मुख्य विषय | चांगल्या लोकांसोबत वाईट का होते?
देव दुष्टाईचे काय करेल?
दियाबल सैतानाने सुरू केलेल्या दुष्टाईचे व दुःखाचे यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त काय करतील हे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणते: “सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र [येशू] प्रगट झाला.” (१ योहान ३:८) जगात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणारा लोभ, द्वेष आणि वाईट गोष्टी लवकरच नाहीशा केल्या जातील. तसेच, “या जगाचा अधिकारी,” म्हणजे दियाबल सैतानही “बाहेर टाकला जाईल” असे अभिवचन येशू देतो. (योहान १२:३१) मग, सैतानाचा प्रभाव नसलेले एक नीतिमान नवीन जग स्थापन होईल आणि संबंध पृथ्वीवर शांती नांदेल.—२ पेत्र ३:१३.
पण, जे लोक आपले चुकीचे मार्ग बदलण्यास तयार नसतात किंवा वाईट गोष्टी करत राहतात अशांबद्दल काय? बायबल सडेतोड शब्दांत काय अभिवचन देते ते विचारात घ्या: “सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.” (नीतिसूत्रे २:२१, २२) अशा प्रकारे जगात दुष्ट लोकांचा प्रभावच उरणार नाही. मग, आज्ञाधारक मानवांना वारशाने मिळालेल्या पापातून हळूहळू मुक्त केले जाईल.—रोमकर ६:१७, १८; ८:२१.
त्या नवीन जगात देव दुष्टाई कशी नाहीशी करेल? मानवांना यंत्रासारखे बनवून त्यांना दिलेल्या इच्छा-स्वातंत्र्याची देणगी रद्द करण्याद्वारे तो असे करेल का? नाही. तो आज्ञाधारक मानवांना त्याचे मार्ग शिकवेल आणि त्याद्वारे त्यांना वाईट विचार व चुकीची कृत्ये सोडून देण्यास मदत करेल.
दुःखाची सर्व कारणे देव नाहीशी करेल
एकाएकी घाला घालणाऱ्या आपत्तींचे काय होईल? देवाने असे अभिवचन दिले आहे, की लवकरच त्याचे राज्य-सरकार पृथ्वीचा ताबा घेईल. त्या राज्याचा राजा म्हणून देवाने येशू ख्रिस्ताला नियुक्त केले आहे. येशूजवळ सर्व रोग बरे करण्याचे सामर्थ्य आहे. (मत्तय १४:१४) इतकेच नाही, तर नैसर्गिक शक्तींवर नियंत्रण करण्याचेही सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. (मार्क ४:३५-४१) त्यामुळे “समय व प्रसंग” यांमुळे ओढवणाऱ्या दुःखाचा लवलेशही राहणार नाही. (उपदेशक ९:११; पं.र.भा.) ख्रिस्ताच्या शासनाखाली मानवांवर कधीच आपत्ती कोसळणार नाही.—नीतिसूत्रे १:३३.
आकस्मिक रीत्या मरण पावलेल्या लक्षावधी निरपराध लोकांबद्दल काय? येशूने त्याचा मित्र लाजर याला मृत्यूतून पुन्हा जिवंत करण्याआधी असे म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.” (योहान ११:२५) होय, येशूजवळ मृत लोकांचे पुनरुत्थान करण्याचे म्हणजे त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे.
चांगल्या लोकांसोबत कधीच वाईट होणार नाही अशा जगात राहण्याची कल्पना तुम्हाला आकर्षक वाटत असेल, तर बायबलचा अभ्यास करण्याद्वारे तुम्ही खऱ्या देवाबद्दल व त्याच्या उद्देशाबद्दल अधिक शिकून घेण्याचे ध्येय ठेवू शकता का? हे ज्ञान घेण्यास तुमच्या भागातील यहोवाचे साक्षीदार आनंदाने तुम्हाला मदत करतील. तेव्हा, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना लिहू शकता. ▪ (w14-E 07/01)