वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 ऑगस्ट पृ. ३१-३२
  • “‘कापणीच्या कामात’ भाग घेऊन मी यहोवाची स्तुती करत आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “‘कापणीच्या कामात’ भाग घेऊन मी यहोवाची स्तुती करत आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 ऑगस्ट पृ. ३१-३२
सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी जमलेल्या एका गटासोबत योहॅन्स राउटे

सेवाकार्यात भाग घेताना योहॅन्स राउटे, हे कदाचित १९२० च्या दशकातलं छायाचित्र असावं

आमच्या संग्रहातून

“‘कापणीच्या कामात’ भाग घेऊन मी यहोवाची स्तुती करत आहे”

१ सप्टेंबर १९१५ सालच्या टेहळणी बुरूज अंकात पहिल्या महायुद्धाच्या स्थितीचं वर्णन करताना असं लिहिण्यात आलं: “आजवर झालेले सर्व संघर्ष आणि युद्धं सध्या युरोपमध्ये वाढत चाललेल्या संघर्षापुढे फिकी पडली आहेत.” या युद्धात कालांतरानं जवळजवळ ३० देश समाविष्ट झाले. टेहळणी बुरूजमध्ये असंही सांगण्यात आलं, की युद्धादरम्यानच्या कठीण परिस्थितीमुळे “[राज्याच्या] सेवेत काही प्रमाणावर अडथळा निर्माण झाला आहे, खासकरून जर्मनी आणि फ्रान्स या देशांत.”

जागतिक स्तरावर चाललेल्या या संघर्षाला बायबल विद्यार्थ्यांनाही सामोरं जावं लागलं. त्या वेळी तटस्थता नेमकी काय असते हे बऱ्‍याच विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजलेलं नव्हतं. असं असलं तरी, राज्याची सुवार्ता घोषित करण्याचा त्यांचा निर्धार मात्र पक्का होता. जर्मनीचा सैनिक असलेला विल्हेम हिल्डेब्रान्ट याचं उदाहरण घ्या. राज्याच्या कार्यात आपली भूमिका बजावण्याची त्याची मनापासून इच्छा होती. त्यामुळे त्याने फ्रेंच भाषेतील द बायबल स्टुडंट्‌स मंथली (बायबल विद्यार्थ्यांचे नियतकालिक) मागवले. तो फ्रान्समध्ये कॉलपोर्टर (पूर्ण-वेळेचा प्रचारक) म्हणून सेवा करत नव्हता, तर वर सांगितल्याप्रमाणे तो एक जर्मन सैनिक होता. यामुळे, फ्रान्सच्या शत्रू राष्ट्राचा हा सैनिक जेव्हा येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या फ्रेंच लोकांना शांतीचा संदेश सांगायचा तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटायचं.

टेहळणी बुरूजमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रांवरूनही एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. ती म्हणजे जर्मन लष्करात काम करणारे बरेच बायबल विद्यार्थी असे होते, जे सुवार्ता सांगण्याच्या कार्याला एक जबाबदारी मानायचे आणि ती पूर्ण करण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. लेमके नावाच्या बांधवाचं उदाहरण घ्या. तो नौदलात काम करायचा. तो सांगतो की त्याच्यासोबत काम करणाऱ्‍या सहखलाश्‍यांपैकी पाच खलाशी असे होते, ज्यांनी राज्याच्या संदेशात आस्था दाखवली. लेमके याने म्हटलं, “या जहाजावरही ‘कापणीच्या कामात’ भाग घेऊन मी यहोवाची स्तुती करत आहे.”

आता जॉर्ज किजर याच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. तो युद्धात एक सैनिक म्हणून गेला होता. पण जेव्हा तो परत आला तेव्हा तो एक सैनिक म्हणून नाही, तर खऱ्‍या देवाचा उपासक म्हणून परत आला. त्याच्यात हा बदल कसा झाला? त्याला कुठूनतरी बायबल विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेली प्रकाशनं मिळाली. त्यातून राज्याबद्दलचं सत्य जेव्हा त्याला शिकायला मिळालं, तेव्हा त्याने ते आपलंसं केलं आणि युद्धात लढण्याचं सोडून दिलं. तो असं काम करू लागला ज्यात त्याला शस्त्र बाळगण्याची किंवा स्वतः युद्धात जाऊन लढण्याची गरज नव्हती. युद्ध संपल्यानंतर त्याने बरीच वर्षं आवेशाने पायनियर सेवा केली.

तटस्थतेच्या भूमिकेबद्दल बायबल विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजलेलं नव्हतं. पण तरी, त्यांच्या मनोवृत्तीत आणि वागण्यात आणि युद्धाचं समर्थन करणाऱ्‍या लोकांच्या मतांमध्ये आणि वागणुकीमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता हे स्पष्टपणे दिसून आलं. जिथं राजकारणी आणि चर्चचे पुढारी युद्धाला पाठिंबा देत होते, तिथं बायबल विद्यार्थी “शांतीचा अधिपती” याला आपलं समर्थन देत राहिले. (यश. ९:६) यांपैकी काही जण पूर्णपणे तटस्थ राहिले नसले, तरी कॉनरॅड मेर्टे या बांधवाप्रमाणे ते बायबलमधील एका मूलभूत तत्त्वाला मात्र जडून राहिले. कॉनरॅड मेर्टे याने म्हटलं: “देवाच्या वचनातून मला हे स्पष्टपणे समजलं आहे की ख्रिश्‍चनांनी कोणाचाही खून करू नये.”—निर्ग. २०:१३.a

द गोल्डन एज या मासिकाची जाहिरात करण्यासाठी हान्स होल्टरहोफ ट्रॉलीचा वापर करताना

द गोल्डन एज या मासिकाची जाहिरात करण्यासाठी हान्स होल्टरहोफने या ट्रॉलीचा वापर केला

विवेकाला पटत नसल्यामुळे लष्करी कामातून सूट मिळवणं शक्य होईल, असा कोणताही नियम जर्मनीमध्ये नव्हता. तरीदेखील या ठिकाणी २० पेक्षा जास्त बायबल विद्यार्थ्यांनी लष्करात सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे यांपैकी काहींना मानसिक रोगी म्हणून घोषित करण्यात आलं, आणि वेड्यांच्या इस्पितळात टाकण्यात आलं. यात गुस्टाव कुयाट हादेखील होता. मानसिक रोगी नसतानाही त्याला इस्पितळात टाकण्यात आलं आणि त्याच्यावर उपचारदेखील सुरू केले गेले. हान्स होल्टरहोफ यानेही लष्करात भाग घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. तुरुंगात असताना युद्धाशी संबंधित असलेलं काम करण्यास त्याला सांगण्यात आलं, तेव्हा त्याने तेही करण्यास नकार दिला. त्यामुळे सैनिकांनी त्याला ‘स्ट्रेटजॅकेटमध्ये’ म्हणजे अशा एका जॅकेटमध्ये घट्ट बांधलं, ज्यामुळे त्याला हात पाय हलवणं अजिबात शक्य नव्हतं. त्यांनी त्याला इतक्या जास्त काळासाठी त्यात बांधलं, की त्याचे हातपाय अगदी सुन्‍न झाले. इतकं सगळं करूनही जेव्हा तो त्याच्या निर्धारावर पक्का राहिला, तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात येईल. पण, खरंतर त्याचा निर्धार बदलण्याच्या हेतूनं त्याला ठार मारण्यासाठी त्यांनी केलेलं हे एक नाटक होतं. युद्धाच्या संपूर्ण काळात हान्सने मात्र आपली एकनिष्ठा टिकवून ठेवली.

इतरही बऱ्‍याच बांधवांनी शस्त्र बाळगण्यास नकार दिला आणि प्रत्यक्ष युद्धात लढण्याची गरज पडणार नाही असं काम देण्यात यावं अशी विनंती केली.b योहॅन्स राउटे यांपैकी एक होता. त्याला रेल्वेमध्ये काम करण्यास पाठवण्यात आलं. कॉनरॅड मेर्टे याला वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत काम देण्यात आलं, तसंच रिनहोल्ट वेबर हा इस्पितळात मेल-नर्स म्हणून काम करू लागला. ऑगस्ट क्राफचिक यालाही या गोष्टीचं समाधान होतं की त्याला असं काम मिळालं ज्यामुळे स्वतः युद्धात जाऊन लढण्याची त्याला गरज पडली नाही. या आणि यांच्याप्रमाणे इतरही बायबल विद्यार्थ्यांचा यहोवाची सेवा करण्याचा निर्धार पक्का होता. त्यांचा हा निर्धार प्रेम आणि एकनिष्ठता याबद्दल त्यांना जी समज होती त्यावर आधारित होता.

युद्धादरम्यान बायबल विद्यार्थ्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे अधिकाऱ्‍यांनी त्यांच्या कामावर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सुरवात केली. त्याच्या नंतरच्या काही वर्षांत, जर्मनीतील बायबल विद्यार्थ्यांवर ते करत असलेल्या प्रचारकार्यामुळे बरेच खटले चालवले गेले. त्यामुळे, त्यांना साहाय्य करण्यासाठी व न्यायिक बाबी हाताळण्यासाठी जर्मनीमधील शाखा कार्यालयाने मॅगजबर्ग इथं कायदा विभाग सुरू केला.

ख्रिश्‍चनांच्या तटस्थ भूमिकेबद्दल यहोवाच्या साक्षीदारांची समज पुढे आणखी स्पष्ट होत गेली. जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा लष्करात कोणत्याही प्रकारे सहभाग न घेता बायबल विद्यार्थ्यांनी आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवली. यामुळे, त्यांना जर्मन राष्ट्राचे शत्रू समजण्यात आलं आणि त्यांचा क्रूरपणे छळ करण्यात आला. याबद्दलची विस्तारित माहिती “आमच्या संग्रहातून” या लेखमालेतील पुढील भागात देण्यात येईल.—मध्य युरोपमधील आमच्या संग्रहातून.

a टेहळणी बुरूज १५ मे २०१३ मधील “आमच्या संग्रहातून—‘परीक्षाप्रसंगी’ ते खंबीर राहिले” हा लेख पाहा. यात पहिल्या महायुद्धादरम्यान असलेल्या ब्रिटिश बायबल विद्यार्थ्यांचे अहवाल देण्यात आलेले आहेत.

b त्यांनी उचललेलं हे पाऊल मिलेनियल डॉन याच्या खंड ६ (१९०४) यातील माहितीवर आणि ऑगस्ट १९०६ च्या झायन्स वॉच टॉवरच्या जर्मन आवृत्तीमधील माहितीवर आधारित होतं. सप्टेंबर १९१५ च्या द वॉच टॉवर यामध्ये आपल्या समजुतीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. त्यात सांगण्यात आलं की बायबल विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे लष्करात सहभाग घेऊ नये. पण, हा लेख जर्मन आवृत्तीत प्रकाशित करण्यात आला नव्हता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा