आमच्या संग्रहातून
“सत्य शिकण्यासाठीच यहोवानं तुम्हाला फ्रान्समध्ये आणलं आहे”
ॲन्टवान स्कालेकी लहान होता तेव्हा त्याच्याजवळ असलेला घोडा त्याचा नेहमीचा सोबती होता. ते दोघंही अंधूक प्रकाश असलेल्या बोगद्यात, जमीनीपासून १,६०० फूट खोल असलेल्या एका खाणीत कोळसा वाहण्याचं काम करायचे. कोळशाची खाण खचल्यामुळे ॲन्टवानचे वडील जखमी झाले होते. त्यामुळे, आता ॲन्टवानलाच खाणीत नऊ तास राबावं लागणार होतं. त्याच्या कुटुंबाजवळ दुसरा काही पर्यायच उरला नव्हता. एके प्रसंगी तर खाणीत काम करताना ॲन्टवान अगदी मरता मरता वाचला होता.
पोलिश खाण कामगारांनी वापरलेली अवजारं; सम-मी-नोब्याजवळ दूशी इथल्या याच खाणीत ॲन्टवान स्कालेकी काम करायचे
१९२० आणि १९३० च्या दशकात फ्रान्समध्ये राहणाऱ्या पोलिश कुटुंबात ॲन्टवानचा जन्म झाला होता. ॲन्टवानच्या कुटुंबासारखीच अनेक पोलिश कुटुंबं फ्रान्समध्ये राहात होती. पण पोलंडचे रहिवासी फ्रान्समध्ये राहायला का आले होते? पहिल्या महायुद्धानंतर पोलंडला परत स्वातंत्र्य मिळालं. त्या वेळी तिथली वाढती लोकसंख्या एक मोठी समस्या बनली होती. दुसरीकडे पाहता फ्रान्सचे लाखो पुरुष युद्धात मारले गेले होते. त्यामुळे तिथल्या कोळशाच्या खाणींत काम करण्यासाठी त्यांना कामगारांची खूप जास्त गरज होती. म्हणून १९१९ च्या सप्टेंबर महिन्यात फ्रेंच आणि पोलिश सरकारनं इमिग्रेशन करार केला. १९३१ पर्यंत फ्रान्समध्ये राहाणाऱ्या पोलिश लोकांची संख्या ५,०७,८०० इतकी झाली आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण उत्तरेकडील खाणींच्या क्षेत्रांमध्ये राहायचे.
हे कष्टाळू पोलिश लोक जेव्हा फ्रान्समध्ये स्थलांतरित झाले, तेव्हा ते आपली धार्मिक संस्कृतीही सोबत घेऊन आले. ९० वर्षांचे ॲन्टवान आठवून सांगतात, “माझे आजोबा बायबलविषयी नेहमीच अगदी श्रद्धेनं बोलायचे. त्यांच्या वडिलांनीच त्यांच्यात ही अध्यात्मिक मनोवृत्ती बिंबवली होती.” खाणीत काम करणारी पोलिश कुटुंबं प्रत्येक रविवारी अगदी नीटनेटकी तयार होऊन चर्चला जायची. पोलंडला असतानाही त्यांची हीच रीत होती. पण, भौतिकवादी फ्रेंच लोकांना ही गोष्ट खूप विचित्र वाटायची.
नॉ-पेत-केले या ठिकाणी अनेक पोलिश रहिवाशांचा पहिल्यांदा बायबल विद्यार्थ्यांशी संबंध आला. हे बायबल विद्यार्थी १९०४ पासूनच या ठिकाणी अगदी आवेशानं प्रचार करत होते. पुढं १९१५ साली टेहळणी बुरूज नियतकालिक दर महिन्याला पोलिश भाषेत प्रकाशित होऊ लागलं. आणि, १९२५ पासून द गोल्डन एज (अवेक!) मासिक पोलिश भाषेत प्रकाशित होऊ लागलं. या मासिकांतील बायबल आधारित माहितीला अनेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिवाय, द हार्प ऑफ गॉड या पोलिश भाषेतील पुस्तकालाही त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ॲन्टवानच्या कुटुंबाला त्याच्या मामांकडून सत्य मिळालं. १९२४ साली त्याचे मामा पहिल्यांदा सभेला उपस्थित राहिले होते. त्याच वर्षी ब्रू-एन-आर्थ्वा या ठिकाणी बायबल विद्यार्थ्यांनी पोलिश भाषेतील पहिलं संमेलन भरवलं होतं. त्यानंतर एका महिन्याच्या आतच जागतिक मुख्यालयाचे प्रतिनिधी जोसेफ एफ. रदरफर्ड यांनी त्या शहराला भेट दिली. तिथं भरवण्यात आलेल्या जाहीर सभेला २,००० लोक उपस्थित होते. उपस्थितांमध्ये पोलिश लोकांची संख्या जास्त आहे हे पाहून ब्रदर रदरफर्ड अगदी भारावून गेले. ते म्हणाले, “सत्य शिकण्यासाठीच यहोवानं तुम्हाला फ्रान्समध्ये आणलं आहे. आता तुम्ही आणि तुमच्या मुलांनी फ्रेंच लोकांना मदत करण्याची ही वेळ आहे. मोठ्या प्रमाणात प्रचाराचं काम अजूनही बाकी आहे. आणि या कामासाठी प्रचारकांची व्यवस्था यहोवा नक्कीच करेल.”
यहोवानं अगदी तसंच केलं. पोलिश बांधव ज्याप्रमाणे खाणीत काबाडकष्ट करायचे, त्याचप्रमाणे प्रचारकार्यातही ते जीव ओतून काम करायचे. आपल्याला समजलेलं मौल्यवान सत्य पोलंडमधील आपल्या लोकांनाही समजावं म्हणून त्यांच्यातील काही जण पोलंडला परतले. पोलंडच्या मोठ्या प्रदेशात प्रचार करण्यासाठी फ्रान्स सोडून जाणाऱ्यांमध्ये टिओफील पिस्कोस्की, स्टेपॅन कोसियाक आणि ज्यॉ लबिदा हेही होते.
पण बऱ्याच पोलिश प्रचारकांनी फ्रान्समध्येच राहून आपल्या फ्रेंच बांधवांसोबत आवेशानं प्रचारकार्य केलं. १९२६ साली सम-मी-नोब्या या ठिकाणी झालेल्या संमेलनात पोलिश भाषेतील कार्यक्रमासाठी १,००० जण, तर फ्रेंच भाषेतील कार्यक्रमासाठी ३०० जण उपस्थित राहिले होते. १९२९ च्या ईयरबुकमध्ये याविषयी असं सांगण्यात आलं: “या वर्षी ३३२ पोलिश बांधवांनी त्यांचं अर्पण [समर्पण] जाहीर रीत्या व्यक्त करून बाप्तिस्मा घेतला.” दुसरं महायुद्ध सुरू होण्याआधी फ्रान्समधील ८४ मंडळ्यांपैकी ३२ मंडळ्या पोलिश भाषिक होत्या.
फ्रान्समधील पोलिश बांधव अधिवेशनाला जाताना. बसवरील फलकावर “यहोवाचे साक्षीदार” असं लिहिलेलं आहे
१९४७ साली पोलंडच्या सरकारनं पोलिश लोकांना परत पोलंडला येण्याचं आमंत्रण दिलं, तेव्हा अनेक पोलिश साक्षीदारांनी ते स्वीकारलं आणि ते मायदेशी परतले. पण, त्यांनी आणि फ्रेंच बांधवांनी घेतलेल्या मेहनतीचे परिणाम नंतरही दिसून आले. त्याच वर्षी फ्रान्समधील प्रचारकांच्या संख्येत १० टक्क्यांनं वाढ दिसून आली. त्यानंतर १९४८ ते १९५० या वर्षांदरम्यान तिथं २०, २३ आणि नंतर अगदी ४० टक्क्यांनं वाढ झाली. या नवीन प्रचारकांना प्रशिक्षण देण्याकरता फ्रान्सच्या शाखा कार्यालयानं १९४८ साली पहिल्यांदाच काही विभागीय पर्यवेक्षकांना नियुक्त केलं. यासाठी ज्या पाच बांधवांची निवड करण्यात आली, त्यांपैकी चार पोलिश होते आणि ॲन्टवान स्कालेकी त्यांच्यापैकी एक होते.
खाणीत आणि सेवाकार्यात भरपूर परिश्रम घेणाऱ्या आपल्या पूर्वजांकडून मिळालेली आडनावं, फ्रान्समध्ये राहणाऱ्या आपल्या पोलिश बांधवांनी बदललेली नाहीत. आजही फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेले बरेच लोक सत्य स्वीकारत आहेत. अजूनही अनेक प्रचारक आपल्या पोलिश पूर्वजांच्या चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करत आहेत. तेही आवेशानं प्रचारकार्य करत आहेत. मग ते आपल्या मायदेशी परतणारे असोत किंवा मग दुसऱ्या ठिकाणी राहणारे असोत.—फ्रान्समधील आमच्या संग्रहातून.