बायबलमधून प्रश्नांची उत्तरं
आपल्या पापांची क्षमा होऊ शकते का?
यहोवाचं मन आनंदित करणं खूप कठीण नाही
बायबल सांगतं की सर्व मानव पापी आहेत. पाप करण्याची प्रवृत्ती आपल्याला पहिला मानव आदाम याच्याकडून मिळाली. म्हणूनच आपल्या हातून कधीकधी वाईट गोष्टी होतात आणि त्याबद्दल नंतर आपल्याला पस्तावा होतो. पण आपल्या पापांसाठी देवाच्या मुलाने, येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं. आणि खंडणी बलिदानामुळे आपल्या पापांची क्षमा मिळणं शक्य झालं आहे. ही खरंच देवाकडून एक देणगी आहे.—रोमकर ३:२३, २४ वाचा.
काही लोकांनी खूप गंभीर पापं केली आहेत आणि त्यामुळे त्यांना वाटतं की ‘देव कधी आपल्याला माफ करेल का?’ पण देवाच्या वचनात असं सांत्वन दिलंय: “[येशूचं] रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.” (१ योहान १:७) जर आपली योग्य मनोवृत्ती असली आणि आपण मनापासून पश्चात्ताप केला, तर यहोवा आपल्या गंभीर पापांचीही क्षमा करायला तयार आहे.—यशया १:१८ वाचा.
क्षमा मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
जर आपल्याला वाटतं की यहोवा देवाने आपल्याला क्षमा करावी तर आपण त्याच्याबद्दल शिकून घेतलं पाहिजे. म्हणजेच आपण त्याच्या आज्ञा, मार्गदर्शन आणि अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत. (योहान १७:३) ज्यांना आपल्या वाईट वागण्याबद्दल पश्चात्ताप वाटतो आणि ते स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न करतात त्यांना यहोवा मोठ्या मनाने क्षमा करतो.—प्रेषितांची कार्यं ३:१९ वाचा.
यहोवाचं मन आनंदित करणं आपल्यासाठी खूप कठीण नाही. कारण यहोवा आपल्याला समजून घेतो. त्याला आपल्या कमतरता माहीत आहेत. तसंच, तो क्षमाशील आणि दयाळू आहे. अशा प्रेमळ आणि दयाळू देवाचं मन कसं आनंदित करता येईल, हे जाणून घ्यावंसं तुम्हाला वाटत नाही का?—स्तोत्र १०३:१३, १४ वाचा.