्रत मागवली जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी खाली दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे संपर्क साधू शकता किंवा फोन नंबरचा उपयोग करून संपर्क साधू शकता:

Jehovah’s Witnesses of India

Post Box ६४४०, Yelahanka

Bengaluru ५६००६४

Karnataka, India

Telephone: ०८०-२३०९२४२६

a भारतात हे “Jehovah’s Witnesses of India” ला देय असावे.

b भारतीय पासपोर्ट धारक पुढे दिलेल्या वेबसाईटचा उपयोग करू शकतात: www.jwindiagift.org.

c अंतिम निर्णय घेण्याआधी स्थानिक शाखा कार्यालयाशी याबद्दल खातरी करून घ्या.

d भारतात, “आपल्या मौल्यवान गोष्टींनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका मराठी, गुजराती, इंग्रजी, कन्‍नड, तमिळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा